पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आसाममधील गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2025 8:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली- दि. 20 डिसेंबर, 2025.

नोमोस्कार। लुइटपोरिया राइजोलोई मुर श्रोद्धा अरु मरोम ज़ासिसु!

आसामचे  राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य,

मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा , केंद्रातील माझे सहकारी, आपले माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल , राम मोहन नायडू , मुरलीधर मोहोळ , पवित्रा मार्गेरिटा, आसाम सरकारमधील मंत्री, इतर उपस्थित मान्यवर, तसेच बंधू आणि भगिनींनो!!

आपले भाषण सुरू करण्यापूर्वी, मी  आपल्या सर्वाना    एक विनंती करीत आहे, आजचा हा 'विजय दिन'   केवळ आसामसाठीच नाही तर संपूर्ण ईशान्येसाठी विकासाचा उत्सव आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो कीतुम्ही आपले मोबाईल फोन काढावेत, फोनचा टॉर्च, फ्लॅश लाईट सुरू करावा आणि विकासाच्या या उत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा टॉर्च-फ्लॅश    सुरू करावा  आणि प्रचंड टाळ्यांचा गजरही करावा. संपूर्ण देशाला ऐकू आले पाहिजे आणि दिसले पाहिजे की, आसाम  आता विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ज्यावेळी विकासाचा प्रकाश पोहोचतो, त्यावेळी जीवनाचा प्रत्येक मार्ग नवीन उंची गाठू लागतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

मित्रांनो,

आसामच्या भूमीविषयी मला खूप आपुलकी आहे मनातून ओढ आहे. इथल्या लोकांचे प्रेम आणि जिव्हाळा आणि विशेषतः आसाम आणि ईशान्येकडील माझ्या माता आणि भगिनी यांच्याकडून मिळणारा आपलेपणा, मला सतत प्रेरणा देत असतो. त्यामुळे ईशान्येकडील विकासाचा आमचा संकल्प अधिक बळकट होतो.  आज पुन्हा एकदा आसामच्या विकासामध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे हे मी पाहतोय आणि अशावेळी भारतरत्न भूपेन दा यांचे एक वाक्य खरे ठरल्याची साक्ष पटते. त्यांनी म्हटले होते की,

"लुईदोर पर जिलिकाई तुलीबोलोई, अमी प्रतिज्ञाबोध! अमी होनकल्पबोध! "

म्हणजे, याचा अर्थ असा की, लुईत नदीचे काठ उजळतील, अंधाराची प्रत्येक भिंत तुटेल आणि हे घडेल. हा आमचा संकल्प आहे, हे आमचे वचन आहे.

मित्रांनो,

भूपेन दा यांच्या या ओळी म्हणजे फक्त एक गीत नव्हते; तर तो आसामवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक महान आत्म्याचा संकल्प होता आणि आज हा संकल्प आपल्यासमोर साकार होत आहे. ज्याप्रमाणे आसाममध्ये वाहणारी विशाल नदी  ब्रह्मपुत्रा कधीही थांबत नाही, त्याचप्रमाणे, भाजपच्या डबल-इंजिन सरकारच्या काळात, विकासाचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. आज, लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन या संकल्पाचे प्रतीक आहे. या नवीन टर्मिनल इमारतीसाठी मी आसाममधील सर्व लोकांचे आणि देशातील जनतेचेही मनापासून अभिनंदन करतो.

भगिनींनो आणि बंधूंनो,

काही वेळापूर्वीचगोपीनाथ बोरदोलोई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे सद्भाग्य  मला मिळाले. बोरदोलोई हे आसामचे पहिले मुख्यमंत्री होते, आसामचा अभिमान होते, त्यांनी आसामची ओळख, आसामचे भविष्य - भवितव्य आणि हित यांच्याशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचा हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि आसामच्या जनतेमध्ये अभिमानाची भावना निर्माण करेल.

मित्रांनो,

आधुनिक विमानतळ आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी, आधुनिक पायाभूत सुविधा यासारख्या  गोष्टी कोणत्याही राज्यासाठी नवीन शक्यता आणि संधींचे प्रवेशद्वार आहेत. ते राज्याच्या वाढत्या आत्मविश्वासाचे आणि लोकांच्या विश्वासाचे आधारस्तंभ आहेत. ज्यावेळी तुम्ही आसाममध्ये इतके भव्य महामार्ग आणि विमानतळ बांधलेले पाहता तेव्हा तुम्हीही म्हणता, "शेवटी, आसामला न्याय मिळण्यास आता प्रारंभ झाला आहे."

नाहीतर मित्रांनो,

काँग्रेस सरकारांसाठी, आसाम आणि ईशान्येचा विकास हा विषय त्यांच्या  कार्यक्रम पत्रिकेवर कधीच नव्हता. काँग्रेस सरकारे आणि त्यांचे लोक म्हणायचे, "आसाम आणि ईशान्येकडे कोण जाते?" काँग्रेसचे नेते म्हणत होते, "आसाम आणि ईशान्येला आधुनिक विमानतळ, महामार्ग आणि चांगल्या रेल्वेची गरज का आहे?" या विचारसरणीमुळे, काँग्रेसने  अनेक दशकांपासून या संपूर्ण प्रदेशाकडे दुर्लक्ष केले.

मित्रांनो,

गेल्या 6-7 दशकांपासून काँग्रेसने केलेल्या चुका एक-एक करून   आता मोदी सरकार दुरुस्त करत आहेत. मोदी म्हणतात, "काँग्रेसचे सदस्य ईशान्येला गेले किंवा नाही गेले तरी, ईशान्येला आणि आसामला भेट दिली की, असे वाटते मी माझ्या लोकांमध्ये आहे." मोदींसाठी, आसामचा विकास ही एक गरज, जबाबदारी आणि उत्तरदायीत्व, असे दोन्ही आहे.

आणि म्हणूनच, मित्रांनो,

गेल्या 11 वर्षांत, आसाम आणि ईशान्येसाठी लाखो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. आज, आसाम प्रगती करत आहे आणि नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतीय दंड संहिता लागू करण्यात आसाम देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे हे जाणून मला आनंद झाला. 50 लाखांहून अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर बसवून आसामने आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. काँग्रेसच्या काळात, आसाममध्ये वशिला चिट्ठी किंवा कोणत्याही वरखर्च  केल्याशिवाय सरकारी नोकरी मिळणे अशक्य होते. परंतु आज, हजारो तरुणांना अशा चिट्ठीशिवाय आणि कोणत्याही वरखर्चाशिवाय नोकऱ्या मिळत आहेत. भाजपा  सरकारच्या काळात, प्रत्येक व्यासपीठावर आसामी संस्कृतीचा प्रचार केला जात आहे. गेल्या वर्षी 13 एप्रिल रोजी, 11,000 हून अधिक कलाकारांनी गुवाहाटी स्टेडियममध्ये एकत्र बिहू नृत्य सादर केले होते, हा कार्यक्रम मी विसरू शकत नाही.

ही घटना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. असेच नवनवीन विक्रम नोंदवत आसाम वेगाने पुढे जात आहे.

मित्रांनो,

या नव्या टर्मिनल इमारतीमुळे गुवाहाटी आणि आसामची क्षमता आणखी वाढणार आहे. या टर्मिनलवरून दरवर्षी सुमारे सव्वा कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील! म्हणजेच मोठ्या संख्येने पर्यटकही आसामला येऊ शकतील. भाविकांना माँ कामाख्या देवीच्या दर्शनाची सुविधाही अधिक सुलभ होईल.

या नव्या विमानतळाच्या टर्मिनलमध्ये पाऊल टाकताच विकासही आणि वारसाहीया मंत्राचा अर्थ स्पष्ट दिसतो. हे विमानतळ आसामची निसर्गसंपदा आणि संस्कृती लक्षात घेऊन घडवण्यात आले आहे. टर्मिनलच्या आत हिरवळ आहे. इनडोअर फॉरेस्टसारखी रचना आहे. सर्वत्र निसर्गाशी जोडलेली रचना आहे, जेणेकरून येथे येणारा प्रत्येक प्रवासी शांतता अनुभवू शकेल. याच्या बांधकामात बांबूचा विशेष वापर करण्यात आला आहे. बांबू हा आसामच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेतो इथे मजबुतीही दर्शवतो आणि सौंदर्यही. आणि दिल्लीमध्ये बसलेल्या भूतकाळातील सरकारांना बांबू म्हणजे काय, याची ओळखही नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल—2014 मध्ये तुम्ही मला देशसेवेची  संधी दिली त्यापूर्वी आपल्या देशात असा कायदा होता की बांबू तोडता येत नव्हता. आता कोणी मला समजावून सांगेल का, का बरं? कारण त्यांनी बांबूला झाड, म्हणजेच वृक्ष घोषित केले होते. आणि एकदा वृक्ष म्हटले की सारे दरवाजे बंद झाले. संपूर्ण जग मान्य करते की बांबू ही एक वनस्पती (गवतवर्गीय) आहे. आम्ही कायद्यात बदल करून बांबूला त्याची खरी ओळख असलेल्या गवतवर्गात समाविष्ट केले. त्यानंतरच आज बांबूपासून अशी भव्य इमारत उभी राहू शकली. आणि आज जर तुम्ही समाज माध्यमावर पाहिले, तर जगभरात भारतातील विमानतळांच्या रचनांची चर्चा होत आहे.

मित्रांनो,

पायाभूत सुविधांच्या या विकासाचा मोठा संदेश भारताच्या विकासयात्रेची ओळख बनत आहे. यामुळे उद्योगांना चालना मिळते. गुंतवणूकदारांना संपर्क प्रणालीबाबत विश्वास वाटतो.  स्थानिक उत्पादनांना जगभर पोहोचण्याचा मार्ग खुला होतो. आणि सर्वात मोठा विश्वास त्या युवकाला मिळतो, ज्याच्यासाठी नवीन  संधी निर्माण होत आहेत. म्हणूनच, आज आपण आसामला अमर्याद संधीची भरारी घेताना पाहत आहोत.

मित्रांनो,

आज भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे, आणि भारताची भूमिका देखील बदलली आहे. भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. अवघ्या 11 वर्षांत हे कसे घडले?

मित्रांनो,

यामध्ये आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाची फार मोठी भूमिका आहे. भारत 2047 ची तयारी करत आहे. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेया महान विकास मोहिमेत देशातील प्रत्येक राज्याचा, प्रत्येक प्रदेशाचा सहभाग आहे. आम्ही मागास भागांना प्राधान्य देत आहोत. देशातील सर्व राज्यांनी एकत्र प्रगती करावी आणि विकसित भारताच्या अभियानात आपले योगदान द्यावे, या दिशेने आमचे सरकार काम करत आहे.

मला आनंद आहे की आज आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारत या मिशनचे नेतृत्व करत आहेत. ॲक्ट ईस्टधोरणाद्वारे आम्ही ईशान्येकडील राज्यांना प्राधान्य दिले, आणि आज आसाम भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वारम्हणून उदयास येताना दिसत आहे. भारताला आसियान देशांशी जोडण्यासाठी आसाम सेतूची भूमिका बजावत आहे. ही केवळ सुरुवात आहे; हा प्रवास खूप पुढे जाणार आहे. आणि आसाम अनेक क्षेत्रांत विकसित भारताचे इंजिन बनेल.

मित्रांनो,

आज आसाम आणि संपूर्ण ईशान्येकडील सर्व राज्ये भारताच्या विकासाचे नवे प्रवेशद्वार बनत आहेत. बहुआयामी संपर्क सुविधेच्या  संकल्पाने या प्रदेशाची दिशा आणि दशादोन्ही बदलल्या आहेत. आसाममध्ये नवे पूल उभारण्याचा वेग, नवे मोबाइल टॉवर्स उभारण्याची गती, आणि विकासकामांची झपाट्याने होत असलेली अंमलबजावणीयातून सगळी स्वप्ने प्रत्यक्षात साकार होत आहेत. ब्रह्मपुत्रेवर उभारलेल्या पुलांनी आसामच्या संपर्क प्रणालीला नवी मजबुती आणि नवा आत्मविश्वास दिला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 6-7 दशकांत येथे फक्त तीन मोठे पूल बांधले गेले होते. पण गेल्या दशकात चार नवे भव्य पूल पूर्ण झाले आहेत. याशिवाय अनेक ऐतिहासिक प्रकल्प आकार घेत आहेत. बोगीबील आणि ढोलासादिया यांसारख्या सर्वात लांब पुलांनी आसामला धोरणात्मकदृष्ट्या अधिक सक्षम बनवले आहे. रेल्वे संपर्कप्रणालीमध्ये देखील क्रांतिकारी बदल झाला आहे. बोगीबील पूल सुरू झाल्यामुळे अपर आसाम आणि देशाच्या उर्वरित भागांमधील अंतर कमी झाले आहे. गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवासाचा वेळ कमी केला आहे. देशातील जलमार्गांच्या विकासाचा फायदा आसामलाही होत आहे. कार्गो वाहतुकीत 140 टक्क्यांची वाढ झाली आहे. यावरून हे सिद्ध होते की ब्रह्मपुत्र ही केवळ नदी नाही, तर आर्थिक शक्तीचा प्रवाह आहे.

पांडू येथे पहिली जहाज दुरुस्ती सुविधा विकसित होत असून, वाराणसी ते डिब्रूगड दरम्यान चालविण्यात येणाऱ्या गंगा विकास क्रूझबाबत मोठा उत्साह आहे. या उपक्रमामुळे ईशान्य भारताला जागतिक क्रूझ पर्यटनाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

साथींनो,

काँग्रेस सरकारांनी आसाम आणि ईशान्य भारताला विकासापासून दूर ठेवण्याचे जे पाप केले होते, त्याचा अत्यंत मोठा फटका देशाच्या सुरक्षेला, एकतेला आणि अखंडतेला सहन करावा लागला. काँग्रेसच्या सत्ताकाळात हिंसाचाराचा काळ अनेक दशकांपर्यंत बहरत राहिला. मात्र, केवळ 10–11 वर्षांच्या कालावधीत आपण तो पूर्णपणे समाप्त करण्याच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहोत. ईशान्य भारतात जिथे पूर्वी हिंसाचार आणि रक्तपात घडत होता, तिथे आज 4 जी  आणि 5 जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचत आहे. पूर्वी हिंसाग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्हे आज आकांक्षी जिल्हे म्हणून विकसित होत आहेत. येणाऱ्या काळात हाच प्रदेश औद्योगिक कॉरिडॉर म्हणूनही उभा राहणार आहे. म्हणूनच, आज ईशान्य भारताबाबत एक नवा विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास अधिक बळकट करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

साथींनो,

आसाम आणि ईशान्य भारताच्या विकासात आता आपल्याला यश मिळत आहे, कारण आपण या प्रदेशाची ओळख आणि संस्कृती जपण्याचे कार्य करत आहोत. काँग्रेसने येथे आणखी एक गंभीर पाप केले होते, या भागाची ओळख नष्ट करण्याचा त्यांनी कट रचला होता.  तो कट केवळ काही वर्षांचा नव्हता; काँग्रेसच्या या पापाच्या मुळांचा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून होता.  मुस्लिम लीग आणि ब्रिटिशांनी मिळून भारताच्या फाळणीची योजना आखली होती. आसामचा अविभाजित बंगालचा, म्हणजेच ईस्ट पाकिस्तानचा भाग बनविण्याची योजना आखण्यात आली होती. त्या कटात काँग्रेस सहभागी होण्याच्या तयारीत होती. तेंव्हा गोपीनाथ बोरदोलोईजींनी आपल्या पक्षाविरुद्ध ठामपणे उभे राहत आसामची ओळख नष्ट करण्याच्या या कटाला तीव्र विरोध केला आणि आसामला देशापासून वेगळे होण्यापासून वाचवले. भारतीय जनता पक्ष नेहमीच पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक देशभक्ताचा सन्मान करतो. अटलजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले, तेव्हा बोरदोलोईजींना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

बंधूंनो आणि भगिनींनो,

बोरदोलोईजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात आसामला वाचवले; मात्र त्यांच्या नंतर काँग्रेसने पुन्हा एकदा आसामविरोधी आणि देशविरोधी कृत्यांना सुरुवात केली. काँग्रेसने आपली मतपेढी वाढवण्यासाठी धार्मिक तुष्टीकरणाचे कट रचले. बंगाल आणि आसाममध्ये आपल्या मतपेढीशी संबंधित घुसखोरांना संरक्षण दिले. या प्रदेशाची लोकसंख्यात्मक रचना बदलून टाकण्यात आली. तेंव्हा घुसखोरांनी आपल्या जंगलांवर अतिक्रमण केले, आपल्या भूमीवर कब्जा केला. परिणामी, संपूर्ण आसामची सुरक्षा आणि ओळख धोक्यात आली आहे.

साथींनो,

आज हिमंतजींचे सरकार आणि त्यांच्या संपूर्ण टीममधील सर्व सहकारी अत्यंत कष्टाने आसामची साधनसंपत्ती या बेकायदेशीर आणि देशविरोधी अतिक्रमणापासून मुक्त करण्याचे काम करत आहेत. आसामची साधनसंपत्ती आसामच्या जनतेच्या हितासाठीच वापरली जावीत, यासाठी प्रत्येक स्तरावर ठोस प्रयत्न सुरू आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारनेही कठोर पावले उचलली आहेत. अवैध घुसखोरांना देशाबाहेर पाठविण्यासाठी त्यांची ओळख पटविण्याची प्रक्रियाही राबवली जात आहे.

बंधूंनो आणि भगिनींनो,

काँग्रेस पक्ष आणि इंडी आघाडीतील लोक उघडपणे देशविरोधी षडयंत्र राबवत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही घुसखोरांना देशाबाहेर काढण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. तरीही हे लोक घुसखोरांच्या बचावासाठी जाहीरपणे वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात घुसखोरांच्या बचावाची बाजू मांडली जात आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका राबवण्यासाठी एसआयआर प्रक्रियेची अंमलबजावणी करत असताना, या लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यात अस्वस्थता दिसून येते आहे. हे लोक आसामच्या बंधू  भगिनींचे  हित जपणार नाहीत. ते तुमच्या जमिनींवर आणि जंगलांवर इतरांचा ताबा बसू देतील. त्यांची देशविरोधी मानसिकता पुन्हा जुन्या काळातील हिंसा आणि अशांततेची परिस्थिती निर्माण करू शकते. म्हणूनच, माझ्या आसामच्या बंधू-भगिनींनो, आपल्याला अत्यंत सावध राहावे लागेल. ज्या आसामच्या अस्मितेसाठी बोरदोलोईजींसारख्या नेत्यांनी आयुष्यभर सर्वस्व अर्पण केले, त्या अस्मितेचे रक्षण आपल्यालाच करावे लागेल. आसामच्या जनतेने एकजूट दाखवली पाहिजे. आसामचा विकास भरकटू नये, यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे आणि काँग्रेसच्या षड्यंत्रांना प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर पराभूत करत राहिले पाहिजे.

साथींनो,

आज जग भारताकडे नव्या अपेक्षांसह पाहत आहे. भारताच्या भविष्यातील परिवर्तनाचा सूर्योदय ईशान्य भारतातूनच होणार आहे. त्यासाठी आपल्याला हातात हात धरून, आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आसामच्या विकासाला अग्रक्रम देत आपली वाटचाल सुरू ठेवावी लागेल. मला ठाम विश्वास आहे की आपली एकजूट आणि सामूहिक कष्ट आसामला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जातील. विकसित आसाममधूनच विकसित भारताची पायाभरणी होईल. याच शुभेच्छांसह मी या नव्या टर्मिनलसाठी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

***

जयदेवी पुजारी स्वामी/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207224) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Gujarati , Odia