माहिती आणि प्रसारण मंत्रालय
योजना, कुरुक्षेत्र आणि एम्प्लॉयमेंट न्यूज ही नियतकालिके आता वेव्हज या ओटीटी मंचावर विनामूल्य स्वरुपात उपलब्ध
प्रकाशन विभागाने इंडिया इयर बुकसह 227 ई-बुक्स विनामूल्य उपलब्ध करून दिली
Posted On:
09 APR 2026 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026
प्रकाशन विभागाने आपली प्रमुख नियतकालिके योजना, कुरुक्षेत्र, आजकल आणि बाल-भारती यांसह एम्प्लॉयमेंट न्यूज हे साप्ताहिक प्रसार भारतीच्या वेव्हज या ओटीटी मंचावर विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे हा समृद्ध ज्ञानसाठा देशभरातील वाचकांसाठी थेट उपलब्ध झाला आहे. ही घडामोड म्हणजे प्रकाशन विभागाने डिजिटल ज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरले आहे.

देशभरातील वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विश्वासार्ह, माहितीपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आशय-मजकुराचे लोकशाहीकरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही मासिक नियतकालिके त्यांतील सामाजिक-आर्थिक प्रश्न, ग्राम विकास, साहित्य आणि मुलांच्या शिक्षणासारख्या विषयांवरील तपशीलवार विश्लेषणासाठी ओळखली जातात. तर एम्प्लॉयमेंट न्यूज हे रोजगाराच्या संधी, भरती संबंधीच्या अधिसूचना, करिअर विषयक मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाबाबतची विश्वासार्ह तसेच योग्य वेळेत माहिती पुरवणारे नियतकालिक असून, ते नोकरी शोधणाऱ्यांसाठीचा एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणून उपयुक्त ठरणारे नियतकालिक आहे.
या नियतकालिकांव्यतिरिक्त, वैविध्यपूर्ण विषयांवरील ई-बुक्सचा सर्वसमावेशक संग्रह देखील वेव्हज या ओटीटी मंचावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये भारताचे प्रशासन,अर्थव्यवस्था आणि विकास प्रक्रियेशी संबंधित उपक्रमांबद्दलची अधिकृत आणि तपशीलवार माहितीसाठी ओळखले जाणाऱ्या भारत इयर बुक या प्रसिद्ध आणि एका प्रमुख प्रकाशनाचाही समावेश आहे. या उपक्रमाअंतर्गत सद्यस्थितीत, एकूण 227 ई-बुक्स वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली गेली आहेत.
आपल्या डिजिटल सेवांचा अधिक विस्तार करण्याचा उद्देश प्रकाशन विभागाने समोर ठेवला असून, त्याअंतर्गत येत्या एप्रिल अखेरपर्यंत वेव्हज या ओटीटी मंचावर अंदाजे 300 अतिरिक्त ई-बुक्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन विभागाने केले आहे. ही प्रकाशने नाममात्र दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे ज्ञानाचा प्रसार करण्याचे विभागाचे अभियान सातत्यपूर्णतेने सुरू राहील आणि त्यासोबतच वाचकांना परवडणाऱ्या दरात प्रकाशने उपलब्ध होतील याची सुनिश्चितीही होणार आहे.
वाचकांना ही सुविधा अधिक सुलभतेने उपलब्ध व्हावी, आणि त्याचवेळी ही सुविधा वाचकांसाठीही सोयीस्कर ठरावी या उद्देशाने, प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेली मुद्रित पुस्तके देखील वेव्हज या ओटीटी मंचावरून खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली गेली आहे. ओएनडीसी ( Open Network for Digital Commerce) आराखड्यांतर्गत सामायिक सुविधा केंद्रावरील ग्रामीण ई-स्टोअरच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागासह देशभरातील वाचकांसाठी प्रत्यक्ष मुद्रित प्रती सुरळीतपणे उपलब्ध होतील याची सुनिश्चिती होणार आहे. याअंतर्गत सद्यस्थितीत एकूण 524 मुद्रित पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध करून दिली गेली आहेत.
या उपक्रमातून, आपल्या प्रकाशनांची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच वाचकांच्या बदलत्या पसंतीनुसार त्यांना सेवा देता यावी यासाठी डिजिटल व्यासपीठांचा उपयोग करून घेण्याबद्दलची प्रकाशन विभागाची वचनबद्धता अधोरखित होते. डिजिटल स्वरुपातील विनामूल्य उपलब्धता, परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध करून दिलेला सशुल्क आशय मजकूर आणि प्रत्यक्ष पुस्तकांची उपलब्धता अशा सगळ्या घटकांचे एकात्मिकरण घडवून आणत, वाचनाशी संबंधित एक सर्वसमावेशक परिसंस्था घडवण्याचे उद्दिष्ट विभागाने समोर ठेवले आहे.
नागरिकांनी वेव्हज या ओटीटी मंचावर सध्या उपलब्ध असलेल्या नियतकालिकांच्या आणि ई -बुक्सच्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण संग्रहाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागाने केले आहे.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250565)
अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam