पंतप्रधान कार्यालय
जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
Posted On:
23 NOV 2025 2:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत भाग घेतला. ही बैठक दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष महामहिम सिरिल रामाफोसा यांनी आयोजित केली होती आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.
ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
आयबीएसए हा केवळ तीन देशांचा समूह नाही तर तीन खंड, तीन प्रमुख लोकशाही राष्ट्रे आणि तीन प्रमुख अर्थव्यवस्थांना जोडणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
जागतिक प्रशासन संस्थांची संरचना 21व्या शतकातील वास्तवापासून खूप दूर गेली आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी जागतिक प्रशासन संस्थांच्या, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे हा आता पर्याय नसून एक अनिवार्यता आहे असा मजबूत संदेश देण्याचे आवाहन केले. आयबीएसए ने या संदर्भात ठोस संदेश द्यावा, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी दहशतवादविरोधी लढ्यात घनिष्ठ समन्वयाची गरज असल्याचे अधोरेखित केले, आणि दहशतवादाविरुद्ध लढताना कोणत्याही प्रकारच्या दुहेरी निकषांना जागा नसावी यावर भर दिला. मानव-केंद्रित विकास सुनिश्चित करण्यात तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी तीन देशांमध्ये यूपीआय, को-वीन सारखे आरोग्य व्यासपीठ, सायबर सुरक्षा आराखडा आणि महिला-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान उपक्रम यासारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे सामायिकरण सुलभ करण्यासाठी 'आयबीएसए डिजिटल नवोन्मेषी आघाडी' स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला.
पंतप्रधानांनी सुरक्षित, विश्वासार्ह आणि मानव-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता नीति विकासात योगदान देण्याची आयबीएसए ची क्षमता अधोरेखित केली. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आयबीएसए नेत्यांना आमंत्रित केले.
'आयबीएसए एकमेकांच्या विकासाला पूरक ठरू शकते आणि शाश्वत विकासासाठी एक उदाहरण बनू शकते, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी भरड धान्य, नैसर्गिक शेती, आपत्ती प्रतिकारशक्ती, हरित ऊर्जा, पारंपरिक औषधपद्धती आणि आरोग्य सुरक्षा यासारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधींवर प्रकाश टाकला.
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सौर ऊर्जा यासारख्या क्षेत्रामध्ये चाळीस देशातील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी 'आयबीएसए फंडच्या कामाचे कौतुक करत पंतप्रधानांनी दक्षिण-दक्षिण सहकार्य आणखी वाढविण्यासाठी हवामान बदल प्रतिरोधक कृषीसाठी 'आयबीएसए फंडाची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला.
पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल.
***
गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193168)
Visitor Counter : 12