पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2026 ला केले संबोधित


अभिनव कल्पना, ऊर्जा आणि उद्देशासह, युवा शक्ती राष्ट्र उभारणीत आघाडीवर आहे: पंतप्रधान

स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत : पंतप्रधान

युवकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही एकामागून एक योजना राबवल्या. इथूनच भारतात स्टार्टअप क्रांतीने खऱ्या अर्थाने वेग पकडला : पंतप्रधान

भारत केशरी अर्थव्यवस्थेत उल्लेखनीय वाढ अनुभवत आहे, जो संस्कृती, आशय आणि सर्जनशीलतेमध्ये रुजलेला आहे: पंतप्रधान

मागील दशकात, आम्ही सुरू केलेली सुधारणांची मालिका आता रिफॉर्म एक्सप्रेसमध्ये बदलली आहे. या सुधारणांच्या केंद्रस्थानी आपली युवा शक्ती आहे: पंतप्रधान

भारताच्या युवकांनी गुलामगिरीच्या मानसिकतेतून देशाला मुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे: पंतप्रधान

Posted On: 12 JAN 2026 9:12PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे विकसित भारत युवा नेतृत्व  संवाद 2026 च्या समारोप सत्राला संबोधित केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा आजचे अनेक युवा  नागरिक  जन्माला देखील आले नव्हते आणि 2014 मध्ये जेव्हा त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला , तेव्हा त्यापैकी बहुतांश लहान  मुले होती. मध्ये एवढा काळ उलटूनही युवा पिढीवरील त्यांचा विश्वास कायम आणि अतूट  राहिला आहे यावर त्यांनी भर दिला. "तुमची क्षमता, तुमची प्रतिभा, मला नेहमीच तुमच्या उर्जेतून ऊर्जा मिळाली  आहे. आणि आज पहा, तुम्ही सर्वानी  विकसित भारताच्या ध्येयाची सूत्रे हाती घेतली आहेत ", असे मोदी यांनी नमूद केले.

2047 पर्यंतचा काळ, जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100  वर्षे पूर्ण करेल, तो देशासाठी  आणि येथील युवकांसाठी  निर्णायक काळ आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, युवा भारतीयांची ताकद आणि क्षमता भारताच्या सामर्थ्याला  आकार देतील आणि त्यांचे यश देशाला नव्या  उंचीवर नेईल. विकसित भारत युवा नेतृत्व  संवादातील सहभागींचे अभिनंदन करताना, पंतप्रधानांनी विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यात युवा नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.

 

पंतप्रधानांनी नमूद केले की हा कार्यक्रम योगायोगाने स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी होत आहे. “स्वामी विवेकानंदांचे स्मरण करून, आपण दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो. त्यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन,12  जानेवारी हा दिवस विकसित भारत युवा नेतृत्व  संवादासाठी निवडण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांचे जीवन आपल्या सर्वांसाठी  मार्गदर्शन करणारा  प्रकाश आहे”, यावर मोदी यांनी भर दिला.

विकसित भारत युवा नेतृत्व संवादाच्या वेगवान वाढीबद्दल समाधान व्यक्त करताना,  मोदी यांनी हे एक शक्तिशाली व्यासपीठ असल्याचे नमूद केले जे भारताच्या विकास कार्यक्रमाला आकार देण्यासाठी  तरुणांचा थेट सहभाग सक्षम करते. "या उपक्रमाशी कोट्यवधी युवक जोडले गेले आहेत, 50 लाखांहून अधिक जणांनी केलेली नोंदणी, विकसित भारत आव्हानात सहभागी ३० लाखांहून अधिक युवकांचा सहभाग आणि देशाच्या विकासासाठी त्यांनी विचार सामायिक करणे, इतका मोठ्या प्रमाणात युवा शक्तीचा हा सहभाग अभूतपूर्व आहे", असे  मोदी यांनी अधोरेखित केले.

प्राप्त झालेल्या सूचनांच्या गुणवत्तेचे कौतुक करताना, पंतप्रधानांनी विशेषतः महिला-प्रणित  विकास आणि लोकशाहीमध्ये युवकांचा सहभाग यासारख्या प्रमुख विषयांवर विचारपूर्वक सादर केलेल्या कल्पनांचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान केलेल्या सादरीकरणांचा संदर्भ देत ते म्हणाले की यातून विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा भारताच्या अमृत पिढीचा दृढ संकल्प प्रतिबिंबित होतो. पंतप्रधानांनी भारताच्या जेनझी पिढीची सर्जनशीलता आणि नवोन्मेषी भावना देखील अधोरेखित केली आणि हा संवाद यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व सहभागी युवकांचे आणि मेरा युवा भारत संघटनेच्या सदस्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी 2014 च्या पूर्वीच्या काळाची आठवण करून दिली आणि तो काळ धोरणात्मक लकवा, लालफितीचा  कारभार आणि तरुणांसाठी मर्यादित संधींचा काळ होता असे नमूद केले. ते म्हणाले की, त्यावेळी तरुणांना नोकऱ्या, परीक्षा आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी त्रासदायक प्रक्रियांचा सामना करावा लागत होता, निर्णय घेण्यास विलंब आणि धोरणांची वाईट पद्धतीने अंमलबजावणी होत होती. आज जे अस्वाभाविक वाटते ते दशकापूर्वी नेहमीचे होते यावर त्यांनी भर दिला, त्यानंतर प्रशासन सुधारणांनी भारतातील तरुणांचा अनुभव कसा बदलला हे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी बदलाचे उदाहरण म्हणून स्टार्टअप परिसंस्थेचा उल्लेख केला, त्यांनी नमूद केले की मागील दशकांमध्ये स्टार्टअप संस्कृतीत जागतिक स्तरावर वाढ झाली असली तरी, 2014 पूर्वी भारतात स्टार्टअपवर अगदी कमी प्रमाणात लक्ष केंद्रित केले गेले होते. “ 2014 पर्यंत, देशात 500 पेक्षा कमी नोंदणीकृत स्टार्टअप होते. स्टार्टअप संस्कृतीच्या अभावामुळे , प्रत्येक क्षेत्रात सरकारी हस्तक्षेपाचे वर्चस्व होते. आपल्या युवा प्रतिभेला, त्यांच्या क्षमतांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही”, असे  मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी भारताच्या युवा वर्गाच्या क्षमतेवरचा आपला विश्वास व्यक्त केला. याच विश्वासामुळे युवा संशोधकांचे सक्षमीकरण करण्यावर भर असलेला विकासाचा नला दृष्टिकोन अवलंबला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, व्यवसाय सुलभता, तसेच कर आणि अनुपालन प्रक्रियेचे सुलभीकरण यांसारख्या प्रमुख सुधारणा आणि उपक्रमांची माहिती दिली. या प्रयत्नांमुळे पूर्वी केवळ सरकारी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांमध्येही आता उद्योजकतेसाठी दारे उघडली गेली असून भारताच्या स्टार्टअप क्रांतीला गती मिळाली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्राचे उदाहरणही मांडले. पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत अंतराळ क्षेत्राच्या प्रगतीची जबाबदारी केवळ इस्रो वर होती. मात्र आता आपल्या नेतृत्वातील सरकारने हे क्षेत्र खाजगी उद्योगांसाठी खुले केले, त्यासाठी पाठबळ देणारी चौकट आणि संस्था निर्माण केल्या असे त्यांनी सांगितले. हे क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले केल्यामुळे 300 पेक्षा जास्त स्टार्टअप्स उदयाला आले आहेत, असे त्यांनी नमूद केले. Skyroot Aerospace आणि Agnikul Cosmos यांनी मिळवलेले यश म्हणजे युवा नेतृत्वाखालील नवोन्मेष कशारितीने भारताला उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे  जागतिक नेतृत्व करणारा देश बनवत आहेत, याचाचा पुरावा आहे, असे ते म्हणाले.

निर्बंधात्मक नियम हटवल्यामुळे ड्रोन क्षेत्रात कसे परिवर्तन झाले, याबद्दलही त्यांनी सांगितले. पूर्वी हे क्षेत्र गुंतागुंतीचे कायदे आणि परवान्यांच्या ओझ्याखाली दबून गेले होते. मात्र नियमांच्या सुलभीकरणामुळे ड्रोन तंत्रज्ञानात युवा नेतृत्वाखालील प्रगती आता शक्य झाली आहे, मेड इन इंडिया ड्रोन आणि नमो ड्रोन दीदी यांसारख्या उपक्रमांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि शेतीला त्याचा फायदा होऊ लागला आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.

कधीकाळी सार्वजनिक उपक्रमांचे वर्चस्व असलेल्या संरक्षण क्षेत्रातील मोठ्या सुधारणांचाही उल्लेख त्यांनी केला. आज भारतात संरक्षण क्षेत्राशी संबंधित 1,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स कार्यरत आहेत. कोणी युवा ड्रोन बनवत आहे, तर कोणी ड्रोन प्रतिबंधक प्रणाली विकसित करत आहे, कोणीतरी कृत्रिम बुद्धिमत्ताधारित कॅमेरे तयार करत आहे, तर काही जण रोबोटिक्समध्ये काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आपल्या संबोधनातून पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीतील सर्जनशील कलाकारांची कशा रितीने जडणघडण होत आहे, त्याचबरोबर संस्कृती, आशय आणि सर्जनशीलतेवर आधारित भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीची कशा रितीने प्रगती होत आहे याबद्दलही सांगितले. आज भारत ऑरेंज इकॉनॉमी म्हणजेच संस्कृती, आशय आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती अनुभवत असल्याचे ते म्हणाले. माध्यमे, चित्रपट, गेमिंग, संगीत, डिजिटल आशय आणि व्हीआर-एक्सआर (VR-XR) यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारत एक प्रमुख जागतिक केंद्र म्हणून उदयाला येऊ लागले असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (WAVES) हे युवा कलाकारांसाठीचे एक मोठे व्यासपीठ बनले आहे. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात संधींची अमर्याद दारे उघडली जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. युवा वर्गाने धाडसाने आपल्या कल्पना साकारण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करताना त्यांनी केले, तसेच त्यांच्या प्रयत्नांना सरकारकडून सातत्याने पाठबळ मिळत राहील, अशी ग्वाही देखील दिली.

गेल्या दशकात सुरू झालेल्या सुधारणांच्या संकल्पाने आता वेग घेतला असून, युवा वर्ग हा या सुधारणांच्या केंद्रस्थानी असल्याचे , पंतप्रधानांनी सांगितले. नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांचा आणि 12 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत यांसारख्या उपाययोजनांचा उल्लेखही त्यांनी केला. या सुधारणांमुळे प्रक्रियांचे सुलभीकरण झाले आहे तसेच युवा व्यावसायिक तज्ञ आणि उद्योजकांची बचतही वाढू लागली असल्याचे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत उत्पादनामुळे ऊर्जेची मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊनच नागरी आण्विक ऊर्जा आणि शांती कायद्याअंतर्गत सुधारणा केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. हमीबद्ध वीज पुरवठ्याची सुनिश्चिती, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम घडवून आणणे हाच या सुधारणांचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक स्तरावरील मनुष्यबळाच्या कमतरतेचा संदर्भही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून मांडला. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या युवा वर्गाला आंतरराष्ट्रीय संधींसाठी सज्ज करण्याचे आपल्या सरकारचे धोरण आहे असे ते म्हणाले. जगात निर्माण होणाऱ्या संधींसाठी भारताचा युवा वर्ग सज्ज असेल याची सुनिश्चिती करण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. म्हणूनच कौशल्य विकासाशी संबंधित क्षेत्रांमध्ये सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर आता उच्च शिक्षणाशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आता परदेशी विद्यापीठेही भारतात आपली संकुल सुरू करू लागली आहेत. अलीकडेच हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पीएम सेतू हा कार्यक्रम सुरू केला आहे. युवा वर्गाला उद्योगाच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजांनुसार प्रशिक्षित करता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाअंतर्गत हजारो  औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्ययावतीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाला आत्मनिर्भर आणि विकसित बनवण्यासाठी आत्मविश्वास गरजेचा असतो ही बाब त्यांनी अधोरेखित केली. वसाहतवादाच्या काळातील मॅकॉलेच्या शैक्षणिक धोरणांचा संदर्भ त्यांनी दिला. या धोरणांनी भारतीयांच्या मनात आपल्या स्वतःच्या वारशाबद्दल, उत्पादनांबद्दल आणि क्षमतेबद्दल न्यूनगंड निर्माण केला होता. भारताच्या युवा वर्गाने एकत्रितपणे ही मानसिकता मोडीत काढण्याचा संकल्प करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. येत्या दहा वर्षांत मॅकॉलेच्या धोरणांना 200 वर्षे पूर्ण होणार आहेत, म्हणूनच देशातील प्रत्येक युवा व्यक्तीने भारताला या मानसिकतेतून मुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे असे ते म्हणाले.

जगभरात निर्माण होत असलेल्या ज्ञानासाठी आपण खुले राहायला हवे, त्याचवेळी भारताच्या स्वतःच्या वारशाचे मूल्यही जपणे महत्त्वाचे आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः, अर्थात सर्व दिशांनी आपल्याकडे शुभ, लाभदायक आणि उत्कृष्ट विचार येऊ देत हे वैदिक वचनही त्यांनी यानिमित्ताने मांडले. आपण जगभरातील सर्वोत्तम पद्धतींमधून शिकले पाहिजे, पण आपल्या स्वतःच्या वारशाचे आणि विचारांचे मूल्य कमी लेखण्याची वृत्ती कधीही वरचढ ठरू देऊ नका असे आवाहन त्यांनी उपस्थित युवा वर्गाला केले.

यानिमित्ताने पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांचाही दाखला दिला.  स्वामी विवेकानंद यांनी जागतिक विचारांचा स्वीकार केला, पण त्याचवेळी त्यांनी भारताबद्दलच्या चुकीच्या समजांनाही आव्हान दिले होते, एका सर्वोत्तम राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा दिली होती असे त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांनी युवा वर्गाला ऊर्जेने वाटचाल करत राहण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी प्रोत्साहित केले होते असे ते म्हणाले. आपल्याला युवा वर्गावर, त्यांच्या क्षमतांवर आणि ऊर्जेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले. आपल्या संबोधनाच्या समारोपात त्यांनी सर्वांना पुन्हा राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

***

NehaKulkarni/SushmaKane/TusharPawar/DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2216348) अभ्यागत कक्ष : 45