गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, गुजरातच्या भुज येथे भारत-पाकिस्तान सीमेवर स्थित G-7 सीमा चौकीवरील जवानांशी साधला संवाद ; G-7 आणि G-13 या सीमा चौक्यांचे केले उद्घाटन


मोदी सरकार प्रत्येक दृष्टिकोनातून त्रुटीविरहित सुरक्षा जाळे उभारत असून जिथे प्रत्यक्ष कुंपण अशक्य आहे तिथे तंत्रज्ञानावर आधारित कुंपण प्रणाली कार्यान्वित करून सरकार एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करत आहे

Posted On: 29 MAY 2026 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधल्या भुज येथे G-7 आणि G-13 दोन सीमा चौक्यांचे उद्घाटन केले आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांशी संवाद साधला.

बीएसएफ जवान अत्यंत प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत वावरतात, तरीही या ठिकाणी भेट दिल्यावर आणि देशाच्या सरहद्दींवर हसतमुख चेहऱ्याने पाय रोवून उभे राहिलेल्या  त्यांना पाहिले की त्यांच्या तुलनेत आपले काम खूपच सोपे असल्याचे जाणवते, असे अमित शाह यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

स्थापनेपासून गेल्या 60 वर्षांत सीमा सुरक्षा दलाने  देशाच्या दोन अत्यंत आव्हानात्मक सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलली असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते सुंदरबनच्या जंगलांपर्यंत, गंगासागरच्या  किनाऱ्यांपासून ते मेघालय आणि आसामच्या डोंगराळ व वनक्षेत्रांपर्यंत, बीएसएफने गेल्या सहा दशकांमध्ये संरक्षणाची पहिली फळी म्हणून आपली जबाबदारी अत्यंत प्रशंसनीयरीत्या पार पाडली आहे, असे अमित शाह म्हणाले.

सीमा सुरक्षा दलाच्या दोन हजार जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. यामुळे भारत सरकार आणि देशाच्या 1.4 अब्ज नागरिकांना बीएसएफप्रति अतीव आदर आहे आणि त्यांच्यामुळेच  आपण शांतपणे झोपू शकतो, असे शाह यांनी सांगितले.

बीएसएफच्या स्थापनेच्या 60 व्या वर्षात बीएसएफची सीमा सुरक्षा संकल्पना आमूलाग्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शाह यांनी सांगितले.  आगामी काळात चतुष्कोणीय सुरक्षा ग्रिड तयार केले जाईल सीमा सुरक्षेऐवजी प्रादेशिक सुरक्षा ही नवी संकल्पना आणली जाईल. यात बीएसएफ जवानांच्या साथीने, जनता, नागरी प्रशासन, स्थानिक पोलीस आणि लष्कर यांच्यामध्येही प्राथमिक जबाबदारी विभागून दिली जाईल, असे शाह म्हणाले.  स्मार्ट सीमा सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत, सीमांवरील सुरक्षा ग्रिड अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या उपक्रमात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून, ड्रोन, रडार , निरीक्षण मनोरे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जवानांच्या तैनातीमुळे  एक अत्यंत भक्कम सुरक्षा ग्रिड उभारले जाईल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे सुरक्षा ग्रिड पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर आपल्या सीमांचे उल्लंघन करण्याचे धाडस कोणीही करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2266775) अभ्यागत कक्ष : 10