MIFF banner

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (MIFF) प्रतिनिधी नोंदणी सुरु 


MIFF हा वृत्तपट, लघु कथात्मक आणि एनिमेशन पटांसाठीचा दक्षिण आशियातील सर्वात जुना महोत्सव, त्याचे आयोजन 15 ते 21 जून 2026 दरम्यान मुंबईत होणार

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (MIFF) आयोजन 15 ते 21 जून 2026 दरम्यान मुंबईत होणार असून त्यासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरु झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) इमारत, पेडर रोड, मुंबई, महाराष्ट्र इथे होणार आहे. MIFF हा नॉन-फिचर पटांसाठी समर्पित दक्षिण आशियातील सर्वात जुना व सर्वात प्रतिष्ठेचा महोत्सव असून जगभरातील  चित्रनिर्माते, कलाकार, माध्यम व्यावसायिक व चित्ररसिकांसाठी मोठे आकर्षण आहे.  

जागतिक स्तरावर आशय निर्मितीमध्ये भारतीय चित्रपट उद्योग आघाडीवर असून, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून  (MIFF) उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी महत्वाचे व्यासपीठ तसेच नवीन संधीचे महाद्वार खुले होते. 

MIFF 2026 साठी प्रतिनिधी नोंदणी 

MIFF च्या नूतन आवृत्तीसाठी अधिकृत संकेतस्थळावर प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली असून स्वारस्य असलेल्यांनी MIFF च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात https://miff.in/en ऑनलाईन नोंदणी करावी. 

नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रतिनिधींनी https://my.miff.in/dashboard/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

नवीन वापरकर्त्यांनी स्वतःचे खाते उघडणे आवश्यक आहे. सध्याच्या वापरकर्त्यांनी थेट साइन इन करावे. नोंदणी करताना आवश्यक माहिती भरावी व नोंदणी शुल्क रु 500/- भरावे. 

विद्यार्थ्यांसाठी नोंदणी निःशुल्क आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जासोबतची कागदपत्रे व माहिती तपासल्यानंतर आयोजक त्यांना प्रवेश मंजूर करतील. 

नोंदणीसंबंधी कोणतीही मदत हवी असल्यास कृपया https://www.pib.gov.in/registration@miff.in यावर संपर्क करावा, तसेच तांत्रिक अडचणींसाठी digitalteam@nfdcindia.com यावर संपर्क साधावा. 

१९ व्या MIFF बद्दल अधिक माहिती 

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) अतिशय महत्वाचा उपक्रम असून वृत्तपट, लघु कथात्मक व एनिमेशन चित्रपटांसाठीचा दक्षिण आशियातील सर्वात जुना व सर्वात मोठा महोत्सव आहे. हा महोत्सव प्रथम 1990 साली (बॉम्बे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या नावाने) सुरु झाला होता, आणि आता भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांचे गुणवत्तापूर्ण चित्रपट प्रदर्शित करण्याचे एक चैतन्यमय व्यासपीठ म्हणून तो नावाजला जातो. 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भव्य स्वरूपात उदघाटन व समारोप सोहळा होणार असून महोत्सवात भारतीय स्पर्धात्मक विभागात प्रतिष्ठेचे सुवर्ण व रौप्य शंख पुरस्कार तसेच रू. 55 लाख इतक्या रोख रकमेचे पुरस्कार आहेत. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नवोन्मेष / प्रायोगिक चित्रपटांसाठी प्रमोद पती पुरस्कार, तंत्रज्ञानविषयक उत्कृष्टतेसाठी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपट पुरस्कार व सवोत्कृष्ट प्रथम दिग्दर्शन पुरस्कार हे काही महत्वाचे पुरस्कार या महोत्सवात दिले जातात. 

या महोत्सवात स्पर्धात्मक नसलेलेही अनेक मुक्त विभाग आहेत, त्यात प्रिझम या भागात भारतातील तसेच जगभरातील उत्कृष्ट व नवीन वाट चोखाळणारे चित्रपट, निवडक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे  पुरस्कार विजेते चित्रपट,  स्वतंत्र अभिव्यक्तीचे चित्रपट, देशविशिष्ट भर असलेले चित्रपट, नूतनीकरण केलेले अभिजात चित्रपट, वन्यजीव-आधारित चित्रपट, प्रशिक्षणार्थींचे चित्रपट, नवमाध्यम व एआय चित्रपट यांचा समावेश आहे. 

MIFF २०२६ हा चित्रपटविषयक उत्कृष्टतेचा आणि प्रतिभेच्या आदानप्रदानाचा महोत्सव असून त्यामध्ये चित्रपटांची गाला स्क्रिनिंग्ज, रेड कार्पेट इव्हेंट्स, मास्टर क्लासेस, पॅनल चर्चा, वेव्हज डॉक बाजार इत्यादी अनेक उपक्रम होणार आहेत. प्रथमच  वेव्हज डॉक बाजार अंतर्गत आशयनिर्माते, चित्रनिर्माते व तंत्रज्ञांसाठी समर्पित  'इमर्सिव्ह मार्केट' हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. व्ही आर, ए आर, एक्स आर तसेच चर्चात्मक कार्यक्रम यावर भर असणाऱ्या या इमर्सिव्ह मार्केट मध्ये नवकल्पनांचे प्रकल्प प्रदर्शित केले जातील, कथाकथनाच्या नवीन पद्धती तसेच नवीन सहयोगाची सुरुवात करून देण्यावर इथे भर दिला जाईल. 

***

माधुरी पांगे/उमा रायकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2259444   |   Visitor Counter: 51