गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद इथे, एनडीआरएफच्या राष्ट्रपती ध्वज सन्मान समारंभाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित


केंद्र सरकार उष्माघाताशी संबंधित मृत्यूच्या घटना शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे - गृहमंत्री

या आधी,आपत्ती व्यवस्थापन कार्य मदत-प्रणित असे, मात्र मोदी सरकारने केवळ प्रतिसादात्मक न राहता,ते प्रतिबंधात्मक आणि विधायक कार्यात रूपांतरित केले

आपत्ती व्यवस्थापनाप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10-कलमी अजेंडा आणि 360 अंशातला सर्वव्यापी दृष्टिकोन आपत्ती जोखीम व्यवस्थापनाला नवी दिशा देणारा - गृहमंत्री

Posted On: 14 MAY 2026 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मे 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद इथे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद  दल- एनडीआरएफच्या राष्ट्रपती ध्वज सन्मान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित केले. केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, एनडीआरएफ चे महासंचालक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एनडीआरएफ ला राष्ट्रपती ध्वज सन्मान मिळणे, केवळ तुमच्या उल्लेखनीय सेवांचा सन्मान नसून, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, ग्रामपंचायतींपासून राज्य सरकारांपर्यंतची संपूर्ण यंत्रणा, एनसीसी, एनएसएस तसेच सेवेत कार्यरत हजारो आपत्ती स्वयंसेवक यांच्या योगदानाचीही राष्ट्रपतींकडून घेण्यात आलेली दखल आहे, असे गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले.

एनडीआरएफच्या स्थापनेपासून गेल्या 20 वर्षांत देशभरातील पूर, भूकंप, चक्रीवादळे आणि इतर आपत्तींच्या काळात यशस्वी बचाव व मदतकार्य करून या सेवेने 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे, असेही अमित शाह यावेळी म्हणाले. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांचा जीव वाचवला आहे, 9 लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. नागरिकांमध्ये सुरक्षितता आणि विश्वासाची भावना निर्माण केली आहे.

अमित शाह यांनी सांगितले की, आज 116 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे नागरिकांना सर्व प्रकारच्या आपत्तींपासून संरक्षण देण्याच्या एनडीआरएफच्या क्षमतेत अधिक बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून भारताने केवळ आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी कार्य केले नाही, तर आता देश ‘शून्य जीवितहानी’ या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याच्या स्थितीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

उष्णतेच्या लाटांसारख्या गंभीर आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी गृह मंत्रालय पूर्णपणे सज्ज आहे. मोदी सरकार उष्माघातामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्षमता वृद्धी आणि समुदायाचा सहभाग यावर गृहमंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने नेहमीच अतिशय भर दिला आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. एन डी आर एफ ने स्वतःचे 8,500 जवान, दहा हजारांहून जास्त नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि दोन लाख वीस हजारांहून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे मोठे काम हाती घेतले आहे. गेल्या दोन वर्षात साडेदहा हजार हून जास्त नाविकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी यांचा  दहा कलमी कार्यक्रम  आणि आपत्ती व्यवस्थापनासाठीचा 360 अंशाचा सर्वव्यापी दृष्टिकोन   यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमीच नवीन दिशा मिळाली आहे. आपत्ती धोका मापन, धोक्याचा इशारा देणारी व्यवस्था, समुदायाचा सहभाग आणि मार्गदर्शक तत्त्वांची आखणी यासारख्या क्षेत्रांना बळकटी आणण्यासाठी ती उपयोगी पडते. भारत हा जागतिक स्तरावर निर्विवाद नेतृत्व आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रथम प्रतिसाद देणारा म्हणून उदयाला येत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. वसुधैव कुटुम्बकम हे तत्व वास्तवात  आणण्यात आले असून ते प्रत्यक्ष परिस्थितीतही लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून भारताने आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा क्षेत्रात जागतिक नेतृत्वपद मिळवले आहे. आज 48 देश सीडीआरआयचे सदस्य असून त्या दिशेने भारतासोबत काम करत असल्याचे ते म्हणाले.


निलीमा चितळे/विजया सहजराव/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 

 


(Release ID: 2261031) अभ्यागत कक्ष : 20