गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राजस्थानात बिकानेरमधील सांचू चौकी येथे तैनात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधला आणि तेथील महिला बॅरेक्सचे ई-उद्घाटन केले
देशाच्या सीमेलगत रस्ते बांधून, अत्याधुनिक कुंपण उभारून आणि राजस्थानातील सीमा सुरक्षा दलाच्या 180 चौक्यांना नळाद्वारे पेयजल पुरवून मोदी सरकार सीमाभागातील परिस्थितीत परिवर्तन घडवून आणत आहे
प्रचंड भौगोलिक आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही सीमा सुरक्षा दलाचे जवान सीमेवर ठामपणे उभे राहिले ; आम्ही 2,000 हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानाला वंदन करतो
येत्या 6 महिन्यांत सीमेवर ड्रोन-विरोधी यंत्रणा तैनात करण्यात येतील, सीमा सुरक्षेसाठी लवकरच जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल
सीमावर्ती भागात अंतर्गत धोके निर्माण करणाऱ्यांवर आपण कडक नजर ठेवली पाहिजे,आणि त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे
Posted On:
26 MAY 2026 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज बिकानेर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर उभारलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सांचू चौकीवर तैनात सैनिकांशी संवाद साधला आणि महिलांच्या बॅरेक्सचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.

यावेळी उपस्थित सैनिकांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की बीएसएफच्या स्थापनेपासून, या दलातील जवानांनी, भाजून काढणारा उकाडा, कडाक्याची थंडी, पाऊस, घनदाट जंगले, हिमाच्छादित शिखरे किंवा 45 अंश ते उणे 45 अंश अशा दोन्ही टोकांचे तापमान यापैकी कोणत्याही घटकाची पर्वा न करता, कर्तव्याप्रती समर्पण,शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाच्या भावनेसह देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. ते म्हणाले की सीमा सुरक्षा दलातील 2,000 जवानांचे बलिदान हे केवळ बीएसएफ आणि भारत सरकारवरील ऋण नाही तर ते 1.4 अब्ज भारतीयांवर बीएसएफचे ऋण आहे. केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की संपूर्ण देशाला सीमा रक्षकांचा अभिमान आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, देशाच्या सुकन्यांचा प्रत्येक क्षेत्रात लिंगनिरपेक्ष पद्धतीने सहभाग सुनिश्चित करण्याचा तसेच त्यांना समान संधी मिळवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.ते पुढे म्हणाले की वर्ष 2030 पर्यंत सीमा सुरक्षा दलात तैनात असलेल्या महिला सैनिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा मिळतील यांची सुनिश्चिती करून घेतली जाईल. राजस्थानात 79 बॅरेक्स बांधायला परवानगी देण्यात आली असून सुमारे 39 कोटी रुपये खर्च करून त्यापैकी 67 बॅरेक्सच्या उभारणीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. यातील 14 बॅरेक्सचे आज उद्घाटन करण्यात आले अशी माहिती शाह यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, बीएसएफच्या निगराणीखाली असलेल्या सीमाभागात 200 कोटी रुपये खर्च करून एकूण 356 बॅरेक्स बांधण्यात येणार आहेत.

याप्रसंगी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून, देशाच्या सुरक्षा स्थितीत आमूलाग्र परिवर्तन झाले आहे.
अमित शाह म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान बीएसएफ – म्हणजेच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली.
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, संपूर्ण राजस्थानच्या सीमेवरील वाळवंटी प्रदेशातून जाणार्या एका समांतर रस्त्याच्या बांधकामास सुरुवात झाली आहे.
अमित शाह म्हणाले की, बीएसएफच्या पारंपरिक भूमिकेकडे आता एका नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, केवळ सीमा सुरक्षेपुरते मर्यादित न राहता, या दलाने तस्करी, घुसखोरी यासारख्या बेकायदा, अवैध कृत्यांबाबत तसेच सीमेपलिकडून होणाऱ्या कारवायांविरुद्ध सतत सतर्क राहून आपली सज्जता अधिक बळकट केली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, जर सीमेपासून 50 किलोमीटरच्या परिघामध्ये कोणत्याही प्रकारे कृत्रिम लोकसांख्यिकीय बदल घडवून आणला जात असेल, तर बीएसएफने त्याबाबत सतर्क राहावे आणि राज्य सरकारला त्वरित माहिती द्यावी. त्यांनी असेही नमूद केले की, ड्रोन आणि इतर माध्यमांद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी सर्व आवश्यक कठोर उपाययोजना करणे, ही आपली जबाबदारी आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकार आगामी सहा महिन्यांच्या आत ‘अँटी-ड्रोन यंत्रणा’ (ड्रोन-विरोधी प्रणाली) बसवण्यास सुरुवात करेल. तथापि, त्यांनी या गोष्टीवर विशेष भर दिला की, ड्रोन भारतीय भूमीवर उतरल्यानंतर ते कोणाच्या हाती लागतात आणि त्याद्वारे आणलेल्या साहित्याचा वापर देशविरोधी कारवायांसाठी कोण करते, हे शोधून काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. अमित शाह म्हणाले की, अशा प्रकारच्या कारवायांवर सतत कडक पाळत ठेवणे गरजेचे आहे. या कारवाया निष्प्रभ करण्यासाठी, नागरी प्रशासन आणि जिल्हा पोलिस यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे समन्वय साधणे अत्यावश्यक आहे. तसेच यावरील प्रतिसाद हा निश्चितपणे परिणामकारक असला पाहिजे, तो दिसूनही आला पाहिजे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, सीमेपलीकडून निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांवर सतत कडक नजर ठेवणे गरजेचे आहे. त्याच वेळी, ज्यांचा वापर देशांतर्गत धोके निर्माण करण्यासाठी केला जातो, अशा आपल्या देशाच्या सीमांतर्गत असलेल्या घटकांकडेही लक्ष दिले पाहिजे.अशा व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली पाहिजे. मंत्री शाह म्हणाले की, पाकिस्तान आणि बांगलादेश लगतच्या सीमांचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर आहे. सीमा सुरक्षा हे केवळ एका दलाची जबाबदारी नसून, ती आपल्या सर्वांचीच एक सामायिक प्रादेशिक जबाबदारी आहे.
सुषमा काणे/संजना चिटणीस/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265650)
अभ्यागत कक्ष : 8