पंतप्रधान कार्यालय
गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
15 NOV 2025 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2025
जय जोहार।
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.
तसा मी तुमच्याकडे येतो तेव्हा गुजराती भाषेत बोलायला हवं. परंतु आता देशभरातले लोक आपल्या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत, त्यामुळे आपणा सर्वांच्या आशीर्वाद आणि अनुमतीने मला आता हिंदीत बोलावं लागेल.
नर्मदा मैयेची ही पवित्र धरती आज आणखी एका ऐतिहासिक आयोजनाची साक्षीदार होत आहे. नुकतीच 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांची 150 वी जयंती साजरी केली. आपली एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी भारत पर्व सुरू झालं आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाच्या या भव्य आयोजनाने आपण भारत पर्वाच्या पूर्ततेचे साक्षीदार होत आहोत. या मंगलमय क्षणी मी भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम करतो. स्वातंत्र्यसंग्रामात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण जनजातीय क्षेत्रात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणाऱ्या गोविंद गुरु यांचा आशीर्वादही आपल्या सर्वांच्या सोबत आहे. या व्यासपीठावरून मी गोविंद गुरु यांनाही प्रणाम करतो. काही वेळापूर्वीच मला देवमोगरा मातेच्या दर्शनाचंही महद्भाग्य मिळालं. मातेच्या चरणांनाही मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. खूप कमी लोकांना माहीत असेल- काशी विश्वनाथ कॉरिडॉर त्याची चर्चा होते, उज्जैन महाकालची चर्चा होते, अयोध्येच्या राममंदिराची चर्चा होते, केदारनाथ धाम चर्चेत असतं. गेल्या दशकभरात आपल्या अशा अनेक धार्मिक, ऐतिहासिक स्थानांचा विकास झाला आहे. परंतु अगदी कमी लोकांना माहीत असेल, की 2003 मध्ये मुख्यमंत्री म्हणून मी मुलींच्या शिक्षणासाठी रेलीया पाटणमध्ये आलो होतो.. तेव्हा मी मातेच्या चरणी नमन करायलाही आलो होतो, आणि तेव्हा तिथली जी परिस्थिती मी पाहिली होती की एक छोटीशी झोपडीसारखी जागा होती-- आणि माझ्या आयुष्यात पूर्णनिर्माणाची जी अनेक कामं झाली असतील, त्यांच्या बाबतीत मी अभिमानाने सांगू शकतो की त्यांची सुरुवात देवमोगरा मातेच्या स्थानाच्या विकासाने झाली होती. मी आज तिथे गेल्यावर मला खूप छान वाटलं की लक्षावधींच्या संख्येने आता लोक तिथे येतात. मातेप्रती आपल्या मनात - विशेषतः आपल्या जनजातीय बांधवांमध्ये अपार श्रद्धाभाव आहे.
मित्रहो,
देडियापाडा आणि सागबाराचं हे क्षेत्र संत कबीरांच्या उपदेशांनी प्रेरित आहे. आणि मी वाराणसीचा खासदार आहे - आणि वाराणसी म्हणजे तर संत कबीरांची भूमी आहे. म्हणून स्वाभाविकपणे संत कबीरांचा माझ्या जीवनात एक वेगळं स्थान आहे. म्हणूनच या व्यासपीठावरून मी त्यांनाही नमन करतो.
मित्रहो,
आज इथे देशाच्या विकासाशी आणि जनजातीय कल्याणाशी संबंधित अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे. पीएम जनमन आणि अन्य योजनांच्या माध्यमातून इथे 1 लाख कुटुंबांना पक्की घरं दिली गेली आहेत. मोठ्या संख्येने एकलव्य मॉडेल स्कूल्सचं आणि आश्रमशाळांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं आहे. बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठात श्री गोविंद गुरु अध्यासनाची स्थापनाही झाली आहे. आरोग्य, रस्ते आणि वाहतुकीशी संबंधित अनेक प्रकल्पही सुरू झाले आहेत. या सर्व विकासकामांसाठी, सेवाकार्यांसाठी, कल्याणकारी योजनांसाठी आपणा सर्वांना- विशेषतः गुजरातच्या आणि देशातल्या माझ्या जनजातीय कुटुंबांना अनेक अनेक शुभेच्छा!
मित्रहो,
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करायला आपण 2021 मध्ये सुरुवात केली. जनजातीय गौरव सहस्रावधी वर्षांपासून आपल्या भारताच्या चैतन्याचाच अविभाज्य घटक आहे. जेव्हा जेव्हा देशाचा सन्मान, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा विषय समोर आला, तेव्हा तेव्हा आपला आदिवासी समाज सर्वांच्या पुढे खंबीरपणे उभा होता. आपल्या स्वातंत्र्य-आंदोलन हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आदिवासी समाजातून आलेल्या कित्येक नायक - नायिकांनी स्वातंत्र्याची मशाल पुढे नेली. तिलका मांझी, रानी गाइदिनल्यू, सिधो-कान्हो, भैरव मुर्मु, बुद्धो भगत, जनजातीय समाजाला प्रेरणा देणारे अल्लुरी सीताराम राजू, तसेच मध्यप्रदेशचे तंट्या भिल्ल, छत्तीसगडचे वीर नारायण सिंह, झारखंडचे तेलंगा खडिया, आसामचे रूपचंद कोंवर, आणि ओदिशाचे लक्ष्मण नायक अशा कितीतरी शूरवीरांनी स्वातंत्र्यासाठी अपरंपार त्याग केला, संघर्ष केला आणि आयुष्यभर इंग्रजांना स्वस्थपणे बसूही दिलं नाही. आदिवासी समाजाने अगणित वेळा क्रांती केली आणि स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलं.
गड्यांनो,
इथे गुजरातमध्येही जनजातीय समाजाचे असे कितीतरी शूरवीर देशभक्त आहेत - भगत आंदोलनाचं नेतृत्व करणारे गोविंद गुरु, पंचमहालात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रदीर्घ संघर्ष करणारे राजा रूपसिंह नायक, 'एकी आंदोलन' चालवणारे मोतीलाल तेजावत.. पाल चितरिया इथे जाऊन पाहाल तर शेकडो आदिवासींच्या हौतात्म्याचं तिथे स्मारक आहे- जालियनवाला बागेसारखी ती घटना साबरकांठामध्ये पाल चितरिया इथे घडली होती. गांधीजींची शिकवण आदिवासी समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या दशरीबेन चौधरी... स्वातंत्र्यसंग्रामाचे असे कित्येक अध्याय जनजातीय गौरव आणि वनवासी बांधवांच्या शौर्यानं रंगलेले आहेत.
बंधु-भगिनींनो,
स्वातंत्र्यसंग्रामातलं आदिवासी समाजाचं योगदान आपण कदापि विसरू शकत नाही आणि स्वातंत्र्यानंतर हे काम व्हायलाच हवं होतं. परंतु काही मोजक्या परिवारांना स्वातंत्र्याचं श्रेय देण्याच्या मोहापायी माझ्या लक्षावधी आदिवासी बंधू-भगिनींचा त्याग तपस्या आणि बलिदान नाकारलं गेलं. आणि म्हणूनच 2014 पूर्वी देशात भगवान बिरसा मुंडा यांचं स्मरण करणारं कोणीही नव्हतं. केव्हा त्यांच्या जवळपासच्या गावांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाई. सरावाचं झालेलं ते चित्र आम्ही बदललं. का? तर माझ्या आदिवासी बंधु-भगिनींनी आपल्याला केवढी मोठी भेट दिली आहे-- स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे हे आपल्या पुढच्या पिढीलाही समजलं पाहिजे. आणि हेच कार्य पुन्हा जिवंत करण्यासाठी, पुढच्या पिढीच्या स्मरणात राहण्यासाठी आपण देशात अनेक वनवासी संग्रहालयं निर्माण करत आहोत. इथे गुजरातमध्येही राजपीपलामध्येच 25 एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर एक विशाल ट्रायबल म्युझियम साकारतं आहे. आता काही दिवसांपूर्वीच मी छत्तीसगडमध्येही गेलो होतो. तिथेही मी हुतात्मा वीर नारायण सिंह जनजातीय संग्रहालयाचं लोकार्पण केलं. तसंच रांचीमध्ये ज्या तुरुंगात भगवान बिरसा मुंडा यांनी कारावास भोगला, त्याच तुरुंगात आता 'भगवान बिरसा मुंडा आणि तत्कालीन स्वातंत्र्यसंग्राम' या विषयावर एक अतिशय भव्य संग्रहालय उभारलं गेलं आहे.
मित्रांनो,
आज श्री गोविंद गुरु, यांच्या नावाने एक अध्यासन जनजातीय भाषा संवर्धन केंद्र म्हणून स्थापन करण्यात आले आहे. येथे भिल्ल, गामित, वसावा, गरासिया, कोकणी, संथाळ, राठवा, नायक, डबला, चौधरी, कोकणा, कुंभी, वरली, डोडिया अशा सर्व आदिवासी बोलीभाषांविषयी अध्ययन होईल. त्यांच्याशी संबंधित कथा आणि गीते संरक्षित केली जातील. आदिवासी समाजाकडे हजारो वर्षांच्या अनुभवांतून मिळालेले ज्ञानाचे अफाट भांडार आहे. त्यांच्या जीवनशैलीत विज्ञान लपलेले आहे, त्यांच्या कथांमध्ये दर्शन आहे, त्यांच्या भाषेत पर्यावरणाची जाण आहे. श्री गोविंद गुरु अध्यासन या समृद्ध परंपरेला नवीन पिढीशी जोडण्याचे काम करेल.
मित्रांनो,
आजचा जनजातीय गौरव दिवसाचा हा प्रसंग, आपल्याला त्या अन्यायाची आठवण करून देतो, जो आपल्या कोट्यवधी आदिवासी बंधू-भगिनींसोबत करण्यात आला. देशात सहा दशकांपर्यंत राज्य करणाऱ्या काँग्रेसने आदिवासींना त्यांच्या दयनीय स्थितीत सोडून दिले होते. आदिवासी भागांमध्ये कुपोषणाची समस्या होती, आरोग्य सुरक्षेची समस्या होती, शिक्षणाचा अभाव होता, कनेक्टिव्हिटीचा तर मागमूसही नव्हता. हीच उणीव एका प्रकारे आदिवासी भागांची ओळख बनली होती आणि काँग्रेस सरकारे हातावर हात ठेवून बसली होती.
पण मित्रांनो,
आदिवासी कल्याणाला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. आम्ही नेहमी हा संकल्प सोबत घेऊन चाललो, की आम्ही आदिवासींवर होत असलेला हा अन्याय संपुष्टात आणू, त्यांच्यापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवू. देशाला स्वातंत्र्य तर 1947 मध्ये मिळाले होते. आदिवासी समाज तर भगवान रामाशी देखील संबंधित आहे, इतका जुना आहे. पण सहा-सहा दशकांपर्यंत राज्य करणाऱ्यांना हे माहीतच नव्हते, की इतक्या मोठ्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
मित्रांनो,
जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान बनले, भाजपाचे सरकार आले, तेव्हा देशात पहिल्यांदा आदिवासी समाजासाठी एका वेगळ्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, त्यापूर्वी ती झाली नव्हती. पण अटलजींच्या सरकारनंतर, काँग्रेसला पुन्हा दहा वर्षे काम करण्याची जी संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी या मंत्रालयाकडे दुर्लक्ष केले, त्याचा त्यांना पूर्णपणे विसर पडला. तुम्ही कल्पना करू शकता, 2013 मध्ये काँग्रेसने आदिवासी कल्याणासाठी काही हजार कोटी रुपयांची योजना बनवली होती, काही हजार कोटी रुपये, एका जिल्ह्यात एका हजार कोटी रुपयांनी काम होत नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही खूप मोठी वाढ केली, त्यांच्या हिताची चिंता केली, आम्ही मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ केली आणि, आज जनजातीय मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अनेक पटीने वाढ करून आम्ही आदिवासी भागांच्या विकासाचा विडा उचलला आहे. शिक्षण असो, आरोग्य असो, कनेक्टिव्हिटी असो, प्रत्येक क्षेत्रात आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत.
मित्रांनो,
एके काळी येथे गुजरातमध्येही आदिवासी भागांची स्थिती फारशी चागंली नव्हती. परिस्थिती अशी होती की अंबाजीपासून उमरगांव पर्यंत संपूर्ण आदिवासी पट्ट्यात एकही विज्ञान शाखेची शाळा सुद्धा नव्हती, सायन्स स्कूल नव्हती. डेडियापाडा आणि सागबारासारख्या भागांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळत नव्हती. मला आठवते आहे, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मी येथे डेडियापाडा येथूनच कन्या केळवणी महोत्सव सुरू केला होता. त्यावेळी अनेक मुले मला भेटायची, आणि ती मुलांची खूप स्वप्ने होती. खूप काही बनण्याची त्यांची इच्छा होती. कोणाला डॉक्टर व्हायचे होते, कोणी इंजिनिअर बनायचे होते. कोणाला शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती. मी त्यांना समजावत असे, शिक्षण हाच याचा मार्ग आहे. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या आम्ही दूर करू, असा विश्वास मी देत असे.
मित्रांनो,
परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही दिवस-रात्र कष्ट केले. त्याचाच परिणाम आहे, आज गुजरातच्या आदिवासी पट्ट्यात, मी जेव्हा मुख्यमंत्री बनलो त्याआधी जिथे विज्ञान शाखेची शाळा नव्हती, आज त्या आदिवासी पट्ट्यात 10 हजारांहून अधिक शाळा आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये आदिवासी भागांमध्ये दोन डझन विज्ञान महाविद्यालये, केवळ शाळा नाहीत, विज्ञान महाविद्यालये, वाणिज्य महाविद्यालये, कला महाविद्यालये बनली आहेत. भाजपा सरकारने आदिवासी मुलांसाठी शेकडो वसतिगृहे तयार केली. येथे गुजरातमध्ये 2 आदिवासी विद्यापीठे देखील बनवली. अशाच प्रयत्नांमुळे येथे देखील मोठे परिवर्तन झाले आहे. 20 वर्षांपूर्वी जी मुले आपली स्वप्ने घेऊन मला भेटायची, आता त्यापैकी कोणी डॉक्टर आणि इंजिनिअर आहे, तर कोणी संशोधन क्षेत्रात काम करत आहे.
मित्रांनो,
आदिवासी बालकांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही दिवस-रात्र काम करत आहोत. गेल्या 5-6 वर्षांमध्येच केंद्र सरकारने, देशात एकलव्य आदर्श आदिवासी शाळांसाठी 18 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केले आहेत. विद्यार्थिनींसाठी शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. याचा परिणाम हा आहे, की या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आदिवासी बालकांच्या संख्येत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मित्रांनो,
आदिवासी तरुणांना जेव्हा संधी मिळतात, तेव्हा ते प्रत्येक क्षेत्रात शिखर गाठण्याची क्षमता राखतात. त्यांची हिंमत, त्यांची मेहनत आणि त्यांची क्षमता, हे त्यांना परंपरेने, वारशाने मिळालेले आहे. आज क्रीडा क्षेत्राचे उदाहरण सर्वांसमोर आहे, जगात तिरंग्याची शान वाढवण्यात आदिवासी मुला-मुलींनी खूप मोठे योगदान दिले आहे! आतापर्यंत आपण सगळे मेरी कोम, थोनाकल गोपी, दुती चंद आणि बाईचुंग भुतिया यांसारख्या खेळाडूंची नावे जाणत होतो. आता प्रत्येक मोठ्या स्पर्धेत आदिवासी भागांतून असेच नवे नवे खेळाडू उदयाला येत आहेत. नुकतेच भारताच्या क्रिकेट टीमने महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. त्यात देखील आमच्या एका आदिवासी समाजाच्या मुलीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमचे सरकार आदिवासी भागांमध्ये, नवीन प्रतिभांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी सतत काम करत आहे. आदिवासी क्षेत्रांमध्ये क्रीडा सुविधा देखील वाढवल्या जात आहेत.
मित्रांनो,
आमचे सरकार वंचितांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनावर काम करते. याचे खूप मोठे उदाहरण हा आपला नर्मदा जिल्हा देखील आहे. आधी तर हा वेगळा नव्हता, तो भरूच जिल्ह्याचा भाग होता, काही सूरत जिल्ह्याचा भाग होता. आणि हा संपूर्ण भाग कधीकाळी मागासलेला मानला जात होता, आम्ही याला प्राधान्य दिले, आम्ही या जिल्ह्याला आकांक्षी जिल्हा बनवले, आणि आज हा विकासाच्या अनेक मापदंडांवर खूप पुढे आला आहे. याचा खूप मोठा लाभ येथील आदिवासी समुदायाला मिळाला आहे. तुम्ही पाहिले आहे, केंद्र सरकारच्या अनेक योजना, आम्ही आदिवासी बहुल राज्यांमध्ये आणि वंचित वर्गां मध्ये जाऊनच सुरू करतो. तुम्हाला आठवत असेल, 2018 मध्ये मोफत उपचारांसाठी आयुष्मान भारत योजना सुरू झाली होती. ही योजना आम्ही, झारखंडच्या आदिवासी भागात रांचीमध्ये जाऊन सुरू केली होती. आणि, आज देशातील कोट्यवधी आदिवासी बंधू-भगिनींना याअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळत आहे. सरकारने आयुष्मान आरोग्य मंदिराची सुरुवात देखील आदिवासी बहुल छत्तीसगडमधून केली होती. याचा देखील खूप मोठा लाभ आदिवासी वर्गाला मिळत आहे.
मित्रहो,
आदिवासींमध्येही जे अधिक मागास आहेत, त्यांना आमचे सरकार विशेष प्राधान्य देत आहे. ज्या भागांमध्ये स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांनंतरही वीज नव्हती, पाणी पोहोचविण्यासाठी व्यवस्था नव्हती,रस्ते नव्हते,रुग्णालय सुविधा नव्हती, अशा भागांच्या विकासासाठी विशेष अभियान सुरू करण्यासाठी झारखंडमधल्या खुंटी इथून ही पीएम जनमन योजना सुरु केली होती. भगवान बिरसा मुंडा यांच्या गावाला गेलो होतो. तिथली धूळ कपाळी लावून आदिवासी कल्याणाचा संकल्प घेऊन मी निघालो आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या घराला भेट देणारा मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, आजही भगवान बिरसा मुंडा यांच्या कुटुंबियांसमवेत माझे तितकेच घनिष्ठ संबंध आहेत. पीएम जनमन योजनेवर 24 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
मित्रहो,
धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानही मागास आदिवासी गावांच्या विकासाची नवी गाथा लिहित आहे. देशभरात आतापर्यंत 60 हजाराहून अधिक गावे या अभियानाशी जोडली गेली आहेत.यापैकी हजारो गावे अशी आहेत जिथे प्रथमच नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचले आहे. शेकडो गावांमध्ये टेलीमेडिसिन सुविधा सुरु झाली आहे.या अभियानाअंतर्गत ग्राम सभांना विकासाची केंद्रे करण्यात आली आहेत.गावांमध्ये आरोग्य,शिक्षण,पोषण,कृषी आणि उपजीविकेसाठी सामुहिक योजना तयार करण्यात येत आहेत. दृढनिश्चय केला तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते हे या अभियानाने सिद्ध केले आहे.
मित्रहो,
आदिवासी जीवनाचा प्रत्येक पैलू लक्षात घेऊन आमचे सरकार काम करत आहे. आम्ही वन उत्पादनांच्या संख्येत 20 वरून वाढ करून ती संख्या 100 केली आहे.वन उत्पादनांच्या एमएसपी मध्ये वाढ केली आहे. आमचे सरकार,भरड धान्य,श्री अन्नाला मोठे प्रोत्साहन देत आहे, ज्याचा लाभ आदिवासी भागात शेती करणाऱ्या आमच्या आदिवासी बंधू-भगिनींना मिळत आहे.आपल्यासाठी गुजरातमध्ये आम्ही वनबंधू कल्याण योजना सुरु केली होती. यातून आपल्याला नवे आर्थिक बळ मिळाले आहे.मला आठवत आहे की ही योजना मी सुरु केली होती तेव्हा अनेक महिने वेगवेगळ्या आदिवासी भागातून लोक माझे आभार मानण्यासाठी येत असत.इतकी ही योजना परिवर्तनकारक होती.भूपेंद्र भाई या योजनेचा विस्तार करत आहेत आणि आदिवासी कल्याण योजनेच्या रूपाने नव्या विस्तृत कार्यक्रमांसह आपल्यासाठी ती आणत आहेत याचा मला आनंद आहे.
बंधू-भगिनींनो,
आदिवासी समुदायामध्ये सिकलसेल या आजाराचा मोठा धोका राहिला आहे.याच्या निर्मुलनासाठी आदिवासी भागांमध्ये दवाखाने,वैद्यकीय केंद्रे आणि रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे. सिकल सेल आजाराच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान सुरु आहे.या अंतर्गत देशभरात 6 कोटी आदिवासी बंधू-भगिनींची तपासणी झाली आहे.
मित्रहो,
नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत स्थानिक भाषेत शिक्षणाची सुविधाही देण्यात येत आहे. केवळ भाषेच्या कारणास्तव मागे राहणारी आदिवासी समुदायातली मुले आता स्थानिक भाषेत शिक्षण घेऊन स्वतःही आगेकूच करत आहेत आणि देशाच्या प्रगतीमधेही आपले अधिकाधिक योगदान देत आहेत.
मित्रहो,
गुजरातच्या आपल्या आदिवासी समाजाकडे अद्वितीय कला भांडार आहे. त्यांची चित्रे,त्यांची चित्रकला यांना स्वतःचे वैशिष्ट्य आहे. एक मुलगी तिथे चित्र घेऊन आहे.ते देण्यासाठी तिने आणले आहे असे वाटते.आमचे एसपीजी, जरा त्या मुलीकडून ते घ्या.इथूनच मला दिसत आहे की त्यात वारली चित्रकलाही आहे.धन्यवाद मुली.यामध्ये जर तुझा पत्ता असेल तर मी तुला पत्र लिहीन.खूप-खूप आभार.चित्र कला हा इथला स्थायी भाव आहे.आमचे परेश भाई राठवा यांच्यासारखे चित्रकार ही शैली पुढे नेत आहेत आणि मला आनंद आहे की आमच्या सरकारने परेश भाई राठवा यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मित्रहो,
कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकशाहीमध्ये त्याची योग्य भागीदारीही तितकीच आवश्यक असते. म्हणूनच आमचे धेय्य आहे की आदिवासी समाजाच्या आमच्या बंधू-भगिनी,देशाच्या उच्च पदांवरही पोहोचाव्यात,त्यांनी देशाचे नेतृत्व करावे.आपण पहा, आज देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहेत.अशाच प्रकारे भाजपाने, एनडीएने , आदिवासी समाजाच्या आमच्या होतकरू मित्रांना उच्च पदांवर पोहोचविण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री,आदिवासी समाजाचे विष्णूदेव जी साय, छत्तीसगडचा कायापालट घडवीत आहेत.ओदिशामध्ये मोहन चरण मांझी, भगवान जगन्नाथ जी यांच्या आशीर्वादाने, आदिवासी समुदायाचे आमचे मांझी जी ओदिशाचा विकास घडवीत आहेत.अरुणाचल प्रदेशात आमचे आदिवासी बंधू पेमा खांडू जी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.नागालँडमध्ये आमचे आदिवासी बंधू,नेफ्यू रियो काम करत आहेत.आम्ही अनेक राज्यांमध्ये आदिवासी मुख्यमंत्री दिले आहेत. देशात अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये आमच्या पक्षाने आदिवासी अध्यक्ष दिले आहेत.आमच्या गुजरातचे मंगूभाई पटेल मध्यप्रदेशचे राज्यपाल आहेत.आमच्या केंद्र सरकारमध्ये सर्बानंद जी सोनोवाल आदिवासी समाजाचेच आहेत आणि नौवहन मंत्रालयाचा संपूर्ण कारभार सांभाळत आहेत.
मित्रहो,
या सर्व नेत्यांनी देशाची जी सेवा केली आहे,देशाच्या विकासात जे योगदान दिले आहे ते अतुलनीय आहे, अभूतपूर्व आहे.
मित्रहो,
आज देशाकडे ‘सबका साथ,सबका विकास’ या मंत्राचे बळ आहे. याच मंत्राने मागील वर्षांमध्ये कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. याच मंत्राने देशाच्या ऐक्याला बळकटी दिली आहे आणि याच मंत्राने दशकांपासून उपेक्षित राहिलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडले आहे, इतकेच नव्हे संपूर्ण समाजाचे नेतृत्व होत आहे. म्हणूनच आज भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या पावन पर्वावर ‘सबका साथ,सबका विकास’ हा मंत्र बळकट करण्याची शपथ आपल्याला घ्यायची आहे.विकासात कोणी मागे राहणार नाही.धरती आबांना हीच खरी श्रद्धांजली आहे.आपण सर्वजण मिळून आगेकूच करू आणि विकसित भारत हे स्वप्न साकार करू याचा मला विश्वास आहे.याच संकल्पासह आदिवासी गौरव दिनानिमित्त आपण सर्वाना पुन्हा एकदा शुभेच्छा.देशवासियांना मी सांगू इच्छितो की या आदिवासी गौरव दिनामध्ये आपल्या मातीचा सुगंध आहे,आपल्या देशाच्या परंपरा जपत जगणाऱ्या आदिवासी समुदायाच्या परंपराही आहेत,शक्तीही आहे आणि भविष्यासाठीच्या आकांक्षाही आहेत.म्हणूनच भारताच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात नेहमीच 15 नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिवस म्हणून अतिशय अभिमानाने साजरा करायचा आहे.आपल्याला नव्या सामर्थ्याने आगेकूच करायची आहे.नव्या विश्वासाने पुढे वाटचाल करायची आहे.त्याचबरोबर भारताचा गाभा जपत नवी शिखरे गाठायची आहेत. या विश्वासासह आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद.
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
या वर्षी वंदेमातरम् या गीताला 150 वर्षे झाली हे आपणा सर्वाना माहित आहेच.हे गीत स्वतःच भारताच्या महान प्रेरणेचा,दीर्घ प्रवासाचा,प्रदीर्घ संघर्षाचा प्रत्यके प्रकारे वंदेमातरम् हा मंत्र ठरला होता,त्याची 150 वर्षे आपण साजरी करत आहोत. माझ्यासोबत म्हणा -
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्।
वंदे मातरम्।
वंदे मातरम्।
वंदे मातरम्।
वंदे मातरम्।
वंदे मातरम्।
खूप-खूप धन्यवाद.
जयदेवी पुजारी-स्वामी/सुषमा काणे/हर्षल आकुदे/जाई वैशंपायन/शैलेश पाटील/निलीमा चितळे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191106)
Visitor Counter : 9
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada