पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथे 'विंग्स इंडिया 2026' कार्यक्रमाला केले संबोधित


गेल्या दशकात भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राने एक ऐतिहासिक परिवर्तन अनुभवले आहे आणि ते एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित असलेल्या क्षेत्रापासून जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ म्हणून विकसित झाली आहे: पंतप्रधान

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ ही सरकारच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे, ज्याने प्रत्येक नागरिकाला विमानाने सहज प्रवास करता यावा या उद्देशाने विमान प्रवासाला सर्वसमावेशक बनवले आहे: पंतप्रधान

देशभरात प्रादेशिक आणि परवडणारी हवाई कनेक्टिव्हिटी तसेच सी-प्लेन सेवांचा विस्तार करण्यासाठी सरकार 'उडान' योजनेच्या पुढील टप्प्यावर काम करत आहे: पंतप्रधान

भारताने देशांतर्गत पातळीवर लष्करी आणि वाहतूक विमानांचे उत्पादन सुरू केले आहे आणि नागरी विमान निर्मितीच्या क्षेत्रातही तो पुढे वाटचाल करत आहे: पंतप्रधान

भारत 'ग्लोबल साउथ' आणि जगादरम्यान एक प्रमुख हवाई वाहतूक केंद्र म्हणून उदयास येत आहे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 28 JAN 2026 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जानेवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील हैदराबाद येथे 'विंग्ज इंडिया 2026' कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उद्योगपती, तज्ञ आणि गुंतवणूकदारांचे स्वागत केले आणि हवाई वाहतूक उद्योगाचा आगामी काळ महत्त्वाकांक्षेने भरलेला असून भारत एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे नमूद केले. त्यांनी विमान निर्मिती, वैमानिक प्रशिक्षण, प्रगत हवाई वाहतूक आणि विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या क्षेत्रात भारतामध्ये असलेल्या प्रचंड संधींवर प्रकाश टाकला आणि सर्व संबंधितांसाठी 'विंग्ज इंडिया' शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.

मोदी म्हणाले की गेल्या दशकात भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन झाले आहे. एकेकाळी हवाई प्रवास हा केवळ उच्चभ्रू लोकांसाठी मर्यादित होता, पण आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ बनला आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की प्रवासी वाहतुकीत वेगाने वाढ झाली आहे आणि भारतीय विमान कंपन्या आपल्या ताफ्याचा विस्तार करत आहेत, ज्या अंतर्गत अलिकडच्या वर्षांत 1,500 हून अधिक विमानांची मागणी नोंदवण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ही वाढ सरकारच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे, ज्यामध्ये हवाई प्रवासाला केवळ विशिष्ट लोकांसाठी मर्यादित न ठेवता सर्वांसाठी सुलभ बनवले आहे आणि प्रत्येक नागरिकाला विमानाने सहज प्रवास करता यावा असे ध्येय ठेवले आहे. त्यांनी यावर जोर दिला की टियर-2 आणि टियर-3 शहरे विमानतळांशी जोडली गेली आहेत. 2014 मध्ये भारतात 70 विमानतळे होती तर आज ही संख्या 160 पेक्षा जास्त झाली आहे. म्हणजेच देशाने केवळ एका दशकात दुप्पटीपेक्षा जास्त विमानतळे बांधली आहेत, असे त्यांनी नमूद केले. मोदी पुढे म्हणाले की 100 हून अधिक विमानतळे कार्यान्वित करण्यात आली आहेत आणि यासोबतच सरकारने परवडणाऱ्या दरात विमानप्रवास उपलब्ध करून देण्यासाठी 'उडान' योजना सुरू केली आहे. त्यांनी सांगितले की, 'उडान' योजनेमुळे सुमारे दीड कोटी म्हणजेच 15 दशलक्ष प्रवाशांनी अशा मार्गांवर प्रवास केला आहे, जे मार्ग पूर्वी अस्तित्वातही नव्हते.

पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार अनेक पटींनी वाढणार आहे. 2047 पर्यंत, भारतात 400 हून अधिक विमानतळ असतील, त्यामुळे विशाल नेटवर्क तयार होईल, असे ते म्हणाले. मोदी यांनी नमूद केले की, सरकार उडान योजनेच्या पुढील टप्प्यावर काम करत आहे, ते  देशाच्या कानाकोपऱ्यात कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या उद्देशाने सी-प्लेन ऑपरेशन्सच्या विस्ताराबरोबरच प्रादेशिक आणि परवडणाऱ्या हवाई कनेक्टिव्हिटीला आणखी बळकटी देईल. पर्यटन क्षेत्राच्या विकासावर सरकार भर देत आहे, असे नमूद करून, देशभरात पर्यटन स्थळे अद्ययावत केली जात आहेत, आणि हवाई प्रवास, हा बहुसंख्य नागरिकांचा पसंतीचा पर्याय बनला आहे, असे मोदी म्हणाले. येत्या काही वर्षांत हवाई प्रवासाच्या मागणीत अभूतपूर्व वाढ होईल आणि गुंतवणुकीच्या अधिक संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारत एक प्रमुख जागतिक हवाई वाहतूक केंद्र म्हणून उदयाला येत असताना, हवाई वाहतुकीच्या गरजांसाठी इतरांवरील अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मजबूत करणे आवश्यक आहे, ज्याचा फायदा भारतात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाही होईल. भारत विमानाचे डिझाइन, उत्पादन आणि विमानाच्या एमआरओ परिसंस्थेवर अधिक भर देत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. भारत हा विमानाच्या सुट्या भागांचा मोठा उत्पादक आणि पुरवठादार आहे, यावर त्यांनी भर दिला. भारताने देशांतर्गत लष्करी आणि वाहतूक विमानांचे उत्पादन सुरू केले आहे, आणि नागरी विमान निर्मितीमध्येही प्रगती करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक हवाई मार्गिकांमधील भारताचे भौगोलिक स्थान, अतुलनीय देशांतर्गत फीडर नेटवर्क आणि भविष्यात लांब पल्ल्याच्या ताफ्याचा विस्तार, यासह भारताच्या फायद्याच्या असलेल्या घटकांकडे त्यांनी लक्ष वेधले, जे एकत्रितपणे एक मोठी ताकद आहेत.

भारतात तयार झालेली आणि इथल्याच बनावटीची टेक ऑफ आणि लँडिंग विमाने, विमान वाहतूक क्षेत्राला नवीन दिशा देतील, यामुळे प्रवासाचा वेळही लक्षणीयरित्या कमी होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हा दिवस आता फार दूर नाही असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला भारत शाश्वत विमान इंधनासाठी व्यापक प्रयत्न करत असून येत्या काळातील हरित विमान इंधनाचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातक देश म्हणून स्थान मिळवण्यासाठी भारत सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत विमान वाहतूक क्षेत्राअंतर्गत अनेक सुधारणा करत असून, त्यामुळेच भारत ग्लोबल साऊथ अंतर्गतचे देश आणि उर्वरित जगासाठी, विमान वाहतुकीचा एक प्रमुख मार्ग बनू लागल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विमान वाहतूक उद्योगाशी संबंधित गुंतवणूकदार आणि उत्पादकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

भारत विविध प्रदेश आणि बाजारपेठांना परस्परांशी जोडत असून, वाहतुकीच्या विविध माध्यमांद्वारे शहरे बंदरांशी जोडली जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. भारताच्या विमान वाहतूक संकल्पनेत, हवाई मालवाहतुकीलाही तितकेच महत्व दिले गेले आहे, त्या अनुषंगाने हवाई मालवाहतूक अधिक वेगवान आणि कार्यक्षम व्हावी याकरता सरकार सर्व आवश्यक नियामक सुधारणांवर काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. डिजिटल कार्गो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि अधिक पारदर्शक बनवली जात आहे, तर विमानतळाबाहेरील प्रक्रियेसाठी लागू केलेल्या व्यवस्थेमुळे विमानतळांवरचा भार कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.  वाहतुकीसाठीच्या वस्तुमालाच्या हाताळणीत सुधारणा घडून यावी आणि त्याचा वेग वाढावा यासाठी आधुनिक गोदामे बांधली जात असून, यामुळे भविष्यात माल नियोजित स्थळी पोहचण्याचा वेळ तसेच संबंधित व्यावसायिक दळवळणाचा खर्चात घट होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत एक प्रमुख आणि स्पर्धात्मक ट्रान्स-शिपमेंट हब (वाहतुकीचे मध्यस्थ केंद्र) म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज असून, गुंतवणूकदारांनी गोदामे, फ्रेट फॉरवर्डिंग, एक्सप्रेस लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील संधींच्या शक्यता चाचपडून पाहाव्यात असे आवाहनही त्यांनी केले.

आज भारताकडील विमान वाहतूक उद्योगासाठीची व्याप्ती मोठी आहे, त्यात धोरणात्मक स्थैर्य तसेच तंत्रज्ञानविषयक महत्त्वाकांक्षा आहे, मात्र त्याचवेळी जगातील केवळ मोजक्या देशांकडेच अशी सुविधा उपलब्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. प्रत्येक देशाने, जगभरातील दिग्गज उद्योजकांनी आणि प्रत्येक नवोन्मेषकाने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. भारताच्या विकासाच्या वाटचीलीत  दीर्घकालीन भागीदार होण्याचे आणि जागतिक विमान वाहतूक क्षेत्राच्या प्रगतीला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. जगातील गुंतवणूकदारांनी सह वैमानिक म्हणून भारताच्या या उड्डाणात सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विंग्स इंडियाचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.

 

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219835) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam