उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दिल्ली विद्यापीठात 'नशामुक्त परिसर अभियान' चे उद्घाटन


नशामुक्त परिसरासाठी ई-प्रतिज्ञा प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ॲपचे उपराष्ट्रपतींनी केले अनावरण

प्रविष्टि तिथि: 13 JAN 2026 3:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्ली विद्यापीठात 'नशामुक्त परिसर' मोहिमेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तसेच विकसित व आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यासाठी सातत्यपूर्ण व सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.

मजबूत राष्ट्रांना कणखर नेतृत्वाची आवश्यकता असते, यावर जोर देत उपराष्ट्रपती म्हणाले की, विद्यापीठे ही केवळ शैक्षणिक शिक्षणाची केंद्रे नाहीत, तर जिथे मूल्यांची जोपासना केली जाते, जिथे नेतृत्वाला आकार दिला जातो आणि राष्ट्राचे भविष्य घडवले जाते, अशा संस्था आहेत. जेव्हा दिल्ली विद्यापीठासारखी अग्रगण्य संस्था अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध ठाम भूमिका घेते, तेव्हा ती संपूर्ण समाजाला एक शक्तिशाली संदेश देते असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी 'नशा मुक्त परिसर अभियाना'अंतर्गत एक समर्पित ई-प्रतिज्ञा प्लॅटफॉर्म (https://pledge.du.ac.in/home) आणि मोबाईल ॲप्लिकेशनचेही अनावरण केले आणि देशभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभागी होऊन व्यसनमुक्त परिसरासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना 'नशामुक्त परिसर अभियान' सर्व केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांचा अविभाज्य भाग बनेल याची खात्री करण्याचे आवाहन केले.

उपराष्ट्रपती म्हणाले की, विकसित आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना केवळ तेव्हाच साकार होऊ शकते, जेव्हा तरुण निरोगी, व्यसनमुक्त आणि ध्येयनिष्ठ असतील. ते पुढे म्हणाले की, व्यसनमुक्त तरुण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी, उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि आर्थिक वाढ व राष्ट्रीय विकासात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी अधिक सक्षम असतात.

शिक्षण आणि संस्कृतीच्या भूमिकेवर भर देत उपराष्ट्रपती म्हणाले की, भारताच्या प्राचीन परंपरांमध्ये आत्म-शिस्त, मानसिक संतुलन आणि मन व शरीराच्या शुद्धतेला खूप महत्त्व दिले गेले आहे. 

दिल्ली विद्यापीठ एक आदर्श व्यसनमुक्त परिसर म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करत उपराष्ट्रपती म्हणाले की, निरोगी, बलवान आणि विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी व्यसनमुक्त भारताची आवश्यकता आहे.

निलीमा ‍चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2214126) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam