पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद

Posted On: 26 NOV 2025 11:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 नोव्हेंबर 2025

 

“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!

मला वेळेची मर्यादा आहे, कारण मला संसदेत पोहोचायचे आहे आणि राष्ट्रपतींचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता, अगदी थोडक्यात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगून माझे बोलणे पूर्ण करेन. आजपासून भारताचे विमान वाहतूक क्षेत्र एक नवी भरारी घेणार आहे. सफ्रानची ही नवीन सुविधा भारताला जागतिक 'एम आर ओ हब' म्हणून स्थापित करण्यात मदत करेल. ही एम आर ओ सुविधा हायटेक एरोस्पेसच्या जगात तरुणांसाठी नवीन संधी देखील निर्माण करेल.

मी नुकताच, 24 नोव्हेंबरला, सफ्रान मंडळ आणि व्यवस्थापनातील लोकांना भेटलो आहे. यापूर्वीही माझी त्यांच्याशी भेट झाली आहे. प्रत्येक चर्चेत मला त्यांच्यामध्ये भारताबद्दल विश्वास आणि उमेद दिसून आली आहे. मला आशा आहे की सफ्रानची भारतातील गुंतवणूक पुढेही याच गतीने सुरू राहील. आज या सुविधे करिता मी टीम सफ्रानला खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो, तुम्हालाही माहित आहे की गेल्या काही वर्षांत भारताचे एव्हिएशन क्षेत्र अभूतपूर्व गतीने पुढे गेले आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत विमान वाहतूक मार्केटमध्ये सामील आहे. आपली ही मजबूत बाजारपेठ आता जगातली तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आज भारतातील लोकांच्या आकांक्षा एका नव्या आकाशाला गवसणी घालत आहेत. अशा स्थितीत भारतात हवाई प्रवासाची मागणी सातत्याने वाढत आहे. आणि म्हणूनच आपल्या एअरलाइन्स सातत्याने त्यांच्या ताफ्यात वाढ करत आहेत. भारताच्या एअरलाइन कंपन्यांनी 1500 हून अधिक नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे.

मित्रांनो, भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील वेगवान विस्तारामुळे 'देखभाल, दुरुस्ती आणि नूतनीकरण सुविधांची गरजही वाढत आहे. आपले 85 टक्के एमआरओ चे काम देशाबाहेर होत आले आहे. यामुळे खर्च वाढत होता, वेळ जास्त लागत असे आणि विमाने दीर्घकाळ जमिनीवर राहत असत. भारतासारख्या विशाल विमान वाहतूक बाजारपेठेसाठी ही परिस्थिती योग्य नव्हती. म्हणूनच आज भारत सरकार देशाला जगातील एक मोठे एमआरओ केंद्र म्हणून विकसित करत आहे. आता पहिल्यांदाच देशात एक ग्लोबल ओईएम 'डीप लेव्हल सर्व्हिसिंग'ची सुविधा सुरु करत आहे.

मित्रांनो, सफ्रानचे जागतिक प्रशिक्षण, ज्ञानाची देवाणघेवाण आणि भारतीय संस्थांशी भागीदारी, यामुळे देशात एक अशी कार्यशक्ती तयार होईल, जी येणाऱ्या काळात संपूर्ण एमआरओ परिसंस्थेलाला नवी गती आणि नवी दिशा देईल. या सुविधेमुळे दक्षिण भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. आणि आम्हाला फक्त विमान वाहतूक एमआरओ पर्यंत मर्यादित राहायचे नाही. आम्ही जहाजबांधणीशी संबंधित एमआरओ परिसंस्थेवरही खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहोत.

मित्रांनो, आम्ही प्रत्येक क्षेत्रात 'डिझाइनिंग इंडिया'लाही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहोत. मी सफ्रानच्या टीमला विनंती करेन की तुम्ही भारतात विमान इंजिन आणि सुटे भाग यांच्या डिझाइनच्या शक्यताही तपासाव्यात. यामध्ये आमचे एमएसएमईचे खूप मोठे नेटवर्क आणि आमचे कुशल तरुण यांची तुम्हाला खूप मदत होईल. सफ्रान 'एअर स्पेस प्रोपल्शन यंत्रणे'वर मोठ्या स्तरावर काम करते. माझी इच्छा आहे की तुम्ही प्रोपल्शन डिझाइन आणि निर्मितीसाठीही भारताच्या कौशल्याचा आणि संधींचा उपयोग करावा.

मित्रांनो, आजचा भारत केवळ मोठी स्वप्ने पाहत नाही, तर भारत मोठे निर्णय घेत आहे आणि त्याहूनही मोठे यश मिळवत आहे. आम्ही मोठी स्वप्ने पाहत आहोत, त्याहून मोठे काम करत आहोत आणि सर्वोत्तम परिणाम देत आहोत. आणि भारताचा 'ईझ ऑफ डूइंग बिझनेस'वर खूप भर आहे.

मित्रांनो, जागतिक गुंतवणूक आणि जागतिक उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आम्ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही सर्वात मोठे सुधारणावादी निर्णय घेतले आहेत. आधी आम्ही अर्थव्यवस्थेची दारे उघडली, मग आम्ही आमच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत केल्या, त्यानंतर आम्ही व्यवसाय करणे सुलभ केले.

मित्रांनो, आज बहुतेक क्षेत्रांमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणूक स्वयंचलित मार्गाने शक्य आहे. संरक्षणासारख्या क्षेत्रात जिथे पूर्वी खाजगी क्षेत्राला स्थान नव्हते, तिथेही 74 टक्के थेट परकीय गुंतवणूक स्वयंचलित मार्गाने खुली करण्यात आली आहे. अंतराळ क्षेत्रातही व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. आणि या प्रयत्नांनी जगाला भारत गुंतवणुकीचे स्वागत करतो, भारत नवनिर्मितीचे स्वागत करतो असा स्पष्ट संदेश दिला आहे. 'उत्पादन संलग्न प्रोत्साहन' - पी एल आय योजनांनी जागतिक उत्पादकांना मेक इन इंडियाकडे आकर्षित केले आहे.

गेल्या 11 वर्षांत आम्ही 40,000 हून अधिक कंपनी अनुपालने कमी केली आहेत. भारताने व्यवसायाशी संबंधित शेकडो तरतुदींना गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढले आहे. राष्ट्रीय एक खिडकी व्यवस्थेमुळे अनेक मंजुरींना एकाच पातळीवर आणले आहे. जीएसटी सुधारणा, फेसलेस असेसमेंट, नवीन कामगार संहिता  आणि आयबीसी, या सर्वांनी प्रशासन पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि पारदर्शक बनवले आहे. याच प्रयत्नांमुळे आज भारताकडे एक विश्वासार्ह भागीदार, एक मोठी बाजारपेठ आणि एक उगवते निर्मिती केंद्र म्हणून पाहिले जाऊ शकते.

मित्रांनो, भारताकडे वेगवान वाढ आहे, स्थिर सरकार आहे, सुधारणावादी मानसिकता आहे, खूप मोठा कुशल तरुण वर्ग आहे, एक विशाल देशांतर्गत बाजारपेठ आहे. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे भारतात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी, आम्ही त्यांना केवळ गुंतवणूकदार मानत नाही, तर 'सह-निर्माते' मानतो. आम्ही त्यांना विकसित भारताच्या प्रवासाचे भागधारक मानतो. म्हणूनच मी सर्व गुंतवणूकदारांना सांगेन की, "भारतावर विश्वास ठेवणे हा या दशकातील सर्वात हुशार व्यावसायिक निर्णय असल्याचे भारत सिद्ध करत आहे."

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या आधुनिक एमआरओ सुविधेसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. मला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद!”

 

* * *

गोपाळ चिप्‍पलकट्टी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2195281) अभ्यागत कक्ष : 34