पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आसाममधील काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 18 JAN 2026 1:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2026

 

ऑखोमोर प्रोकृती प्रेमी राइजोलोई आंतोरिक प्रोणाम।

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, पवित्रा मार्गरीटा जी, आसामचे मंत्री अतुल बोरा जी, चरण बोरो जी, कृष्णेंदू पॉल जी, केशव महंता जी, इतर मान्यवर आणि आसाममधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

हवामान थंड आहे, गावे दूर-दूर आहेत, तरीही जिथपर्यंत माझी नजर जाते तिथे लोकच लोक दिसत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आज पुन्हा काझीरंगाला येण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. साहजिकच माझ्या मागील भेटीच्या आठवणी मनात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी काझीरंगामध्ये घालवलेले क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास अनुभवांपैकी आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात मला रात्रभर मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी हत्ती सफारीदरम्यान या परिसराचे सौंदर्य मी अगदी जवळून अनुभवले होते.

मित्रांनो,

आसामला आलो की मला नेहमीच वेगळाच आनंद मिळतो. ही भूमी वीरांची आहे. प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवणाऱ्या मुला-मुलींची ही भूमी आहे. कालच मी गुवाहाटी येथे बागुरुंबा दहोउ कार्यक्रमात सहभागी झालो होतो. तेथे आपल्या बोडो समाजातील कन्यांनी बागुरुंबा नृत्यप्रकाराचे सादरीकरण करून नवा विक्रम प्रस्थापित केला. बागुरुंबाचे असे अद्भुत सादरीकरण, दहा हजारांहून अधिक कलाकारांची ऊर्जा, खामची थाप, सिफुंगची धून—या मनोहारी क्षणांनी प्रत्येकाला मंत्रमुग्ध केले. बागुरुंबाची अनुभूती डोळ्यांतून थेट हृदयात उतरली. आसामच्या आपल्या कलाकारांनी खरोखरच कमाल केली आहे. त्यांचे परिश्रम, त्यांची तयारी, त्यांचा समन्वय—सर्व काही अत्यंत अद्भुत होते. बागुरुंबा दहोउमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. तसेच देशभरातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचेही मी अभिनंदन करतो. कालपासून मी पाहतो आहे की बोडो परंपरेचा हा उत्कृष्ट नृत्यप्रकार समाज माध्यमावर गाजत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देश-विदेशातील लोक भारताच्या कला-संस्कृतीचा हा दृष्टिकोन आणि त्याची ताकद ओळखतील. या कार्याला पुढे नेणारे सर्व सोशल इन्फ्लुएंसर्सही अभिनंदनास पात्र आहेत. माध्यमातील मित्रांसाठी कालची संध्याकाळ थोडी गडबडीची होती; मात्र आज सकाळपासून अनेक टीव्ही वाहिन्यांनी या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण सुरू केले आहे. तुम्ही कल्पना करू शकता—हा कार्यक्रम किती भव्य असेल.

मित्रांनो,

मागील वर्षी मी झूमर महोत्सवातही सहभागी झालो होतो. यावेळी मला माघ बिहूच्या निमित्ताने येथे येण्याची संधी मिळाली आहे. एक महिन्यापूर्वी मी विकास प्रकल्पांसाठी येथे आलो होतो. गुवाहाटीतील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार झाला आहे; त्याच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मी केले होते. तसेच नामरूप येथे अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्सची पायाभरणीही केली होती. या सर्व प्रसंगांनी भाजप सरकारचा ‘विकासही, वारसाही’ हा मंत्र अधिक बळकट केला आहे. येथे काही बंधू चित्रे घेऊन उभे आहेत—तुम्ही थकून जाल, ती चित्रे पुढे पाठवा; मी नक्की स्वीकारेन. एसपीजीचे सहकारी चित्रे घेऊन आलेल्या लोकांकडून ती स्वीकारतील. जर मागे तुमचा पत्ता लिहिलेला असेल, तर माझे पत्र नक्की येईल. इथेही या बाजूला एक तरुण बराच वेळ खांद्याला खांदा लावून उभा आहे. मी सर्व कलाकारांचे मनापासून आभार मानतो—तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या भावनांसाठी. कृपया तुम्ही बसून घ्या. इथे जे आहेत त्यांनीही घ्या; कोणालाही त्रास देऊ नका.

मित्रांनो,

आसामच्या इतिहासात कलियाबोरचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. आसामच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही हे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार आहे आणि अपर आसामच्या संपर्कप्रणालीचे केंद्रही आहे. याच ठिकाणाहून महान योद्धा लचित बोरफुकन जी यांनी मुघल आक्रमकांना परतवून लावण्याची रणनीती आखली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आसामच्या लोकांनी धैर्य, एकजूट आणि दृढ संकल्पाच्या बळावर मुघल सैन्याचा पराभव केला. हा केवळ लष्करी विजय नव्हता, तर आसामच्या स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा जयघोष होता. भूतकाळात येथून संपूर्ण पश्चिम आसामची जबाबदारी सांभाळली जात होती. अहोम राजवटीपासूनच कलियाबोरला धोरणात्मक महत्त्व दिले गेले आहे. मला आनंद आहे की भाजप सरकारच्या काळात हा परिसर आता संपर्कप्रणाली आणि विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे.

मित्रांनो,

आज भाजप संपूर्ण देशात लोकांची पहिली पसंती बनली आहे. गेल्या एक-दीड वर्षांपासून भाजपवरील देशाचा विश्वास सातत्याने वाढत आहे. अलीकडेच बिहारमध्ये निवडणुका झाल्या; तेथे 20 वर्षांनंतरही जनतेने भाजपला विक्रमी मते दिली आणि विक्रमी जागा जिंकून दिल्या. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल लागले. मुंबई—जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक—तेथील जनतेने प्रथमच भाजपला विक्रमी जनादेश दिला. पाहा, विजय मुंबईत झाला आहे आणि त्या विजयाचा आनंद काझीरंगामध्ये साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील जनतेने भाजपला सेवेची संधी दिली आहे.

मित्रांनो,

याआधी दूर दक्षिणेत केरळच्या जनतेने भाजपला मोठे समर्थन दिले आहे. तेथे प्रथमच भाजपचा महापौर झाला आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे आज भाजप सेवा करत आहे.

मित्रहो,

अलीकडील सर्व निवडणुकांच्या निकालांचा जनादेश स्पष्ट आहे. आज देशातील मतदारांना सुशासन हवे आहे, विकास हवा आहे. ते विकास आणि वारसा या दोन्हींवर लक्ष केंद्रित करतात. म्हणूनच ते भाजपला प्राधान्य देतात.

मित्रहो,

या निवडणुकांमधून आणखी एक संदेश मिळतो: देश काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला सातत्याने नाकारतो आहे. ज्या मुंबई शहरात काँग्रेसचा जन्म झाला, तिथे तो आता चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. महाराष्ट्रात, जिथे काँग्रेसने वर्षानुवर्षे राज्य केले, तिथे काँग्रेस पूर्णपणे कोसळली आहे. काँग्रेसने देशाचा विश्वास गमावला आहे कारण त्यांचा विकासाचा अजेंडा नाही. अशी काँग्रेस कधीही आसामचे किंवा काझीरंगाचे काहीही भले करू शकणार नाही.

मित्रहो,

भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांनी काझीरंगाच्या सौंदर्याबद्दल म्हटले होते, "आमार काजिरोंगा धोन्यो, प्रोकृतिर धुनिया कुलात खेलि, आमार मोन होल पुण्यो." हे शब्द काझीरंगावरील प्रेम आणि आसामी लोकांचे निसर्गावरील प्रेम व्यक्त करतात. काझीरंगा हे केवळ एक राष्ट्रीय उद्यान नाही, तो आसामचा आत्मा आहे. हे उद्यान भारताच्या जैवविविधतेचे एक मौल्यवान रत्न आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

मित्रहो,

काझीरंगा आणि त्यातील वन्यजीवांचे जतन करणे ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करणे नाही तर ती आसामच्या भविष्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी आपली जबाबदारी देखील आहे. आणि ही केवळ मोदींची जबाबदारी नाही, ती तुमचीही जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन, आज आसाममध्ये नवीन प्रकल्प सुरू केले जात आहेत, ज्याचा दूरगामी परिणाम होईल. या प्रकल्पाबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

काझीरंगा हे एकशिंगी गेंड्याचे मूळ स्थान आहे. दरवर्षी पूर आल्यावर ब्रह्मपुत्र नदीची पाण्याची पातळी वाढते, तेव्हा याच ठिकाणी सर्वात मोठे आव्हान उभे राहते. वन्यजीव उंच जागा शोधतात. तेव्हा त्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जावे लागते. या काळात गेंडे, हत्ती आणि हरीण रस्त्याच्या कडेला अडकतात. रस्ताही खुला राहावा आणि जंगलही संरक्षित राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या दृष्टिकोनातून, कालियाबोर ते नुमालीगड असा 90 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर विकसित केला जात आहे. या प्रकल्पावर सुमारे 7000 कोटी रुपये खर्च केले जातील. अंदाजे 35 किलोमीटर लांबीचा उन्नत वन्यजीव कॉरिडॉर देखील बांधला जाईल. वाहने वरून जातील आणि खाली वन्यजीवांची मुक्त हालचाल कायम राहील. एकशिंगी गेंडा, हत्ती आणि वाघांच्या हालचालीच्या रूळलेल्या वाटा लक्षात घेऊन ही रचना विकसित करण्यात आली आहे.

मित्रहो,

हा कॉरिडॉर अप्पर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल. काझीरंगा उन्नत कॉरिडॉर आणि नवीन रेल्वे सेवा आसाममधील लोकांसाठी नवीन शक्यता खुल्या करतील. या महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल मी आसामच्या जनतेचे आणि देशाचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

निसर्ग सुरक्षित असतो, तेव्हा त्याबरोबर संधी सुद्धा निर्माण होतात. गेल्या काही वर्षांत काझीरंगाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढली आहे. होमस्टे, मार्गदर्शक सेवा, वाहतूक, हस्तकला आणि लहान व्यवसायांद्वारे स्थानिक तरुणांना उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडले आहेत.

मित्रहो,

आज मी तुमचे, आसामच्या लोकांचे आणि येथील सरकारचे आणखी एका गोष्टीसाठी विशेषतः कौतुक करू इच्छितो. एक काळ असा होता की काझीरंगामध्ये गेंड्यांची शिकार ही आसामची सर्वात मोठी काळजीची बाब ठरली होती. 2013 आणि 2014 मध्ये डझनभर एकशिंगी गेंडे मारले गेले. भाजप सरकारने असे चालू राहणार नाही, असे यापुढे होणार नाही, असे ठरवले. त्यानंतर आम्ही सुरक्षा व्यवस्था मजबूत केली. वन विभागाला आधुनिक स्रोत मिळाले, देखरेख व्यवस्था मजबूत केली आणि 'वन दुर्गा' म्हणून महिलांचा सहभाग वाढवला. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 2025 मध्ये गेंड्यांच्या शिकारीची एकही घटना घडली नाही. आणि म्हणूनच, तुम्ही सर्वजण आणि सरकार अभिनंदनास पात्र आहात. भाजप सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे आणि आसामच्या जनतेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

मित्रहो,

बऱ्याच काळापासून असा समज होता की निसर्ग आणि प्रगती एकमेकांशी सुसंगत नाहीत. असे म्हटले जात असे की या दोन्ही बाबी एकत्र राहू शकत नाहीत. पण आज भारत जगाला दाखवून देत आहे की अर्थव्यवस्था आणि पर्यावरण दोन्ही एकत्र प्रगती करू शकतात. गेल्या दशकात देशात जंगल आणि वृक्षांचे प्रमाण वाढले आहे. "एक पेड माँ के नाम" मोहिमेत लोकांनी उत्साहाने भाग घेतला. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 2.6 अब्जापेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. 2014 सालापासून देशात वाघ आणि हत्तींच्या अभयारण्यांची संख्या वाढली आहे. संरक्षित क्षेत्रे आणि सामुदायिक क्षेत्रे देखील लक्षणीयरीत्या वाढली आहेत. भारतात दीर्घकाळापासून नामशेष झालेले बिबटे आता पुन्हा अस्तित्वात आले आहेत. आज चित्ते लोकांसाठी एक नवीन आकर्षण बनले आहेत. आम्ही पाणथळ जागांच्या संवर्धनावर देखील सतत काम करत आहोत. आज भारत आशियातील सर्वात मोठे रामसर नेटवर्क बनले आहे. रामसर स्थळांच्या संख्येच्या बाबतीत, भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विकासासोबतच आपण आपला वारसा कसा जपू शकतो आणि निसर्गाचे संरक्षण कसे करू शकतो, हे आता आपले आसाम राज्य दाखवून देते आहे.

मित्रहो,

अंतर हे ईशान्येकडील राज्यांचे सर्वात मोठे दुःख राहिले आहे. अंतर, हृदयांमधले आणि ठिकाणांमधील अंतर, यामुळे येथील लोकांना गेल्या अनेक दशकांपासून मागे राहिल्यासारखे वाटत होते. याचा परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर विश्वासावरही झाला होता. भाजपने ही भावना बदलण्याचे काम केले आहे; डबल इंजिन सरकारने ईशान्येकडील विकासाला प्राधान्य दिले आहे. रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांद्वारे आसामला जोडण्याचे काम एकाच वेळी सुरू झाले आहे.

मित्रांनो,

जेव्हा आपण रेल्वे जोडणी वाढवतो तेव्हा त्याचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. म्हणूनच, ईशान्येकडील संचारसंपर्क वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण काँग्रेसने कधीही त्याची पर्वा केली नाही. मी तुम्हाला एक आकडा देतो. जेव्हा काँग्रेस केंद्रात सत्तेत होती तेव्हा आसामला रेल्वे अर्थसंकल्पासाठी कमी रक्कम मिळत असे - ती होती सुमारे 2 हजार कोटी रुपये. आता भाजप सरकारच्या काळात ते दरवर्षी अंदाजे 10 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला हा आकडा आठवतो का? तुम्हाला हा आकडा आठवतो का? तुम्ही विसरलात का? मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो: काँग्रेसच्या राजवटीत आसामला रेल्वेसाठी 2 हजार कोटी रुपये मिळत होते. किती? सगळे जण सांगा, किती मिळत असत? किती मिळत असत ? भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर आसामला किती मिळाले? 10 हजार कोटी रुपये. किती? किती? किती? 10 हजार कोटी रुपये. याचा अर्थ काँग्रेस आसामला रेल्वेसाठी देत होती त्यापेक्षा पाचपट जास्त पैसे भाजपा देत आहे.

मित्रांनो,

या वाढीव गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. नवीन रेल्वे मार्गांचे बांधकाम, दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यामुळे रेल्वेची क्षमता वाढली आहे आणि जनतेसाठी सुविधा वाढल्या आहेत. आज कालियाबोर येथून सुरू होणाऱ्या तीन नवीन रेल्वे सेवा आसामच्या रेल्वे जोडणी मधील लक्षणीय विस्तार दर्शवितात. वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटीला कोलकाताशी जोडेल. ही आधुनिक स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासाला अधिक आरामदायी बनवेल. याव्यतिरिक्त, दोन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या जात आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील प्रमुख स्थानकांवर सेवा देणाऱ्या या गाड्या लाखो प्रवाशांना थेट फायदा देतील. या गाड्या आसामी व्यावसायिकांना नवीन बाजारपेठांशी, विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक संधींशी जोडतील आणि आसाममधील लोकांसाठी देशाच्या विविध भागांमध्ये प्रवास करणे सोपे करतील. संचारसंपर्काच्या विस्तारामुळे असा विश्वास निर्माण होतो की ईशान्य आता विकासापासून वंचित राहिलेले नाही. ईशान्य आता दुर्गम राहिलेले नाही; ते आता हृदयाच्याही जवळ आहे आणि दिल्लीच्याही जवळ आहे.

मित्रांनो,

आज आसामसमोरील एका मोठ्या आव्हानावर चर्चा करणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. हे आव्हान आसामची ओळख जपण्याचे आहे, आसामची संस्कृती जपण्याचे आहे. मला सांगा, आसामची ओळख जपायची की नाही? असे नाही, सर्वजणांनी या प्रश्नाचे उत्तर द्या. आसामची ओळख जपायची की नाही? तुमची ओळख निर्माण करायची की नाही? तुमच्या पूर्वजांचा वारसा जपायचा की नाही? आसाममधील भाजप सरकार ज्या पद्धतीने घुसखोरीला तोंड देत आहे, ज्या पद्धतीने ते आपली जंगले, ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळे आणि तुमच्या जमिनी बेकायदेशीर कब्ज्यांपासून मुक्त करत आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे योग्य आहे की नाही? हे घडावे की नाही? हे तुमच्या फायद्यासाठी आहे की नाही? पण मित्रांनो, कृपया काँग्रेस पक्षाने आसामसाठी काय केले याचा विचार करा. फक्त सरकारे बनवण्यासाठी, काही मते मिळविण्यासाठी त्यांनी आसामची माती घुसखोरांकडे सोपविली. काँग्रेसने अनेक दशके आसाममध्ये सरकारे स्थापन केली. या काळात घुसखोरी वाढतच राहिली आणि या घुसखोरांनी काय केले? त्यांना आसामच्या इतिहासाची, त्याच्या संस्कृतीची किंवा आपल्या श्रद्धेची काहीच पर्वा नव्हती म्हणून त्यांनी विविध क्षेत्रांवर अतिक्रमण केले. या घुसखोरीमुळे प्राण्यांच्या मार्गांवर अतिक्रमण झाले, शिकारीला प्रोत्साहन मिळाले आणि तस्करी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली.

मित्रांनो,

हे घुसखोर लोकसंख्येचा समतोल बिघडवत आहेत, आपल्या संस्कृतीवर हल्ला करत आहेत, गरीब आणि तरुणांचा रोजगार हिसकावून घेत आहेत आणि आदिवासी भागात फसवणूक करून जमिनी बळकावत आहेत. यामुळे आसाम आणि देशाची सुरक्षा, दोन्हीसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

मित्रांनो,

तुम्ही काँग्रेस पक्षापासून खूप सावध राहिले पाहिजे. काँग्रेसचे एकमेव धोरण म्हणजे घुसखोरांना संरक्षण देणे आणि त्यांच्या मदतीने सत्ता मिळवणे! काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष देशभरात हेच करत आहेत. बिहारमध्येही त्यांनी घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी मोर्चे आणि रॅली आयोजित केल्या. पण बिहारच्या लोकांनी काँग्रेस पक्षाचे उच्चाटन केले. आता आसामच्या लोकांची पाळी आहे. मला विश्वास आहे की काँग्रेस पक्षाला आसामच्या मातीतूनही योग्य उत्तर मिळेल.

मित्रांनो,

आसामचा विकास संपूर्ण ईशान्येच्या विकासाचे नवीन दरवाजे उघडत आहे. अ‍ॅक्ट ईस्ट या धोरणाचे मार्गदर्शन आसाम करत आहे. जेव्हा आसाम प्रगती करतो तेव्हा ईशान्य प्रगती करतो. जेव्हा ईशान्य प्रगती करतो तेव्हा भारत प्रगती करतो. आमचे प्रयत्न आणि आसामच्या लोकांचा विश्वास संपूर्ण ईशान्येला नवीन उंचीवर घेऊन जाईल. याच विश्वासाने मी पुन्हा एकदा आजच्या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. माझ्यासोबत म्हणा:

भारत माता की जय।

भारत माता की जय।

हे वर्ष वंदे मातरम्ला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे, ही पवित्र आठवण काढण्याचे आहे. माझ्यासोबत म्हणा:

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2216499) अभ्यागत कक्ष : 32