पंतप्रधान कार्यालय
श्रीमद् विजयरत्न सुंदर सूरीश्वरजी महाराज यांच्या 500 व्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
11 JAN 2026 1:48PM by PIB Mumbai
जय-जिनेंद्र !
आजच्या या पवित्र प्रसंगी सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे प्रेरणास्त्रोत पूज्य भुवनभानुसूरीश्वर जी महाराज साहब यांच्या चरणी प्रणाम करतो. प्रशांतमूर्ती सुविशाल गच्छाधिपति पूज्य श्रीमद् विजय राजेंद्रसूरीश्वर जी महाराज साहेब, पूज्य गच्छाधिपति श्री कल्पतरूसूरीश्वर जी महाराज साहेब, सरस्वती कृपापात्र परम पूज्य आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्नसुंदरसूरीश्वर जी महाराज आणि या समारंभाला उपस्थित सर्व साधू-साध्वी यांना मी वंदन करतो.
या समितीशी संबंधित सर्व सदस्य भाई कुमारपाल भाई, कल्पेश भाई, संजय भाई, कौशिक भाई, अशा सर्व मान्यवरांचेही मी अभिनंदन करतो. पूज्य संतजन,आज आपणा सर्वाना श्रीमद् विजयरत्न सुंदर सूरीश्वर जी महाराज साहब यांच्या 500व्या पुस्तक प्रकाशन समारंभात सहभागी होण्याचे पुण्य लाभले आहे. महाराज साहेब यांनी ज्ञान केवळ ग्रंथांपुरते मर्यादित ठेवले नाही तर प्रत्यक्ष जीवनात ते बाणवून इतरानाही ते जीवनात उपयोगात आणण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे जीवन, संयम, साधेपणा आणि स्पष्टता यांचा अनोखा संगम आहे . ते जेव्हा लेखन करतात तेव्हा शब्दांना अनुभवाचे कोंदण असते.ते जेव्हा बोलतात तेव्हा वाणीला करुणेची झालर असते आणि ते मौनात असतानाही मार्गदर्शन लाभते.महाराज साहेब यांच्या 500 व्या पुस्तकाचा विषय ''प्रेमनु विश्व, विश्वनो प्रेम'', हे शीर्षकच किती बोलके आहे ! आपला समाज,आपला युवा वर्ग,आणि अवघा मानव वर्ग त्यांच्या या रचनेचा लाभ घेईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. या विशेष प्रसंगी उर्जा महोत्सवाचे आयोजन, जनतेच्या मनात नव्या विचारांची उर्जा निर्माण करेल.या प्रसंगी आपणा सर्वाना मी शुभेच्छा देतो.
मित्रहो,
महाराज साहेब यांच्या 500 रचना म्हणजे एक असा विशाल सागर आहे ज्यामध्ये अनेकविध विचाररत्ने सामावली आहेत. या पुस्तकांमध्ये मानव जातीच्या सर्वच समस्यांवर सुलभ आणि आध्यात्मिक उपाय उपलब्ध आहेत. काळ आणि परिस्थितीनुरूप ज्याला जशा मार्गदर्शनाची आवश्यकता लागेल वेग-वेगळे ग्रंथ त्यासाठीचा मार्ग उजळतील. अहिंसा,अपरिग्रह आणि अनेकांत,प्रेम,सहिष्णुता आणि सौहार्द आपल्या तीर्थंकरांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, पूर्वीच्या आपल्या आचार्यांनी आपल्याला जो उपदेश केला आहे त्या सर्वाना आधुनिक आणि समकालीन स्वरुपात आपण या रचनांमध्ये पाहू शकतो. विशेषतः आज जेव्हा जग विभाजन आणि संघर्ष यांनी त्रस्त आहे अशा काळात ''प्रेमनु विश्व, विश्वनो प्रेम'' हा केवळ एक ग्रंथ नव्हे तर हा एक मंत्रही आहे.हा मंत्र आपल्याला प्रेमाचे सामर्थ्य तर सांगतोच त्याचबरोबर जग आज ज्या शांतता आणि सलोख्याच्या शोधात आहे तिथवर पोहोचण्याचा मार्गही हा मंत्र आपल्याला दाखवितो.
मित्रहो,
आपल्या जैन तत्वज्ञानाचे सूत्र आहे - ''परस्पर उपग्रहो जीवानाम्''
म्हणजेच प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाशी जोडलेला आहे. जेव्हा आपण हे सूत्र जाणून घेतो तेव्हा आपला दृष्टीकोन व्यक्तीकडून समाजाकडे वळतो. आपण वैयक्तिक आकांक्षांच्या पलीकडे जाऊन समाज, राष्ट्र आणि मानवतेच्या ध्येयांच्या दिशेने विचार करू लागतो.याच भावनेतून मी आपणा सर्वांसमवेत,आपणा सर्वाना आठवत असेलच नवकार महामंत्र दिवशीही मी आलो होतो.या आयोजनात चारही पंथ एकत्र होते. या ऐतिहासिक प्रसंगी मी नऊ आवाहने, नऊ संकल्प मांडले होते.आज या संकल्पांचा पुनरुच्चार करण्याचा हा प्रसंग आहे. पहिला संकल्प – पाण्याची बचत करण्याचा संकल्प, दुसरा संकल्प -'एक पेड मॉं के नाम. तिसरा - स्वच्छता अभियान. चौथा - व्होकल फॉर लोकल. पाचवा -भारत दर्शन. सहावा - नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा. सातवा -निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा. आठवा -जीवनात योग आणि खेळांना स्थान देण्याचा. नववा -गरिबांना मदत करण्याचा संकल्प.
मित्रहो,
आज आपला भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्रांपैकी एक आहे. आपली युवाशक्ती विकसित भारताची जडणघडण करत आहे त्याचबरोबर सांस्कृतिक मुळेही मजबूत करत आहे. या परिवर्तनात महाराज साहेबांसारख्या संतांचे मार्गदर्शन, त्यांचे साहित्य आणि त्यांचे शब्द जे सदैव साधनेने परिपूर्ण असतात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या 500 व्या पुस्तकासाठी शुभेच्छा देतो.भारताच्या बौद्धिक, नैतिक आणि मानवी जीवनाच्या प्रवासात त्यांचे विचार सतत मार्ग उजळत राहतील याचा मला विश्वास आहे. मी आपणा सर्वांची क्षमाही मागतो. मी स्वतः येऊ इच्छित होतो आणि कार्यक्रमही खूप आधीपासून ठरला होता मात्र आपणाला माहित आहे की जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मी आपणाला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही.मात्र महाराज साहेबांची कृपा आहे की त्यांनी माझी अडचण ओळखली आणि व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपले दर्शन करण्याची,आपल्याला भेटण्याची,आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला दिली.यासाठीही मी महाराज साहेबांचा अतिशय आभारी आहे.
जय जिनेंद्र!
***
नेहा कुलकर्णी / निलीमा चितळे /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2215777)
अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam