पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्लोव्हाकिया च्या पंतप्रधानांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2026

सन्माननीय पंतप्रधान फ़ित्सो,

दोन्ही देशांमधील मान्यवर प्रतिनिधी,

माध्यमातील सहकारी,

नमस्कार!

“दोब्री देन”

आपण केलेल्या  या अतिथ्यशील स्नेहमय स्वागताबद्दल मी पंतप्रधान फ़ित्सो यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

ते एक अनुभवी नेते तर आहेतच; त्याशिवाय भारताचे सच्चे मित्र आहेत. भारत स्लोव्हाकिया यांच्यातील संबंध नव्या उंचीवर पोहोचवण्यात, त्यांच्या अतूट मैत्रीचे आणि  कटिबद्धतेचे विशेष महत्त्व आहे. आज त्यांना भेटून, मला आमच्या संबंधामधील एक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे.

माझा हा दौरा, कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा स्लोव्हाकियाचा पहिला दौरा आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, आम्ही आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, यांचाही मला आनंद आहे. हे आमच्यातील परस्पर विश्वास, सामाईक प्राधान्यक्रम आणि सामाईक भविष्याचे प्रतीक आहे.

मित्रांनो,

आज पंतप्रधान आणि मी आमच्या सहकार्याला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्यामध्ये होत असलेली प्रगती ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.

मात्र, आमच्या क्षमता विशाल आहेत आणि आमच्या आकांक्षा त्याहूनही मोठ्या आहेत. ऑटोमोबाईल, रेल्वे, प्रगत उत्पादन आणि हरित तंत्रज्ञान ही आमच्यासाठी विशेष महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या सर्व क्षेत्रांमधील आमची ताकद एकत्रित करत, आम्ही आज दोन्ही देशांतील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

भारत-युरोपीय महासंघ यांच्यातील  मुक्त व्यापार कराराला  अंतिम स्वरूप देण्यासाठी स्लोव्हाकियाने दिलेल्या सहकार्याबद्दल मी पंतप्रधानांचे विशेष आभार मानतो. हा करार शक्य तितक्या लवकर अंमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, जेणेकरून दोन्ही देशांतील उद्योग, स्टार्टअप्स आणि व्यापारी समुदायाला त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

मित्रांनो,

आमच्या भविष्यातील भागीदारीचा तंत्रज्ञान क्षेत्र एक महत्वाचा स्तंभ आहे. डिजिटल तंत्रज्ञानावर आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

स्लोव्हाकियातील एका विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयासाठी भारत अध्यासनाची स्थापना करण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवतेची सेवा आणि प्रगतीसाठी एक प्रभावी साधन ठरावी, ही आमची समान भूमिका आहे. एआयक्षेत्राचे चे भविष्य केवळ नवोन्मेषावर आधारित नसून विश्वास , जबाबदारी आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांवर उभे राहिले पाहिजे, असे आमचे मत आहे.

अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची आपल्या दोन्ही देशांमध्ये मोठी क्षमता आहे. 2017 मध्ये स्लोव्हाकियाचा पहिला उपग्रह भारताने प्रक्षेपित केला होता. आज भारतातील अंतराळ क्षेत्र अभूतपूर्व वेगाने प्रगती करत असून नवनवीन उंची गाठत आहे. या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी मी स्लोव्हाकियातील कंपन्यांना आमंत्रित करतो.

नागरी अणुऊर्जा हे देखील दोन्ही देशांसाठी प्राधान्याचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात दोन्ही देशांतील उद्योग आणि तज्ज्ञांमधील सहकार्य अधिक बळकट करण्यावर आम्ही भर दिला आहे.

संरक्षण विषयातील सहकार्य आमच्यातील परस्पर विश्वास आणि सामरिक सहकार्याचा पुरावा आहे. मला आनंद आहे, की या महत्वाच्या क्षेत्रात आज आम्ही इरादा पत्रावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे, संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि संरक्षण उद्योगांमधील सहकार्याला नवी गती मिळणर आहे.

मित्रांनो,

जागतिक मंचावर देखील भारत आणि स्लोव्हाकिया अत्यंत दृढ सामंजस्य ठेवून वाटचाल करत आहेत. सर्व विवाद आणि तणावांवर शांततामय मार्गाने तोडगा काढला पाहिजे यावर आम्ही सहमत आहोत. आम्ही सर्व भागीदारांसोबत एकत्रितपणे या दिशेने पुढे वाटचाल करत राहणार आहोत.

जागतिक संस्थांनी एकविसाव्या शतकातील वास्तव आणि आव्हानांनुसार स्वतःची पुनर्व्याख्या करणे आवश्यक आहे, यावरही आम्ही सहमत आहोत. या विषयावर जागतिक पातळीवरील प्रयत्न अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कार्य करू.

मित्रांनो,

दोन्ही देशांमधील घनिष्ठ सांस्कृतिक संबंध आणि लोकांमधील परस्पर संपर्क, आपल्या संबंधांचा भक्कम आधार आहेत. भारतातील प्राचीन उपनिषदांचे स्लोव्हाक भाषेत झालेले भाषांतर हे आपल्या सांस्कृतिक सौहार्दाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

स्लोव्हाकियामध्ये वास्तव्यास असलेले भारतीय वंशाचे नागरिक ईथली अर्थव्यवस्था आणि समाजजीवनात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. दोन्ही देशांदरम्यान व्यावसायिक आणि कुशल कामगारांच्या आदानप्रदानाला चालना देण्यासाठी, आज आम्ही कामगारांच्या स्थलांतरासंदर्भातील सामंजस्य करार केला आहे.

तसेच, सामाजिक सुरक्षविषयक सामंजस्य करारालाही लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी आमची अपेक्षा आहे.

मान्यवर,

आजची अत्यंत फलदायी चर्चा आणि आपल्या सकारात्मक विचारसरणीसाठी, मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आपले आभार मानतो.

मी 140 कोटी भारतीयांच्या वतीने आपणास भारत भेटीचे निमंत्रण देतो. आपण हे निमंत्रण सार्वजनिकरीत्याही स्वीकारले आहे, याचा मला विशेष आनंद आहे. आपल्या स्वागतासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.

मला विश्वास आहे की आपली सर्वसमावेशक भागीदारी येत्या काळात नव्या संधी, सामायिक समृद्धी आणि आपल्या दोन्ही देशांतील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया ठरेल.

आपले मनःपूर्वक आभार.

नमस्कार !

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2273167) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam