महिला आणि बालविकास मंत्रालय
8 व्या पोषण पंधरवडा 2026 चा उद्या राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ होणार असून जीवनाच्या पहिल्या 6 वर्षांत मेंदूचा जास्तीत जास्त विकास करणे या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे
Posted On:
08 APR 2026 2:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026
महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने येत्या 9 ते एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवड्याची 8 वी आवृत्ती राबवली जाणार आहे. या पंधरवड्यातून देशातील षोषण विषयक फलनिष्पत्तीत सुधारणा घडवून आणण्याबद्दलची सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला पोषणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. व्यवस्थित पोषण लाभलेला बालक हा भक्कम राष्ट्राचा पाया असतो. पोषण अभियान हा केवळ सरकारी कार्यक्रम नाही, तर हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक माता आणि बालकाच्या सर्वांगीण पोषणाची सुनिश्चित करणारी ही एक लोकचळवळ आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
येत्या 9 April 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथून, पोषण पंधरवडा 2026 चा राष्ट्रीय पातळीवर प्रारंभ केला जाईल. महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्यासह महिला आणि बाल विकास सचिव अनिल मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल.
जीवनाच्या पहिल्या 6 वर्षांत मेंदूचा जास्तीत जास्त विकास करणे ही या पोषण पंधरवडा 2026 ची संकल्पना आहे. बालपणीचे सुरुवातीचे दिवस, विशेषतः पहिले 1,000 दिवस, हे मेंदूचा विकास, शारीरिक वाढ आणि बालकाच्या आरोग्याच्या सर्वांगीण कल्याणाच्या अनषंगाने अत्यंत महत्त्वाचे असतात, याचे महत्व लक्षात घेऊनच ही संकल्पना आखली गेली आहे. मेंदूचा 85 टक्क्यांपेक्षा जास्त विकास हा वयाच्या 6 वर्षांपर्यंत होत असतो ही बाब वैज्ञानिक तथ्ये आणि पुराव्यांमधून दिसून आली आहे. यातून उत्तम पोषण, आरग्यविषयक प्रतिसादात्मक निगा - सेवा शुश्रूषा (Responsive caregiving) आणि बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षणाचे महत्त्वही ठळकपणे अधोरेखित होते.
या वर्षाच्या संकल्पनेअंतर्गत प्रामुख्याने भर दिल्या गेलेल्या बाबी खाली नमूद केल्या आहेत:
माता आणि बालकांचे पोषण : गर्भधारणेदरम्यानच्या उत्तम पोषणाला चालना देणे, प्रामुख्याने स्तनपान तसेच वयानुसार पूरक आहार देण्यासाठी चालना देणे.
सुरुवातीच्या टप्प्यावरच मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेला गती देणे (0–3 वर्षे): आरोग्यविषयक प्रतिसादात्मक निगा - सेवा शुश्रूषा आणि बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षणाशी संबंधित संवादाला चालना देणे.
बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील खेळावर आधारित शिक्षण (3–6 वर्षे): सर्वांगीण विकास आणि शालेय पूर्व तयारीला पाठबळ देणे.
स्क्रीन टाइम (मोबाइल/टीव्हीचा वेळ) कमी करण्यात पालकांची आणि समाजाची भूमिका: आरोग्यदायी सवयी आणि सक्रिय सहभागाला चालना देणे.
सामुदायिक सहभागातून अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण: जन भागीदारी आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात सुधारणा घडवून आणणे.
या पोषण पंधरवड्याच्या प्रारंभा निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उत्कृष्ट कार्य पद्धती मांडल्या जाणार आहेत, त्यासोबतच अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचाही प्रारंभ केला जाणार आहे, तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील बालसंगोपन आणि पोषण विषयक सेवांना बळकटी देण्यासाठी आघाडीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, विशेषतः अंगणवाडी सेविकांच्या योगदानही सर्वांसमोर ठळकपणे मांडले जाणार आहे.
उद्घाटनाच्या दिवसाच्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय माहिती केंद्राच्या https://webcast.gov.in/mwcd या वेबकास्ट मंचावरून तसेच मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिनीवरून केले जाणार आहे.
या पंधरवड्यादरम्यान अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातील. याअंतर्गत माता, सेवा शुश्रूषा करणाऱ्या व्यक्ती, कुटुंबे, सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग असणार आहे. यामध्ये पोषण पंचायती, जनजागृतीपर सत्रे, सुरुवातीच्या टप्प्यातील प्रेरणादायी उपक्रम, खेळावर आधारित शैक्षणिक उपक्रम तसेच लहान मुलांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देणाऱ्या तसेच स्क्रीन टाइम कमी करणाऱ्या मोहिमांचा समावेश असणार आहे.
पोषण पंधरवडा 2026 च्या माध्यमातून मंत्रालयाने लोकचळवळीला अधिक बळकटी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यादृष्टीनेच आरोग्यदायी, सुशिक्षित आणि सक्षम भारताचा पाया रचण्यासाठी पोषण, आरोग्यविषयक निगा - सैवा शुश्रूषा, सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षण आणि सामुदायिक सहभागाच्या एकात्मिकीकरणाचा दृष्टिकोन मंत्रालयाने बाळगला आहे.
पोषण अभियान हा पोषणासंबंधीच्या फलनिष्पत्तीत सुधारणा घडवून आणण्यासाठीचा केंद्र सरकारचा एक प्रमुख उपक्रम असून, या उपक्रमाने कुपोषणमुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सामुदायिक सहभाग आणि जन भागीदारीचा विस्तार करणार्या एका देशव्यापी लोकचळवळीचे स्वरुप धारण केले आहे. पोषण पंधरवड्याअंतर्गत होत असलेली जनजागृती, सवयींमध्ये घडून येत असलेले बदल आणि घडून येत असलेले सामाजिक अभिसरण यामुळे हा उपक्रम या चळवळीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून कामी येतो आहे.
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249995)
अभ्यागत कक्ष : 230
Read this releasein:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada