गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची जागतिक नवकार महामंत्र दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती


आज ज्या वेळी जगाला शांततेची गरज आहे,अशा वेळी नवकार मंत्राचे सामूहिक पठण वातावरण शुद्ध करण्याबरोबरच मनातील कोलाहल शांत करण्यास देखील मदत करेल

नवकार मंत्र ही एक पूर्णपणे निराकार, निष्पक्ष आणि वैश्विक प्रार्थना आहे, ज्यामध्ये काळ, जात, प्रदेश किंवा धर्म यावर आधारित कोणताही भेदभाव नाही

Posted On: 09 APR 2026 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह,‘विश्व नवकार महामंत्र दिना’निमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, जगाच्या विविध भागांमध्ये आपापली विचारधारा स्थापित करण्याच्या प्रयत्नांतून संघर्ष सुरू असताना, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी येथे नवकार मंत्राचा सामूहिक जप करणे अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रासंगिक आहे. ते म्हणाले की, भारत हा विविध पंथ आणि धर्मांचा देश आहे, जिथे प्रत्येक परंपरा मंत्रांचे विशेष महत्त्व आणि आध्यात्मिक शक्ती अधोरेखित करते.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, मंत्र मानवी जीवनाला उच्च मार्गाच्या दिशेने मार्गदर्शन करतात, आपली चेतना जागृत करतात आणि उदात्त हेतूंना अधिक बळकट करतात. ते पुढे म्हणाले की, जेव्हा लोक श्रद्धापूर्वक सामूहिकपणे  एकाच मंत्राचा जप करतात, तेव्हा त्याचा लाभ केवळ व्यक्तीलाच नाही, तर संपूर्ण राष्ट्राला आणि जगालाही होतो.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जेव्हा एखादी व्यक्ती आदराने नतमस्तक होते, तेव्हा तिच्या अहंकाराच्या विरघळण्याची ती  सुरुवात असते. गृहमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्तीने परिपूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे, क्रोध, अहंकार, कपट आणि लोभ यांवर पूर्ण विजय मिळवला आहे आणि जी व्यक्ती जैन धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या 12 दैवी गुणांनी युक्त आहे, तिला अरिहंत मानले जाते आणि आम्ही अशा अरिहंतांना वंदन करतो.

अमित शाह म्हणाले की, आपण 108 सद्गुणांना सामूहिकरित्या वंदन करतो, जे अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांच्यामध्ये निहित असतात. ते म्हणाले की, या मंत्राद्वारे  अत्यंत कमी वेळात त्या सर्वांच्या सद्गुणांचे एकत्रितपणे स्मरण आणि वंदन  करता येते.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, नवकार मंत्राची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे, ज्यात 24  तीर्थंकर आणि त्यांच्या अनुयायांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते पुढे म्हणाले की, आज ज्या वेळी जगाला शांततेची गरज आहे, त्या वेळी नवकार मंत्राचा सामूहिक जप वातावरण शुद्धीबरोबरच मनातील अशांतता दूर  करण्यास मदत करू शकतो. यामुळे परस्पर सामंजस्य, सलोखा आणि एकमेकांबद्दलची संवेदनशीलता देखील दृढ होईल.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2250457) अभ्यागत कक्ष : 23