अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत उद्योगांच्या सकल मूल्यवर्धनात वर्षाकाठी 7.0 टक्के वाढ झाल्यामुळे भारताची औद्योगिक कामगिरी भक्कम : आर्थिक सर्वेक्षण 2025-26


आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राच्या जीव्हीए मध्ये अनुक्रमे 7.72 टक्के आणि 9.13 टक्के वाढ

भारताच्या एकूण उत्पादन मूल्यवर्धनात मध्यम आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील उपक्रमांचा 46.3 टक्के वाटा

भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले

इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हे विकासाला चालना देणारे प्रमुख घटक म्हणून उदयाला आले, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या निर्यात श्रेणीत घेतली झेप (आर्थिक वर्ष 22-आर्थिक वर्ष 25)

प्रविष्टि तिथि: 29 JAN 2026 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2026

 

आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत उद्योगाच्या सकल मूल्यवर्धनात (जीव्हीए) वर्षाकाठी 7.0 टक्के वाढ झाल्यामुळे भारताची औद्योगिक कामगिरी मजबूत राहिली. मागील आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष 2024-25) 5.9 टक्क्यांवर आलेली ही आकडेवारी, आता स्पष्ट वाढ दर्शवते. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2025-26 मध्ये हे नमूद करण्यात आले आहे.

2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणात असे नमूद केले आहे की, उत्पादन क्षेत्राच्या एकूण मूल्यवर्धनात आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे 7.72 टक्के आणि 9.13 टक्के वाढ झाली. या क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या संरचनात्मक बदलांमुळे हे दिसून आले.

आर्थिक सर्वेक्षणात असे नमूद केले आहे की, मध्यम आणि उच्च-तंत्रज्ञान उपक्रमांचा वाटा आता भारताच्या एकूण उत्पादन मूल्यापैकी 46.3 टक्के आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, रसायने आणि वाहतूक क्षेत्रातील देशांतर्गत क्षमता मजबूत करण्याबरोबरच उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशन यासारख्या विविध सरकारी उपक्रमांमुळे हे शक्य झाले.

आर्थिक वर्ष 2024 मधील 9.39 टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025 मध्ये व्यावसायिक बँकांकडून बँक-आधारित औद्योगिक कर्ज वाटपातील वाढ 8.24 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली तरी, मूल्यांकनांवरून बँकांपासून दूर असलेल्या निधी स्रोतांचे विविधीकरण सुरू असल्याचे दिसून येते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2020 ते आर्थिक वर्ष 2025 या कालावधीत बिगर-बँकिंग स्त्रोतांकडून व्यावसायिक क्षेत्रात आलेल्या वित्तीय प्रवाहाने 17.32 टक्के सीएजीआर नोंदवला. 

उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रमुख उद्योग

भारत हा पोलाद आणि सिमेंटचा दुसरा सर्वात मोठा जागतिक उत्पादक देश ठरल्याचे आर्थिक सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश आहे. जागतिक सरासरी दरडोई 540 किलोच्या तुलनेत भारतात सिमेंटचा दरडोई वापर अंदाजे 290 किलो आहे.

गेल्या पाच वर्षात पोलाद क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले असून मुख्यतः बांधकाम आणि उत्पादन क्षेत्राकडून असलेल्या मजबूत देशांतर्गत मागणीमुळे हे शक्य झाले.

भारताच्या कोळसा उद्योगाने आर्थिक वर्ष 25 मध्ये 1,047.52 दशलक्ष टन (एमटी) कोळशाचे उत्पादन करून ऐतिहासिक उंची गाठली. मागील वर्षाच्या 997.83 दशलक्ष टनाच्या तुलनेत यात 4.98 टक्के वाढ झाली.

अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक विकासात रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राची महत्वाची भूमिका असून, आर्थिक वर्ष 24 मध्ये या क्षेत्राने एकूण उत्पादन क्षेत्राच्या जीव्हीए मध्ये 8.1 टक्के योगदान दिले.

आर्थिक वर्ष 15-25 दरम्यान वाहन उद्योगाने उत्पादनात सुमारे 33 टक्के वाढ नोंदवली. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने अलिकडच्या वर्षांत संरचनात्मक परिवर्तन केले असून, आर्थिक वर्ष 22 मधील सातव्या क्रमांकाच्या निर्यात श्रेणीवरून आर्थिक वर्ष 25 मध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या श्रेणीपर्यंत झेप घेतली आहे. शांतर्गत उत्पादन आणि निर्यातीच्या प्रमाणात झालेल्या उल्लेखनीय वाढीमुळे ही वाढ झाल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे (तक्ता VIII.16). या विस्ताराचा केंद्रबिंदू मोबाईल उत्पादन क्षेत्र असून, त्याच्या उत्पादन मूल्यात सुमारे 30 पट वाढ होऊन, आर्थिक वर्ष 15 मधील ₹18,000 कोटी वरून आर्थिक वर्ष 25 मध्ये ते ₹5.45 लाख कोटी वर पोहोचले.

भारतीय औषध उद्योग हा आकारमानाच्या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा उद्योग असून, तो जागतिक जेनेरिक औषधांच्या मागणीच्या अंदाजे 20 टक्के मागणी पूर्ण करतो.  आर्थिक वर्ष 25 मध्ये 191 देशांमध्ये औषधांची निर्यात करण्यात आली. सर्वेक्षणात असेही नमूद केले आहे की, आर्थिक वर्ष 25 मध्ये, या क्षेत्राची वार्षिक उलाढाल ₹4.72 लाख कोटींवर पोहोचली, तसेच गेल्या दशकात (आर्थिक वर्ष 15 ते आर्थिक वर्ष 25) निर्यातीत 7 टक्के सीएजीआरने वाढ झाली.

पुढील झेप घेण्यासाठीचा रोडमॅप

सतत बदलत्या आणि आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, व्यवसाय सुलभता आणि नवोन्मेशी प्रणालींमधील सुधारणांद्वारे भारताचे औद्योगिक क्षेत्र मजबूत कामगिरी दर्शवत असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

 

* * *

गोपाळ चिप्‍पलकट्टी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2220461) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Bengali , English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada