टॅलेंट्स इन टर्बो मोड! ‘सीएमओटी’ 2025 सुरू होताना भारतातील भावी पिढ्यांतील सर्जक उतरले मैदानात
‘सीएमओटी’ हे केवळ चित्रपटनिर्मितीशी संबंधित नाही; तर ते देशाच्या सर्जनशील भविष्याला आकार देण्यासंबधी आहे : केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन
‘सीएमओटी’चे माजी विद्यार्थी हे भविष्यातील कथाकथनकर्ते आणि भारताचे वैश्विक सांस्कृतिक राजदूत आहेत: केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2025
टॅलेंट्स इन टर्बो मोड! क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमॉरोचा पाचव्या वर्षीचा कार्यक्रम, सीएमओटी 2025 आज गोव्यात सुरू होताना भारतातील भावी पिढ्यांतील सर्जक मैदानात उतरले आणि त्यांनी या निसर्गरम्य किनारपट्टीवरील शहराला भारताच्या सर्वात प्रतिभाशाली आणि नवोदित तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी सजवलेल्या मैदानात रुपांतरीत केले.

जेथे सर्जकता, सहयोग आणि चित्रपटीय करिष्म्याच्या वावटळीत, कल्पना पटकथेतून पडद्याकडे झेप घेतात, अशा उच्च दर्जाच्या, 48 तास चालणाऱ्या चित्रपट निर्मिती स्पर्धेसाठी 125 उभरते तारे प्रकाशझोतात प्रवेश करत आहेत. हा केवळ महोत्सवातील एक कार्यक्रम नाही, तर उद्याचे दिग्दर्शक, अभिनेते आणि कथाकथनकार त्यांच्या स्वतःच्या प्रभावी कथा तयार करतात, असा हा मंच आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय व्यवहार राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी या स्पर्धेची सुरुवात करून दिली आणि सहभागींची उत्कटता आणि सर्जनशीलता यांची प्रशंसा केली. या उपक्रमाने वर्ष 2021 पासून सातत्याने केलेल्या वृद्धीची दखल घेत त्यांनी युवा कथाकथनकर्त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल सीएमओटीचे कौतुक केले. “या मंचाने भारतातील उभरत्या सर्जकांना जागतिक पातळीवरील निर्माते आणि सर्जनशील नेटवर्कशी जोडले आहे. हा उपक्रम केवळ चित्रपट तयार करण्याविषयी नाही तर तो देशाचे सर्जनशील भविष्य घडवण्याविषयी आहे,” ते म्हणाले.

डॉ मुरुगन यांनी स्पर्धकांना हे 48 तासांमध्ये चित्रपट निर्मितीचे कठोर आव्हान स्वीकारण्यास सांगितले. “हे उच्च दबाव असणारे अनुभव तुमच्या कौशल्यांना धार आणतात आणि तुमच्यातील सर्वोत्तम कर्तुत्व खुले करतात.” चैतन्यमय, नवोन्मेष- चलित सर्जक क्षेत्रासाठी पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेच्या धर्तीवर नुकतीच मुंबईत नव्याने सुरु करण्यात आलेली भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था, प्रतिभेची जोपासना करण्यासाठी, भारताची सर्जक परिसंस्था बळकट करण्यासाठी आणि ‘ऑरेंज’ अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू यांनी या स्पर्धेसाठी निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन करताना, त्यांचे समावेशन ही महत्वाची कामगिरी असल्याचे सांगितले. या स्पर्धकांच्या उत्सुकतेचे कौतुक करत त्यांनी गेल्या वर्षी याच उपक्रमात निर्मित अत्युत्कृष्ट चित्रपटांची आठवण काढली. त्यांनी या कार्यक्रमाच्या अंतिम सादरीकरणाचे वर्णन “बहुतांश ऑस्करसारखेच” असे केले आहे. सीएमओटी ही स्पर्धा दुर्मिळ सहयोगाची जोपासना करते कारण येथे अनोळखी व्यक्ती एकत्र येऊन दबावाखाली काम करत आकर्षक कथा निर्माण करतात. अलीकडेच एका चित्रपटासाठी राष्ट्रीय पारितोषिक जिंकलेल्या सीएमओटीच्या माजी विद्यार्थ्याचे उदाहरण देत ते म्हणाले, “तुमच्यापैकी अनेक जण भविष्यातील कथाकथन कर्ते आणि भारताचे वैश्विक सांस्कृतिक राजदूत आहात,”
शॉर्ट्स इंटरनॅशनलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्टर पिल्चर यांनी यावर्षीच्या सीएमओटीचे वर्णन आतापर्यंतची सर्वात उत्कंठावर्धक स्पर्धा अशा शब्दात केले. इतर कोणत्याही जागतिक महोत्सवात नसलेले अतुलनीय व्यासपीठ उभारल्याबद्दल त्यांनी मंत्रालयाची प्रशंसा केली. “याआधीच्या भागातील स्पर्धक यापूर्वीच कान्स मध्ये चित्रपट सादर करताना दिसले आहेत आणि ऑस्करसाठी नामनिर्देशित देखील झाले आहेत,”ते म्हणाले. पिल्चर यांनी सर्जकांना ही संधी शिकण्यासाठी, सहयोगासाठी आणि सर्जनशीलतेच्या मर्यादा आणखी ताणण्यासाठी वापरण्याचे आवाहन करत, कथाकथनाचे लघुरूप आता जागतिक मनोरंजन क्षेत्राच्या हृदयस्थानी आहे याचा पुनरुच्चार केला.
मंत्रालयाचे संयुक्त सचिव (चित्रपट विभाग) डॉ.अजय नागभूषण तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम देखील या उद्घाटन समारंभात उपस्थित होते.
क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) विषयी थोडक्यात माहिती
क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) हा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी सुरु केलेला एक दूरदर्शी उपक्रम असून भारतीय चित्रपट उद्योगातील उभरते तारे शोधून काढून, त्यांची जोपासना करुन त्यांना प्रकाशझोतात आणण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा केवळ एक प्रतिभाशोधाचा कार्यक्रम नाही- ते भारताच्या सर्जक अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या, भविष्यकालीन कथाकथनकारांसाठी तयार केलेले लाँचपॅड आहे.
देशभरातील नवोदित चित्रपट निर्मात्यांना आशियातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवातील जागतिक व्यासपीठावर त्यांची कौशल्ये सादर करण्याची असाधारण संधी देऊ करत सीएमओटी, प्रत्येक वर्षी अस्पर्श उत्कटतेला चित्रपटीय प्रतिभेत रुपांतरीत करते.
इफ्फी या भारतातील प्रमुख चित्रपट महोत्सवाच्या जोडीने आयोजित करण्यात येत असलेल्या या उपक्रमाने चार यशस्वी वर्षांची वाटचाल केली आहे. महत्त्वपूर्ण अशा या पाचव्या वर्षी, सीएमओटी पुन्हा एकदा भारतातील एकूण 13 चित्रपटसंबंधी कारागीरीत 125 युवा प्रतिभांची कामगिरी सादर करेल.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2191768
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2075551
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2073892
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1978454
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1979776
https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1856855
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2192613
| Visitor Counter:
13