पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या पराक्रम दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी नेताजींचे अदम्य साहस आणि चिरस्थायी प्रेरणेचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी नेताजी बोस यांच्याशी संबंधित हरिपुरा येथून सुरु केलेल्या ई ग्राम विश्वग्राम योजनेचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी नेताजी बोस यांच्या वारशाबद्दल सर्वाना अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी आणि संबंधित फायली सार्वजनिक करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
पंतप्रधानांनी नेताजी बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याच्या घोषणेचे आणि नेताजी भवनला भेट दिल्याचे स्मरण केले.
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 8:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या पराक्रम दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी नेताजींचे अदम्य साहस, दृढ संकल्प आणि राष्ट्रासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले, नेताजींचे निडर नेतृत्व आणि प्रखर राष्ट्रभक्ती मजबूत भारताच्या निर्मितीसाठी येणाऱ्या कित्येक पिढयांना प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त केला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली आहे असे पंतप्रधान म्हणाले. गुजरातच्या माहिती तंत्रज्ञान परिसंस्थेचा कायापालट करण्याच्या उद्देशाने 23 जानेवारी 2009 रोजी ई ग्राम विश्वग्राम ही एक पथदर्शी योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. नेताजींच्या आयुष्यात एक खास स्थान असलेल्या हरिपुरा येथून या योजनेचा आरंभ करण्यात आला असे सांगून हरिपुरा मधील नागरिकांनी अत्यंत जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताचे तसेच ज्या मार्गावरुन कधी काळी नेताजी बोस गेले असतील त्याच मार्गावरुन काढलेल्या मिरवणुकीचे स्मरण केले.
2012 मध्ये आझाद हिंद फौज दिनानिमित्त अहमदाबादमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याची आठवण करुन देत पंतप्रधान म्हणाले की, त्या कार्यक्रमाला नेताजी बोस यांच्यापासून प्रेरित झालेल्या अनेक व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यात लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचाही समावेश होता.
भूतकाळाविषयी भाष्य करताना पंतप्रधानांनी सांगितले की कित्येक दशके देशावर राज्य करणाऱ्यांच्या अजेंड्यावर नेताजी बोस यांच्या गौरवशाली योगदानाचे स्मरण करणे नव्हते आणि त्याकाळात नेताजींच्या स्मृती विसरण्याचेच प्रयत्न अधिक झाले. सध्याची विचारसरणी वेगळी आहे आणि शक्य त्या सर्व प्रसंगी नेताजी बोस यांचे आयुष्य आणि विचारमूल्य यांना लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे नेताजी बोस यांच्याशी निगडित फायली आणि दस्तावेज सार्वजनिक करणे हे होय, असे पंतप्रधान म्हणाले.
2018 हे वर्ष दोन कारणांसाठी संस्मरणीय ठरले होते असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यावर्षी आझाद हिंद सेनेच्या 75 व्या स्थापनदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या समारंभात आपल्याला तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले. या प्रसंगी त्यांनी भारतीय राष्ट्रीय सेनेचे माजी सैनिक ललती राम जी यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवणही सांगितली.
पंतप्रधानांनी, अंदमान आणि निकोबार बेटांमधील श्रीविजयपुरम (तत्कालीन पोर्ट ब्लेअर) येथे, सुभाष बाबूंनी राष्ट्रध्वज फडकवल्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त तिरंगा फडकवण्यात आल्याची आठवण देखील करुन दिली. तीन प्रमुख बेटांचे पुन्हा नामकरण करण्यात आले, त्यापैकी रॉस बेटांचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे केल्याचे पंतप्रधान म्हणाले.
लाल किल्ल्यावर असलेल्या क्रांती मंदिर वस्तुसंग्रहालयात भारतीय राष्ट्रीय सेना आणि नेताजी बोस यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण ऐतिहासिक सामग्री असून त्यात नेताजींनी घातलेली टोपी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नेताजी बोस यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दलची माहिती जतन करण्यासाठी आणि त्याबद्दलचे ज्ञान वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
नेताजी बोस यांच्या सन्मानार्थ, त्यांची जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून घोषित करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
वसाहतवादी मानसिकता झटकून टाकण्याच्या संकल्पाचे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या आदराचे एक ज्वलंत उदाहरण अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी देशाच्या राजधानीच्या केंद्रस्थानी इंडिया गेट येथे नेताजी बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या निर्णयाची आठवण केले. हा पुतळा येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल असे ते म्हणाले.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
"पराक्रम दिन म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी आपण त्यांचे दुर्दम्य साहस, निर्धार आणि राष्ट्रउभारणीसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करुया. ते निर्भीड नेतृत्व आणि अढळ देशभक्तीचे प्रतीक होते. त्यांचे आदर्श एका सशक्त भारताच्या निर्मितीसाठी पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहतील.”
"नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मला नेहमीच खूप प्रेरणा दिली आहे. 23 जानेवारी 2009 रोजी ई-ग्राम विश्वग्राम योजना सुरू करण्यात आली. गुजरातच्या माहिती तंत्रज्ञान परिसंस्थेचा कायापालट करण्याच्या उद्देशाने ही एक पथदर्शी योजना आहे. ही योजना नेताजी बोस यांच्या जीवनात एक विशेष स्थानअसलेल्या हरिपुरामधून सुरू करण्यात आली, हरिपुराच्या लोकांनी ज्या प्रकारे माझे स्वागत केले आणि ज्या रस्त्यावरून नेताजी बोस यांनी प्रवास केला होता, त्याच रस्त्यावरून मिरवणूक काढली, ते मी कधीही विसरणार नाही.”
“आझाद हिंद सेनेचा स्थापना दिन साजरा कारण्याच्या उद्देशाने 2012 मध्ये अहमदाबाद येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.नेताजी बोस यांच्याकडून प्रेरणा घेतलेले अनेक जण यावेळी उपस्थित होते आणि यात लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा देखील उपस्थित होते."
“दशकांनुवर्षे देशावर राज्य करणाऱ्यांच्या अजेंड्यामध्ये नेताजी बोस यांच्या गौरवशाली योगदानाचे स्मरण करणे बसत नव्हते. म्हणूनच, त्यांना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आमची श्रद्धा वेगळी आहे. शक्य त्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांचे जीवन आणि आदर्शांना लोकप्रिय केले आहे. त्यांच्याशी संबंधित फायली आणि कागदपत्रे सार्वजनिक करणे हे एक महत्त्वाचे पाऊल होते.”
"2018 हे वर्ष दोन कारणांसाठी संस्मरणीय ठरले होते.
त्यावर्षी लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या समारंभात आझाद हिंद सेनेचा 75 व्या स्थापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी मला तिरंगा फडकावण्याची संधी मिळाली. त्याच प्रमाणे भारतीय राष्ट्रीय सेनेचे माजी सैनिक ललती राम जी यांच्यासोबत संवाद साधता आला.
अंदमान आणि निकोबार बेटांवरील श्रीविजयपुरम (तत्कालीन पोर्ट ब्लेअर) येथे, सुभाष बाबूंनी तेथे तिरंगा फडकवल्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त तिरंगा फडकवण्यात आला. तीन प्रमुख बेटांचे पुन्हा नामकरण करण्यात आले, त्यापैकी रॉस बेटांचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे करण्यात आले."
“लाल किल्ल्यावर असलेल्या क्रांती मंदिर वस्तुसंग्रहालयात भारतीय राष्ट्रीय सेना आणि नेताजी बोस यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण ऐतिहासिक सामग्री असून त्यात नेताजींनी घातलेली टोपी आहे. नेताजी बोस यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दलची माहिती जतन करण्यासाठी आणि त्याबद्दलचे ज्ञान वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे.”
“नेताजी बोस यांच्या सन्मानार्थ, त्यांची जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून घोषित करण्यात आली. वर्ष 2021 मध्ये मी कोलकाता येथील नेताजी भवनाला भेट दिली जिथून नेताजींनी आपल्या महान पलायनाची सुरुवात केली होती!”
“राष्ट्रीय राजधानीच्या मध्यभागी, इंडिया गेटच्या शेजारी नेताजी बोस यांचा भव्य पुतळा उभारणे हे वसाहतवादी मानसिकता झटकून टाकण्याच्या संकल्पाचे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या आदराचे एक ज्वलंत उदाहरण आहे. हा भव्य पुतळा येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल!
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217612)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada