पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे पोंगल सणानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 14 JAN 2026 10:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026

वणक्कम! 

इनिय पोंगल नल्वाळ्तुक्कल!

आज, पोंगल हा एक जागतिक सण झाला आहे. जगभरातील तमिळ समुदाय आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणारे लोक तो उत्साहाने साजरा करतात आणि त्यापैकी मीदेखील एक आहे. हा विशेष सण तुम्हा सर्वांसोबत साजरा करणे, माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्याकडे तमिळ जीवनात पोंगल हा  एक आनंददायी अनुभव आहे.  हा सण  आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीप्रती, पृथ्वी आणि सूर्याप्रती कृतज्ञतेचे प्रतीक आहे.त्याचसोबत हा सण आपल्याला निसर्ग, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन साधण्याचा मार्गदेखील दर्शवतो. देशाच्या विविध भागात लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांचा देखील उत्साह आहे. मी भारतातील आणि जगभरातील माझ्या सर्व तमिळ बंधू आणि भगिनींना पोंगल आणि  सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

मित्रांनो, 

गेल्या वर्षी मला तमिळ संस्कृतीशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब राहिली आहे. मी तमिळनाडूमध्ये एक हजार वर्ष जुन्या गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात पूजा केली.  वाराणसीमध्ये  काशी तमिळ संगम दरम्यान, मी सांस्कृतिक एकतेच्या ऊर्जेशी जोडला गेलो आणि मी जिथेही होतो तिथे प्रत्येक क्षणी मला ती जाणवत होती. जेव्हा मी पंबन पुलाच्या उद्घाटनासाठी रामेश्वरमला गेलो तेव्हा मला पुन्हा एकदा तमिळ इतिहासाची महानता दिसून आली. आपली तमिळ संस्कृती ही संपूर्ण भारताचा सामायिक वारसा आहे, इतकेच नव्हे तर संपूर्ण मानवतेचा तो सामायिक वारसा आहे. मी ज्या  'एक भारत श्रेष्ठ भारत' भावनेबद्दल बोलतो तिला पोंगलसारखे सण अधिक संवर्धित करतात. 

मित्रांनो,

जगातील जवळजवळ प्रत्येक संस्कृती पिकांशी संबंधित काही ना काही उत्सव साजरे करते. तमिळ संस्कृतीत, शेतकऱ्यांना जीवनाचा आधार मानले गेले आहे. तिरुक्कुरल मध्ये  शेती आणि शेतकऱ्यांवर विस्तृतपणे लिहिले आहे. आपले शेतकरी राष्ट्र उभारणीत मजबूत भागीदार आहेत; त्यांचे प्रयत्न आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठ्या प्रमाणात बळकटी देत आहेत. केंद्र सरकारदेखील  शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध असून निरंतर काम करत आहे.

मित्रांनो,

पोंगलचा सण आपल्याला प्रेरणा देतो की निसर्गाप्रती कृतज्ञता केवळ शब्दांपुरता मर्यादित राहू नये, तर ती आपल्या जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे. जेव्हा ही धरती आपल्याला इतके काही देते, तेव्हा तिचा सांभाळ करण्याची जबाबदारीही आपली आहे. पुढल्या पिढीसाठी मातीची सुपीकता जपणे, पाणी बचत आणि संसाधनांचा संतुलित उपयोग सर्वात आवश्यक आहे.  मिशन लाइफ, एक पेड़ मां के नाम, अमृत सरोवर, यांसारखी आपली अभियाने हीच भावना संवर्धित करतात. शेती अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही निरंतर काम करत आहोत. आगामी काळात शाश्वत शेतीच्या पद्धती, जलव्यवस्थापन, आणि जे मी नेहमी सांगतो,  'पर ड्रॉप मोर क्रॉप’ नैसर्गिक शेती, एग्रीटेक आणि मूल्यवर्धन यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये आपले युवा नव्या विचाराने पुढे जात आहेत. काहीच महिन्यांपूर्वी मी तामिळनाडूमध्ये नैसर्गिक शेतीवरील एका परिषदेत सहभागी झालो होतो. तिथे मी पाहिले की आपले तमिळ तरुण किती उत्तम प्रकारे काम करत आहेत. म्हणजे व्यावसायिक जीवनातल्या मोठमोठ्या गोष्टींवर पाणी सोडून ते शेतात काम करताना मी पहिले. मी शेतीशी संबंधित माझ्या तरुण तमिळ मित्रांना आवाहन करतो की शाश्वत शेतीमध्ये क्रांती आणणाऱ्या या अभियानाचा आणखी विस्तार करावा. आपले ताट भरलेले असावे, आपल्याकडे संपत्तीही असावी आणि आपली धरतीही सुरक्षित राहावी, हे आपले ध्येय असायला हवे. 

मित्रांनो, 

तमिळ संस्कृती सर्वात प्राचीन जिवंत संस्कृतींपैकी एक आहे. तमिळ संस्कृती शतकांना जोडणारा दुवा आहे, ती इतिहासातून शिकवण देत वर्तमानाला पुढचा मार्ग दर्शवते. याच प्रेरणेने आजचा भारत आपल्या मुळांपासून शक्ती घेऊन नव्या संधींच्या दिशेने पुढे जात आहे. आज पोंगलच्या या पवित्र क्षणी आपल्याला भारताला पुढे नेणारा आत्मविश्वास जाणवतो. एक असा भारत जो त्याच्या संस्कृतीशी जोडलेला आहे, जो आपल्या भूमीचा सन्मान करतो आणि भविष्याबद्दल ज्याच्या ठायी ओतप्रोत विश्वास आहे. इनिय पोङ्गल् नल्वाळ्तुक्कल्! वाळ्गा तमिळ्, वाळ्गा भारतम्! पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पोंगलच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद!

वणक्कम !

अंबादास यादव/सोनाली कुलकर्णी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2214870) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada