राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी पीडी हिंदुजा रुग्णालयाच्या 'जीवन वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे' या देशव्यापी मोहिमेचे केले उद्घाटन


आरोग्य ही एक सामूहिक जबाबदारी आहे; सर्व भागधारकांनी एकत्रित काम केले तर; सर्वात गरीब व्यक्तीलाही वेळेवर आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळेल - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 24 FEB 2026 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (24 फेब्रुवारी, 26) मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयाच्या लोक भवन, येथे  आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्‍ये  'जीवन  वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे' या देशव्यापी मोहिमेचे उद्घाटन केले.


 
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या दशकात सर्व नागरिक निरोगी राहावेत आणि त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी  सरकारने अनेक योजनांद्वारे महत्त्वाची पावले उचलली आहेत. देशभरात 180,000 हून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे आरोग्यसेवा प्रदान करतात. जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, सुमारे 12 कोटी कुटुंबांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच  मिळते. मिशन इंद्रधनुष, क्षयरोगमुक्त भारत मोहीम आणि सिकलसेल ऍनेमिया निर्मूलन अभियान यासारखे राष्ट्रीय कार्यक्रम नागरिकांना विविध आजारांपासून वाचवण्यासाठी योगदान देत आहेत. दर्जेदार उपचार आणि निम-वैद्यकीय  व्यावसायिकांची उपलब्धता वाढवण्यासाठी एमबीबीएस आणि पदव्युत्तर जागांची संख्या वाढवण्यात आली आहे. दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक राज्यांमध्ये नवीन एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळत आहेत.

तथापि, निरोगी भारताच्या उभारणीत, सरकारसह सर्व भागधारकांची भूमिका महत्त्वाची आहे. दर्जेदार आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी यासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. "जीव वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे" मोहीम ही या दिशेने केला जाणारा एक प्रयत्न आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या  की, जीव वाचवणे हे सर्वात मोठे दान आहे. जीव वाचवण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. रूग्‍णाची स्थिती गंभीर असताना जो काही वेळ  ‘गोल्डन अवर’ मानला जातो, त्यावेळेत तातडीने  योग्य वैद्यकीय सेवा मिळाली तर,  बहुतांश जीव वाचू शकतात; असे मानले जाते. तात्काळ वैद्यकीय मदतीअभावी कोणालाही जीव गमावू लागू नये यासाठी, पंतप्रधान मदत योजनेतून  अपघातग्रस्तांना दीड  लाखांपर्यंत ‘कॅशलेस’  उपचार प्रदान केले जातात . रुग्णवाहिका आणि ‘ट्रॉमा सेंटर्स’ बरोबरच , गंभीर अपघात आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी जागरूकता देखील महत्त्वाची आहे, असे राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्या.

निरोगी नागरिक हे सशक्त राष्ट्राचा पाया आहेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले. नागरिकांचे आजारांपासून संरक्षण करणे आणि वेळेवर तसेच योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, हे नागरिकांच्या निकोप आरोग्यासाठी महत्त्वाचे असते असे त्या म्हणाल्या. आरोग्य सेवा हा राष्ट्र निर्मितीचा अविभाज्य भाग आहे. नागरिकांचे आरोग्य ही सामूहिक जबाबदारी आहे. अगदी गरिबातील गरीब व्यक्तीलाही वेळेवर आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळेल, याची सनिश्चिती करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा देता याव्यात हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे असे राष्ट्रपतींनी सांगितले.


तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे घटक इतर क्षेत्रांप्रमाणेच आरोग्य सेवा क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. भविष्यात या दोन्ही घटकांची भूमिका वाढतीच राहणार आहे, आणि आपण त्यासाठी सज्ज असले पाहिजे असे त्या म्हणाल्या.नवोन्मेष आणि नवीन तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब करता यावा यादृष्टीने अनुकूल अशी परिसंस्था निर्माण करण्याचे काम  केंद्र सरकार करत आहे. इंडिया एआय मिशन हे कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत आरोग्य सेवेतील नवोन्मेषाला पाठबळ देत आहे असे त्यांनी सांगितले.

भारत हा औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीचा उत्पादक देश असल्याची बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. आपल्या देशात तयार झालेली औषधे जगभरातील लोकांच्या उपचारासाठी कामी येतात. मात्र तरीदेखील अनेक वैद्यकीय उपकरणे आणि गंभीर आजारांवरील औषधांसाठी आपण आयातीवर अवलंबून आहोत. अशी आयात केलेली उपकरणे आणि औषधांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भार सोसोवा लागतो.  अशावेळी आपल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, देशातच औषधे आणि उपकरणांची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या दिशेने मेक इन इंडिया आणि उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना यांसारखे उपक्रम उपयुक्त ठरू लागले असल्याचेही त्या म्हणाले. वैद्यकीय क्षेत्र तसेच उद्योग - व्यावसायिकांनी या क्षेत्रातील संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत, देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावे असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प साकार करण्याच्या ध्येयाने आपण पुढे वाटचाल करत आहोत असे राष्ट्रपती म्हणाल्या. हे ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्यसंपन्न नागरिक ही मूलभूत गरज आहे असे त्यांनी सांगितले. नागरिकांना वेळेवर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध झाली तरच ते आरोग्यदायी राहू शकतील याची जाणीव त्यांनी करून दिली. आपल्या सामूहिक प्रयत्नांतूनच आपल्या नागरिकांना उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सेवा मिळू शकतील आणि त्यातून आरोग्याचे जागतिक केंद्र म्हणून भारताची व्यापक दखल घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

शैलेश पाटील/नेहा कुलकर्णी/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2232432) अभ्यागत कक्ष : 21