दुसऱ्या महायुद्धाच्या कथा आणि दंतकथा जिवंत करण्याच्या मोहिमेवर निघालेला मणिपुरी माहितीपट- 'बॅटलफील्ड'
'हमसफर' - जुन्या काळातील सौहार्दाची गाथा
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2025
56 व्या इफ्फीमध्ये अद्यापही सशक्त, अर्थपूर्ण संदेश देणारे, सकारात्मक परिणाम साधणारे आणि प्रभावी कथनाद्वारे जागतिक चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे विविध विषयांवरील कथाबाह्य चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या वर्षीच्या इफ्फीमध्ये लक्षवेधी ठरलेल्या कथाबाह्य चित्रपटांमध्ये हमसफर (मराठी) आणि बॅटलफील्ड (मणिपुरी) यांचा समावेश आहे. याविषयी आज आयोजित पत्रकार परिषदेत, या चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी त्यांच्या निर्मितीमागील कथा सांगितल्या आणि या चित्रपटांमुळे समाजावर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा व्यक्त केली.

‘बॅटलफील्ड’ हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी जवळजवळ दहा वर्षे लागल्याचे दिग्दर्शक बोरुन थोकचोम यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, प्रत्येक मणिपुरी व्यक्ती दुसऱ्या महायुद्धाच्या कथा ऐकत लहानाची मोठी झाली आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात मणिपूर हे कदाचित सर्वाधिक रक्तपात झालेल्या रणभूमींपैकी एक असावी. एक चित्रपट निर्माता म्हणून, विशेषतः योग्य नोंदी नसताना - या आठवणींचे दस्तऐवजीकरण करण्याचे आव्हान मला स्वीकारावे लागले, मग त्या नोंदी पुस्तकांमध्ये केल्या गेलेल्या असोत किंवा माध्यमांनी केलेले वार्तांकन असो. या प्रदेशातील आज्या-पणज्यांची कहाणी सच्चेपणाने आणि आदराने सांगणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांना वाटत होते.
प्रत्येक मणिपुरी व्यक्ती या युद्धकाळाच्या वारशाचा एक भाग असल्याने, त्यांनी या कथा, दंतकथा आणि युद्धगीते एकत्र गोळा करून ते सर्व जगासोबत शेअर करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचा धांडोळा घेऊन त्या संग्रहित केल्या.

ते पुढे म्हणाले की, फक्त साध्या मेटल डिटेक्टरसह - दुसऱ्या महायुद्धाच्या कथा आणि दंतकथा जिवंत करण्याची मोहीम ज्यांनी आधीच सुरू केली होती त्या राजेश्वर सारख्या लोकांकडून प्रेरणा घेऊन, जवळजवळ दहा वर्षांपूर्वी हा चित्रपट तयार करण्यास सुरूवात केली होती.

बॅटलफील्ड या चित्रपटाचे निर्माते आणि सह-निर्माते, मनजॉय लूरेम्बम आणि डॉ. राधेश्याम ओइनम यांनी, अशा दमदार आणि मनात रेंगाळत राहणाऱ्या कल्पनेवर आधारित चित्रपटाची निवड केल्याबद्दल इफ्फीच्या आयोजन समितीचे आभार मानले. बॅटलफील्डचे स्वतःचे असे खास महत्त्व असून या कथा जतन करण्यात आणि त्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात हा पट महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी नमूद केले.

'हमसफर' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित अरविंद दळवी यांनी, ही कथा आपल्या लहानपणी आपल्याच घरातील घटनेने प्रेरित असल्याचे सांगितले. लहान असताना त्यांनी एकदा त्यांच्या आजोबांचा रेडिओ ट्रान्झिस्टर लपवून ठेवला होता, कारण आजोबांना त्याची खूप सवय असल्याने ट्रान्झिस्टर जवळ नसेल तर आजोबांची काय प्रतिक्रिया असेल हे त्यांना पाहायचे होते. काही दिवसांनंतर, जेव्हा त्यांच्या आईला कळले की, ही खोडी करण्यात त्यांचाच हात आहे. त्यांना शिक्षा झाली आणि अखेर त्यांनी तो ट्रान्झिस्टर परत केला. अनेक वर्षांनंतर, त्यांना पुन्हा तोच ट्रान्झिस्टर दिसल्यानंतर, त्यांच्या मनात यावर चित्रपट तयार करण्याची कल्पना आली.
दळवी यांनी पुढे स्पष्ट केले की, चित्रपटात जे आवाज ऐकू येतात ते सगळे फक्त रेडिओतूनच येतात - कोणताही नायक थेट बोलत नाही - ही बाब कथेत ट्रान्झिस्टरशी असलेले भावनिक नाते आणि कथनात्मक महत्त्व दर्शवते. आजोबांना ट्रान्झिस्टर नसल्याने जी उणीव जाणवत असते. त्या काळामध्ये रेडिओचे माध्यम आणि साथीदार म्हणून असलेले महत्त्व प्रकर्षाने प्रकट होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193927
| Visitor Counter:
11