पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला
पंतप्रधानांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला
पंतप्रधानांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून मिळालेल्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले
पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रासाठी काम करण्याची आणि काही नवीन योगदान देण्याची भावना निर्माण झाली की ती प्रबळ प्रेरणेचे स्रोत ठरते
Posted On:
16 NOV 2025 3:47PM by PIB Mumbai
गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली.
केरळमधील एका अभियंत्यांनी नवसारी, गुजरात येथील नॉइज बॅरियर कारखान्यातील कामाचा अनुभव सांगितला. या ठिकाणी लोखंडी सळईच्या पिंजऱ्याच्या जोडणीसाठी रोबोटिक यंत्रणा वापरली जात आहे. मोदी यांनी तिला विचारले की, भारताची पहिली बुलेट ट्रेन तयार करण्याचा अनुभव तिला वैयक्तिकरीत्या कसा वाटतो आणि या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ती आपल्या कुटुंबीयांना काय सांगू इच्छिते.
त्यावर या अभियंत्याने सांगितले की, राष्ट्राच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात योगदान देण्याचा तिला अभिमान आहे आणि हा प्रकल्प तिच्यासाठी स्वप्नातील प्रकल्प तसेच तिच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रसेवेच्या भावनेवर प्रकाश टाकताना, राष्ट्रासाठी कर्तव्य करण्याची आणि काहीतरी नवीन योगदान देण्याची भावना जागृत होते तेव्हा ती प्रचंड प्रेरणेचा स्रोत ठरते, यावर भर दिला. त्यांनी याची तुलना देशाच्या अवकाश वाटचालीशी करताना, देशाचा पहिला उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या भावना काय, कशा असतील याचे स्मरण केले आणि आज शेकडो उपग्रहांचे प्रक्षेपण केले जात असल्याचे सांगितले.
बंगळुरूची आणखी एक कर्मचारी श्रुती, मुख्य अभियांत्रिकी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तिने कठीण आरेखन आणि अभियांत्रिकी नियंत्रण प्रक्रियांविषयी माहिती दिली. अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर, तिच्या चमूने फायदे आणि तोटे लक्षात घेतले, त्यावर उपाय शोधले आणि सुरळित निर्दोष अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पर्यायही शोधले असे तिने अधोरेखित केले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इथे मिळालेले अनुभव ब्लू बुकप्रमाणे ध्वनिमुद्रित अथवा नोंदवले आणि संकलित केले तर देश मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीकडे निर्णायक वाटचाल करू शकेल. भारताने प्रयोगातील पुनरावृत्ती टाळली पाहिजे आणि विद्यमान प्रारूपांमधून शिकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करावी, यावर त्यांनी भर दिला. प्रतिकृती तेव्हा अर्थपूर्ण ठरतील जेव्हा एखादी विशिष्ट कृती का केली आहे याची स्पष्टता असेल, असेही मोदी यांनी अधोरेखित केले. अन्यथा, पुनरावृत्ती दिशाहीन अथवा हेतूविरहित होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारे नोंदी केल्या तर भविष्यात त्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील आणि राष्ट्र उभारणीत योगदान ठरू शकेल.
"आपण आपले जीवन इथे समर्पित करू आणि देशासाठी काहीतरी मौल्यवान मागे सोडून जाऊ," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
एका कर्मचाऱ्याने कवितेद्वारे त्याची वचनबद्धता मनापासून व्यक्त केली. पंतप्रधानांनी त्याच्या समर्पणाचे कौतुक केले आणि प्रतिसादही दिला.
या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190555)
Visitor Counter : 15