कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या 35 वर्षांच्या अनुभवांवर आधारित लिहिले ‘अपनापन’ हे पुस्तक
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या हस्ते 26 मे रोजी ‘अपनापन’चे प्रकाशन
प्रविष्टि तिथि:
14 MAY 2026 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2026
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या त्यांच्या 35 वर्षांच्या सहवासाचा आणि अनुभवांचा वृत्तांत असलेल्या ‘अपनापन’ या आपल्या नवीन पुस्तकाची घोषणा केली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चौहान यांनी अनेक दशकांचे संघटनात्मक कार्य, सार्वजनिक सेवा, प्रशासन आणि राष्ट्र उभारणीच्या काळात पंतप्रधानांसोबतच्या आपल्या घनिष्ठ संबंधांचा हा एक वृत्तांत असल्याचे सांगितले. या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन 26 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘अपनापन’ हे पुस्तक वाचकांना पंतप्रधान मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्वशैली, संवेदनशीलता आणि कार्यशैली अधिक जवळून आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून समजून घेण्याची संधी देते, असे चौहान यांनी या पुस्तकाबद्दल बोलताना सांगितले.
आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनात नरेंद्र मोदींसोबत काम करताना आलेले अनुभव, भावना, प्रेरणा आणि मूल्यांना या पुस्तकात शब्दबद्ध केले असल्याचे चौहान यांनी सांगितले. 1991 मधील एकता यात्रेपासून सुरू झालेला त्यांचा पंतप्रधानांसोबतचा सहप्रवास साडेतीन दशकांहून अधिक जुना असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांच्या संघटन कौशल्यावर प्रकाश टाकताना चौहान म्हणाले की, संघटनेचा विस्तार करण्याची, निवडणूक रणनीती आखण्याची, तळागाळापर्यंत विचार पोहोचवण्याची आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे त्यांचे कौशल्य ही त्यांची एक प्रमुख ताकद राहिली आहे. नेतृत्व हे अनेकदा केवळ संघटनात्मक कणखरतेशी जोडले जाते, मात्र नरेंद्र मोदी यांच्या मनात कामगार, गरीब, शेतकरी, माता, भगिनी आणि समाजाच्या शेवटच्या स्तरातील लोकांविषयी प्रचंड ममत्व आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. हाच मानवतावादी दृष्टिकोन पंतप्रधानांच्या नेतृत्वाला वैशिष्ट्यपूर्ण आणि दूरगामी बनवतो, असे त्यांनी सांगितले.
पुस्तकाचे सार स्पष्ट करताना चौहान म्हणाले की, ‘अपनापन’ हे केवळ घटनांचे वर्णन नाही, तर एक असा दस्तऐवज आहे जो एक विचार, दृष्टीकोन, कार्यपद्धती आणि भारताला बदलण्याचे धाडस करणाऱ्या राष्ट्रनिर्माणाच्या भावनेचे प्रतिबिंब आहे. या पुस्तकात वाचकांना संघटनेपासून प्रशासनापर्यंत, संवेदनशीलतेपासून निर्णयक्षमतेपर्यंत आणि दृढनिश्चयापासून पूर्ततेपर्यंतच्या प्रवासाची एक जवळून झलक मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2261263)
आगंतुक पटल : 51