पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (129 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

प्रविष्टि तिथि: 28 DEC 2025 11:57AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार.

'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन. काही दिवसातच 2026 हे वर्ष सुरू होणार आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, गेल्या संपूर्ण वर्षाच्या आठवणी मनात पिंगा घालत आहेत - अनेक छायाचित्रे, अनेक चर्चा, अनेक उपलब्धी, ज्यांनी देशाला एकत्र जोडलं. 2025 ने आपल्याला असे अनेक क्षण दिले ज्यावर ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला. देशाच्या सुरक्षेपासून ते खेळांच्या मैदानापर्यंत, विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगभरातील मोठ्या व्यासपीठांपर्यंत, भारताने प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला. यावर्षी 'ऑपरेशन सिंदूर ' प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले. जगाने स्पष्टपणे पाहिले, आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नाही. 'ऑपरेशन सिंदूर ' दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतमातेप्रति प्रेम आणि समर्पणाची छायाचित्रे समोर आली. लोकांनी आपापल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मित्रांनो, हाच उत्साह 'वंदे मातरम्' ला 150 वर्षे पूर्ण झाली तेव्हाही पहायला मिळाला. मी तुम्हाला #VandeMataram150' सह तुमचे संदेश आणि सूचना पाठवण्याची विनंती केली होती. देशवासियांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग नोंदवला.

मित्रांनो, 2025 क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनेही एक संस्मरणीय वर्ष ठरलं. आपल्या पुरुष क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली. महिला क्रिकेट संघाने प्रथमच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या मुलींनी दृष्टिहीन महिला क्रिकेट संघाने पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास रचला. आशिया चषक टी-20 मध्येही तिरंगा डौलाने फडकला. पॅरा-ऍथलिट्सनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पदकं जिंकून हे सिद्ध केलं की कुठलाही अडथळा मनोधैर्य खच्ची करू शकत नाही. विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही भारताने उत्तुंग झेप घेतली. शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनले. पर्यावरण संरक्षण आणि वन्य-जीवांच्या सुरक्षेशी संबंधित अनेक प्रयत्न देखील 2025चे वैशिष्ट्य बनले. भारतात चित्यांची संख्या आता 30हून अधिक झाली आहे. 2025 मध्ये श्रद्धा, संस्कृती आणि भारताचा अद्वितीय वारसा हे सगळे एकत्र पहायला मिळालं. वर्षाच्या सुरुवातीला प्रयागराज महाकुंभच्या आयोजनाने संपूर्ण जगाला अचंबित केलं. वर्षअखेरीस अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमाने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं दाटून आला. स्वदेशीच्या बाबतीतही लोकांचा अमाप उत्साह दिसून आला. अनेकजण त्याच वस्तू खरेदी करत आहेत, ज्या भारतीयांनी घाम गाळून बनवल्या आहेत आणि ज्यात भारताच्या मातीचा सुगंध आहे. आज, आपण अभिमानाने म्हणू शकतो की 2025 ने भारताला मोठा आत्मविश्वास दिला आहे. ही गोष्ट देखील खरी आहे की या वर्षी आपल्याला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला, अनेक क्षेत्रांमध्ये करावा लागला. आता देश 2026 मध्ये नवीन आशा आणि नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. भारताकडून आशेचे सर्वात मोठे कारण आहे आपली युवा शक्ती. विज्ञान क्षेत्रातील आपली कामगिरी, नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानाच्या विस्ताराने जगभरातील देश खूप प्रभावित झाले आहेत.

मित्रांनो, भारतातील युवकांमध्ये नेहमीच काहीतरी नवीन करण्याची आवड असते आणि ते तितकेच जागरूक देखील असतात. माझे युवा मित्र मला अनेकदा विचारतात की ते राष्ट्र उभारणीत आपले योगदान आणखी कशा प्रकारे वाढवू शकतात? ते त्यांच्या कल्पना कशा प्रकारे सामायिक करू शकतात? बरेच मित्र विचारतात की ते त्यांच्या कल्पना माझ्यासमोर कशा मांडू शकतात? आपल्या युवा मित्रांच्या या जिज्ञासेवर उपाय आहे 'विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद'. गेल्या वर्षी याची पहिली आवृत्ती पार पडली. आता काही दिवसांनी याची दुसरी आवृत्ती होणार आहे. पुढल्या महिन्याच्या 12 तारखेला स्वामी विवेकानंद जी यांच्या जयंतीदिनी ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा केला जाणार आहे. याच दिवशी 'युवा नेत्यांचा संवाद’ कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाणार आहे आणि मी देखील यात नक्की सहभागी होईन. यामध्ये आपले युवक नवोन्मेष, तंदुरुस्ती हस्टार्टअप आणि शेती सारख्या महत्वपूर्ण विषयांवर आपल्या कल्पना सामायिक करतील. मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे.

मित्रांनो, या कार्यक्रमात आपल्या युवकांचा सहभाग वाढत आहे हे पाहून मला आनंद झाला. काही दिवसांपूर्वीच यासंबंधी एक प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. त्यात 50 लाखांहून अधिकयुवक सहभागी झाले. एक निबंध स्पर्धा देखील झाली, ज्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. या स्पर्धेत तामिळनाडू प्रथम, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

मित्रांनो, आज देशात तरुणांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी नव-नवीन संधी मिळत आहेत. असे असंख्य मंच उदयास येत आहेत, जिथे युवक आपली क्षमता आणि आवडीनुसार प्रतिभा दाखवू शकतात. असाच एक मंच आहे - 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन', आणखी एक असे माध्यम जिथे कल्पना कृतीत रूपांतरित होतात.

मित्रांनो, ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025’ चा समारोप याच महिन्यात झाला. या हॅकेथॉन दरम्यान 80हून अधिक सरकारी विभागांच्या 270 हून अधिक समस्यांवर विद्यार्थ्यांनी काम केलं. विद्यार्थ्यांनी असे उपाय दिले जे वास्तविक जीवनातील आव्हानांशी निगडित होते. उदा. वाहतूक कोंडीची समस्या आहे.

यावर युवकांनी ‘स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन’शी संबंधित अतिशय रोचक दृष्टीकोन सामायिक केला. आर्थिक फसवणूक आणि डिजिटल अटक यासारख्या आव्हानांवर उपाय म्हणून युवकांनी त्यांच्या कल्पना मांडल्या. गावांमध्ये डिजिटल बँकिंगसाठी सायबर सुरक्षा चौकट संबंधी उपाय सुचवले. अनेक युवक कृषी क्षेत्रातील आव्हाने सोडवण्यात गर्क होते.

मित्रांनो, मागील 7-8 वर्षांमध्ये 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन' मध्ये 13 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि 6 हजारांहून अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत. युवकांनी शेकडो समस्यांवर अचूक उपाय देखील दिले आहेत. अशा प्रकारच्या हॅकेथॉनचे आयोजन वेळोवेळी होत असते. मी माझ्या युवा मित्रांना या हॅकेथॉनचा भाग बनण्याचे आवाहन करतो.

मित्रांनो, आजचे जीवन तंत्रज्ञान-संचालित होत चालले आहे आणि जे परिवर्तन पूर्वी अनेक शतकांमध्ये व्हायचं ते आता काही वर्षांतच होताना पहायला मिळत आहे. अनेकदा तर काही लोक चिंता व्यक्त करतात की रोबोने मानवांची जागा घेतली तर काय होईल. या बदलत्या काळात, मानवी विकासासाठी आपल्या मुळांशी जोडलेले राहणे अतिशय आवश्यक आहे. मला हे पाहून खूप आनंद होत आहे की आपली पुढची पिढी आपल्या संस्कृतीच्या मुळांना घट्ट धरून आहे - नवीन विचारसरणी आणि नवीन पद्धतींसह.

मित्रांनो, तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे नाव नक्कीच ऐकले असेल. संशोधन आणि नवोन्मेष ही या संस्थेची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी तिथल्या काही विद्यार्थ्यांना वाटले की अभ्यास आणि संशोधन सुरु असताना संगीतासाठी देखील जागा असायला हवी. मग इथूनच एक छोटासा संगीत वर्ग सुरु झाला. कुठलाही मोठा मंच नाही, फार मोठे बजेट नाही. हळूहळू हा उपक्रम विस्तारत गेला आणि आज आपण तो ‘गीतांजली आयआयएससी’ नावाने ओळखतो. हे तो आता केवळ एक वर्ग नाही, तर कॅम्पसचे सांस्कृतिक केंद्र आहे. इथं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे, लोक-परंपरा आहेत, शास्त्रीय शैली आहेत. विद्यार्थी येथे बसून एकत्र रियाज करतात. प्राध्यापक एकत्र बसतात आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्यात सामील होतात. आज, दोनशेहून अधिक लोक यात सहभागी आहेत. आणि विशेष म्हणजे जे लोक परदेशात गेले आहेत ते देखील ऑनलाइन यात सहभागी होऊन या समूहाचा डोलारा सांभाळत आहेत.

मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याचे हे प्रयत्न केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत. जगाच्या कानाकोपऱ्यात, तिथे स्थायिक झालेले भारतीय देखील आपली भूमिका बजावत आहेत. आणखी एक उदाहरण जे आपल्याला देशाबाहेर घेऊन जाते - हे ठिकाण आहे दुबई. तिथे राहणाऱ्या कन्नड कुटुंबांनी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला - आपली मुले तंत्रज्ञानाच्या जगात पुढे जात आहेत, मात्र ते आपल्या भाषेपासून तर दूर जात नाहीत ना? यातूनच कन्नड शाळेचा जन्म झाला. एक असा प्रयत्न, जिथे मुलांना कन्नड शिकवायला, शिकायला, लिहायला आणि बोलायला शिकवलं जातं. आज, एक हजाराहून अधिक मुले यात सहभागी आहेत. खरोखरच, कन्नड नाडू, नुडी नम्मा हेम्मे. कन्नडची भूमी आणि भाषा हा आपला अभिमान आहे.

मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, "जिथे इच्छा तिथे मार्ग". ही म्हण पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे, मणिपूरमधील एक युवक मोइरांगथेम सेठ जी यांनी. त्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. श्री. मोइरांगथेम जी मणिपूरच्या ज्या दुर्गम भागात राहत होते, जिथे वीजेची मोठी समस्या होती. या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांनी स्थानिक उपायांवर भर दिला आणि त्यांना सौरऊर्जेमध्ये हा उपाय सापडला. आपल्या मणिपूरमध्ये सौरऊर्जा निर्मिती करणे सोपे आहे. म्हणून, मोइरांगथेम यांनी सौर पॅनेल बसवण्याची मोहीम राबवली आणि या मोहिमेमुळे आज त्यांच्या परिसरातील शेकडो घरांमध्ये सौरऊर्जा पोहचली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आरोग्य सेवा आणि उपजीविका सुधारण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला आहे. आज, त्यांच्या प्रयत्नांमुळे, मणिपूरमधील अनेक आरोग्य केंद्रांना देखील सौरऊर्जा मिळत आहे. त्यांच्या या कामाचा मणिपूरमधील महिलांनाही खूप फायदा झाला आहे. स्थानिक मच्छीमार आणि कलाकारांनाही यामुळे मदत होत आहे.

मित्रांनो, आज सरकार ‘पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’अंतर्गत प्रत्येकी लाभार्थी कुटुंबाला सौर पॅनेल बसवण्यासाठी सुमारे 75 ते 80 हजार रुपये देत आहे. मोइरांगथेम जी यांचे हे प्रयत्न तसे वैयक्तिक आहेत, परंतु ते सौर ऊर्जेशी संबंधित प्रत्येक मोहिमेला नवीन गती देत आहेत. 'मन की बात'च्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता आपण जरा जम्मू आणि काश्मीरकडे वळूया. जम्मू आणि काश्मीरचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा, त्याबाबत एक अशी गोष्ट सांगायची आहे जी तुम्हाला अभिमानाने भारून टाकेल. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला मध्ये जेहनपोरा नावाचे एक ठिकाण आहे. तिथले लोक अनेक वर्षांपासून काहीसे उंच ढिगारे पाहत आले होते. साधारण असे ढिगारे, हे काय आहे हे कोणालाही माहित नव्हते. मग एके दिवशी पुरातत्वशास्त्रज्ञांची नजर यावर पडली. जेव्हा त्यांनी या परिसराला काळजीपूर्वक पहायला सुरुवात केली तेव्हा हे ढिगारे काहीसे वेगळे वाटले. त्यानंतर, या ढिगाऱ्यांचा वैज्ञानिक अभ्यास सुरू करण्यात आला. ड्रोनद्वारे वरून छायाचित्रे घेतली गेली आणि जमिनीचे मॅपिंग करण्यात आले. त्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येऊ लागल्या. हे ढिगारे नैसर्गिक नसल्याचे समजले.

हे मानवानं बांधलेल्या एखाद्या मोठ्या इमारतीचे अवशेष आहेत. दरम्यान, याला आणखी एक मनोरंजक दुवा जोडला गेला. काश्मीरपासून हजारो किलोमीटर अंतरावर, फ्रान्समधल्या एका संग्रहालयाच्या भांडारात एक जुना, अस्पष्ट फोटो सापडला. बारामुल्लाच्या त्या फोटोमध्ये तीन बौद्ध स्तूप दिसत होते. इथूनच काळानं एक वळण घेतलं आणि काश्मीरचा वैभवशाली भूतकाळ आपल्यासमोर आला. हा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. काश्मीरमधला जहानपोराचा हा बौद्ध परिसर आपल्याला काश्मीरचा भूतकाळ काय होता, त्याची ओळख किती समृद्ध होती याची आठवण करून देतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एका हृदयस्पर्शी प्रयत्नाबद्दल सांगू इच्छितो. फिजीमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रशंसनीय उपक्रम सुरू आहे. तिथल्या नवीन पिढीला तमिळ भाषेशी जोडण्यासाठी अनेक पातळ्यांवर सतत प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या महिन्यात फिजीच्या राकी-राकी भागातल्या एका शाळेत पहिल्यांदाच तमिळ दिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी मुलांना एक व्यासपीठ मिळालं जिथे त्यांनी आपल्या भाषेबद्दलचा अभिमान उघडपणे व्यक्त केला. मुलांनी तमिळमध्ये कविता वाचल्या, भाषणे दिली आणि मंचावर आपली संस्कृती पूर्ण आत्मविश्वासानं सादर केली. मित्रांनो, तमिळ भाषेच्या संवर्धनासाठी देशातही सतत काम केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी माझा संसदीय मतदारसंघ असलेल्या काशीमध्ये चौथा 'काशी तमिळ संगम' आयोजित करण्यात आला होता.

आता मी तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवणार आहे. ऐका आणि अंदाज बांधा की तमिळ बोलण्याचा प्रयत्न करणारी ही मुलं कुठली आहेत?

# (Audio Clip 1 पायल) #

मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तमिळ भाषेत इतक्या सहजपणे स्वतःला व्यक्त करणारी ही मुलं वाराणसीची, काशीची आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी आहे, परंतु तमिळ भाषेवरच्या प्रेमामुळे त्यांना तमिळ शिकण्याची प्रेरणा मिळाली आहे. यावर्षी वाराणसीतल्या "काशी तमिळ संगम" दरम्यान तमिळ शिकण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

Learn Tamil – ‘तमिल कराकलम’ या संकल्पनेअंतर्गत वाराणसीतल्या 50 हून अधिक शाळांमध्ये विशेष मोहिमा देखील राबवण्यात आल्या. याचाच परिणाम आपल्याला या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतो आहे.

# (Audio Clip 2 वैष्णवी) #

मित्रांनो, तमिळ ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे. तमिळ साहित्य देखील खूप समृद्ध आहे. मी तुम्हाला ‘मन की बात’मध्ये काशी तमिळ संगममध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. मला आनंद वाटतो की आज देशाच्या इतर भागातही मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये तमिळ भाषेबद्दल एक नवीन आवड दिसून येत आहे - ही भाषेची शक्ती आहे, ही भारताची एकता आहे.

मित्रांनो, पुढच्या महिन्यात आपण देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपलं हृदय स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांबद्दलच्या कृतज्ञतेनं भरून येतं. आपल्या देशानं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी दीर्घ संघर्ष केला आहे. देशाच्या प्रत्येक भागातल्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलं आहे. परंतु दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या अनेक नायक-नायिकांना त्यांचा योग्य तो आदर मिळाला नाही. अशाच एका स्वातंत्र्यसेनानी आहेत – ओडिशाच्या पार्वती गिरी. जानेवारी 2026 मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी केली जाईल. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भारत छोडो चळवळीत भाग घेतला. मित्रांनो, स्वातंत्र्य चळवळीनंतर पार्वती गिरी यांनी आपले जीवन समाजसेवा आणि आदिवासी कल्याणासाठी समर्पित केलं. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली. त्यांचं प्रेरणादायी जीवन प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करत राहील.

“मूँ पार्वती गिरि जिंकु श्रद्धांजलि अर्पण करुछी |”

(मी पार्वती गिरी जी यांना श्रद्धांजली अर्पण करतो)

मित्रांनो, आपण आपला वारसा विसरता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नायक-नायिकांची महान गाथा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुम्हाला आठवत असेलच की जेव्हा आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली तेव्हा सरकारनं एक विशेष संकेतस्थळ तयार केलं होतं. यामध्ये ‘Unsung Heroes'ना समर्पित एक विभाग होता. आजही तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेऊ शकता.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 'मन की बात' च्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या कल्याणाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची एक चांगली संधी मिळते. आज मी आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय बनलेल्या एका मुद्द्याबद्दल बोलू इच्छितो. आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात असं म्हटलं आहे की न्यूमोनिया आणि यूटीआय सारख्या अनेक आजारांवर अँटीबायोटिक औषधे कुचकामी ठरत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. अहवालानुसार, याचं एक प्रमुख कारण म्हणजे लोकांकडून अँटीबायोटिकचा अविचारी वापर. अँटीबायोटिक्स ही अशी औषधे नाहीत जी सहज स्वतःच घेतली जाऊ शकतात. ती फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वापरली पाहिजेत. आजकाल लोकांना असं वाटतं की फक्त एक गोळी घेतली की सर्व समस्या दूर होतील. म्हणूनच आजार आणि संसर्ग या अँटीबायोटिक औषधांवर मात करत आहेत.

मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही स्वतःच्या मर्जीनं औषधं वापरणं टाळा. अँटीबायोटिक्सच्या बाबतीत तर हे विशेष महत्वाचं आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की औषधांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि अँटीबायोटिक्ससाठी डॉक्टरांची आवश्यकता असते. ही सवय तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या पारंपरिक कला केवळ समाजाला सक्षमच बनवत नाहीत तर लोकांच्या आर्थिक प्रगतीचं एक मोठं माध्यम बनत आहेत. आंध्र प्रदेशच्या नरसापुरम जिल्ह्यातल्या लेस क्राफ्टची चर्चा आता संपूर्ण देशात पसरत आहे. हे लेस क्राफ्ट अनेक पिढ्यांपासून महिलांच्या हातात आहे. देशाच्या महिला शक्तीनं ते मोठ्या संयमानं आणि अचूकतेनं जपलं आहे. आज ही परंपरा एका नवीन रंगरूपात पुढे नेली जात आहे. आंध्र प्रदेश सरकार आणि नाबार्ड हे एकत्र येऊन कारागिरांना नवीन डिझाईन्स शिकवत आहेत, त्यांना चांगलं कौशल्य प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांना नवीन बाजारपेठांशी जोडत आहेत. नरसापुरम लेसला जीआय टॅग देखील मिळाला आहे. आज यापासून 500 हून अधिक उत्पादनं बनवली जात आहेत आणि अडीचशेहून अधिक गावांतल्या सुमारे 1 लाख महिलांना यातून काम मिळत आहे.

मित्रांनो, 'मन की बात' हे अशा लोकांना पुढे आणण्याचं एक व्यासपीठ आहे जे आपल्या कठोर परिश्रमानं केवळ पारंपरिक कलांना प्रोत्साहनच देत नाहीत तर त्याद्वारे स्थानिक लोकांना सक्षम बनवत आहेत. मणिपूरमधल्या चुराचांदपूर इथल्या मार्गारेट रामथरसीएम जी यांचे प्रयत्नही असेच आहेत. त्यांनी मणिपूरची पारंपरिक उत्पादनं, तिथली हस्तकला, बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तू मोठ्या दूरदृष्टीनं पाहिल्या आणि या दूरदृष्टीमुळे त्या एका हस्तकला कलाकारापासून लोकांचं जीवन बदलण्याचं माध्यम झाल्या. आज मार्गारेट जींच्या युनिटमध्ये 50 हून अधिक कलाकार काम करत आहेत आणि त्यांनी आपल्या कठोर परिश्रमानं दिल्लीसह देशातल्या अनेक राज्यांमध्ये आपल्या उत्पादनांसाठी बाजारपेठ विकसित केली आहे.

मित्रांनो, मणिपूरमधलंच आणखी एक उदाहरण म्हणजे सेनापती जिल्ह्यातल्या रहिवासी चोखोन क्रिचेना. त्यांचं संपूर्ण कुटुंब पारंपरिक शेतीत गुंतलेलं आहे. क्रिचेना यांनी हा पारंपरिक अनुभव एका वेगळ्या पातळीवर वाढवला. त्यांनी फुलांच्या शेतीला आपला छंद बनवलं. आज त्या या कामाला विविध बाजारपेठांशी जोडत आहेत आणि स्वतःच्या परिसरातल्या स्थानिक समुदायांना सक्षम बनवत आहे. मित्रांनो, हे उदाहरण या वस्तुस्थितीचं प्रतीक आहे की जेव्हा पारंपरिक ज्ञान आधुनिक दृष्टिकोनानं विकसित केल जातं तेव्हा ते आर्थिक प्रगतीचं प्रमुख माध्यम बनतं. तुमच्या आजूबाजूला अशा यशोगाथा असतील तर कृपया त्या माझ्यासोबत शेअर करा.

मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे वर्षभर देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात उत्सवाचं वातावरण असतं. वेगवेगळ्या सणांव्यतिरिक्त, वेगवेगळ्या राज्यांचे स्थानिक सण देखील आयोजित केले जातात. याचा अर्थ असा की जर तुम्ही प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर प्रत्येक वेळी देशाचा कुठला न् कुठला कोपरा आपल्या अनोख्या उत्सवासह सज्ज असलेला सापडेल. असाच एक महोत्सव सध्या कच्छच्या रणात सुरू आहे. यावर्षी कच्छ रणोत्सव 23 नोव्हेंबर रोजी सुरू झाला आणि तो 20 फेब्रुवारीपर्यंत चालेल. या कार्यक्रमात कच्छची विविध लोकसंस्कृती, लोकसंगीत, नृत्य आणि हस्तकला यांचं दर्शन घडतं. कच्छच्या पांढऱ्या रणाची भव्यता पाहणं हा खरोखरच एक आनंददायी अनुभव आहे. रात्री जेव्हा पांढऱ्या रणावर चांदण्या पसरतात तेव्हा ते दृश्य मंत्रमुग्ध करणारं असतं. रण उत्सवाचं तंबू शहर खूप लोकप्रिय झालं आहे. गेल्या महिन्याभरात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी रणोत्सवात भाग घेतला आहे आणि मला असंही कळलं आहे की यात देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी परदेशातूनही लोक आलेले आहेत. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अशा उत्सवांमध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि भारताच्या विविधतेचा आनंद घ्या.

मित्रांनो, 2025 मधला हा 'मन की बात' चा शेवटचा भाग आहे. आता आपण 2026 मध्ये याच उत्साहानं आणि जोशानं, आपलेपणाच्या भावनेनं आपल्या मनातल्या गुजगोष्टी करण्यासाठी 'मन की बात' कार्यक्रमात सहभागी होऊ. नवीन ऊर्जा, नवीन विषय आणि प्रेरणा देणाऱ्या देशवासीयांच्या असंख्य कथा 'मन की बात' मध्ये आपल्याला सर्वांना एकत्र आणतात. दर महिन्याला, मला असे अनेक संदेश मिळतात ज्यात लोक 'विकसित भारत' साठी त्यांचे दृष्टिकोन सांगतात. लोकांच्या सूचना आणि या दिशेनं होणारे त्यांचे प्रयत्न पाहून हा विश्वास दृढ होतो आणि जेव्हा हे सर्व संदेश माझ्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा 'विकसित भारत' चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल. हा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालला आहे. 2026 हे वर्ष या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरो. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं जीवन आनंदी होवो, या इच्छेसह या भागात निरोप घेण्यापूर्वी मी निश्चितच म्हणेन, 'फिट इंडिया मूव्हमेंट', तुम्हीही तंदुरुस्त राहिलं पाहिजे. हा थंडीचा काळ व्यायामासाठी खूप योग्य आहे, व्यायाम करा. तुम्हा सर्वांना 2026 च्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वंदे मातरम्.

 

* * *

हर्षल आकुडे/आकाशवाणी मुंबई/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2209167) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , Malayalam , Punjabi , Punjabi , Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Kannada