पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भारत-युरोपियन युनियन व्यापार मंचाला केले संबोधित


भारत- युरोपियन युनियन संबंध एकीकरणाच्या नवीन युगात प्रवेश करत आहेत : पंतप्रधान

ऐतिहासिक भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे कामगार-केंद्रित उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली केली : पंतप्रधान

पंतप्रधानांनी भारत- युरोपियन युनियन संबंध व्यापक बनवण्यासाठी संपूर्ण समाज भागीदारीचे आवाहन केले

भारत- युरोपियन युनियन जागतिक विकासाचे डबल इंजिन बनले पाहिजे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 27 JAN 2026 10:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारत-युरोपियन युनियन व्यापार मंचाला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी भारत-युरोपियन युनियन (ईयू) बिझनेस फोरममध्ये सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले  की युरोपियन युनियन कौन्सिल आणि कमिशनच्या अध्यक्षांचा भारत दौरा हा काही  सामान्य राजनैतिक दौरा नाही तर भारत-ईयू संबंधांमधील एका नवीन युगाची सुरुवात आहे.भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रथमच युरोपियन युनियनचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते, भारत आणि युरोपियन युनियनने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केला आणि आज, असंख्य सीईओंच्या उपस्थितीत, भारत-युरोपियन युनियन व्यापार मंचाचे  इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन  केले जात असल्याचे  मोदी यांनी अधोरेखित केले. ही कामगिरी जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्तींमधील अभूतपूर्व एकीकरणाचे प्रतीक आहे असे ते म्हणाले .

हे एकत्र येणे  हा काही अपघात नाही; बाजारपेठ अर्थव्यवस्था या नात्याने  भारत आणि युरोपियन युनियनमध्ये समान मूल्ये, जागतिक स्थिरतेसाठी संयुक्त प्राधान्ये आणि खुला  समाज म्हणून तेथील जनतेमध्ये नैसर्गिक बंध आहेत यावर पंतप्रधानांनी  भर दिला.   त्यांनी अधोरेखित केले की या मजबूत पायावर, भागीदारी नवीन उंची गाठत आहे आणि जगातील सर्वात प्रभावशाली भागीदारींपैकी एक म्हणून स्थापित होत आहे आणि यांचे  परिणाम स्पष्ट दिसत आहेत. मोदी यांनी नमूद केले की गेल्या दहा वर्षांमध्ये व्यापार दुप्पट होऊन 180 अब्ज युरो झाला आहे,  6,000 हून अधिक युरोपियन कंपन्या भारतात कार्यरत आहेत आणि युरोपियन युनियनची भारतातील गुंतवणूक 120 अब्ज युरोपेक्षा जास्त आहे. ते म्हणाले  की 1,500  भारतीय कंपन्या युरोपियन युनियनमध्ये कार्यरत आहेत, ज्यात भारतीय गुंतवणूक जवळजवळ  40 अब्ज युरोपर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आज, भारत आणि युरोपियन कंपन्या संशोधन आणि विकास, उत्पादन आणि सेवांमध्ये  सहकार्य करत आहेत आणि व्यावसायिक नेते या सहकार्याचे चालक देखील आहेत आणि लाभार्थी देखील आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता या  भागीदारीला  'संपूर्ण समाज भागीदारी' बनवण्याची वेळ आली आहे. त्यांनी सांगितले की, या दृष्टिकोनातून आज एक व्यापक मुक्त व्यापार करार पूर्ण झाला आहे, ज्यामुळे  भारताच्या कामगार -केंद्रित उत्पादनांना युरोपियन युनियन बाजारपेठेत सहज प्रवेश मिळेल.  कापड, रत्ने आणि दागिने, ऑटो पार्ट्स आणि अभियांत्रिकी वस्तूंना याचा फायदा होईल, तर फळे, भाज्या, प्रक्रिया केलेले अन्न आणि सागरी उत्पादने नवीन संधी निर्माण करतील यावर मोदी यांनी भर दिला. याचा थेट फायदा शेतकरी, मच्छीमार आणि सेवा क्षेत्राला, विशेषतः आयटी, शिक्षण, पारंपारिक औषध आणि व्यवसाय सेवांना होईल असे त्यांनी अधोरेखित केले.

कंपन्या त्यांच्या बाजार-धोरणांचा आणि भागीदाऱ्यांचा पुनर्विचार करत असल्याने जागतिक व्यापारात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. अशावेळी, हा एफटीए (मुक्त व्यापार करार) व्यापारजगताला एक निःसंदिग्ध आणि सकारात्मक संदेश पाठवतो. कार्यक्षम, विश्वासार्ह आणि भविष्यलक्ष्यी भागीदारी निर्माण करण्यासाठी दोन्हीकडच्या व्यापार समुदायांना निमंत्रण देण्याचे काम हा करार करत आहे. या एफटीए मधून उत्पन्न होणाऱ्या संधींचा पूर्ण उपयोग व्यापार-उदीम क्षेत्रातील धुरीण करून घेतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

भारत आणि ईयू यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये व्यापार-भागीदाऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा अनेक सामायिक बाबी आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले. प्राधान्यक्रमातील तीन प्रमुख बाबी त्यांनी सांगितल्या ---- पहिले  म्हणजे-- व्यापार, तंत्रज्ञान आणि अतिमहत्त्वाची खनिजे यांचाच शस्त्राप्रमाणे उपयोग करून घेणाऱ्या जगात परस्पर-अवलंबित्व पूर्णपणे निर्धोक करण्याची गरज आहे. विद्युत-चालित वाहने, बॅटऱ्या, चिप्स, आणि एपीआय यांच्या बाबतीतील बाह्य-अवलंबित्व कमी करून विश्वासार्ह पुरवठा-साखळ्यांसाठी सामायिक पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न व्यापारी-समुदाय करू शकेल काय, असे त्यांनी विचारले. दुसरे म्हणजे-- भारत आणि ईयू दोहोंचा संरक्षण उद्योगांवर आणि अद्ययावत तंत्रज्ञानावर भर आहे, असे नमूद करत त्यांनी संरक्षण, अवकाश, दूरसंवाद आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत अधिक सहयोगाचे आवाहन केले. तिसरे म्हणजे-- स्वच्छ आणि संतुलित भविष्य ही दोन्ही पक्षांसाठी प्राधान्याची बाब आहे असे प्रतिपादन करत त्यांनी, हरित हायड्रोजन, सौर ऊर्जा, आणि स्मार्ट ग्रिड या क्षेत्रांत संयुक्त संशोधन आणि गुंतवणुकीचे आवाहन केले. लहान मॉड्युलर अणुभट्ट्या आणि शाश्वत मोबिलिटी यांबाबत उद्योगांनी एकत्रित काम करावे, आणि जलव्यवस्थापन, चक्राकार अर्थव्यवस्था संतुलित शेती यांतील समस्या सोडवणारे तोडगे शोधावेत- असे आवाहन त्यांनी केले. 

आजच्या ऐतिहासिक निर्णयांनंतर व्यापारी-समुदायावर एक विशेष दायित्व आले आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. "आता जबाबदारी तुमच्या खांद्यांवर आहे" असे सांगत, आता व्यापार-समुदायाने पुढचे पाऊल उचलायचे आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. केवळ परस्पर सहकार्यातूनच भागीदारीला विश्वास मिळेल, तिचा आवाका वाढेल आणि विस्तार होईल. एकत्रित प्रयत्नांनी सामायिक समृद्धीकडे जात येईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रत्येकाने आप-आपल्या सामर्थ्याची भर घालून संपूर्ण जगासाठी विकासाचे दुहेरी-इंजिन म्हणून काम करावे, असे आवाहन करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 

युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉंन डेर लेयन यांच्यासह व्यापार-उदीम क्षेत्रातील भारतीय आणि युरोपीय धुरीण या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/जाई वैशंपायन/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219408) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam