पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरदीप सिंह पुरी यांची व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्रपतींशी चर्चा; भारताच्या ऊर्जा विविधीकरण धोरणात व्हेनेझुएलाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित


भूराजकीय व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर, एप्रिल–मे 2026 दरम्यान भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या आघाडीच्या देशांपैकी एक असलेल्या व्हेनेझुएलाकडे वाढीची भक्कम क्षमता

प्रविष्टि तिथि: 05 JUN 2026 5:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2026

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी 04 जून 2026 रोजी नवी दिल्ली इथे व्हेनेझुएला बोलिव्हेरियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्रपती डेल्सी एलोईना रोड्रिग्ज गोमेझ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी भारत आणि व्हेनेझुएला यांच्यात दीर्घकालीन आणि दृढ ऊर्जा भागीदारी उभारण्याच्या संधींवर चर्चा केली.

बैठकीदरम्यान मंत्र्यांनी नमूद केले की भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीच्या आधारावर दोन्ही देशांमध्ये नैसर्गिक भागीदारी निर्माण झाली आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्राच्या पुनर्बांधणीसाठी भारताचा ठाम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आणि भारतीय कंपन्या व्हेनेझुएलामध्ये आपली उपस्थिती अधिक बळकट करण्यास तयार असल्याचे सांगितले. भारताच्या ऊर्जा विविधीकरण धोरणात व्हेनेझुएलाची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करत त्यांनी व्हेनेझुएलाबरोबर ऊर्जा व्यापार वाढविण्यासाठी भारत उत्सुक असल्याचे सांगितले.

व्हेनेझुएलाचा विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताची दखल घेत, प्रभारी राष्ट्रपतींनी भारतीय कंपन्यांचे व्हेनेझुएलाच्या सुधारित तेल व वायू क्षेत्रात सक्रिय सहभागासाठी स्वागत केले. त्यांनी ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील परस्परपूरकतेवर भाष्य केले आणि सहकार्याच्या आणखी संधींचा शोध घेण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाने व्हेनेझुएलाला भेट द्यावी, असे निमंत्रण दिले.

पार्श्वभूमी

जगातील सर्वात मोठे तेलसाठे असलेला व्हेनेझुएला हा भारताला पूर्वापार कच्चे तेल पुरविणारा देश आहे. भारताच्या अत्याधुनिक तेल शुद्धीकरण क्षेत्रात व्हेनेझुएलाचे जड कच्चे तेल प्रक्रिया करण्याची क्षमता  आहे. आखाती प्रदेशातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर भूराजकीय घडामोडींचा परिणाम होत असताना आणि पुरवठ्यात व्यत्यय येत असताना, भारत आपल्या ऊर्जा स्रोतांच्या विविधीकरणासाठी व्हेनेझुएलासोबत एक धोरणात्मक भागीदार म्हणून संबंध अधिक दृढ करत आहे.

एप्रिल आणि मे 2026 दरम्यान भारताला कच्चे तेल पुरविणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी व्हेनेझुएला एक आहे, भविष्यातील मोठ्या संभाव्यतेचे द्योतक आहे. भारताची व्हेनेझुएलाकडून होणारी सरासरी मासिक आयात आर्थिक वर्ष 2025-26 मधील 64.027 टीएमटीवरून आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-मे कालावधीत 1,047.148 टीएमटीपर्यंत वाढली आहे.

भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची 2008 पासून व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रातील उपस्थिती  दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंधाचे प्रतीक आहे. व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रातील भारताची एकूण गुंतवणूक सुमारे 1 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी असून, ती ओरिनोको बेल्टमधील सॅन क्रिस्तोबाल आणि पेट्रोकाराबोबो-1 या प्रकल्पांमध्ये आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269387) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam