आदिवासी विकास मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिलेल्या राजनैतिक भेटवस्तूंच्या माध्यमातून भारताच्या आदिवासी वारशाचे दर्शन घडवले
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2026 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अलीकडील राजनैतिक भेटीगाठींदरम्यान, भारताच्या वैविध्यपूर्ण स्थानिक कला आणि सांस्कृतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खास निवडक भेटवस्तू जागतिक नेत्यांना देऊन, भारताच्या समृद्ध आदिवासी वारसा आणि पारंपरिक कलाकुसरीचे दर्शन घडवले.
स्विडनच्या युवराज्ञी व्हिक्टोरिया यांना, भारताच्या चैतन्यमय आदिवासी कला वारशाचे प्रतीक म्हणून मध्य प्रदेशातील पारंपरिक गोंड चित्र भेट देण्यात आले. गोंड आदिवासी समुदायाची ही कलाशैली तिच्यावरील बिंदू आणि रेषांच्या नाजूक नक्षीकामासाठी, नैसर्गिक गडद रंगसंगती आणि निसर्ग-आधारित संकल्पनांच्या चित्रणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते. गोंड कला ही मध्य भारतातील आदिवासी कलाकारांना उपजीविकेच्या शाश्वत संधी पुरवत आली आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना आसाममधील पारंपरिक मुगा रेशमी स्टोल, तसेच मणिपूरच्या तांगखुल नागा समुदायाने विणलेला शिरुई लिली स्टोल भेट देण्यात आला. नैसर्गिक सोनेरी झळाळी आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असलेले मुगा रेशीम, आसामच्या शतकानुशतकांच्या विणकाम परंपरेचे प्रतीक असून त्याला भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. तर शिरुई लिली स्टोल हा तांगखुल नागा जमातीची सांस्कृतिक ओळख आणि कलात्मक परंपरा दर्शवतो, तसेच मणिपूरचे दुर्मिळ राज्यपुष्प शिरुई लिलीपासून तो प्रेरित आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या राजमातोश्रींना मणिपूरमधील काळा तांदूळ(चक हाओ ) भेट देण्यात आला. या क्षेत्रातील आदिवासी डोंगराळ समुदायाकडून पारंपरिकरित्या लागवड केले जाणारे हे वारसा धान्य आहे. आपल्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांसाठी सर्वत्र ओळखला जाणारा हा 'चक-हाओ' तांदूळ, स्थानिक समुदायांनी अनेक पिढ्यांपासून जपलेल्या समृद्ध कृषी परंपरांचे प्रतीक आहे.

या राजनैतिक भेटवस्तूंच्या माध्यमातून पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर भारताच्या आदिवासी परंपरा, स्थानिक हस्तकला आणि सांस्कृतिक वारशाचे प्रभावी दर्शन घडवले, तसेच देशाच्या कलात्मक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्यामध्ये आदिवासी समुदायांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचीही दखल घेतली.
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2265356)
आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam