iffi banner

"आता तुम्हाला चित्रपट जसा बनवला होता तसा दिसेल": इफ्फी 2025 मध्ये रमेश सिप्पी यांनी 'शोले'ची 50 वर्षे केली साजरी


मुक्त संवाद सत्र: हिंदी सिनेमातील महान खलनायक 'गब्बर सिंह'चा जन्म कसा झाला, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितला किस्सा

रिकीब निसटून पडल्यानंतरही दिवंगत धर्मेंद्र यांनी एका ॲक्शन सीनमध्ये दाखवलेल्या समर्पणाची रमेश सिप्पींनी काढली आठवण

'शोले'ने हिंदी सिनेमातील ॲक्शन दृश्यांसाठी सुरक्षा नियमांचा पाया घातला, किरण सिप्पी यांची माहिती

#IFFIWood, 27 नोव्‍हेंबर 2025

 

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (IFFI), "शोलेची 50 वर्षे: 'शोले' आजही का प्रभावशाली आहे?" या शीर्षकाखालील 'मुक्त संवाद' सत्रात 'शोले' या प्रतिष्ठित हिंदी चित्रपटाचे कर्ते, दिग्गज चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी प्रेक्षकांना चित्रपटाच्या इतिहासातील एका रोमांचक सफरीवर नेले. त्यांच्या पत्नी आणि अष्टपैलू अभिनेत्री-निर्मात्या किरण सिप्पी यांनी आयोजित केलेले हे सत्र जुन्या आठवणी, किस्से आणि हृदयस्पर्शी मानवंदना यांनी परिपूर्ण होते. यावेळी रमेश सिप्पी यांनी सांस्कृतिक मापदंड ठरलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल विचार व्यक्त केले.

या सत्राचे सूत्रसंचालन रमेश सीप्पी यांच्या पत्नी आणि बहुमुखी अभिनेत्री-निर्मात्या किरण सिप्पी यांनी केले. हे सत्र आठवणी, खुलासे आणि दिग्गज कलाकारांना मनापासून वाहिलेल्या आदरांजलीच्या क्षणांनी व्याप्त होते. या सत्रात रमेश सिप्पी यांनी सांस्कृतिक मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास प्रेक्षकांना उलगडून दाखवला. 

50 वर्षांनंतर मूळ क्लायमॅक्सचे पुनरागमन

रमेश सिप्पी यांनी चित्रपटप्रेमींना अत्यंत उत्सुकता असलेली घोषणा केली -: शोलेचे होणार पुनर्प्रदर्शन - यावेळी त्याचा मूळ शेवट चित्रपटात केला जाणार समाविष्ट!

1975 मध्ये आणीबाणीच्या काळात जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा तत्कालीन सेन्सॉर बोर्डाने ‘ठाकूर बलदेव सिंग आपल्या खिळ्यांच्या बुटांनी गब्बर सिंगला ठार करतो’, या चित्रपटाचा शेवट करणाऱ्या दृश्यावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी सेन्सॉर बोर्डाने आग्रह धरला होता की एक पोलीस अधिकारी सूड घेतो असे दाखवले जाऊ शकत नाही. अखेरीस सिप्पी आणि त्यांच्या चमूने अनिच्छेने शेवटचे दृश्य पुन्हा चित्रित केले होते.

"आता तुम्हाला हा चित्रपट आम्ही जसा बनवला होता तसाच पाहायला मिळेल,’’ असे सिप्पी यांनी या सत्रात अत्यंत उत्साहाने सांगितले. दीर्घकाळापासून प्रतिक्षा असणाऱ्या त्यांच्या सर्जनशील दृष्टिकोनाला समाधान देणारी ही घोषणा होती.

एक नवीन लोकेशन आणि एक भयंकर खलनायक

या चित्रपटासाठी पूर्णपणे नवीन लोकेशन कसे शोधले याचे वर्णन दिग्दर्शकांनी केले. ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील दरोडेखोरांभोवती फिरणाऱ्या नाट्यांचे चित्रीकरण बहुतेक वेळा राजस्थान आणि चंबळ खोऱ्यात होत असे, त्या काळात रमेश सिप्पी यांनी म्हैसूर आणि बेंगळुरूजवळील खडकाळ भूभाग शोधून काढला. खडकाळ निसर्गरचनेमुळे शोले या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही न दिसलेली भिन्न दृश्य ओळख प्राप्त झाली, असे त्यांनी सांगितले. 

या पार्श्वभूमीने एक अनोखा विरोधाभासही तयार केला – दक्षिण भारतातील खडकाळ परिसरात उत्तर प्रदेशातील बोलीभाषा बोलणाऱ्या गब्बरसिंगने दहशत माजवली होती. अमजद खान या गुणी अभिनेत्याच्या अविस्मरणीय अभिनयाबद्दल बोलताना, सिप्पी यांनी खुलासा केला की गब्बर ही भूमिका सुरुवातीला डॅनी डेन्झोंगपा यांना देण्याबद्दल विचार झाला होता. परंतु ते परदेशात चित्रीकरणासाठी गेल्यामुळे उपलब्ध नव्हते. लेखक द्वयी सलीम-जावेद यांच्या शिफारसी वरून अमजद खान ऑडिशनसाठी आले. त्यांच्या अभिनयकौशल्याने सिप्पी प्रभावित झाले आणि पुढे इतिहास घडला. 

पटकथा लेखक जोडीने (सलीम-जावेद) सुरुवातीला मनमोहन देसाई यांना दोन ओळींची संकल्पना सादर केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मात्र, सिप्पी पिता-पुत्रांच्या जोडीने, म्हणजेच जीपी सिप्पी आणि रमेश सिप्पी यांनी, लगेचच यातील क्षमता ओळखली. खलनायक अनपेक्षितरित्या धोकादायक असावा, असे सिप्पी यांनी सलीम-जावेद यांना सांगितल्यानंतर एका महिन्यात पटकथा पूर्ण झाली आणि हा अविस्मरणीय खलनायक जन्माला आला. अशा प्रकारे हिंदी सिनेमाला एक सर्वोत्कृष्ट खलनायक मिळाला, असे 'शोले'च्या कर्त्याने सांगितले.

दिग्गजांचे स्मरण

काळाच्या प्रभावाविषयी भाष्य करत रमेश सिप्पी चित्रपटातील दिवंगत दिग्गज कलाकारांना आठवून भावूक झाले. त्यांनी संजीव कुमार, अमजद खान आणि नुकतेच निधन झालेले धर्मेंद्र यांना मनःपूर्वक श्रद्धांजली वाहिली.

रमेश सिप्पी यांनी दिवंगत धर्मेंद्र यांच्या समर्पणाची हृदयस्पर्शी आठवण सांगितली: घोडेस्वारीच्या ॲक्शन सीनमध्ये रिकीब निसटली आणि धर्मेंद्र खाली पडले. रमेश सिप्पी म्हणाले, "क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला, पण धरमजी लगेच उठले, त्यांनी कपडे झटकले आणि पुन्हा कामासाठी तयार झाले. ते नेहमी स्वतःच्या क्षमता पणाला लावायचे आणि नवीन गोष्टी करून पहायचे."

'शोले'ची अद्वितीय कलात्मकता

'शोले' हा एकत्रित केलेल्या कामाचा असामान्य परिणाम होता , यावर सिप्पी यांनी जोर दिला. या चित्रपटाने प्रथमच सादर केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे, हा चित्रपट यूकेमधून हाणामारीच्या दृश्यासाठी व्यावसायिक चमू आणणारा पहिला भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने हिंदी सिनेमातील हाणामारीच्या दृश्यांसाठी सुरक्षा नियमांचा पाया घातला, अशी माहिती किरण सिप्पी यांनी दिली.

या संवादादरम्यान, रमेश सिप्पी यांनी छायाचित्रकार द्वारका दिवेचा यांनी आपल्या दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून नवीन मापदंड कसे स्थापित केले हे देखील सांगितले. त्यांनी प्रॉडक्शन मॅनेजर अजिज भाई यांच्या पडद्यामागील महत्त्वपूर्ण भूमिकेचीही आठवण करून दिली.

सिप्पी यांनी खुलासा केला की, जया भादुरी यांच्या संध्याकाळच्या दिव्याच्या दृश्यासाठी योग्य वेळ मिळवण्यासाठी दररोज थांबून वाट पहावी लागायची. ते भावनिक दृश्य चित्रित करण्यासाठी अनेक दिवस लागले.

त्यांनी आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या आणि आर.डी. बर्मन यांनी संगीत दिलेल्या, पिढ्यानपिढ्या आजही ऐकल्या जाणाऱ्या "ये दोस्ती हम नही तोडेंगे" या अजरामर गीताची आठवणही सांगितली.

अखंडित वारसा

सत्र संपले तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली—'शोले' हा केवळ चित्रपट नाही. तो एक जिवंत वारसा आहे. तो आजही चित्रपटकर्त्यांना प्रेरणा देत आहे, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे आणि भारतीय सिनेमाच्या सीमांना पुन्हा परिभाषित करत आहे.

आपला 50 वा वर्धापन दिन साजरा करत आणि बहुप्रतिक्षित मूळ क्लायमॅक्सच्या पुनरागमनासह, प्रतिष्ठित दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी अर्धशतकापूर्वी त्याची जशी कल्पना केली होती त्याच रुपात 'शोले' पुन्हा एकदा मैदान गाजवायला सज्ज झाला आहे.

'शोले'च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आदरांजलीचा भाग म्हणून, इफ्फीने चित्रपटातली सुप्रसिद्ध मोटारसायकल महोत्सव स्थळावर प्रदर्शित केली आहे. ती चित्रपट रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

For more information, click on:

IFFI Website: https://www.iffigoa.org/

PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/

PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F

X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20

X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे | IFFI 56


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Release ID: 2195651   |   Visitor Counter: 7