सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'भारत टॅक्सी' या भारतातील पहिल्या सहकार-आधारित टॅक्सी सेवेचा औपचारिक प्रारंभ केला


तीन वर्षांमध्ये 'भारत टॅक्सी'काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते कामाख्या पर्यंत, आपल्या टॅक्सी सारथींच्या कल्याणाचे एक प्रमुख माध्यम बनेल.

'भारत टॅक्सी'शी संबंधित प्रत्येक सारथी बंधू-भगिनी या सहकारी टॅक्सी समितीचे खरे मालक आहेत

'भारत टॅक्सी'चे चार मूलमंत्र आहेत - स्वामित्व , सुरक्षा कवच, प्रतिष्ठा आणि 'सर्वांचे चाक, सर्वांची प्रगती'

100 गाड्यांची भव्य रॅली आणि 1,200 हून अधिक सारथींच्या सहभागाने भारत टॅक्सीचा शुभारंभ कार्यक्रम ऐतिहासिक बनवला

Posted On: 05 FEB 2026 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह  यांनी आज नवी दिल्ली येथे 'भारत टॅक्सी' या भारतातील पहिल्या सहकार-आधारित टॅक्सी सेवेचा औपचारिक प्रारंभ केला.  या प्रसंगी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर आणि मुरलीधर मोहोळ,  सहकार सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक कार्यक्रमात विविध राज्यांमधून 1,200 हून अधिक "सारथी" (ड्रायव्हर भागीदार) सहभागी झाले होते, जे भारत टॅक्सीच्या चालक-सक्षमीकरण आणि सहकार-स्वामित्व -आधारित मॉडेलला व्यापक समर्थन  दर्शवते.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी मालकी हक्काचे  मॉडेल विकसित करत आहे. ते म्हणाले की, तीन वर्षांमध्ये 'भारत टॅक्सी'  काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते कामाख्यापर्यंत, आपल्या टॅक्सी सारथींच्या कल्याणाचे  एक प्रमुख माध्यम बनेल.

सहकार टॅक्सीमध्ये,सर्वोच्च भागभांडवल अवघे 500 रुपये आहे आणि तेच 500 रुपये सारथींना खऱ्या मालकांचा दर्जा देत आहेत. ते म्हणाले की ही छोटी रक्कम टॅक्सी सारथींचे कठोर परिश्रम, स्वाभिमान आणि आर्थिक स्वातंत्र्याचा पाया बनणार आहे.

चारचाकी टॅक्सी, रिक्षा आणि दुचाकी या तिन्ही प्रकारच्या वाहनांना एकत्र आणत भारत टॅक्सी ही संकल्पना साकारण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. भारत टॅक्सी देशाच्या मातृशक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देईल, असा संदेश त्यांनी देशाला दिला. यासाठी सारथी दीदी ही विशेष संकल्पना मांडली आहे, आगामी काळात ॲपमध्ये सारथी दीदीसाठी एक स्वतंत्र विभाग असेल आणि या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या कोणत्याही महिलेला केवळ सारथी दीदीच प्रवासासाठी नेतील, असे त्यांनी सांगितले. सारथी दीदी दुचाकीवरून येतील आणि महिलांना अतिशय कमी दरात त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवतील, ही सुविधा महिलांसाठी एक मोठी आणि व्यावहारिक दिलासा देणारी ठरेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.

भारत टॅक्सीअंतर्गतचे पूर्वनिर्धारीत शुल्क हे सारथींच्या खात्यापेक्षा वेगळे असेल असे अमित शाह म्हणाले. याव्यतिरिक्त, भारत टॅक्सी, सारथींच्या कष्टाच्या कमाईतून एक टक्काही कमिशन कापणार नाही, यामुळे त्यांची वेगाने भरभराट होईल, असे त्यांनी सांगितले. कंपनीचे भांडवल वाढवणे हे भारत टॅक्सीचे उद्दिष्ट नाही, तर त्याऊलट या टॅक्सीचे खरे मालक असलेले सारथी बंधु आणि सारथी दीदी यांचा नफा आणि उत्पन्न वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. ग्राहकाने दिलेले पैसे थेट, त्वरित आणि आपोआप सारथींच्या खात्यात जमा होतील आणि यासाठी वाट पाहण्याची गरज राहणार नाही, असे ते म्हणाले. कोणत्याही सारथीचे खाते योग्य सुनावणीशिवाय बंद केले जाणार नाही, मात्र, ग्राहकांशी चांगले वागणे, टॅक्सी व्यवस्थित राखणे आणि सेवेच्या गुणवत्तेवर भर देणे ही सारथींची जबाबदारी असणार असल्याची जाणीव त्यांनी करून दिली.

भारत टॅक्सीची सुरुवात म्हणजे सहकार क्षेत्रासाठी नवे आयाम खुले होण्याचीही सुरुवात आहे, ही बाब त्यांनी नमूद केली. भारतात गेल्या 125 वर्षांपासून सहकार चळवळ सुरू आहे, परंतु आता सहकाराचे प्रारुप अधिकाधिक नवीन क्षेत्रांपर्यंत विस्तारण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

भारत टॅक्सीचे मालकी हक्क, सुरक्षा कवच, सन्मान आणि सर्वांचे चाक, सर्वांची प्रगती (Everyones Wheel, Everyones Progress) म्हणजेच लाभांशाचे सर्वांमध्ये न्याय्य वाटप हे चार मुख्य मंत्र आहेत, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले. या चार उद्दिष्टांसह भारत टॅक्सी सुरू करण्यात आली असून, आगामी काळात हा एक अत्यंत यशस्वी प्रयोग ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या इतर अनेक सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभही या सारथींना आपोआपच मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, भारत टॅक्सीचे मॉडेल केवळ सारथींची आर्थिक स्थिती मजबूत करणार नाही, तर त्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि मालकी हक्कही सुनिश्चित करेल. तसेच, सारथींसाठी 24 तास, सातही दिवस हेल्पलाईन नेहमी उपलब्ध असेल. सध्या ही सेवा गुजरात, दिल्ली आणि एनसीआरमधील काही शहरांमध्ये सुरू होत आहे. मात्र पुढील तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत देशातील प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक मोठ्या शहरात ही सेवा पोहोचेल.

ही केवळ टॅक्सी सेवा नसून देशातील कोट्यवधी सारथींची समृद्धी, आत्मसन्मान आणि आर्थिक बळ वाढविण्याचे एक सशक्त माध्यम ठरणार आहे.

या दिवशी याआधी भारत टॅक्सीच्या शुभारंभाचे प्रतीकात्मक उद्घाटन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते विज्ञान भवन या मार्गावर 100 चारचाकी गाड्यांच्या भव्य रॅलीद्वारे करण्यात आले. या रॅलीत देशातील टॅक्सी समुदायाची एकजूट, अभिमान आणि सामूहिक ताकद प्रभावीपणे दिसून आली.

कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच सारथींचा सहकारी (को-ऑपरेटिव्ह) मॉडेलअंतर्गत चालक मालकी आणि सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान करण्यात आला. प्रत्येक सन्मानित सारथीला वैयक्तिक अपघात विमा प्रमाणपत्रे तसेच 5 लाख रुपये कुटुंबीय आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले, ज्यातून भारत टॅक्सीची चालक कल्याण आणि सामाजिक सुरक्षेबाबतची बांधिलकी स्पष्ट होते.

दिल्ली पर्यटन आणि परिवहन विकास महामंडळ / दिल्ली विमानतळ पार्किंग सेवा (डीएपीएस – जीएमआर समर्थित) यांच्यासोबतच्या करारानुसार, भारत टॅक्सीच्या व्हाइट कॅब सेवांना आयजीआय विमानतळाच्या विविध टर्मिनल्सवरील अनेक पार्किंग च्या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या वर्षासाठी प्रति फेरीला 245 रुपये शुल्कावर डीएपीएस कडून 20% सवलत दिली जाईल. यामुळे भारत टॅक्सीच्या काळी-पिवळी सेवांना पूरक मदत मिळेल आणि विमानतळावरील प्रवासाचे प्रमाण व उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढेल.

आयएफएफसीओ टोकीओ ला भारत टॅक्सीचा विमा भागीदार म्हणून समाविष्ट करण्यात आले असून, चालकांना नाममात्र दरात 5 लाख रुपये वैयक्तिक अपघात विमा देण्यात येणार आहे. तसेच दीर्घकालीन चालक कल्याण आणि विमा उपाययोजनांसाठी सल्लागार सहाय्यही दिले जाणार आहे.

पे-टीएम सोबत झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत डिजिटल पेमेंट्स, को-ब्रँडेड ऑफर्स आणि फिनटेक सक्षम सुविधा देण्यात येणार असून त्यात पेमेंट गेटवे एकत्रीकरण आणि पे-टिएम च्या भागीदार इकोसिस्टमचा प्रवेश समाविष्ट आहे. पे-टिएम चालकांसाठी कुटुंबीय गट आरोग्य विमालाही पाठबळ देत आहे.


सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/तुषार पवार/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2224173) अभ्यागत कक्ष : 11