वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी न्यूयॉर्कमध्ये जागतिक उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ नेतृत्त्वांशी उच्चस्तरीय व्यावसायिक आणि गुंतवणूकविषयक चर्चा केली


भारत-अमेरिका व्यापार आणि गुंतवणूक संबंध दृढ करणे तसेच उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्याचा विस्तार यावर भर

Posted On: 29 MAY 2026 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2026

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी, 28 मे 2026 रोजी न्यूयॉर्क इथे उच्चस्तरीय व्यावसायिक आणि गुंतवणूकविषयक चर्चा केल्या.

या भेटी दरम्यान, मंत्र्यांनी, कार्लाइल ग्रुपचे  मुख्य कार्यकारी अधिकारी हार्वे श्वार्ट्झ, मॉर्गन स्टॅनलीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टेड पिक, वॉरबर्ग पिंकसचे  अध्यक्ष चार्ल्स के,  ॲम्निअल फार्मास्युटिकल्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चिंटू पटेल, आणि मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल मीबाक यांच्याशी स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठका घेतल्या.

 भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुक संबंध  दृढ करण्यावर या चर्चांमध्ये भर देण्यात आला.  भारतातील जागतिक व्यवसायांसाठीच्या संधींचा विस्तार करणे, पुरवठा साखळीची क्षमता वाढवणे, तसेच वित्तीय सेवा, आरोग्यसेवा, डिजिटल पेमेंट्स, उत्पादन, नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख  तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य पुढे नेण्यावरही यावेळी भर देण्यात आला. या चर्चांमधून, जागतिक गुंतवणुकीचे एक प्रमुख केंद्र म्हणून भारताविषयीचे आकर्षण वाढत असल्याचेही अधोरेखित झाले.

मंत्र्यांनी अमेरिका- भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या  सहयोगाने आयोजित एका व्यावसायिक संवाद कार्यक्रमात, गुंतवणूक आणि व्यापार क्षेत्रातील 50 हून अधिक प्रमुख व्यावसायिक नेतृत्त्वांच्या मेळाव्याला संबोधित केले. या संवादामुळे भारताची मजबूत विकासगाथा, सध्या सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा, व्यवसाय सुलभता, सहकार्याची क्षमता असलेली क्षेत्रे आणि विविध प्रमुख क्षेत्रांमधील गुंतवणुकीच्या नव्याने तयार झालेल्या संधी यांवर विचारांचे आदान-प्रदान  करण्याची संधी मिळाली.

या चर्चा-संवादांमधून भारताच्या आर्थिक परिदृश्याबाबत जागतिक स्तरावर वाढत चाललेला विश्वास अधोरेखित झाला, तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ  उद्योग सहकार्याच्या महत्वाला  पुन्हा एकदा पुष्टी देण्यात आली.


निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266697) अभ्यागत कक्ष : 21