दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक वायफाय सुलभ आणि अधिक सहज उपलब्ध करण्यासाठी पीएम-वाणीमध्ये सामान्य नागरिकांना अनुकूल सुधारणा

Posted On: 26 MAY 2026 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2026

देशाची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या आणि  नागरिकांसाठी इंटरनेटचा वापर अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, दूरसंवाद विभागाने पीएम-वाणी  (प्रधानमंत्री  वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस) अंतर्गत वापरकर्त्यांसाठी अनुकूल अशा सुधारणांची मालिका  सुरु केली   आहे.

या नवीन उपाययोजनांमध्ये समाविष्ट बाबी:

लॅपटॉप आणि दुय्यम उपकरणांसाठी क्यूआर-आधारित प्रमाणीकरण

15, 30 आणि 60 मिनिटांच्या लवचिक व अल्प-

कालावधीच्या वायफाय प्लॅन्सची सुरुवात

सुलभ ओळख आणि अधिक विश्वासार्हतेसाठी पीएम-वाणी  हॉटस्पॉट नावांचे (एसएसआयडी) मानकीकरण

या सुधारणा, दूरसंवाद विभागाच्या  22 मे 2026 रोजी प्रसिद्ध परिपत्रक क्र. 1/PM-WANI/2026 आणि 2/PM-WANI/2026 च्या  माध्यमातून लागू करण्यात आल्या आहेत. 

पीएम-वाणीशी संबंधित सर्व भागधारकांना ही  परिपत्रके  लागू झाल्यापासून आठ आठवड्यांच्या आत सुधारित दिशानिर्देश अमलात आणण्याचे आणि  जुलै  2026 पर्यंत संपूर्ण व्यवस्थेमध्ये  वापरकर्त्यांसाठी ही नवीन सुलभ वैशिष्ट्ये कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

या सुधारणा, प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी किफायतशीर आणि सुलभ करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकार करत असलेल्या निरंतर प्रयत्नांचा भाग आहेत. 

केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या नेतृत्वात पीएम वाणी व्यवस्थेत सर्वसमावेशक परिवर्तन घडत असून, हे परिवर्तन सुलभ उपलब्धता, आंतरकार्यक्षमता, वापरण्यातील सुलभता आणि नागरिकांद्वारे स्वीकाराला चालना,  या बाबींवर केंद्रित आहे.

पीएम-वाणीअंतर्गत कार्यान्वयाला गती देणे, वापरकर्त्याचा अनुभव अधिक सुधारणे यासाठी,दूरसंवाद राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी अलीकडेच विभागाचे अधिकारी आणि संबंधित भागधारकांसोबत सविस्तर आढावा बैठका घेतल्या.  

डॉ.पेम्मासानी यांनी या सुधारणांविषयी सांगितले.पीएम-वाणी हा सर्वांना सार्वजनिक वाय-फाय उपलब्ध करून देण्यासाठीचा आमचा मंच  आहे आणि आम्ही त्याचा वापर अधिक सुलभ करत आहोत. आता क्यूआर -आधारित लॉगिन' सुविधेमुळे तुम्ही तुमच्या फोनवरील कोड स्कॅन करून तुमचा लॅपटॉप सहजपणे वाय-फायशी जोडू शकता. तसेच, ज्या वापरकर्त्यांना केवळ थोड्या काळासाठी इंटरनेटची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी  15, 30 आणि  60 मिनिटांचे अल्प-कालावधीचे प्लॅन्स उपलब्ध करण्याचा सल्लाही हॉटस्पॉट ऑपरेटर्सना दिला असल्याचे, त्यांनी सांगितले. 

आजच्या डिजिटल युगात, सार्वजनिक वाय-फाय ही एक महत्त्वाची सार्वजनिक सुविधा म्हणून उदयास येत असून  देशभरातील विद्यार्थी, प्रवासी, दैनंदिन प्रवासी, व्यावसायिक आणि लहान उद्योगांना ती सहायक  ठरत आहे.

क्यूआर प्रमाणीकरणाद्वारे सुलभ लॅपटॉप कनेक्शन 

पीएम वाणी अधिक सुलभरित्या उपलब्ध करण्यासाठी दूरसंवाद विभागाने आता लॅपटॉपसारख्या द्वितीयक उपकरणांसाठी क्यूआर आधारित प्रमाणीकरणास परवानगी दिली आहे. वापरकर्ते एखाद्या प्रमाणित स्मार्टफोन ॲपचा वापर करून, लॉगिन पृष्ठावरील क्यूआर कोड स्कॅन करून जोडले जाऊ  शकतात.  यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होऊन  वेग आणि सुरक्षित कामकाज शक्य होते. 

लवचिक अल्प कालावधीचे ॲक्सेस प्लॅन्स 

ट्रान्झिट हब, मॉल्स, यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी वापरकर्त्यांना साहाय्य करण्यासाठी ऑपरेटर्सनी अल्प कालावधीचे वैधता प्लॅन्स उपलब्ध करून द्यावेत, असा सल्ला दूरसंवाद विभागाने दिला आहे. 15, 30 आणि  60 मिनिटांचे प्लॅन्स दैनंदिन प्रवासी आणि विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर ठरतात, त्याचसोबत ऑपरेटर्सचा महसूल वाढवण्यास आणि हॉटस्पॉटचा उपयोग वाढवण्यास चालना देतात. 

मानकीकृत हॉटस्पॉट 

वापरकर्त्यांना प्रमाणित नेटवर्क ओळखण्यात साहाय्य करण्यासाठी एसएसआयडी नामपद्धती आता पीएम-वाणी ब्रॅण्डिंगसह मानकीकृत करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत प्रारंभ करण्यात आलेली पीएम- वाणी योजना पीडीओ, पीडीओए आणि ॲप प्रदात्यांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून व्यापक, किफायशीर इंटरनेट पुरवते. या सुधारणांचा उद्देश सार्वजनिक वायफाय पायाभूत सुविधेचा राष्ट्रव्यापी स्तरावर अवलंब वाढवण्यासाठी चालना  देणे, हा आहे. 

निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2265491) अभ्यागत कक्ष : 9