माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतात वेव्हज् 2025 चे आयोजन; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात 90 पेक्षा अधिक देशांचा सहभाग
'क्रिएटोस्फिअर' (CreatoSphere) मध्ये 'क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस' द्वारे जगभरातील निर्मात्यांचा परस्परांशी संवाद
वेव्हेक्स 2025: माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारे पुढील पिढीचे व्यासपीठ
वेव्हज बाजार, भारताची सृजनशील प्रतिभा आणि उत्पादनांचे प्रदर्शन करणारे वन स्टॉप पोर्टल
सर्जनशील तंत्रज्ञानातील अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, IICT ची स्थापना
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 8:54AM by PIB Mumbai
वेव्हज्
2025 मध्ये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. त्यापैकी वेव्हज 2025 (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट) हा सर्वात मोठा उपक्रम होता. पंतप्रधान मोदी यांनी वेव्हज् चे वर्णन केवळ एक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर "संस्कृती, सर्जनशीलता आणि जागतिक कनेक्टिव्हिटीची एक लाट" असे केले आणि जगभरातील निर्मात्यांना "मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आपली कथा सांगण्यासाठी" प्रोत्साहित केले. पंतप्रधानांनी भारताच्या “क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड” या संकल्पनेवरही भर दिला आणि जागतिक गुंतवणूकदार व तरुणांना भारताच्या विस्तीर्ण सर्जनशील परिसंस्थेशी जोडले जाण्याचे आवाहन केले.
वेव्हज् 2025 मध्ये 90 पेक्षा अधिक देशांचा सहभाग पाहायला मिळाला, ज्यामध्ये 10,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 निर्माते, 300 पेक्षा जास्त कंपन्या, 350 हून अधिक स्टार्टअप्स आणि अंदाजे 1 लाख लोकांची उपस्थिती होती. यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेनमेंट, AVGC-XR, चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होता..
वेव्हज् प्लॅटफॉर्म त्याच्या तीन भविष्यवेधी विभागांच्या माध्यमातून सुरू ठेवला जात आहे:
1) क्रिएटोस्फिअर (CreatoSphere) आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस (CIC)
क्रिएटोस्फिअर हे नवोन्मेषाचे एक 'इमर्सिव्ह हब' आहे जे निर्मात्यांना केंद्रस्थानी ठेवते; चित्रपट, व्हीएफएक्स, व्हीआर, ऍनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, संगीत, ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडिया या क्षेत्रातील कल्पनांचे अनुभवात रूपांतर करते. हे संवाद, भागीदारी, नवोन्मेष आणि प्रतिभेचे जागतिक सादरीकरण करण्यासाठी भारत आणि परदेशातील आघाडीच्या सर्जनशील विचारांना एकत्र आणते.
सीआयसी सीझन- I ही "भारतातील सर्वात मोठी सर्जनशील प्रतिभा चळवळ" म्हणून उदयास आली असून तिने अभूतपूर्व जागतिक व्याप्ती गाठली आहे. सीझन I मध्ये 33 श्रेणींचा समावेश होता, ज्यामध्ये संपूर्ण भारत आणि 60 पेक्षा जास्त देशांमधून 1 लाखाहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. वेव्हज् मधील आठ सर्जनशील झोनमध्ये 750 हून अधिक अंतिम स्पर्धकांचे सादरीकरण करण्यात आले, ज्याने भारताचे सर्वात मोठे क्रिएटर-लीड चॅलेंज प्लॅटफॉर्म स्थापित केले आहे.
या हंगामाचा एक निर्णायक क्षण म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, ज्यांनी तरुण निर्मात्यांशी थेट संवाद साधला, विजेत्या नवकल्पनांचा अनुभव घेतला आणि जागतिक 'कंटेंट हब' म्हणून भारताच्या क्षमतेला अधोरेखित केले. या हंगामाच्या समारोपाच्या वेळी माननीय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेव्हज् क्रिएटर ऍवॉर्ड्स सोहळ्यात 150 हून अधिक निर्मात्यांचा गौरव करण्यात आला, ज्यातून भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था जोपासण्यावर सरकारचा असलेला भर अधोरेखित झाला.
सीआयसी विजेत्यांनी अलीकडेच मेलबर्न, ओसाका, टोरंटो, टोकियो आणि माद्रिद येथे भारताचे प्रतिनिधित्व केले असून, प्रमुख आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व्यासपीठांवर आपली कला सादर केली आणि प्रदर्शित केली. संगीत क्षेत्रातील विजेत्यांनी मेलबर्न आणि टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादरीकरण केले. गेमिंग आणि ॲनिमेशनमधील अंतिम स्पर्धकांनी टोकियो गेम शोमध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन केले. चित्रपट आणि व्हिएफएक्स निर्मात्यांनी माद्रिद येथील इबेरसिरिज मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. इतर अनेक विजेत्यांनी विविध करारांतर्गत भागीदारी मिळवली, प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांचे काम प्रदर्शित केले आणि मोठी ओळख प्राप्त केली.
2) वेव्हेक्स
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याच्या आपल्या उपक्रमाचा भाग म्हणून 200 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना पाठबळ देणे आणि त्यांना सहभागी करून घेणे हे वेव्हेक्स चे उद्दिष्ट आहे.
या मंचाने 30 पेक्षा अधिक स्टार्टअप्सना मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि लुमिकाई यांसारख्या जागतिक उद्योग धुरिणांसमोर सादरीकरण करण्यास सक्षम केले, तर जवळपास 100 स्टार्टअप्सनी प्रदर्शनातील स्टॉल्सच्या माध्यमातून आपली सोल्यूशन्स प्रदर्शित केली. एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे व्हीवायजीआर न्यूज आणि विवा टेक्नोलॉजीस (दोन्ही मंचांना WaveX चे पाठबळ ) यांची 'शार्क टँक इंडिया' वर सादरीकरणासाठी झालेली निवड, ज्याने राष्ट्रीय स्तरावरील ओळख आणि विश्वासार्हता अधोरेखित केली.
वेव्हेक्सने तंत्रज्ञान, संस्कृती आणि भाषिक विविधतेच्या संगमावर नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी कलासेतू आणि भाषासेतू आव्हाने यशस्वीरित्या संकल्पित आणि कार्यान्वित केली. 'कलासेतू' ने मोठ्या प्रमाणावर वापरता येण्याजोग्या एआय-आधारित 'टेक्स्ट-टू-व्हिडिओ' निर्मिती सोल्यूशन्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले, तर भाषासेतूने ने रिअल-टाइम भाषांतर साधनांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले. या उपक्रमांमध्ये देशभरातील 100 पेक्षा जास्त स्टार्टअप्सनी सहभाग नोंदवला आणि याचा समारोप 10 स्टार्टअप्सच्या निवडीने झाला, ज्यांना सरकारी मीडिया युनिट्ससोबत काम करण्याची संधी देण्यात आली.
वेव्ह-एक्स ने इंडिया जॉय, आय.जी.डी.सी, इन्फोकोम, इफ्फी/ वेव्हज चित्रपट बाजार आणि 'द बिग पिक्चर समिट' यांसारख्या प्रमुख व्यासपीठांवरील सहभाग सुलभ केला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ओढ निर्माण झाली आणि भागीदारी, प्रकाशन तसेच व्यापारीकरण या विषयांवर प्रगत चर्चा शक्य झाली.
संपूर्ण भारतभर व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी एफ.टी.आय.आय पुणे, एस.आर.एफ.टी.आय कोलकाता, आय.आय.सी.टी मुंबई आणि आय.आय.एम.सी च्या विविध आवारांमध्ये 09 इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करण्यात आली आहेत. सध्या 34 स्टार्ट अप्स प्रत्यक्ष आणि संमिश्र स्वरूपात तिथे कार्यरत आहेत, तर 100 हून अधिक अर्जांचे मूल्यमापन सुरू आहे. टी-हब सोबतच्या सामंजस्य करारासारख्या भागीदारीमुळे या उपक्रमाला अधिक बळकटी मिळाली आहे.
3) वेव्हज बाजार
वेव्हज बाजार हे चित्रपट, गेम डेव्हलपर्स, ऍनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवा, एक्सआर, व्हीआर आणि एआर, रेडियो आणि पॉडकास्ट, कॉमिक्स आणि ई-पुस्तके, वेब-मालिका आणि संगीत यासाठीची जागतिक ई-बाजारपेठ आहे. 'कलेकडून व्यापाराकडे' नेणारा उपक्रम म्हणून याची रचना करण्यात आली असून, तो भारतीय निर्मात्यांना आणि संस्थांना जागतिक व देशांतर्गत बाजारपेठांशी जोडतो. हे काम निवडक महोत्सव किंवा कार्यक्रमांमधील सहभाग, व्यावसायिक बैठका, सह-निर्मिती, गुंतवणूक आणि भागीदारी याद्वारे उद्योग क्षेत्रातील भागधारकांच्या समन्वयाने केले जाते.
जागतिक आणि देशांतर्गत पोहोच (ऑगस्ट–डिसेंबर 2025)
ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 दरम्यान, वेव्हज बाजारने चार खंडांमधील 12 प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आणि 4 महत्त्वाच्या देशांतर्गत उद्योग कार्यक्रमांमध्ये एक व्यापक जनसंपर्क कार्यक्रम राबवला. या प्रयत्नांमुळे अभूतपूर्व व्याप्ती आणि मोजता येण्याजोगा प्रभाव निर्माण झाला:
-
संभाव्य व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या चर्चेतून अंदाजे 4,334 कोटी रुपयांची उलाढाल निर्माण झाली.
-
10 सामंजस्य करार किंवा स्वारस्य पत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आणि 3 सामंजस्य करार प्रस्तावित करण्यात आले.
-
9,000 पेक्षा जास्त नियोजित व्यावसायिक बैठका सुलभ करण्यात आल्या.
-
भारत-जपान सर्जनशील कॉरिडॉर, भारत-कोरिया ए.व्ही.जी.सी सहकार्य आराखडा आणि भारत-ऑस्ट्रेलिया सर्जनशील सहकार्याचा प्रारंभ करण्यात आला.
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये मेलबर्न चित्रपट महोत्सव, गेम्सकॉम, व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ओसाका वर्ल्ड एक्स्पो, टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (टिफ्फ 50), बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, टोकियो गेम शो, आयबर्सिरीज, मिपकॉम, रेड सी चित्रपट महोत्सव, फोकस लंडन आणि एशिया टीव्ही फोरम मार्केट, सिंगापूर यांचा समावेश होता.
महत्त्वाचे देशांतर्गत उपक्रम – इफ्फी / वेव्ह्स फिल्म बाजार (गोवा), इंडिया जॉय (हैदराबाद), IGDC आयजीडीसी(चेन्नई), सीआयआय – बिग पिक्चर.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज् (आयआयसीटी)
सरकारने अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) क्षेत्रासाठी ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलेन्स’ (एनसीओई) 19 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईमध्ये 391.15 कोटी रुपये एकरकमी अर्थसहाय्यातून निर्माण केले. या केंद्राला आता ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज्’ (आयआयसीटी) असे नाव आहे. हे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर आधारित असून फिक्की आणि सीआयआय हे यात भागीदार आहेत. मुंबईतील एनएफडीसीच्या जागेत तात्पुरती जागा देऊन ही संस्था सुरू करण्यात आली.
संस्थेच्या कामकाजाच्या पहिल्या टप्प्याला 18 जुलै 2025 रोजी आयआयसीटी-एनएफडीसीच्या मुंबई कॅम्पसमध्ये सुरूवात झाली. या टप्प्यात 4 ते 7 मजल्यांपर्यंत चार पूर्णपणे कार्यक्षम मजले, अत्याधुनिक वर्ग खोल्या आणि आठ नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारे स्वतंत्र स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले. व्यावसायिक दर्जाच्या स्क्रीनिंग, साउंड डिझाइन आणि निर्मितीनंतरच्या प्रक्रियेसाठी जागतिक उद्योग मानकांनुसार अत्याधुनिक चित्रपटगृह पूर्ण करण्यात आले. भविष्यात गोरेगावातील फिल्मसिटी इथे 10 एकर क्षेत्रफळाचा कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्याचा बेत असून, त्यामध्ये अत्याधुनिक इमर्सिव्ह स्टुडिओद्वारे एआर/व्हीआर/एक्सआरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था असेल. यामुळे विद्यार्थी भारताच्या मनोरंजन उद्योगाच्या थेट केंद्रस्थानी येतील.
महत्त्वपूर्ण घडामोडी
a. गूगल, मेटा, एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲडोब आणि डब्ल्यूपीपी यांसारख्या आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान व माध्यम कंपन्यांसोबत अनेक सामंजस्य करारांद्वारे धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे.
b. संस्थेच्या संकेतस्थळावर (https://www.iict.org) एकूण 18 अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आले असून, 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये नावनोंदणी केली आहेत. सध्या आयआयसीटीमध्ये 8 स्टार्ट-अप्सना इन्क्युबेशन दिले जात आहे.
भारताचा लाईव्ह इव्हेंट उद्योग
कॉन्सर्ट इकॉनॉमीला राष्ट्रीय विकासाचा चालक बनविण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत ठरेल अशा लाईव्ह इव्हेंट्स डेव्हलपमेंट सेल – एलईडीसी कक्षाची स्थापना माहिती व प्रसारण मंत्रालयाने केली आहे. या कक्षात संबंधित केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, उद्योग संस्था आणि प्रमुख भागधारकांचे प्रतिनिधी सहभागी असून, या क्षेत्राच्या समन्वयित व संरचित विकासाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
मुख्य लक्ष्य केंद्रे
-
मंजुरी प्रक्रिया जलद आणि गुंतवणूकदारांना अनुकूल करण्यासाठी अग्निशमन, वाहतूक, महानगरपालिका इत्यादी मंजुऱ्यांसाठी इंडिया सिने हब (आयसीएच) वर एक-खिडकी मंजुरी प्रणाली विकसित करण्यात येत आहे.
-
राज्यांसाठी नमुनेदार एसओपी तयार करणे आणि अनावश्यक परवानग्या काढून टाकणे.
डिजिटल पायरसी रोखण्यासाठी सरकारी उपाययोजना
चित्रपट व मनोरंजन उद्योगासह सर्जनशील अर्थव्यवस्थेवर बेकायदा प्रती निर्माण करण्या- (पायरसी) -मुळे होणाऱ्या विपरीत परिणामांची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने कायदे, कठोर अंमलबजावणी आणि जनजागृती या माध्यमांतून बहुआयामी धोरण अवलंबिले आहे.
पायरसीविरोधी धोरणे मजबूत करण्यासाठी आणि समन्वयित कृती आराखडे तयार करण्यासाठी गृह मंत्रालय, एमईआयटीवाय, डीपीआयआयटी आणि डीओटी यांसह प्रमुख मंत्रालयांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली आंतर-मंत्रालयीन समिती (आयएमसी) स्थापन करण्यात आली आहे.
दूरदर्शन आणि सामुदायिक रेडिओची कामगिरी
2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान मतदार जनजागृती आणि शिक्षणविषयक कामगिरीबद्दल दूरदर्शनला ईसीआय मीडिया पुरस्कार (दूरचित्रवाणी) मिळाला. हा पुरस्कार 25 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
2025 मध्ये सामुदायिक रेडिओने स्थानिक संवाद, शिक्षण आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपला विस्तार सुरू ठेवला. 22 नवीन केंद्रे कार्यान्वित झाल्याने देशभरातील एकूण केंद्रांची संख्या 551 झाली. मुंबईत वेव्हज् शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ संमेलन भरविण्यात आले. तसेच पाच जनजागृती कार्यशाळा आणि एक प्रादेशिक संमेलन घेण्यात आले. यामध्ये सामुदायिक रेडिओ न पोहोचलेली क्षेत्रे आणि सामुदायिक रेडिओ केंद्रांच्या क्षमता बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
इफ्फी 2025 (56 वी आवृत्ती) आणि वेव्हज् / फिल्म बाजार
-
गोवा इथे आयोजित 56 व्या इफ्फी 2025 - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 81 देशांतील 240 हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये अनेक जागतिक, आंतरराष्ट्रीय आणि आशियाई चित्रपटांच्या पहिल्या प्रदर्शनाचा समावेश होता. त्यामुळे इफ्फीचे प्रमुख आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणून स्थान अधोरेखित झाले.
-
इफ्फी 2025 मध्ये नवोन्मेष आणि समावेशकतेवर भर देण्यात आला. भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता - एआय चित्रपट महोत्सव तसेच व्हीएफएक्स, सीजीआय आणि डिजिटल निर्मितीवरील सत्रे आयोजित करण्यात आली. उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आगामी काळासाठी सज्ज कौशल्यांसह महोत्सव कालसुसंगत झाला.
-
पणजी शहरातून काढण्यात आलेल्या ऐतिहासिक भव्य मिरवणुकीमुळे इफ्फीचे गल्लोगल्लीतील सार्वजनिक उत्सवात रूपांतरित झाले. लोककेंद्रित राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव म्हणून त्याची ओळख बळकट झाली आणि गोव्याचे सर्जनशील केंद्र म्हणून ‘ब्रँडिंग’ अधिक मजबूत झाले.
-
इफ्फी 2025 सह आयोजित वेव्हज् फिल्म बाजारात अभूतपूर्व जागतिक सहभाग दिसून आला. 40 हून अधिक देशांतील 2,500 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले. हा दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय फिल्म बाजारांपैकी एक ठरला. या कार्यक्रमात 15 पेक्षा अधिक देशांतील 320 प्रकल्प सादर करण्यात आले, ज्यामुळे भारतातील मजकूर, संदेशादी प्रती जगाचे वाढलेले कुतूहल दिसून आले.
सीबीएफसीकडून डिजिटल, बहुभाषिक आणि लिंग-संतुलित प्रमाणपत्रे देण्यास चालना
-
सीबीएफसीने ई-सिनेप्रमाण पोर्टलवर ऑनलाइन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ केली असून, पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया आणि सुरक्षित डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे अर्जदारांना डाउनलोड करून घेता येतात.
-
ई-सिनेप्रमाणवर नवीन बहुभाषिक प्रमाणपत्रे विभाग सुरू करण्यात आला असून, एका अर्जाद्वारे चित्रपटाच्या अनेक भाषांमधील आवृत्त्यांसाठी अर्ज करता येतो. सर्व मंजूर भाषांचा समावेश असलेले एकत्रित बहुभाषिक प्रमाणपत्र दिले जाते.
-
प्रत्येक परीक्षण आणि पुनरावलोकन समितीत महिलांचा 50% सहभाग सुनिश्चित करून सीबीएफसीने प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व बळकट केले आहे.
***
NehaKulkarni/ShaileshPatil/ReshamaJathar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210444)
आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam