पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

15 नोव्हेंबर रोजी ‘जनजातीय गौरव दिवसा निमित्त पंतप्रधान गुजरातमधील नर्मदा जिल्ह्याला भेट देणार


धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

पंतप्रधान नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे 9,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे  लोकार्पण आणि भूमिपूजन करणार

पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि वारसा यावर केंद्रित  हे प्रकल्प आदिवासी सक्षमिकरणाला समर्पित

Posted On: 14 NOV 2025 11:41AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देणार असून, दुपारी 12:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील देवमोगरा मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. त्यानंतर सुमारे 2:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. या प्रसंगी पंतप्रधान 9,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

डेडियापाडा येथील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. पंतप्रधान प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानआणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानया अंतर्गत बांधण्यात आलेल्या 1 लाख घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी होतील. 

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सुमारे 1,900 कोटी रुपयांच्या 42 एकलव्य आदर्श  निवासी शाळांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच 228 बहुउद्देशीय केंद्रे समुदाय-आधारित उपक्रमांसाठी हब म्हणून कार्य करतील. याशिवाय, आसाम मेडिकल कॉलेज, डिब्रूगड येथे सेंटर ऑफ कॉम्पिटन्सआणि मणिपूरमधील इंफाळ येथे आदिवासी संस्कृती आणि वारशाचे संवर्धन करण्यासाठी जनजातीय संशोधन संस्थाभवनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल,

याव्यतिरिक्त, पंतप्रधान गुजरातमधील 14 आदिवासी जिल्ह्यांसाठी 250 बसेसना  हिरवा झेंडा दाखवणार असून, ज्यामुळे आदिवासी भागांमध्ये संपर्क सुविधेत सुधारणा होणार आहे.

पंतप्रधान आदिवासी भागांमधील संपर्क सुविधा वाढविण्यासाठी 748 किमी नव्या रस्त्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करतील आणि डीए-जेएजीयूए  अंतर्गत 14 ‘जनजातीय बहु विपणन  केंद्रांसाठी पायाभरणी  करतील, जी समुदाय विकास केंद्र म्हणून कार्य करतील. 2,320 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 50 नव्या एकलव्य आदर्श निवासी शाळांचे देखील पंतप्रधान भूमिपूजन करतील, ज्यामुळे आदिवासी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळेल. 

***

सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189977) Visitor Counter : 11