पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभेचे सभापती थिरू सी पी राधाकृष्णन् यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी केले भाषण

प्रविष्टि तिथि: 01 DEC 2025 11:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025

आदरणीय सभापती महोदय,

हिवाळी अधिवेशनाचा आरंभ होत आहे आणि आज सभागृहातील आम्हा सर्व माननीय सदस्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तुमचे स्वागत करणे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाच्या माध्यमातून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यात तुमचे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मी सभागृहाच्या वतीने आणि माझ्या वतीने, तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हाला विश्वासही देतो की या सभागृहात बसलेले सर्व माननीय सदस्य, या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेची देखील नेहमीच काळजी घेतील, मर्यादा राखतील. हे मी तुम्हाला आश्वासन देतो.

आपले सभापती महोदय एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत, शेतकरी कुटुंबातून आले आहेत. आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले आहे. समाजसेवा, ही त्यांची सातत्यपूर्ण ओळख राहिली आहे. राजकीय क्षेत्र हा त्याचा एक पैलू आहे. परंतु मुख्य प्रवाह समाजसेवेचा राहिला आहे, समाजासाठी समर्पित होऊन त्यांनी आपल्या तरुणपणापासून आतापर्यंत जे काही केले आहे, ते करत राहिले आहेत. ते आम्हा सर्व समाजसेवेत रुची ठेवणाऱ्या लोकांसाठी एक प्रेरणा आहे, एक मार्गदर्शन आहे. सामान्य कुटुंबातून, सामान्य समाजातून, सामान्य राजकारणातून, जिथे वेगवेगळ्या कुशी बदलत राहिल्या आहेत, तरीसुद्धा, आपले इथपर्यंत पोहोचणे, आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना प्राप्त होणे, ही भारताच्या लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे.

हे माझे सद्भाग्य राहिले आहे, की मी तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखतो आहे, सार्वजनिक जीवनात सोबत काम करण्याची संधीही मिळाली आहे. परंतु पंतप्रधान म्हणून जेव्हा मला येथे जबाबदारी मिळाली आणि जेव्हा मी तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये काम करताना पाहिले, तेव्हा माझ्या मनात अत्यंत सकारात्मक भावना निर्माण होणे खूप स्वाभाविक होते. ‘कॉयर बोर्ड’चे  चेअरमन म्हणून, तिचे ऐतिहासिकदृष्ट्या सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या संस्थेत रूपांतरित करणे, म्हणजेच तुमचे एखाद्या संस्थेसाठी समर्पण असेल तर किती विकास केला जाऊ शकतो आणि जगात त्याची ओळख कशी निर्माण केली जाऊ शकते, हे तुम्ही करून दाखवले. भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये अशी संधी खूप कमी लोकांना मिळते. तुम्ही झारखंडमध्ये, महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये, पुद्दुचेरीमध्ये राज्यपाल, नायब राज्यपाल म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. आणि मी पाहत होतो की झारखंडमध्ये तर तुम्ही आदिवासी जमातींच्या समाजात ज्या प्रकारे आपले नाते निर्माण केले होते. ज्या प्रकारे तुम्ही छोट्या-छोट्या गावांमधून दौरे करत होता, तेथील मुख्यमंत्री मोठ्या अभिमानाने या गोष्टींचा जेव्हाही भेटत तेव्हा उल्लेख करत होते. आणि कधीकधी तेथील राजकारण्यांनाही चिंता वाटायची की हेलिकॉप्टर असो वा नसो, याची कोणतीही पर्वा न करता, जी गाडी उपलब्ध असेल त्यात तुम्ही प्रवास करत होता, रात्री छोट्या-छोट्या ठिकाणी मुक्काम करायचा. हे जे तुमचे सेवाभावाचे रूप होते, त्याला राज्यपालाच्या पदावर असतानाही, ज्या प्रकारे तुम्ही नवी उंची दिली, याची आम्हा सर्वांना चांगली जाणीव आहे. मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून पाहिले आहे, एक सहकारी म्हणून आम्ही सोबत काम केले आहे. खासदार म्हणून पाहिले आहे, वेगवेगळ्या पदांवर काम करताना आज तुम्ही येथे पोहोचले आहात, पण मी एक गोष्ट अनुभवली आहे की साधारणपणे सार्वजनिक जीवनात पदावर पोहोचल्यानंतर कधीकधी लोक पदाचे ओझे अनुभवतात आणि कधीकधी प्रोटोकॉलमध्ये दबून जातात. पण मी पाहिले आहे की, तुमचा आणि प्रोटोकॉलचा कोणताही संबंध राहिलेला नाही. तुम्ही प्रोटोकॉलच्या पलीकडे राहिले आणि मी समजतो की सार्वजनिक जीवनात प्रोटोकॉलपासून मुक्त जीवनाची एक ताकद असते, आणि ती ताकद आम्ही तुमच्यात नेहमीच अनुभवत आलो आहोत, हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे.

आदरणीय सभापती महोदय,

तुमच्या व्यक्तिमत्त्वातील सेवा, समर्पण, संयम या सर्व गोष्टींविषयी आम्ही चांगल्या प्रकारे परिचित आहोत. तसे तर तुमचा जन्म 'डॉलर सिटी'मध्ये झाला, आणि त्याची स्वतःची एक ओळख आहे. पण तरीही तुम्ही तुमच्या सेवेचे क्षेत्र म्हणून अंत्योदयाला निवडले. तुम्ही नेहमीच 'डॉलर सिटी'मधील त्याही वर्गाची चिंता केली जे दडपलेले, पिचलेले आणि काही वंचित कुटुंबांचे होते, त्यांची चिंता केली.

आदरणीय सभापती जी,

मी त्या दोन घटनांचा अवश्य उल्लेख करेन, ज्यांच्याबद्दल मला आपणाकडून आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांकडूनही ऐकायला मिळाले. ज्यांचा आपल्या जीवनावर अत्यंत मोठा प्रभाव राहिला आहे. लहानपणी आपण अविनाशी मंदिराच्या तलावात बुडता बुडता वाचलात. मी तर बुडत होतो, मला कोणी वाचवले, कसे वाचवले, माहित नाही; परंतु मी वाचलो, ही आपली भावना आपल्या कुटुंबातील लोक नेहमी सांगत असतात. त्यावेळी जणू भगवंताने आमच्यावर कृपा केली, असे ते मानतात.

आणि दुसरी घटना तर आपल्याबद्दल सर्वांना चांगलीच माहीत आहे. कोईमतूर मध्ये लालकृष्ण आडवाणी जी यांची यात्रा येणार होती, त्यापूर्वीच एक भयानक बॉम्बस्फोट झाला. सुमारे 60 ते 70 लोकांचा त्यात मृत्यू झाला; अत्यंत भयंकर स्फोट होता. त्यावेळी आपण थोडक्यात बचावलात. या दोन्ही घटनांमध्ये जेव्हा आपण ईश्वरी संकेत पाहता आणि त्या भावनेतून समाजकार्यास अधिक समर्पित भावनेने कार्य करण्याचा मार्ग निवडता, ते आपल्या सकारात्मक जीवनदृष्टीचे प्रतिबिंब आहे.

आदरणीय सभापती जी,

आणखी एक गोष्ट मला माहित नव्हती; पण आता मला त्याबद्दल समजले. आपण उपराष्ट्रपती झाल्यानंतर काशीला गेले होते. माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीसाठी काशीत सर्व काही व्यवस्थित असावे, ही स्वाभाविक भावना असते. पण त्यावेळी आपण सांगितलेली एक गोष्ट माझ्यासाठी नवी होती. तुम्ही म्हणालात की, आपण पूर्वी मांसाहार करीत होता; परंतु जेव्हा आपण पहिल्यांदा काशीला गेले, पूजा-अर्चा केली, गंगा मातेला प्रणाम केला, तेव्हा आपल्या मनात एक संकल्प आला. त्या दिवसापासून आपण ठरवले की आपण मांसाहार करणार नाही.

मला असे म्हणायचे नाही की, मांसाहार करणारे वाईट असतात. असे काही नसते. पण काशीच्या पुण्यभूमीवर आपल्याला आलेली ती सात्विक भावना एक आध्यात्मिक प्रेरणा, ही माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीसाठीही स्मरणात ठेवण्यासारखी घटना आहे.

आदरणीय सभापती जी,

विद्यार्थी जीवनापासूनच आपली नेतृत्वक्षमता ओळखली जात होती. आज आपण राष्ट्रीय नेतृत्वाला मार्गदर्शन करणारी भूमिका निभावत आहात; ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. लोकशाहीचे रक्षक म्हणून तरुण वयात, जेव्हा सोपे मार्ग निवडता आले असते, आपण तो मार्ग न निवडता संघर्षाचा मार्ग निवडला. लोकशाहीवर आलेल्या संकटासमोर उभे राहून आपण सामना केला. आपत्कालीन काळात आपण एक लोकशाहीचे सैनिक म्हणून ज्या प्रकारे लढा दिला, तटपुंज्या साधनात आणि कठीण परिस्थितीतही ज्या पद्धतीने आपण लढा दिलात, त्या पिढीतल्या लोकांसाठी तो आजही तितकाच प्रेरणादायी आहे. जनजागृतीसाठी आपण केलेले कार्यक्रम आणि लोकांना दिलेली प्रेरणा ही लोकशाहीप्रेमींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे.

आपण एक उत्कृष्ट संघटक आहात, हे मी फार चांगले जाणतो. संघटनेतील जबाबदाऱ्या स्वीकारताना आपण त्या कार्याला नवा उजाळा दिला. आपल्या परिश्रमाने, सर्वांना जोडण्याच्या वृत्तीने, नवे विचार स्वीकारण्याच्या मनोवृत्तीने आणि नव्या पिढीला संधी देण्याच्या आपल्या प्रयत्नांतून आपले संघटन कौशल्य दिसून येते. कोईमतूरच्या जनतेने आपल्याला संसदेत पाठवले आणि तेथेही आपण आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी ठामपणे आपल्या भूमिका मांडल्या. सभापती म्हणून आणि उपराष्ट्रपती म्हणून आपला दीर्घ अनुभव राष्ट्रासाठी तसेच या सदनातील सर्व सदस्यांसाठी प्रेरणादायी राहील, याची मला पूर्ण खात्री आहे. याच भावनेने, माझ्या आणि संपूर्ण सभागृहाच्या वतीने, आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा देतो.


नितीन फुल्लुके /शैलेश पाटील /राज दळेकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2197594) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam