गृह मंत्रालय
भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) आणि रिझर्व बँकेचे नवोन्मेष केंद्र(आरबीआयएच) दरम्यान गुन्हेगारांची खाती आणि सायबर आर्थिक गुन्हे ओळखण्यासाठी एआय- प्रणाली बळकट करण्यासाठी सामंजस्य करार
Posted On:
12 MAY 2026 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2026
गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) आणि रिझर्व्ह बँकेचे नवोन्मेष केंद्र (RBIH) यांनी बँकिंग आणि डिजिटल पेमेंट परिसंस्थेतील सायबर-आधारित आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आणि 'म्युल खात्यांना' म्हणजेच गुन्हेगारांच्या खात्यांना प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य बळकट करण्याकरिता एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. फसवणुकीच्या जोखमीबाबत माहितीची देवाणघेवाण, विश्लेषणात्मक सहाय्य आणि सक्रिय फसवणूक शोध आणि प्रतिबंधक यंत्रणा मजबूत करण्यासाठी कार्यान्वित समन्वयाला चालना देणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी X वर पोस्ट केले की, "मोदी सरकार सायबर सुरक्षित भारतासाठी अथक परिश्रम करत आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यामध्ये गुन्हेगारांशी संबंधित 'म्युल खाती' हे मोठे अडथळे आहेत. आज गृह मंत्रालयांतर्गत I4C ने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) सोबत सायबर फसवणुकीचा मुकाबला करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) शक्तीचा वापर करण्याकरिता एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हे पाऊल I4C च्या संशयितांच्या नोंदणी पुस्तिकेतील (Suspect Registry) डेटा AI-आधारित फसवणूक शोध यंत्रणेला पुरवून छुप्या 'म्युल खात्यांचा' वेगाने शोध घेईल आणि त्यांना नष्ट करेल; तसेच सायबर गुन्ह्यांविरुद्ध अत्याधुनिक सुरक्षा कवच म्हणून नागरिकांची सेवा करेल."
या सामंजस्य करारावर I4C च्या आयजी (प्रशासन) रूपा एम. आणि आरबीआयएच चे सीईओ साहिल किन्नी यांनी स्वाक्षरी केली. यावेळी आरबीआय चे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन; गृह मंत्रालयाचे विशेष सचिव (IS) आनंद स्वरूप; गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव (CIS) राकेश राठी; I4C चे सीईओ राजेश कुमार आणि आरबीआय, आरबीआयएच आणि I4C मधील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सामंजस्य करारांतर्गत, बँकांमध्ये लागू केलेल्या MuleHunter.ai™ सारख्या एआय-आधारित फसवणूक शोध यंत्रणांना अधिक मजबूत करण्यासाठी I4C आणि आरबीआयएच हे 'म्युल खात्यांशी' संबंधित माहिती आणि I4C-MHA च्या संशयितांच्या नोंदणी पुस्तिकेतील संशयित लक्षात घेऊन त्यांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सहकार्य करतील. आरबीआयएच या डेटाचा वापर MuleHunter.ai™ सह AI-आधारित फसवणूक-जोखीम मूल्यांकन मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी आणि सुधारणेसाठी करेल.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP), संशयितांची नोंदणीपुस्तिका आणि इतर माहितीची-देवाणघेवाण करणाऱ्या गुप्तचर यंत्रणांसारख्या मंचांच्या माध्यमातून I4C भारताच्या सायबर गुन्हे प्रतिसाद परिसंस्थेला बळकट करण्यासाठी आणि त्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या RBIH ने तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम आणि AI- च्या मदतीने फसवणूक शोध चौकटीच्या विकासाद्वारे वित्तीय क्षेत्रात नवोन्मेषाला चालना दिली आहे. डिजिटल पेमेंट परिसंस्थेची सुरक्षा आणि लवचिकता मजबूत करणे आणि त्याद्वारे डिजिटल बँकिंग परिसंस्थेतील नागरिकांचा विश्वास वाढवणे हा याचा उद्देश आहे.
सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260377)
अभ्यागत कक्ष : 4