पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'आर्थिक विकास शाश्वत आणि बळकट करताना' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 03 MAR 2026 12:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मार्च 2026

 

नमस्कार!

गेल्या आठवड्यात, अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील पहिल्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते आणि तो यशस्वी झाला असे मला कळले आहे, आणि अर्थसंकल्पामधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक खूप चांगल्या सूचना दिल्या, सर्वांच्या सक्रिय सहभागीचे मी स्वागत करतो आणि आज या मालिकेतल्या दुसऱ्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मला सांगण्यात आले आहे की, हजारोंच्या संख्येने, अनेक विषयांवर असंख्य लोक आपल्या सूचना देणार आहेत. विषय तज्ज्ञही यामध्ये सहभाग घेणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पावर चर्चा होणे, हा नक्कीच मोठा यशस्वी प्रयोग आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या वेबिनरमध्ये सहभागी झाला आहात. मी आफल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले स्वागत करतो. या वेबिनारचे विषयसूत्र देशाच्या आर्थिक विकासाला सातत्यपूर्ण बळकटी देणे असा आहे. आज, देश आपल्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे साऱ्या जगाचे आशास्थान झाला आहे, आज जेव्हा जागतिक पुरवठा साखळीची पुनर्रचना होते आहे, तेव्हा अर्थव्यवस्थेची वेगाने होणारी प्रगती विकसित भारताचा मोठा आधार आहे. आमची दिशा स्पष्ट आहे, आमचा संकल्प स्पष्ट आहे, अधिक निर्मिती, अधिक उत्पादन, अधिक संपर्क आणि आता गरज आहे ती अधिक निर्यातीची आणि आज तु्म्हा सर्वांमध्ये निश्चितच विचारमंथन होणार आहे, या विचार मंथनातून येणाऱ्या सूचना यामध्ये मोठी भूमिका बजावतील.

मित्रांनो,

आपण सर्व जाणताच की, उत्पादन, वाहातूक, आपल्या एमएसएमई, लघुउद्योग, कुटीर उद्योग एवढेच नव्हे तर आपली लहान मोठी शहरं, हे अर्थव्यवस्थेचे स्तंभ, दिसायला निरनिराळे असतील, पण ते सर्व एकमेकांशी जोडले गेले आहेत. जसे बळकट उत्पादकता, नव्या संधींची निर्मिती करते आणि त्यामुळे निर्यात वृद्धिंगत होते. एमएसएमईतील स्पर्धेमुळे, लवचीकता आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन मिळते. चांगल्या दळणवळण सुविधेमुळे खर्च कमी होतो. उत्तम नियोजित शहरे, गुंतवणूक आणि बौद्धिक संपदा दोन्हीला आपल्याकडे आकर्षित करून घेतात. या सर्व स्तंभांना चालू वर्षाच्या अर्थसंकल्पाने खूप बळकटी दिली आहे.

मात्र, मित्रांनो...

कोणतीही दिशा स्वतःच निष्कर्ष ठरवू शकत नाही, बदल प्रत्यक्षात तेव्हाच येऊ शकतात, जेव्हा उद्योग, वित्तीय संस्था, राज्य सरकारे एकत्रित येऊन ते प्रत्यक्षात साकारतात. मला आशा आहे की, या वेबिनारमध्ये, विचार मंथन करताना आपण सर्वजण काही विषयांना जरूर प्राधान्य द्याल जसे निर्मिती आणि उत्पादन, यात कशी वृद्धी होईल, स्पर्धात्मक मूल्य रचना कशी आखथा येईल, गुंतवणूकीचे प्रवाह कसे वेगवान होतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यात विकास कसा पोहोचवता येईल. आपल्या सर्वांच्या या दिशेने सूचना महत्त्वाच्या ठरतील.

मित्रांनो,

निर्मिती क्षेत्रात आज उद्योग क्षमतांचा गाभा देश अधिक बळकट करतो आहे. या मार्गात जी आव्हाने आहेत, ती दूर केली जात आहेत. समर्पित दुर्मिळ भू खनिज परिक्षेत्र, कंटनेर उत्पादकता सांरख्या क्षेत्रावर लक्ष्य केंद्रित करून आपण आपल्या व्यापार परिसंस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थसंकल्पामध्ये जैववैद्यकीय शक्ती मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. याचा उद्देश आहे, भारताला जैविक आणि आधुनिक उपचाराच्या क्षेत्रात जागतिक केंद्र बनवावे. आम्ही प्रगत बायोफार्मा संशोधन आणि निर्मिती यांमधील नेतृत्व वृद्धिंगत करू इच्छितो.

मित्रांनो,

आज जग विश्वासार्ह आणि लवचीक भागीदाराच्या शोधात आहे. भारताकडे, ही भूमिका ताकदीने पेलण्याची हीच संधी आहे. त्यासाठी, आपल्या सारख्या सर्व भागधारकांनी अत्यंत आत्मविश्वासाने गुंतवणूक करायला हवी, नवीन तंत्रज्ञान आपलेसे करायला हवे आणि संशोधनासारख्या क्षेत्रात कंजूसपणा करण्याचा काळ मागे पडला, आता आपल्याला संशोधनामध्ये मोठी गुंतवणूक करायला हवी, आणि जागतिक दर्जानुरूप गुणवत्ता सुनिश्चित करावी लागेल आणि मी सातत्याने सांगतो की आता आपल्याकडे प्रगतीकडे वाटचाल करण्याची संधी जेव्हा येईल, तेव्हा आपला मंत्र एकच असला पाहिजे तो म्हणजे गुणवत्ता, गुणवत्ता आणि गुणवत्ता!

मित्रांनो,

भारताने अनेक देशांसमवेत मुक्त व्यापार करार केले आहेत. आपल्यासाठी संधीचा म्हणजे संधीचे महाद्वार खुले झाले आहे. अशा काळात, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही ही आपली जबाबदारी आहे, एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला सर्वांत जास्त ताकद, बुद्धी, शक्ती लावायची असेल आणि आकलन वाढवायचे असेल तर आपल्याला गुणवत्तेवर खूप अधिक भर दिला पाहिजे. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता जागतिक दर्जाचीच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक चांगली असावी. त्यासाठी आपल्या इतर देशांच्या गरजा, त्या देशातल्या लोकांच्या अपेक्षा यांचा अभ्यास करावा लागेल, संशोधन करावे लागेल, त्या समजून घ्याव्या लागतील. आपल्या इतर देशांतल्या लोकांच्या आवडीनिवडी आणि त्यांचे समाधान यांचा अभ्यास करणे, या सर्वांची गरज आहे आणि संशोधन केले पाहिजे. समजा, जर कोणी लहानसा सुटा भाग मागत असेल आणि तो खूप मोठे जहाज बांधत असेल, आपण त्यांना तो भाग पाठवायला सांगत आहोत, तर त्याला काय अर्थ आहे? मग तुमचा सुटे भाग कोण खरेदी करेल? आपल्यासाठी भले तो लहानसा भाग आहे, परंतु मोठ्या उत्पादन विभागामध्ये त्याचे महत्त्व अधिक आहे.

आणि म्हणून आज जगात आपल्यासाठी गुणवत्ता हीच या स्पर्धात्मक जगात सोनेरी संधी ठरतेय. आपल्याला त्यांच्या गरजेनुसार वापरकर्त्याला सुलभतेने वापरता येणारी उत्पादने बनवायला हवी. तेव्हाच आपण या संधींचा फायदा घेऊ शकतो आणि नव्यानेच झालेला मुक्त व्यापार करार, त्यामुळेच विकासाचा महामार्ग आपल्यासाठी खुला झाला आहे. मी आशा करतो की या वेबिनारमध्ये या विषयावर लक्ष केंद्रित करून आपण यांवर जरूर चर्चा कराल.

मित्रांनो,

आम्ही एमएसएमई वर्गीकरणामध्ये ज्या सुधारणा केल्याचा त्याचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये, विस्तार केला तर सरकारकडून मिळणारे फायदे बंद होतील, ही भीती राहिली नाही. एमएसएमईला क्रेडीटपर्यंत सहजपणे पोहोचता यावे, तंत्रज्ञान अद्ययावतीकरण कऱण्यात प्रोत्साहन देणे आणि क्षमता वृद्धिच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले.

पण मित्रांनो,

या प्रयत्नांना तेव्हाच यश मिळेल, जेव्हा अधिकाधिक एमएसएमई स्पर्धेत उतरतील आणि यशस्वी होण्याचे लक्ष्य ठेवून उतरतील. एमएसएमईने आपल्या उत्पादन क्षमता वृद्धिंगत करावी, गुणवत्ता निकषात वाढ करावी, डिजीटल प्रक्रिया आणि बळकट मूल्य साखळीशी स्वतःला जोडून घ्यावी ही वेळ येऊन ठेपली आहे. या वेबिनारवर या संदर्भातही आपल्या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

मित्रांनो,

पायाभूत संरचना आणि वाहातूक सुविधा आपल्या विकास धोरणाचा गाभा आहेत. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये विक्रमी भांडवली खर्चाचा प्रस्ताव सादर झाला आहे. उच्च-क्षमता वाहतूक प्रणालीची निर्मिती, रेल्वे, महामार्ग, बंदरे, विमानतळे, जलमार्ग यांच्यादरम्यान सुयोग्य ताळमेळ, विविध मालवाहतूक परिक्षेत्र आणि बहुआयामी संपर्कजाळ्याचा विस्तार, ही सर्व पावले खर्च कमी आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच, नवीन जलमार्ग, जहाज दुरूस्ती सुविधा आणि गुणवत्तेसाठी प्रादेशिक केंद्रे आपल्या दळणवळण परिसंस्थेला बळकट करतील. नवीन सात उच्च-गतिमान रेल्वे परिक्षेत्र विकासासाठी प्रगत जोड देणारे ठरतील. मात्र, आपल्याला माहीतच आहे की, या पायाभूत सुविधांना प्रत्यक्ष फायदा तेव्हाच होईल, जेव्हा उद्योग आणि गुंतवणूकदार आपल्या धोरणांमध्ये या दृष्टीकोनातून बदल करतील. ही धोरणे काय असतील, त्यावरही तुम्ही सविस्तर चर्चा करायला हवी, आणि तुम्ही या मुद्द्यांकडे जरूर लक्ष द्याल असा मला विश्वास वाटतो.

मित्रांनो,

भारताच्या विकास यात्रेत, शहरीकरणाची भूमिकाही महत्त्वच आहे भारतचा भविष्यातील विकास, हा आपण आपापल्या शहराचे परिणामकारक नियोजन आणि व्यवस्थापन करतो. आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरे, नवीन विकासाचे द्योतक कसे होऊ शकतात, त्यासाठी देखील या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये आपल्या सूचना खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.

मित्रांनो,

आज जगाच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल झालेले पहायला मिळताहेत. बाजार केवळ गुंतवणूक पाहात नाही तर शाश्वततादेखील पाहते. या दिशेने कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवणूक मोहीम ही या दिशेने टाकलेले पुढाकाराचे पाऊल आहे. आता शाश्वततेला आपल्या व्यवसाय धोऱणाचा गाभ्याचा हिस्सा करावा लागेल. जे व्यवसाय वेळीच स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करतील, ते येत्या काही वर्षांत नव्या नव्या बाजारपेठांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचू शकतात. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पाने नवी दिशा मिळाली आहे. त्यामुळेच, उद्योग, गुंतवणूकदार आणि विविध संस्था मिळून या मार्गावर पुढे जात रहा असा माझा आग्रह आहे.

मित्रांनो,

विकसित भारताचे लक्ष्य केवळ सामूहिक मालकीभावाद्वारेच गाठता येईल. अर्थसंकल्पोत्तर वेबिनार केवळ चर्चेचे किंवा आपल्या ज्ञानार्जनासाठीचे व्यासपीठ राहू नये. त्यात सामूहिक बांधिलकी प्रतिबिंबित होणे अत्यंत गरजेची आहे. अर्थसंकल्पाने एक आराखडा दिला आहे, त्याला आता आपण सर्वांनी मिळून गती दिली पाहिजे. आमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही भागीदार व्हायला पाहिजे. आपली प्रत्येक सूचना, प्रत्येक अनुभव प्रत्यक्ष उत्तम परिणाम दाखवण्याची क्षमता बाळगते. आपल्या सूचना देशाच्या प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरावा असा विश्वास व्यक्त करून आपल्या सर्वांचे आभार मानतो.

 

* * *

नेहा कुलकर्णी/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2235304) अभ्यागत कक्ष : 41