संरक्षण मंत्रालय
पश्चिम आशियातील युद्धग्रस्त परिस्थिती आणि त्याचा भारतावर झालेला परिणाम याचा आढावा घेण्यासाठी, नियुक्त अधिकारप्राप्त मंत्रिमंडळ समूहाची संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक
आपल्याला मध्यम ते दीर्घकालीन सज्जता ठेवण्याच्या दृष्टिकोनाचा अंगिकार करण्याची आणि त्वरित निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी केली व्यक्त
कोणत्याही संकटापासून भारतीयांना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कटिबद्ध
मंत्रिमंडळ समुहाने राज्ये आणि जिल्हा प्रशासनादरम्यान समन्वयाचे महत्त्व केले अधोरेखित
विविध मंत्रालये आणि विभागांना अफवा, खोट्या बातम्या आणि गैरसमज दूर करण्यासाठी सत्य माहिती त्वरित प्रसारित करण्याचे निर्देश
प्रविष्टि तिथि:
28 MAR 2026 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, आज, म्हणजेच 28 मार्च 2026 रोजी, सरकारच्या अधिकारप्राप्त मंत्र्यांची पहिली अनौपचारिक बैठक नवी दिल्लीत कर्तव्य पथ येथे झाली. पश्चिम आशियात युद्धामुळे बदलत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी, हा गट स्थापन करण्यात आला आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंह पुरी, रसायन आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, प्रल्हाद जोशी, नागरी वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, आणि विज्ञान-तंत्रज्ञान डॉ.जितेंद्र सिंह उपस्थित होते.

या समूहाने, बदलत्या परिस्थितीचा आणि त्याचा भारतातील विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचा सर्वंकष आढावा घेतला. संरक्षण मंत्र्यांनी, यावेळी, सक्रिय, समन्वयित आणि भविष्यवेधी दृष्टिकोन ठेवण्याची गरज व्यक्त केली. बदलत्या परिस्थितीबद्दल सतर्क राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या बैठकीचा एक भाग म्हणून, सात अधिकारप्राप्त गटांनी एक सादरीकरण केले. या सादरीकरणातून निश्चित केल्या गेलेल्या प्रमुख प्रादेशिक समस्या आणि परिस्थिती हाताळण्यासाठी या आधीच लागू करण्यात आलेल्या धोरणात्मक उपाययोजनांची रूपरेषा मांडण्यात आली. राजनाथ सिंह यांनी सक्षम सचिव गटांना परिस्थितीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने, मध्यम ते दीर्घकालीन सज्जता दृष्टिकोनाचा अवलंब, उच्च स्तरीय समन्वयासाठी तसेच तातडीने निर्णय घेतले जातील याची सुनिश्चिती करण्यासंदर्भातील मुद्यांवर मार्गदर्शन केले. सर्व धोरणात्मक प्रयत्न परस्परांशी सुसंगत असलायला हवेत आणि त्यांची कालबद्ध रितीने अंमलबजावणी केली गेली पाहिजे या मुद्यांवर त्यांनी भर दिला. भारताची लवचिकता आणि सज्जता कायम राहील याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने संबंधित मंत्र्यांकडून त्यांनी विधायक सूचनाही मागितल्या.

आंतर मंत्रालयीन गटाने राज्ये आणि जिल्हा प्रशासनासोबतच्या दृढ समन्वयाचे महत्त्व, तसेच प्रमुख धोरणात्मक उपक्रमांविषयी जनतेला वेळेवर माहिती देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली. सध्याच्या परिस्थितीचे विविध उद्योग व्यवसायांवर होत असलेल्या परिणामांचे मूल्यांकन करण्याची गरज असल्याच्या मुद्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवता यावी तसेच, अफवा, चुकीची माहिती तसेच खोट्या बातम्यांना प्रभावीपणे प्रतिवाद करता यावा याकरता, सर्व मंत्रालये आणि विभागांनी, सध्याच्या परिस्थितीशी संबंधित सर्व माहिती, घडामोडी आणि मार्गदर्शक सूचनांबद्दलची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे सामायिक करावी असे निर्देशही या बैठकीत दिले गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार या संघर्षामुळे पडणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या प्रभावापासून भारतीय जनतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, या बैठकीनंतर X या समाज माध्यमावरून सामायिक केलेल्या संदेशातून दिली.


* * *
शैलेश पाटील/राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2246595)
आगंतुक पटल : 75
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam