शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या, उच्च शिक्षण विभागाने, पंतप्रधान संशोधन अध्यासन योजना 2026 साठी आवेदने मागवली

Posted On: 02 JUN 2026 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जून 2026

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उच्च शिक्षण विभागाने, पंतप्रधान संशोधन अध्यासन योजना 2026, साठी आवेदनपत्रे मागवली आहेत. सरकारचा हा एक पथदर्शी राष्ट्रीय उपक्रम असून, त्याद्वारे, जगभरात नावाजलेली विद्यापीठे, प्रयोगशाळा, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत, भारतीय वंशाचे संशोधक, वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि व्यावसायिक यांना भारतातील अग्रगण्य सरकारी उच्च शिक्षण संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांमध्ये आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

ही योजना, जगभरातल्या भारतीय प्रतिभेला, देशात अत्यंत वेगाने विकसित होत असलेले संशोधन, विकास, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यांच्या व्यवस्थेशी जोडेल. यात, राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या 13 क्षेत्रांचा समावेश आहे. ही क्षेत्रे पुढीलप्रमाणे,

  1. अँडव्हान्स कॉम्प्युटिंग (प्रगत संगणन): (कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सुपर कॉम्प्युटिंग)
  2. सेमी कंडक्टर्स
  3. ऊर्जा, शाश्वतता आणि हवामान बदल
  4. सायबर सुरक्षा
  5. आरोग्यसेवा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान
  6. जैवतंत्रज्ञान
  7. प्रगत पदार्थ व महत्त्वपूर्ण खनिजे
  8. अंतराळ आणि संरक्षण
  9. प्रगत दूरसंवाद तंत्रज्ञान  
  10. उत्पादन आणि  चौथी औद्योगिक क्रांती
  11. कृषी आणि अन्न तंत्रज्ञान
  12. नील अर्थव्यवस्था 
  13. अणुऊर्जा

ही योजना तीन महत्वाच्या स्तंभावर आधारलेली आहे: आघाडीच्या संस्था, यजमान संस्था आणि पीएमआरसी फेलो.ही योजना,  देशाच्या प्राधान्य क्रमांशी सुसंगत आणि राष्ट्रीय हिताशी जोडलेली आणि  परिणामाभिमुख संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. भारताच्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि इतर विकासाच्या उद्दिष्टांना थेट हातभार लावणाऱ्या संशोधन प्रकल्पांना या योजनेत विशेष महत्त्व दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत सहभागी संस्था आणि संशोधन अध्यासनासाठी निवडल्या जाणाऱ्या तज्ज्ञांची निवड अत्यंत कठोर आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखालील अधिकारप्राप्त  समिती देखरेख करेल. या समितीची भूमिका संस्थांची पात्रता, संशोधकांची गुणवत्ता, प्रस्तावित संशोधनाचे राष्ट्रीय महत्त्व आणि संभाव्य परिणाम यांचे मूल्यमापन करून सर्वोत्तम उमेदवार व संस्थांची निवड सुनिश्चित करणे ही असेल. यामुळे या  योजनेअंतर्गत होणारे संशोधन उच्च दर्जाचे, उद्दिष्टपूर्तीकेंद्रित आणि भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी उपयुक्त ठरेल.

पीएमआरसीच्या संशोधकांना अध्ययनवृत्ती, (फेलोशिप) आणि संशोधन अनुदान पाठबळ दिले जाईल, त्याशिवाय, प्रयोगशाळा आणि संशोधनविषयक पायाभूत प्रकल्पामध्ये प्रवेश आणि आघाडीच्या  सरकारी संस्थांमधे काम करण्याची संधी मिळू शकेल.

योजनेत सहभागी होणाऱ्या यजमान संस्थांनाही अनेक महत्वाचे लाभ मिळणार आहेत. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संशोधक, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिकांशी थेट सहकार्याची संधी उपलब्ध होईल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य  अधिक मजबूत होईल. तसेच, प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधन, नवोन्मेष आणि ज्ञाननिर्मितीच्या उपक्रमांना चालना मिळून संस्थांची संशोधन क्षमता आणि जागतिक प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल.

या योजनेत संशोधकांच्या अनुभव आणि कार्यकौशल्याच्या आधारे सहभागासाठी खालील तीन श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत: युवा संशोधक- संशोधन कारकिर्दीच्या प्रारंभिक टप्प्यातील प्रतिभावान संशोधकांसाठी, व्यापक अनुभव आणि उल्लेखनीय संशोधन कार्य असलेल्या अनुभवी संशोधकांसाठी वरिष्ठ संशोधक आणि संशोधन अध्यासन ही श्रेणी, जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त, संशोधन क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या आणि उल्लेखनीय योगदान दिलेल्या संशोधकांसाठी असेल.

पीएमआरसी योजनेअंतर्गत पात्र फेलोमध्ये कर्तृत्ववान भारतीय वंशाचे संशोधक, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक यांचा समावेश आहे, ज्यामध्ये परदेशात कार्यरत असलेले भारतीय नागरिक, ओसीआय कार्डधारक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या, जागतिक स्तरावरील अग्रगण्य संस्था आणि उद्योगांमधील कर्तृत्ववान भारतीय वंशाच्या संशोधकांना आणि व्यावसायिकांना आकर्षित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

पात्र यजमान संस्थांमध्ये एन‌आयआरएफ एकूण किंवा अभियांत्रिकी श्रेणींमध्ये पहिल्या 100 मध्ये किंवा एनआयआरएफ संशोधन श्रेणीमध्ये पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवलेल्या शासकीय उच्च शिक्षण संस्थांचा, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयबीएम आर), आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएस आय आर) यांसारख्या संस्थांच्या अंतर्गत असलेल्या प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांचा समावेश आहे.

विषयात्मक क्षेत्रांमध्ये अंमलबजावणीस समर्थन देण्यासाठी सात (07) प्रमुख संस्थांची अग्रणी संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे:

  1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (आयआयटी दिल्ली)
  2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे)
  3. भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास (आयआयटी मद्रास)
  4. भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर (आयआयटी कानपूर)
  5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद (आयआयटी हैदराबाद)
  6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) धनबाद [आयआयटी (आयएसएम) धनबाद]
  7. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू (आयआयएससी बंगळूरू)

फेलो आणि यजमान संस्थांकडून 1 जून 2026 पासून पीएमआरसी पोर्टलवर अर्ज खुले आहेत.

सविस्तर मार्गदर्शक सूचना, पात्रतेचे निकष आणि अर्ज प्रक्रियेसाठी, येथे भेट द्या: https://pmrc.education.gov.in/

भारताच्या संशोधन, नवोन्मेष आणि राष्ट्रउभारणीच्या पुढील अध्यायाचा भाग व्हा. आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या प्रवासात सामील व्हा.

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267994) अभ्यागत कक्ष : 22