पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींसंदर्भात आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


घरगुती एलपीजी सिलिंडर्सचे वितरण  सुरळीत सुरू  असून, काल 50.5 लाख घरगुती एलपीजी सिलिंडर्सचे केले वितरण 

आखाती प्रदेशातून गेल्या 24 तासात मायदेशी परतलेल्या 30 खलाशांसह आतापर्यंत एकूण 2,447 भारतीय खलाशी परतले सुखरूप

भारतीय हज यात्रेकरूंची पहिली तुकडी, उदया, 18 एप्रिल 2026 ला होणार रवाना; एकूण 1.75 यात्रेकरू यंदा करणार हजयात्रा

Posted On: 17 APR 2026 6:23PM by PIB Mumbai

 

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने, देशातल्या नागरिकांना अद्ययावत माहिती देण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले असून, त्याचाच भाग म्हणून आजही आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात देण्यात आलेली माहिती :-

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार:

सरकारची तयारी आणि पुरवठा व्यवस्थापन उपाययोजना

· सध्याच्या अस्थिर भू-राजकीय परिस्थितीतही, देशात घरगुती एलपीजी, पीएनजी आणि वाहनांसाठीचा सीएनजी पुरवठा 100 टक्के सुरळीत राहील, हे सुनिश्चित केले जात आहे.  

· घरगुती तसेच, व्यावसायिक ग्राहकांना नव्या पीएनजी जोडण्या देण्याची विनंती राज्य सरकारांना करण्यात आली आहे. 

· एलपीजी ची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठीची कारवाई आणि छापे सुरूच आहेत. 16 एप्रिल 2026 पर्यंत 2900 पेक्षा अधिक छापे घालण्यात आले.

· सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांनी छापे आणि तपास सुरूच ठेवला असून, 225 एलपीजी वितरकांवर दंड तर 65 एलपीजी वितरकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

एलपीजी पुरवठा

घरगुती एलपीजी  पुरवठा स्थिती :

· काल  व्यावसायिक ऑनलाइन एलपीजी बुकिंगचे प्रमाण सुमारे 98% पर्यंत वाढले आहे.

· दिनांक 16. एप्रिल 2026 रोजी 50.5 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि  वाटप उपाययोजना:

· काल सुमारे 400 शिबिरांमधून 8643 – 5 किलो एफटीएल विक्री झाली.

· अलीकडेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने वाशी इथे येथे 16 एप्रिल 2026 रोजी आयोजित केलेल्या 5 किलो एफटीएल जनजागृती शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 800 – 5 किलो एफटीएल सिलिंडर्स विकले गेले.

· 23 मार्च 2026 पासून आतापर्यंत मुक्त बाजारात 16.41 लाखांहून अधिक 5 किलो एलपीजी सिलिंडर्स विकले गेले आहेत.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

· डी-पीएनजी आणि सीएनजी-वाहतुकीसाठी ग्राहकांना प्राधान्याने 100% पुरवठा निश्चितपणे देण्याचे नियोजन आहे.

· खत कारखान्यांना त्यांच्या सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या सुमारे 95% पर्यंत गॅस  वाटप करण्यात येत आहे.

· मार्च 2026 पासून सुमारे 4.68 लाख पीएनजी जोडण्यांना गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच, सुमारे 5.23 लाख ग्राहकांनी नवीन जोडणीसाठी नोंदणी केली आहे.

· 16 एप्रिल 2026 पर्यंत, सुमारे 37,000 पीएनजी ग्राहकांनी मायपीएनजीडी डॉट इन या संकेतस्थळाद्वारे आपापल्या एलपीजी जोडण्या परत दिल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे कार्यान्वयन

· सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्पांकडे कच्च्या तेलाचे पुरेसे साठे असून हे प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे पुरेसे साठे राखलेले आहेत.

· देशांतर्गत मागणीचा पुरवठा करण्यासाठी देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये होणारे एलपीजीचे उत्पादन वाढविण्यात आले आहे.

· 9 एप्रिल 2026 पासून सुमारे 2550 मेट्रिक टन प्रोपिलीनची विक्री करण्यात आली आहे.

किरकोळ इंधन उपलब्धता आणि किंमतींबाबत उपाययोजना

· देशभरातील किरकोळ विक्री केंद्रे सामान्यपणे कार्यरत आहेत.

सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक

पुढील माहिती देण्यात आली,

· युद्धामुळे प्रभावित प्रदेशातील सर्व भारतीय नाविक सुरक्षित आहेत आणि मागील 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणत्याही घटनेची नोंद झाली नाही.

· जहाज वाहतूक महासंचालनालय नियंत्रण कक्षाने 6,727 दूरध्वनी कॉल आणि स्थापनेपासून 13,987 पेक्षा अधिक कॉल हाताळले आहेत. गेल्या 24 तासांत 147 कॉल आणि 276 ईमेल कक्षाकडे आले आहेत.

· जहाज वाहतूक महासंचालनालयाने आतापर्यंत 2,447 हून अधिक भारतीय नाविकांच्या परतीसाठी सुरक्षित प्रवासाची सोय केली आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून येणाऱ्या 30 जणांचा समावेश आहे.

· भारतभरातील बंदरांचे कामकाज सामान्यपणे चालू आहे, कोणत्याही बंदरात अतिरिक्त गर्दीची नोंद झालेली नाही.

प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशियाई प्रदेशातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे. या प्रदेशांतील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी लक्षपूर्वक प्रयत्न करीत आहे. याबाबत पुढील माहिती दिली,

· भारतीय दूतावास आणि मिशन्स 24x7 हेल्पलाईन्स चालवत असून भारतीय नागरिकांना सक्रिय मदत करीत आहेत व त्यासाठी ते स्थानिक सरकारांशी सतत संपर्कात आहेत.

· अद्ययावत मार्गदर्शक सूचना नियमितपणे जारी केल्या जात आहेत.

· भारतीय मिशन्स त्या प्रदेशातील रहिवासी भारतीय समुदायाशी, विविध भारतीय संघटना, संस्था, व्यावसायिक गट आणि भारतीय कंपन्यांशी सक्रिय संपर्कात असून त्यांच्या अडचणींवर मार्ग काढत आहेत.

· आमची मिशन्स त्या प्रदेशातील जहाजांवरील भारतीय नाविकांना सर्व प्रकारे मदत करीत आहेत. यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांशी आणि संस्थांशी समन्वय, वाणिज्य दूतावासाशी सहकार्य, भारतातील कुटुंबांशी संवाद सुलभ करणे आणि भारतात परत येण्याच्या विनंत्यांना मदत करणे यांचा समावेश आहे.

· हवाई हद्द खुली आहे, अशा देशांमधून विमान उड्डाणे सुरू आहेत. 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 10 लाख 38 हजार प्रवाशांनी या प्रदेशातून भारतात प्रवास केला.

· संयुक्त अरब अमिरातीमध्ये, विमान कंपन्यांनी परिचालन आणि सुरक्षाविषयक बाबींचा विचार करून, यूएई आणि भारत यांच्या दरम्यान मर्यादित 'अनियोजित व्यावसायिक उड्डाणे' सुरू ठेवली असून, आज यूएई आणि भारत दरम्यान सुमारे 105 उड्डाणे अपेक्षित आहेत.

· सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील गंतव्यस्थानांसाठी उड्डाणे सुरू आहेत.

· कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले असल्यामुळे कतार एअरवेज आज भारतासाठी सुमारे 10 विमानांचे उड्डाण आयोजित करेल अशी अपेक्षा आहे.

· कुवेतची हवाई हद्द बंद आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेज सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावरून भारतात अनियोजित व्यावसायिक उड्डाणे चालवत आहेत.

· बहरीनची हवाई हद्द खुली आहे. बहरीनची 'गल्फ एअर' बहरीनहून भारतासाठी मर्यादित विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन करत आहे, तसेच, सध्या सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावरून भारतातील विविध ठिकाणांसाठी अनिर्धारित विमानांचे संचालन करत आहे.

· इराकची हवाई हद्द मर्यादित संचालनासह  खुली असूनपुढील प्रवास करण्यासाठी या क्षेत्रातील गंतव्यस्थानांकडे मर्यादित विमानसेवा उपलब्ध आहे.

· तेहरानमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत 2,358 भारतीय नागरिकांना इराणमधून अर्मेनिया आणि अझरबैजान मार्गे भारतात आणण्यासाठी सहाय्य केले आहे, यात 1,041 भारतीय विद्यार्थी आणि 657 भारतीय मच्छिमारांचा समावेश आहे.

· इस्रायलची हवाई हद्द अंशतः खुली असून, विमान वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू आहे. भारतीय नागरिकांना जॉर्डन आणि इजिप्तमार्गे भारतात परतण्याची सुविधा उपलब्ध आहे.

हज यात्रा 2026

· अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आज 2026 या वर्षासाठी भारतातून हज यात्रेची सुरुवात करण्यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी केले.

· भारतीय हज यात्रेकरूंचा पहिला जत्था  18 एप्रिल 2026 रोजी देशभरातील विविध ठिकाणांहून सौदी अरेबियासाठी रवाना होईल.

· एकूण 175025 यात्रेकरू हज यात्रेला जातील अशी अपेक्षा आहे.

· रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि हज आणि उमराह मंत्रालयासह संबंधित सौदी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. यात्रेकरूंच्या स्वागतासाठी ते सज्ज आहेत.

· भारत सरकार यात्रेकरूंच्या कल्याणाला आणि हिताला सर्वोच्च प्राधान्य देत असून, त्यांना सुरळीत आणि आरामदायी तीर्थयात्रेचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे.

· मंत्रालय हज यात्रेला जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देत आहे.

· अधिक माहितीसाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले प्रसिद्धी पत्रक पहावे.

***

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/रेश्मा बेडेकर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2253178) अभ्यागत कक्ष : 9