पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींविषयी आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून समन्वित दृष्टिकोनाचा अवलंब

जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येऊनही देशात औषधे आणि औषधनिर्मितीला लागणाऱ्या सामग्रीच्या विक्री किमतीत मोठी वाढ झालेली नाही

भारतीय ध्वज असलेले एलपीजी जहाज 'ग्रीन आशा' 5 एप्रिलला होर्मुझची सामुद्रधुनी पार केल्यानंतर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) येथे सुरक्षितपणे पोहोचले

तेहरानमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थी आणि मच्छीमारांसह 2,170 भारतीय नागरिकांना इराणमधून अर्मेनिया आणि अझरबैजानमार्गे भारतात पुढील प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करून दिली

Posted On: 09 APR 2026 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीबद्दल माध्यमांना माहिती देण्यासाठी  केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आजही राष्ट्रीय माध्यम केंद्रात आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषद घेतली.

औषधनिर्माण क्षेत्रातील सद्यस्थिती

रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने सद्यस्थितीबद्दल माहिती दिली आहे:

केंद्र सरकारने पश्चिम आशियातील संकटामुळे औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याचे नमूद केले आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्याने  सॉल्व्हेंट्स (द्रावक) आणि ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स (एपीआय ) वर झाला आहे.

ही आव्हाने असूनही देशात औषधे आणि औषधनिर्मितीला लागणाऱ्या  सामग्रीच्या विक्री किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ झालेली नाही.

· औषधनिर्माण उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी आणि अत्यावश्यक व जीवनरक्षक औषधांची अविरत उपलब्धता  सुनिश्चित करण्यासाठी, महसूल विभागाने  1 एप्रिल  2026 रोजीच्या अधिसूचनेद्वारे  40 पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क कमी करून शून्यावर आणले आहे.

औषधनिर्माण क्षेत्राचे पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राबरोबर  विशेषतः औषधे आणि सिरपच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण कच्चा माल  आणि सॉल्व्हेंट्ससाठी मजबूत मूल्य-साखळी संबंध आहेत,.

· औषधनिर्माण विभाग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि रसायने व पेट्रोकेमिकल्स विभाग यांच्याशी जवळून  समन्वय साधत  काम करत आहे, जेणेकरून औषधनिर्मितीसाठी  आवश्यक असलेला कच्चा माल विनाव्यत्यय उपलब्ध होईल. या द्रावकांचा , विशेषतः  महत्त्वपूर्ण प्रमाण असलेल्या प्रोपिलीनचा पुरवठा  उपलब्धतेनुसार रसायन आणि द्रावक उत्पादकांना यथाप्रमाण केला  जातो.

औषधनिर्माण उद्योगाला आवश्यक असलेल्या प्रमुख द्रावकांमध्ये प्रोपिलीन, अमोनिया आणि मिथेनॉल यांचा समावेश होतो, तर काही विशिष्ट प्रतिजैविकांसाठी ब्युटेनॉल कमी प्रमाणात लागते.

· प्रोपिलीन हा सर्वात महत्त्वपूर्ण  घटक आहे, कारण त्याचा उपयोग आयसोप्रोपिल अल्कोहोल (IPA) आणि आयसोब्युटिल बेंझिनच्या उत्पादनात केला जातो , जे आयबुप्रोफेनसारख्या औषधांमध्ये वापरले जातात.

सध्या प्रोपिलीनचा मोठा हिस्सा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कोची आणि मुंबई येथील रिफायनरींमार्फत पुरवला  जात असून, तो आयसोप्रोपिल अल्कोहोलच्या प्रमुख उत्पादकांना पुरवला जातो.

· संबंधित विभागाच्या सहकार्याने, खत उद्योगाने औषधनिर्माण कंपन्यांना अमोनिया आणि संबंधित कच्च्या मालाचा पुरेसा पुरवठा होईल याची खात्री दिली आहे.

·मिथेनॉलचा पुरवठा ही एक चिंतेची बाब बनली होती; मात्र आसाम पेट्रोकेमिकल्स आणि गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स (जीएनएफसी) यांनी पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यास सहमती दर्शवली आहे आणि  वाहतुकीची व्यवस्था केली जात असून  पुरवठा सुरू झाला आहे.

· मेटफॉर्मिन आणि ऍस्पिरिनसारख्या औषधांसाठी इंटरमीडिएट म्हणून वापरल्या जाणाऱ्या मिथाइलेटेड अमोनियम उत्पादनांच्या उपलब्धतेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाने मॉर्फोलीनसाठीचा गुणवत्ता नियंत्रण आदेश तात्पुरता स्थगित  केला आहे. मॉर्फोलीन हे अनेक जीवनरक्षक औषधांच्या निर्मितीमध्ये वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक आहे.

· औषधनिर्माण क्षेत्रातील पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियमच्या पुरवठ्यात अडथळे आले होते, परंतु पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असून एका आठवड्यात परिस्थिती सामान्य होईल अशी  अपेक्षा आहे.

अत्यावश्यक औषधांचे उत्पादन विनाखंड  सुरू राहावे यासाठी केंद्र सरकार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या समन्वयाने,आवश्यकतेनुसार महत्त्वपूर्ण सामग्रीचा पुरवठा सुलभ करत आहे.

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता असे सांगण्यात आले की:

सार्वजनिक सल्ला आणि नागरिक जनजागृती

• नागरिकांनी घाबरून जात, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची खरेदी करु नये तसेच माहितीकरिता केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा.
• एलपीजी ग्राहकांनी डिजिटल बुकिंग प्लॅटफॉर्मचा वापर करावा आणि वितरकांकडे प्रत्यक्ष जाणे टाळावे.
• नागरिकांना पीएनजी (PNG) तसेच इलेक्ट्रिक किंवा इंडक्शन कुकटॉप्ससारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

सरकारची सज्जता आणि पुरवठा व्यवस्थापन उपाययोजना

सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीतही, सरकारने देशांतर्गत, विशेषतः रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसाठी, एलपीजी आणि पीएनजी पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे.

अंमलबजावणी आणि देखरेखविषयक कारवाई

· एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी, छापे आणि इतर कारवाई सुरूच आहे. काल, देशभरात, 3300 पेक्षा जास्त  छापे घालण्यात आले  आणि सुमारे 600 सिलेंडर्स जप्त करण्यात आले.

· आतापर्यंत देशभरात, 1.16 लाखांपेक्षा जास्त छापे घालण्यात आले आहेत.

·एलपीजी पुरवठा

घरगुती एलपीजी पुरवठा स्थिती:

· घरगुती एलपीजी सिलेंडर्सची पुरवठा सेवा सुरळीत सुरू आहे.

· 8 एप्रिल 2026 रोजी, 51.5 लाखांपेक्षा अधिक घरगुती एलपीजी सिलेंडर्स वितरीत करण्यात  आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा व वितरण उपाययोजना:

· एकूण व्यावसायिक एलपीजी वितरण संकटपूर्व काळातील पातळीच्या सुमारे 70% पर्यंत वाढविण्यात आले असून त्यात, 10% वितरण, सुधारणा करणाऱ्या राज्यांच्या प्रोत्साहन संलग्न योजनेअंतर्गत आहे.

· या उपाययोजनांमुळे पुरवठा साखळीतील अडथळे दूर होण्याची अपेक्षा आहे. जेणेकरुन, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही आणि जागतिक संकटाच्या काळातही उद्योगक्षेत्र सातत्याने सुरू राहील.

· सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी  गेल्या 6 दिवसांत 5 किग्रॅ एफटीएल सिलेंडर्ससाठी,  सुमारे 2000 जनजागृती शिबिरे आयोजित केली असून, त्यामध्ये 20,000 हून अधिक 5 किग्रॅ FTL सिलिंडरची विक्री करण्यात आली आहे.

· दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी, फेब्रुवारी 2026 महिन्यातील दररोजच्या सरासरी 77,000 च्या तुलनेत देशभरात 1.06 लाखांहून अधिक 5 किलो एफटीएल सिलेंडर्सची विक्री झाली.

· 23 मार्च 2026 पासून, विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांसह दुर्बल घटकांना मुक्त विक्रीअंतर्गत, सुमारे 10 लाख 5 किलो एलपीजी सिलिंडरची विक्री करण्यात आली आहे.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तारविषयक उपक्रम:

· प्राधान्य क्षेत्रांना संरक्षित पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये घरगुती पीएनजी आणि सीएनजी वाहतूक क्षेत्राला होणारा 100% पुरवठा समाविष्ट आहे.

· उपलब्ध साठा आणि नियोजित एलएनजी मालवाहतुकीच्या अपेक्षेच्या आधारे, खत कारखान्यांना दिला जाणारा एकूण वायू पुरवठा 5% ने वाढविण्यात आला असून, तो 09.04.2026 रोजी, त्यांच्या आधीच्या सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या सुमारे 95% पर्यंत पोहोचेल.

· सीजीडी म्हणजेच, सिटी गॅस वितरण  नेटवर्कसह इतर औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना होणारा वायू पुरवठा 6 एप्रिल 2026 पासून आणखी 10% ने वाढविण्यात आला आहे.

· मार्च 2026 पासून सुमारे 3.97 लाख पीएनजी जोडण्यांना गॅस पुरवठा सुरू करण्यात आला असून, सुमारे 4.30 लाख नवीन ग्राहकांनी जोडणीसाठी नोंदणी केली आहे.

· MYPNGD.in या संकेतस्थळाद्वारे 18,000 हून अधिक पीएनजी ग्राहकांनी त्यांच्या एलपीजी जोडण्या स्वेच्छेने परत केल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प:

· सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प, कच्च्या तेलाच्या  पुरेशा साठ्यासह  संपूर्ण क्षमतेने कार्यरत असून पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा राखण्यात येत आहे.

· देशांतर्गत वापराला चालना देण्यासाठी तेल शुद्धीकरण प्रकल्पामधून होणारे एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले आहे.

किरकोळ इंधन उपलब्धता व किंमतविषयक उपाययोजना:

· देशभरातील किरकोळ इंधन विक्री केंद्रे सुरळीत कार्यरत आहेत.

· पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

· सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, राज्य सरकारांना प्रसारमाध्यमांद्वारे अचूक माहिती प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत.

केरोसीन उपलब्धता व वितरण उपाययोजना:

· राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना नियमित वाटपाव्यतिरिक्त अतिरिक्त 48,000 किलोलीटर (KL) केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.

सागरी सुरक्षा आणि जहाजवाहतूक:

पर्शियन आखातातील सध्याची सागरी परिस्थिती तसेच भारतीय जहाजे आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली, ती पुढीलप्रमाणे:

· बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावासांच्या समन्वयाने पर्शियन आखातातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

· युद्धग्रस्त प्रदेशातील सर्व भारतीय सागरी कर्मचारी सुरक्षित असून, गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणतीही घटना नोंदवली गेलेली नाही.

· 5 एप्रिल 2026 रोजी होर्मुझची सामुद्रधुनी पार केलेले भारतीय ध्वजधारक एलपीजी जहाज ग्रीन आशा आज सकाळी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण इथे सुरक्षित पोहोचले आहे.

· जहाजवाहतूक महसंचालनालय नियंत्रण कक्षाने, ते सुरू झाल्यापासून एकूण 5,647 फोनकॉल्स आणि 12,043 ईमेल्स हाताळले आहेत, यात, गेल्या 24 तासातल्या 166 कॉल्स आणि 317 ईमेल्सचा समावेश आहे.

 सागरी जलवाहतूक महासंचालनालयाने आतापर्यंत 1,803 पेक्षा जास्त भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले आहे. यात गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून मायदेशी परतलेल्या 49 खलाशांचाही समावेश आहे.

भारतीय खलाशांचे कल्याण आणि सागरी जलवाहतुकीचे कार्यान्वयन विनाखंड सुरु राहावे याची सुनिश्चिती करण्यासाठी मंत्रालयाच्या वतीने परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी क्षेत्रातील भागधारकांशी दृढ समन्वय राखला जात आहे.

या क्षेत्रातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

भारतीय दूतावास आणि इतर कार्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या गेलेल्या मदतीसह या क्षेत्रातील अलीकडील घडामोडींची माहितीही या सत्रात सामायिक केली गेली. याबाबत मंत्रालयाने दिलेली माहिती खाली नमूद केली आहे :

भारत पश्चिम आशियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सातत्यपूर्णतेने या क्षेत्रातील देशांशी संपर्क राखून आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री दि. 11 ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान, ते द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यासाठी तसेच भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतील.

भारत उच्चस्तरीय संपर्कांच्या माध्यमातून या क्षेत्रातील इतर देशांसोबतही संपर्क साधत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री 9 आणि 10 एप्रिल 2026 रोजी कतारच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

केंद्र सरकार आखाती आणि पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मंत्रालयातील एक समर्पित 24x7 सेवा देणारा नियंत्रण कक्ष कार्यरत असून, या कक्षाद्वारे  राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांसोबतही समन्वय राखला जात आहे.

 या संपूर्ण क्षेत्रातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

भारतीय दूतावास आणि कार्यालयांच्या वतीने चोवीस तास मदत क्रमांकांची सेवा पुरवली जात आहे, ते सक्रीयपणे भारतीय नागरिकांना सातत्याने मदत पुरवत आहेत.

स्थानिक सरकारांसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे, विमान उड्डाणे आणि प्रवासाची स्थिती तसेच दुतावासविषयक सेवांबाबतची माहिती देणाऱ्या अद्ययावत ताज्या मार्गदर्शक सूचना त्या त्या वेळी  नियमितपणे जारी केल्या जात आहेत.

भारताचे दूतावास या क्षेत्रातील भारतीय समुदायाच्या संघटना, व्यावसायिक गट, भारतीय कंपन्या आणि इतर भागधारकांसोबत दृढ संपर्क राखून आहेत.

ज्या देशांमध्ये हवाई क्षेत्र खुले आहे, तिथून विमान उड्डाणे सुरू आहेत. 28 फेब्रुवारी पासून आतापर्यंत सुमारे 8,15,000 प्रवासी या प्रदेशातून भारतात परतले आहेत.

हवाई उड्डाण्णासंबंधीची कार्यान्वयीन स्थिती आणि सुरक्षा विषयक परिस्थिती लक्षात घेऊन, संयुक्त अरब अमिरातीमधून भारतासाठी मर्यादित संख्येने बिगर नियोजित व्यावसायिक विमान उड्डाणे केली जात आहेत,  आज सुमारे 85 विमानांचे उड्डाण होईल अशी अपेक्षा आहे,

सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे सुरू आहेत.

कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले असून तिथून कतार एअरवेजच्या वतीने आज भारतासाठी सुमारे 8 ते 10 बिगर नियोजित विमानांचे उड्डाण केले जाईल अशी अपेक्षा आहे.

कुवेतचे हवाई क्षेत्र बंद आहे. जजीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेजच्या वतीने सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावरून भारतासाठी बिगर नियोजित व्यावसायिक उड्डाणे चालवली जात आहेत. भारतीय नागरिकांसाठी सौदी अरेबियामार्गे प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे.

बाहरीनचे हवाई क्षेत्र आता खुले झाले आहे. गल्फ एअरच्या वतीने लवकरच बाहरीन मधून भारतासाठी मर्यादीत स्वरुपात विमान उड्डाणे सुरु केली जातील अशी अपेक्षा आहे. सध्या सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावरून भारतासाठी बिगर नियोजित उड्डाणे केली जात आहेत. भारतीय नागरिकांना सोदी अरेबिया मार्गे भारतात येण्यासाठी सुविधा पुरवली जात आहे.

तेहरानमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत इराणमधील 2,170 भारतीय नागरिकांना इराणमधून अर्मेनिया आणि अझरबैजान पर्यंत पोहचून पुढे भारतात परत येण्यासाठीच्या प्रवासाकरता मदत पुरवली आहे. यात 971 भारतीय विद्यार्थी आणि 657 भारतीय मच्छिमारांचा समावेश आहे.

इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद आहे. भारतीय नागरिकांना जॉर्डन आणि इजिप्तमार्गे भारतात येण्यासाठी सुविधा पुरवली जात आहे.

इराकचे हवाई क्षेत्र आता खुले झाले आहे, तरीही विमान उड्डाण सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. भारतीय नागरिकांना जॉर्डन आणि सौदी अरेबियामार्गे भारतात येण्यासाठी सुविधा पुरवली जात आहे.


निलीमा चितळे/शैलेश पाटील/सुषमा काणे/राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2250597) अभ्यागत कक्ष : 28