पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली इथे आयोजित 21 व्या हिंदुस्तान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2023 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद

प्रविष्टि तिथि: 04 NOV 2023 10:58PM by PIB Mumbai

शोभना भरतिया जी, हिंदुस्तान टाइम्स चे, आपल्या टीम चे सर्व सदस्य, इथे उपस्थित सर्व अतिथी, सभ्य स्त्री पुरषहो,

सर्वात आधी तर मी आपणा सर्वांची क्षमा मागतो, कारण मी निवडणुकीच्या सभेत होतो, तर तिथून येता-येता थोडा उशीर झाला. पण थेट विमानतळावरून आलो आहे आपल्यामध्ये. शोभना जी खूप उत्तम बोलत होत्या, याचा अर्थ मुद्दे चांगले होते, नक्कीच कधी ना कधी वाचायला देखील मिळेल. चला त्याबाबत उशीर झाला.

मित्रहो,
आपणा सर्वांना नमस्कार. हिंदुस्तान टाइम्सच्या नेतृत्व शिखर परिषदेत एक वेळ पुन्हा तुम्ही मला इथे आमंत्रित केले, यासाठी मी HT समूहाला खूप खूप धन्यवाद देतो. 2014 मध्ये जेव्हा आमचे सरकार बनले होते, आणि आमचा सेवाकाळ सुरू झाला होता, त्या वेळी या शिखर परिषदेची संकल्पना होती – Reshaping India, म्हणजेच HT समूह हे मानून चालला होता की, येत्या काळात भारतात खूप काही बदलेल, नव आयाम मिळेल. 2019 मध्ये जेव्हा आमचे सरकार आधीपेक्षाही जास्त बहुमताने परत आले, तेव्हा आपली संकल्पना होती – Conversations for a Better Tomorrow. आपण HT शिखर परिषदेच्या माध्यमातून जगाला संदेश दिला की भारत एका उत्तम भविष्याच्या मार्गावर पुढे वाटचाल करत आहे. आता 2023 मध्ये जेव्हा देशात पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीची चर्चा होत आहे, त्यावेळी आपली संकल्पना आहे – Beyond Barriers... आणि मी जनतेत राहणारा, जगणारा व्यक्ती आहे, राजकीय माणूस आहे, त्यासोबतच, आणि लोकप्रतिनिधीही आहे, तर मला त्यात काहीएक संदेश दिसतो. साधारणपणे जनमत चाचण्या, निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी येतात आणि मांडतात, की काय होणार आहे. परंतु आपण स्पष्ट संकेत दिला आहे की, देशाची जनता यावेळी सारे अडथळे पार करून आम्हाला पाठिंबा देणार आहे. 2024 Election Results will be beyond barriers.

मित्रहो,
Reshaping India पासून Beyond Barriers पर्यंतच्या भारताच्या या प्रवासाने येणाऱ्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली आहे. याच पायावर विकसित भारताची निर्मिती होईल, भव्य आणि समृद्ध भारताची निर्मिती होईल. दीर्घ काळपर्यंत, भारत आणि आम्हा भारतीयांना अनेक Barriers चा सामना करावा लागला आहे. आपल्यावर झालेले हल्ले आणि गुलामगिरीच्या दीर्घ कालखंडाने भारता असंख्य बंधनांच्या जोखडात अडकलेला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी जी एक उर्जा निर्माण झाली, जो उत्साह निर्माण झाला, सामूहिकतेची जी भावना निर्माण झाली, त्याने अशी अनेक बंधने तोडली होती. स्वातंत्र्यानंतर अपेक्षा होती की हीच गती पुढेही कायम राहील, परंतु दुर्दैवाने असे होऊ शकले नाही. अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये अडकलेला आपला देश, ज्या वेगाने त्याची क्षमता होती, त्या वेगाने पुढे जाऊ शकला नाही. एक खूप मोठा अडथळा मानसिकतेचा होता, Mental Barriers होते. काही अडथळे खरेच होते, वास्तविक होते. काही अडथळे कल्पित होते, निर्माण केले गेले होते, आणि काही अडथळे अतिशयोक्तीसारखे, अतिरंजित करून आपल्यासमोर फुग्यासारखे सादर केले गेले होते. 2014 नंतरच, भारत, सातत्याने ही बंधने तोडण्यासाठी मेहनत करतो आहे. मला समाधान वाटते की, आपण अनेक अडथळे पार केले आहेत आणि आता आपण Beyond Barriers ची गोष्ट करत आहोत. आज भारत प्रत्येक अडथळा ओलांडून, चंद्रावर तिथे पोहोचला आहे, जिथे कोणी पोहोचले नाही. आज भारत प्रत्येक आव्हानावर मात करत डिजिटल व्यवहारांमध्ये नंबर एक बनला आहे. आज भारत, प्रत्येक अडथळ्यातून बाहेर पडत, मोबाईल उत्पादनामध्ये आघाडी घेऊ लागला आहे. आज भारत, स्टार्टअपच्या जगात पहिल्या तीनमध्ये आहे. आज भारत, जगातील सर्वात मोठा कुशल मनुष्यबळाचा समूह स्वतःच्या देशात घडवत आहे. आज भारत, G-20 सारख्या आयोजनांमध्ये आपला झेंडा फडकावत आहे. आज भारत स्वतःला प्रत्येक बंधनातून मुक्त करून पुढे वाटचाल करू लगाला आहे. आणि आपण ऐकले असेलच – ताऱ्यांच्या पलिकडे जग आणखी आहे. भारत, एवढ्यावरच थांबणार नाही आहे. (सितारों के आगे जहां और भी है। भारत, इतने पर ही रुकने वाला नहीं है).

मित्रहो,
जे मी आत्ता सांगत होतो, सर्वात मोठा अडथळा तर आपल्या इथे, मानसिकतेचाच होता, मानसिक अडथळे होते. याच मानसिकतेमुळे आपल्याला काय - काय गोष्टी ऐकायला मिळत होत्या. या देशाचे काही होऊच शकत नाही… या देशात काही बदलूच शकत नाही...आणि, आपल्या येथे सगळे असेच चालते.... जर उशीर झाला तरीही म्हणायचे – Indian Time, मोठ्या अभिमानाने म्हणायचे. भ्रष्टाचाराचे, अरे याबद्दल तर काही होऊच शकत नाही साहेब, जगायला शिका… कोणतीही वस्तू सरकारने बनवली असेल तर, त्याची गुणवत्ता खराब असणारच असणार साहेब, हे तर सरकारी आहे… काही घटना अशा असतात, ज्या संपूर्ण देशाला मानसिक अडथळे ओलांडून बाहेर येण्यासाठी प्रेरणा देतात. गांधीजींनी दांडी यात्रेत, एक चिमूटभर मीठच तर उचलले होते, पण संपूर्ण देश उभा राहिला, आपण स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो, लोकांचा हा विश्वास वाढला होता. आत्ता चांद्रयानच्या यशाने काही 140 कोटी देशवासीय, अचानक वैज्ञानिक बनले नाहीत, अंतराळवीर बनले नाहीत. परंतु संपूर्ण देशात एक आत्मविश्वासाने भरलेले वातावरण आजही आपण अनुभवत आहोत. आणि काय मिळते, – आपण करू शकतो, आपण प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. आज प्रत्येक भारतीय प्रचंड उत्साहाने भारलेला आहे. स्वच्छतेचा विषय आठवत असेल तुम्हाला. काही लोक म्हणायचे की, लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी स्वच्छतेची गोष्ट करणे, शौचालयाची गोष्ट करणे, या पदाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. सॅनिटरी पॅड, असा शब्द होता, ज्याला लोक, विशेषतः पुरुष सामान्य संवादाच्या भाषेतही उच्चार करत नसत. मी लालकिल्ल्यावरून हे विषय मांडले. आणि तिथूनच मनःस्थिती बदलण्याची सुरुवात झाली. आज स्वच्छता एक लोकचळवळ बनली आहे. आपण आठवून पाहा, खादीला कोणी विचारतसुद्धा नव्हते. खूपच, म्हणजेच आमच्यासारख्या नेत्यांची गोष्ट राहिली होती, तीही निवडणुकीत जरा लांब कुर्ता घालून पोहोचणे, एवढ्यापुरतेच ते होते. मात्र आता गेल्या 10 वर्षांत खादीची विक्री तीन पटीपेक्षा जास्तीने वाढली आहे.

मित्रहो,
जनधन बँक खात्यांचे यश देशवासींना ठाऊकच आहे. मात्र जेव्हा आम्ही ही योजना घेऊन आलो होतो, तेव्हा काही तज्ञांनी म्हटले होते की, हे खाते उघडणे संसाधनांची नासाडी आहे, गरीब यात एक पैसाही टाकणार नाही. गोष्ट केवळ पैशाची नव्हती. गोष्ट होती मानसिक अडथळा झुगारण्याची, मनःस्थिती बदलण्याची. हे लोक, गरिबांचा तो अभिमान, तो स्वाभिमान, कधी समजूच शकले नाहीत, जो जनधन योजनेने त्या गरिबांत जागवला. त्यांना तर बँकांच्या दरवाजापर्यंत जाण्याची हिंमत होत नव्हती, ते घाबरत होते. त्याच्यासाठी बँक खाते असणेही श्रीमंतीची गोष्ट होती. जेव्हा त्यांनी पाहिले की, बँक स्वतः त्याच्या दरापर्यंत येत आहेत, तेव्हा त्यांच्यात एक विश्वास जागृत झाला, एक स्वाभिमान जागृत झाला, त्यांच्या मनात एक नवीन बीज रुजले. आज ते मोठ्या अभिमानाने आपल्या खिशातून रुपे कार्ड काढतात, रुपे कार्डचा वापर करतात. आणि आपण तर जाणतोच, आजपासून 5-10 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती ती, एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये मोठे - मोठे लोक जेवण करत असतील, तर त्यांच्यातही स्पर्धा असायची, ते जेव्हा पाकिट काढायचे, तेव्हा त्यांना वाटायचे की, इतरांनी पाहावे की त्यांच्या पाकिटात 15 - 20 कार्डे आहेत, कार्ड दाखवणे ही देखील फॅशन होती, कार्डांची संख्या हा status चा विषय होता. मोदींनी ते गरिबांच्या खिशात आणले. मानसिक अडथळे असे तोडले जातात.

मित्रांनो, 

आज गरिबाला वाटते, की जे श्रीमंताजवळ आहे, ते माझ्याकडेही आहे. या बीजाने, वटवृक्ष होऊन, कितीतरी फळे दिली आहेत. AC खोल्यांच्या संख्येत आणि धारणा असलेल्या जगात राहणारे लोक, गरिबाचे हे मानसिक सक्षमीकरण कधीही समजू शकणार नाहीत. पण मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे, गरिबी जगून इथे आलो आहे, म्हणून ठाऊक आहे, की सरकारच्या या प्रयत्नांनी कितीतरी अडथळे तोडण्याचे काम केले आहे. मानसिकतेतील हे परिवर्तन देशाच्या आतच नाही, देशाबाहेरही झाले आहे. पूर्वी दहशतवादी हल्ला व्हायचा, तेव्हा आपली सरकारे जगाला आवाहन करायची की, आम्हाला मदत करा, जागतिक मत तयार करण्यासाठी जावे लागायचे. दहशतवाद्यांना थांबवा. आमच्या सरकारच्या काळात दहशतवादी हल्ला झाला, तर हल्ल्यासाठी जबाबदार देश जगभरात स्वतःला वाचवण्यासाठी विनवणी करतो. भारताच्या कृतीने जगाची मानसिकताही बदलली. 10 वर्षांपूर्वी जगाला वाटायचे की भारत Climate Action च्या संकल्पांमधला अडथळा आहे, एक अडकाठी आहे, नकारात्मक आहे. परंतु आज भारत जगाच्या Climate Action च्या संकल्पांचे नेतृत्व करत आहे, आपले लक्ष्य वेळेपूर्वीच प्राप्त करून दाखवत आहे. आज मानसिकतेत बदल झाल्याचा परिणाम, आपण क्रीडा जगतातही पाहत आहोत. लोक खेळाडूंना म्हणायचे, खेळत तर आहात, पण कारकीर्दीसाठी काय कराल, नोकरीचे काय कराल? सरकारनेही खेळाडूंना देवाच्या भरवशावर सोडून दिले होते. ना त्यांना जास्त आर्थिक सहकार्य मिळायचे, आणि ना क्रिडा विषयक पायाभूत सुविधांवर लक्ष दिले जायचे. आमच्या सरकारने हा अडथळा देखील दूर केला. आता आज एकापाठोपाठ एका स्पर्धेत, आपल्यावर पदकांची वृष्टी होत आहे.

मित्रहो,
भारतात सामर्थ्याची कमी नाही, संसाधनांची कमी नाही. आपल्यासमोर एक खूप मोठा आणि वास्तव अडथळा राहिला आहे – गरिबीचा. गरिबीसोबत, घोषणेने नाही तर उपाययोजनेनेच लढता येते. गरिबीला घोषणेने नाही, धोरण आणि प्रामाणिकतेनेच हरवता येते. आपल्या इथे आधीच्या सरकारांची जी विचारसरणी होती, तिने देशातील गरिबाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊच दिले नाही. मी मानतो, गरिबांमध्ये, स्वतःत इतके सामर्थ्य असते की ते गरिबीशी लढू शकतील आणि त्या लढाईत जिंकू शकतील. आपल्याला त्यांना पाठबळ द्यावे लागते, त्यांना मूलभूत सुविधा द्याव्या लागतात, त्यांना सक्षम करावे लागते. म्हणूनच आमच्या सरकारने या अडथळ्यांना पार करण्यासाठी, गरिबाला सक्षम करून, ते काम आम्ही सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेवले. आम्ही केवळ लोकांचे जगणेच बदलले नाही, तर गरिबांना गरिबीतून बाहेर पडण्यास मदतही केली. याचे परिणाम आज देश ठळकपणे पाहतो आहे. आणि आत्ता शोभना जी सांगत होत्या, फक्त 5 वर्षांत 13 कोटींपेक्षा जास्त लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो, की 13 कोटी लोकांनी त्यांच्या गरिबीचा अडथळा पार केला आणि देशाच्या नव मध्यमवर्गात सामील झाले आहेत.

मित्रहो,
भारताच्या विकासासमोर एक खूप मोठा वास्तवातला अडथळा राहिला आहे, परिवारवाद आणि घराणेशाहीचा. तोच माणूस सहजपणे पुढे जाऊ शकत होता, जो एखाद्या खास कुटुंबाशी जोडलेला असेल, किंवा मग एखाद्या शक्तिशाली माणसाला ओळखत असेल. देशातील सामान्य नागरिकांना कुठेही विचारले जात नव्हते. खेळ असोच, विज्ञान असोत, राजकारण असो किंवा पद्म सन्मान असो, देशातील सामान्य माणसाला वाटायचे की, जर ते एखाद्या मोठ्या कुटुंबाशी जोडलेले नसतील, तर त्यांच्यासाठी यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु आपण गेल्या काही वर्षांत पाहिले आहे, की या सर्व क्षेत्रांमध्ये देशातील सामान्य नागरिक, आता Empowered आणि Encouraged feel करू लागला आहे. आता त्याला याची चिंता वाटत नाही की त्याला एखाद्या शक्तीशाली माणसाच्या इथे फेऱ्या मारत राहाव्या लागतील, त्याची मदत घ्यावी लागेल. Yesterday's Unsung Heroes are Country's Heroes today!

मित्रहो,
भारतात वर्षानुवर्षांची आधुनिक पायाभूत सुविधांची कमतरता, आपल्या विकासाच्या मार्गातील एक मोठा आणि वास्तवातील अडथळा राहिली आहे. आम्ही यावर तोडगा काढला आहे, भारतात जगातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा निर्माण मोहीम सुरू झाली आहे. आज देशात अभूतपूर्व पायाभूत सुविधा विकसित होतत आहेत. मी तुम्हाला काही उदाहरणे सांगेन, ज्यामुळे तुम्हाला भारताच्या गतीचा आणि व्याप्तीचा अंदाज येईल. वर्ष 2013-14 मध्ये दररोज 12 किलोमीटर इतके महामार्ग बनवले जायचे. माझा सेवाकाळ सुरू होण्यापूर्वीची गोष्ट करत आहे. 2022-23 मध्ये आम्ही जवळपास, दररोज 30 किलोमीटर महामार्ग, दररोज बनवले आहेत. 2014 मध्ये देशातील 5 शहरांपर्यंतच मेट्रो रेल्वे जोडणी होती. 2023 मध्ये देशातील 20 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे जोडणी आहे. 2014 मध्ये देशात सुमारे 70 कार्यरत विमानतळे होती. 2023 मध्ये ही संख्या जवळपास 150 पर्यंत पोहोचली आहे, म्हणजेच हा आकडा दुप्पट झाला आहे. 2014 मध्ये देशात सुमारे 380 वैद्यकीय महाविद्यालये होती. 2023 मध्ये आपल्याकडे 700 पेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 2014 मध्ये ग्रामपंचायतींपर्यंत फक्त 350 किलोमीटर ऑप्टिक फायबर पोहोचले होते. 2023 पर्यंत आम्ही सुमारे 6 लाख किलोमीटरपर्यंत ऑप्टिक फायबरचा विस्तार करून ग्रामपंचायतींना जोडले आहे. 2014 मध्ये 55 टक्के गावेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने जोडलेली होती. आम्ही 4 लाख किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते बनवून हा आकडा 99 टक्क्यावर पोहोचवला आहे. 2014 पर्यंत भारतात जवळपास  20 हजार किलोमीटर रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण होत होते. लक्ष देऊन ऐका. 70 वर्षांत 20 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण. पण आमच्या सरकारने 10 वर्षांत जवळपास  40 हजार किलोमीटर रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण केले आहे. ही आजच्या भारताचा गती आहे, व्याप्ती आहे आणि भारताच्या यशाचे प्रतीक आहे.

मित्रहो,
गेल्या काही वर्षांमध्ये आपला देश काही कल्पित अडथळ्यांमधूनही बाहेर पडला आहे. एक समस्या आपल्या इथल्या धोरणकर्त्यांच्या, आमच्या राजकीय तज्ञांच्या मनातही होती. ते हे मानत होते, की चांगले अर्थकारण, चांगले राजकारण होऊच शकत नाही. अनेक सरकारांनीही हेच मानले, आणि यामुळे देशाला राजकीय आणि आर्थिक दोन्ही आघाड्यांवर अडचणी येऊ लागल्या. परंतु आम्ही चांगले अर्थकारण आणि चांगले राजकारणाचा मिलाफ घडवून दाखवला आहे. आज सर्वजण हे मान्य करतात, की चांगले अर्थकारण, चांगले राजकारण देखील आहे. आपल्या उत्तम आर्थिक धोरणांनी देशात प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. यामुळे समाजातील प्रत्येक वर्गाचे जीवनमान बदलले आणि याच लोकांनी आम्हाला इतके मोठे बहुमत देण्यासाठी, स्थिर सरकारसाठी मत दिले आहे. वस्तू आणि सेवा कर असो, किंवा बँकिंग संकटाचे निवारण असो, किंवा कोविडच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आखलेली धोरणे असोत... आम्ही नेहमी त्या धोरणांचाच पर्याय निवडला, जी देशाला दीर्घकालासाठी उपयुक्त ठरतील, आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभाची हमी देतील.

मित्रहो,
कल्पित अडथळ्यांचे आणखी एक उदाहरण आहे, महिला आरक्षण विधेयक. दशकांपालून प्रलंबित राहिल्यामुळे, असे वाटू लागले होते, की हे विधेयक कधीच मंजूर होणार नाही. परंतु आता हा अडथळा देखील आपण पार केला आहे. नारीशक्ती वंदन अधिनियम आज एक वास्तव आहे.

मित्रहो,
तुमच्याशी बोलताना, सुरुवातीला मी आणखी एका विषयाबद्दल, अतिशयोक्ती असलेल्या अडथळ्यांबद्दल देखील बोललो होतो. आपल्या देशामध्ये काही अडथळे, काही समस्या अशाही होत्या, ज्यांचा आधीच्या सरकारांनी आणि विद्वानांनी, वादविवाद  करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून, आपल्या राजकीय स्वार्थासाठी इतका मोठा फुगा उभा केला होता, इतके मोठे बनवून ठेवले होते, उदाहणादाखल, जेव्हाही कोणी कलम 370 जम्मू काश्मीरमधून काढून टाकण्याची गोष्ट करायचा, तेव्हा अनेक गोष्टी समोर यायच्या. एका अर्थाने मानसिक दबाव निर्माण केला होता, की जर असे झाले, तर आभाळ जमिनीवर कोसळेल. परंतु 370 संपुष्टात आणल्याने, त्या संपूर्ण भागात समृद्धी आणि शांतता तसेच विकासाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. लाल चौकातील दश्यच सांगते, की कशा रितीने जम्मू काश्मीरचा कायापालट होत आहे. आज तिथे दहशतवाद संपुष्टात येत आहे, पर्यटन सातत्याने वाढत आहे. जम्मू काश्मीर, विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचावे, यासाठीही आम्ही वचनबद्ध आहोत.

मित्रहो,
इथे उपस्थित अनेक लोक माध्यम क्षेत्रातील आहेत. आमच्यापर्यंत ब्रेकिंग न्यूज पोहोचवणाऱ्या माध्यमाची प्रसंगिकता खूपच जास्त राहिली आहे. वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज देण्याची परंपरा तर ठीक आहे, परंतु हे विश्लेषण देखील आवश्यक आहे, की आधी कोणत्या प्रकारची ब्रेकिंग न्यूज असायची आणि आता काय असते. 2013 ते 2023 च्या दरम्यान भलेही एक दशकाचाच काळ लोटला असेल, परंतु या काळात झालेल्या बदलांमध्ये, जमीन आणि आस्मानाचा फरक आहे. ज्या लोकांनी 2013 मध्ये अर्थव्यवस्थेवर काम केले आहे, त्यांना आठवत असेल की कशा रितीने पतमानांकन संस्था, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीच्या अंदाजांमध्ये घट करत असत. परंतु 2023 मध्ये याच्या अगदी उलट घडते आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि पतमानांकन संस्था आता आपल्या वाढीच्या अंदाजांत वाढ करत आहेत. 2013 मध्ये बँकिंग क्षेत्राच्या वाईट स्थितीच्या बातम्या येत असत. परंतु आता 2023 मध्ये आपल्या बँका त्यांचा सर्वोत्कृष्ट नफा आणि कामगिरी नोंदवत आहेत. 2013 मध्ये देशात अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याची बातमी गाजलेली असायची. परंतु 2023 मध्ये वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये दिसते, की भारताची संरक्षण निर्यात आता विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. 2013-14 च्या तुलनेत यात 20 पटीने जास्त वाढ झाली आहे. विक्रमी घोटाळ्यांपासून विक्रमी निर्यातीपर्यंत, आपण एक लांबचा प्रवास केला आहे.

मित्रहो,
2013 मध्ये तुम्हाला अशी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशने मिळतील, जी अशी शीर्षक देत होती की, कठीण आर्थिक परिस्थितीमुळे मध्यमवर्गाची स्वप्ने उध्वस्त झाली आहेत. परंतु मित्रहो, 2023 मध्ये बदल कोण घडवून आणत आहेत? क्रीडा क्षेत्र असो, स्टार्ट अप असोत, अंतराळ क्षेत्र असो या तंत्रज्ञान असो, देशाचा मध्यमवर्ग प्रत्येक विकास यात्रेत सर्वात पुढे उभा असलेला दिसतो. गेल्या काही वर्षांत भारतातील मध्यमवर्गाने वेगाने प्रगती केली आहे. त्यांचे उत्पन्न वाढले आहे, त्याचे प्रमाण वाढले आहे. 2013-14 मध्ये सुमारे 4 कोटी लोक प्राप्ती कर विवरणपत्र दाखल करत होते. 2023-24 मध्ये ही संख्या दुप्पट झाली आहे आणि साडे 7 कोटींपेक्षा अधिक लोकांनी प्राप्ती कर विवरणपत्र दाखल केली आहेत. कर विषयक माहितीशी संबंधित एका अभ्यासात म्हटले आहे की, 2014 मध्ये जे Mean Income साडे चार लाख रुपयांपेक्षाही कमी होते, ते 2023 मध्ये 13 लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. याचा अर्थ असा आहे की, भारतात लाखो लोक कमी उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटापर्यंत पोहोचले आहेत. मला आठवते, हिंदुस्तान टाइम्समध्येच गेल्या काही दिवसांत एक लेख छापला होता, ज्यात प्राप्ती कर विषयक माहितीशी संबंधित अनेक रंजक तथ्ये मांडलेली होती. एक खूपच रंजक आकडेवारी, वार्षिक साडे 5 लाख रुपयांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत पगार मिळवणाऱ्यांची आहे. वर्ष 2011-12 मध्ये या पगाराच्या वर्गवारीअंतर्गत  कमावणाऱ्यांचे एकूण उत्पन्न जोडले, तर हा आकडा होता – सुमारे पावणे तीन लाख कोटी रुपये. म्हणजेच तेव्हा भारतात साडेपाच लाखा पासून पंचवीस लाख पगार मिळवणाऱ्यांचे एकूण पगार जोडले, तर ते पावणे तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही कमी होते. 2021 पर्यंत यात वाढ होऊ, साडे 14 लाख कोटी झाले आहे. याचा अर्थ यात 5 पटीने वाढ झाली आहे. याची दोन सुस्पष्ट कारणे  आहेत. साडेपाच लाखापासून 25 लाख रुपयांपर्यंत पगार मिळवणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे, आणि या गटातील लोकांच्या पगारातही खूप वाढ झाली आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा स्मरण करून देतो, हे विश्लेषण फक्त पगारदारांच्याच उत्पन्नावर आधारित आहे. जर यात उद्योग - व्यवसायातून झालेले उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून झालेली कमाई, दुसऱ्या गुंतवणुकीतून झालेली कमाई, आणि हे सगळे जोडले तर हा आकडा यापेक्षाही जास्त मोठा असेल.

मित्रहो,
भारतातील वाढता मध्यमवर्ग आणि कमी होणारी गरिबी, हे दोन घटक एका खूप मोठ्या आर्थिक चक्राचा पाया बनू लागले आहेत. जे लोक गरिबीतून बाहेर पडत आहेत, जे नव मध्यमवर्गाचा भाग बनत आहेत, ते लोक आता देशाच्या उपभोग वाढीला गती देणारी खूप मोठी शक्ती म्हणून उदयाला येत आहेत. ही मागणीला पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या मध्यमवर्गाने उचलली आहे. जर एखाद्या गरिबाला नवीन बूट खरेदी करण्याची इच्छा झाली, तर तो मध्यमवर्गाच्या दुकानातून खरेदी करतो, याचा अर्थ असा, की उत्पन्न मध्यमवर्गाचे वाढते, जीवनमान गरिबांचे बदलते. या एका चांगल्या चक्रातून भारत, आज जातो आहे. म्हणजेच देशात कमी होत असलेली गरिबी, मध्यमवर्गालाही फायदा मिळवून देत आहे. गरीब आणि मध्यमवर्गाच्या अशाच लोकांची आकांक्षा आणि इच्छाशक्ती, आज देशाच्या विकासाला बळ देत आहे. या लोकांच्या बळामुळेच भारताला 10व्या अर्थव्यवस्थेवरून 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवले आहे. आणि आता हीच इच्छाशक्ती, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील सर्वोच्च 3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देणार आहे.

मित्रहो,
या अमृत काळात देश 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी काम करतो आहे. मला विश्वास आहे की, प्रत्येक अडथळा पार करत आपण आपले  लक्ष्य गाठण्यात यशस्वी होऊ. आज गरीब व्यक्तीपासून ते जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांपर्यंत, हे मान्य करू लागले आहेत, की ही भारताची वेळ आहे – This is Bharat's Time. प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वासच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. याच बळावर आपण कोणत्याही अडथळा पार करून जाऊ शकतो. आणि मला विश्वास आहे की 2047 मध्ये इथे कोण, किती असतील मला माहित नाही, परंतु मी विश्वासाने सांगतो, 2047 मध्ये जेव्हा हिंदुस्तान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद होईल, तेव्हा तिची संकल्पना असेल – Developed Nation, What Next? पुन्हा एकदा, या शिखर परिषदेसाठी आपणा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

अस्वीकरण: पंतप्रधानांच्या भाषणाचे हे अंदाजे भाषांतर आहे. मूळ भाषण हिंदीत करण्यात आले होते. 

***

AshishSangle/TusharPawar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2204449) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam