माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इफ्फी  2025 नवोन्मेष आणि समावेशकतेला मूर्त रूप देईल, महिला निर्मात्या , नव्या  दमाच्या प्रतिभेचा  आणि  सर्जनशील उत्कृष्टतेचा गौरव करेल :  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे प्रतिपादन


नवी दिल्ली येथील उद्घाटनपूर्व कार्यक्रमाने इफ्फी  2025 च्या  प्रारंभाविषयी सिनेप्रेमींमध्ये निर्माण झाली उत्‍सुकता

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान  रंगणार  56 वा  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

चित्रपटसृष्टीत 50 वर्षांची गौरवशाली कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल ‘इफ्फी’  समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा करणार  विशेष सन्मान

महोत्सवात 13 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर आणि 44 आशियाई प्रीमियर सह 81 देशांमधील 240 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन

यंदा ‘इफ्फी’मध्‍ये  5 खंडातील 32 चित्रपटांचा समावेश असलेल्या तीन उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन 

2025 च्या जगातील अव्वल  चित्रपट महोत्सवांमधील पुरस्कार विजेते सर्वोत्तम चित्रपट भारतात प्रथमच  होणार प्रदर्शित

यंदा 9 विशेष विभाग :

फिल्म्स, रिस्टोर्ड क्लासिक्स, मॅकेब्रे ड्रीम्स, युनिसेफ (UNICEF) आणि सिनेमा ऑफ द वर्ल्ड

कंट्री फोकस: जपान. जपानी सिनेमा, संस्थात्मक सहकार्य आणि सांस्कृतिक प्रदर्शनांचा निवडक संच होणार  प्रदर्शित  

विशेष चित्रपट पॅकेजेस: भागीदार देश स्पेन आणि केंद्रबिंदू  ऑस्ट्रेलिया

इफ्फी 2025 मध्ये चित्रपटांची शताब्दी साजरी करून पुनर्संचयित अभिजात  चित्रपटांच्या माध्यमातून दिग्गज चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा करणार  सन्मान   

Posted On: 07 NOV 2025 5:10PM by PIB Mumbai

 

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे आज इफ्फीचा उद्घाटनपूर्व कार्यक्रम पार पडला. यामध्ये इफ्फी अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. यंदाच्या महोत्सवात 13 जागतिक प्रीमियर, 4 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 46 आशियाई प्रीमियरसह 81 देशांचे 240 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील. या महोत्सवासाठी 127 देशांमधून 2,314 इतक्या विक्रमी संख्येने प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत, यावरून  जागतिक चित्रपट महोत्सव विश्वात इफ्फीची  वाढती लोकप्रियता आणि या महोत्सवाचा वाढता प्रभाव  अधोरेखित होते.

यंदाच्या इफ्फीमध्ये नवोन्मेष आणि समावेशकता प्रतिबिंबित करणारे अनेक नवीन उपक्रम समाविष्ट  करण्यात आल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी अधोरेखित केले. यंदाच्या महोत्सवात 50 हून अधिक महिला दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित होणार असून, यामधून सिनेमा क्षेत्रात नारी शक्तीला प्रोत्साहन देण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले. वेब आणि स्ट्रीमिंग कंटेंटमधील उत्कृष्टतेला मान्यता देण्यासाठी यावर्षी देखील ओटीटी पुरस्कार दिले जातीलअसे त्यांनी जाहीर केले. पटकथा लेखन, प्रॉडक्शन डिझाईन आणि ध्वनी यासारख्या क्षेत्रात नवीन आणि उदयोन्मुख प्रतिभेला हा महोत्सव प्रोत्साहन देतो असे ते म्हणाले. ‘पायरसी’विरोधी कायदे मजबूत करण्यासाठी आणि चित्रपट प्रमाणीकरण सुलभ करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, तसेच बहु-भाषिक चित्रपटांसाठी सीबीएफसीचे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ प्रमाणपत्र भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेला आणखी बळ देईलयावर त्यांनी भर दिला.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर मजबूत प्रभाव पाडत आहे, आणि भारतीय चित्रपट हे ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर हॉलिवूडच्या चित्रपटांना  मागे टाकत आहेत. यंदाच्या इफ्फीमध्ये जपान, स्पेन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे सहकार्य लाभेल. निर्मिती संस्था, राज्ये आणि सांस्कृतिक गटांचा समावेश असलेली ‘ग्रँड कार्निव्हल परेड’ चैतन्य निर्माण करेल, तर भव्य फिल्म बझार आंतरराष्ट्रीय सह-निर्मितीला चालना देईल.

'इफ्फीएस्टा (IFFIesta)’, हा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी (इफ्फी) संबंधित एक चैतन्यमय, मनोरंजनपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. 'इफ्फीएस्टा' मध्ये संगीत, संस्कृती आणि मनोरंजनाचा उत्सव साजरा होईल. चित्रपट, खाद्यपदार्थ, कला आणि परस्परसंवादी अनुभवांच्या मिश्रणाद्वारे समुदायांना एकत्र आणण्यासाठी हे डिझाइन केले असून, प्रमुख  महोत्सवात तरुणांचा सहभाग आणि सार्वजनिक सहभाग वाढवणे, हे याचे उद्दिष्ट आहे. जनरेटिव्ह एआय मनोरंजन उद्योगात व्यत्यय आणत असतानाकथाकथनाचे भविष्य घडवणारे एक सर्जनशील साधन म्हणून ते स्वीकारायला हवे, असे जाजू यांनी अधोरेखित केले.

इफ्फी 2025 महोत्सवाचे संचालक शेखर कपूर म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात  मोठा चित्रपट निर्माता आणि चित्रपट पाहणारा देश असून, तो आपल्या लोकांच्या कथांवरील प्रेमाचा उत्सव साजरा करतो. कथाकथनामुळे विविध संस्कृतींमध्ये समाज आणि शांततेची भावना निर्माण होते यावर त्यांनी भर दिला. फिल्म बझारचा उल्लेख करताना ते म्हणाले की ही एक चळवळ आहे, जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा निर्मात्यांना सक्षम बनवते. ते पुढे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेकडे कथाकारांना भारताच्या कथा जगासमोर सादर करायला सहाय्य करणारे सर्जनशील साधन म्हणून पाहायला हवे.

या उद्घाटनपूर्व समारंभाला पत्र सूचना कार्यालयाचे प्रमुख महासंचालक धीरेंद्र ओझा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाचे सहसचिव डॉ. अजय नागभूषण, इंडियन पॅनोरामा परीक्षक  फीचर विभागाचे  अध्यक्ष राजा बुंदेला, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि इंडियन पॅनोरामा परीक्षक  नॉन फीचर विभागाचे अध्यक्ष धरम गुलाटी उपस्थित होते.

56 व्या महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये

प्रारंभीचे चित्रपट आणि प्रथम प्रदर्शन

इफ्फी 2025 चा प्रारंभ ‘दी ब्ल्यू ट्रेल’ या ब्राझिलियन लेखक गॅब्रिएल मॅस्कारो यांच्या चित्रपटाने होणार आहे. या विज्ञान कल्पनेवर आधारित काल्पनिक चित्रपटात एका 75 वर्षी य महिलेचा अॅमेझॉनमधील धाडसी प्रवास चित्रित करण्यात आला आहे. तिचे स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वप्न पाहण्याचा अधिकार यांचा हा एक शांततापूर्ण प्रवास आहे. या चित्रपटाने यंदाच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समीक्षकांच्या निवड समितीचा ‘सिल्व्हर बेअर’ पुरस्कार मिळवला आहे.  

या महोत्सवात 18 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यातील 13 चित्रपटांचे जागतिक प्रदर्शन, 2 चित्रपटांचे आशियाई स्तरावर प्रथम प्रदर्शन, एका चित्रपटाचे भारतातील प्रथम प्रदर्शन आणि 2 चित्रपटांचे विशेष प्रदर्शन केले जाणार आहे. लाल गालिच्यांवर  प्रसिध्‍द  कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांचे स्वागत केले जाईल. 

प्रदर्शित होणारे चित्रपट आणि प्रथम प्रदर्शन 

81 देशांमधील एकंदर 240 पेक्षा जास्त चित्रपट

आंतरराष्ट्रीय विभागात 160 चित्रपट, यामध्ये 13 चित्रपटांचे जागतिक स्तरावर प्रथम प्रदर्शन

इफ्फी 2025 मध्ये विविध महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविलेले 80 पेक्षा जास्त चित्रपट आणि ऑस्कर पुरस्कारांसाठी अधिकृत नामांकन मिळालेले 21 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

जागतिक सिनेमा श्रेणीअंतर्गत 55 पेक्षा जास्त चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय सोहोळ्यांमध्ये दाखविले गेलेले निवडक 133 चित्रपट

आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत निवडक विभाग

जपान – प्रमुख केंद्रित देश आणि दोन नव्याने समाविष्ट विभाग भागीदार देश – स्पेन आणि केंद्रबिंदु देश – ऑस्ट्रेलिया

महोत्सवात एकंदर 15 स्पर्धात्मक आणि  निवडक विभाग असतील. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा, नवोदित दिग्दर्शकांचा  सर्वोत्कृष्ट चित्रपट, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक आणि  मॅकब्रे ड्रीम्स, डॉक्यु माँटेज, प्रायोगिक चित्रपट, युनिसेफ आणि  पुनर्संचयित अभिजात यासारखे विशेष विभागही असतील.

प्रमुख केंद्रित देश - जपान

इफ्फी 2025 चा मध्यवर्ती केंद्रित देश जपान आहे. सद्यकाळातील  जपानी चित्रपट या विभागात समाविष्ट असतील. जपानच्या नव्या चित्रपट विश्वाला आकार देणारे नवोदित चित्रपट निर्माते आणि  प्रथितयश लेखक या दोघांचीही सर्जनशीलता या विभागात साजरी केली जाणार आहे. स्मृतींमधील नाट्यपूर्ण चित्रपट, महोत्सवात पुरस्कार मिळविणारे मनोवैज्ञानिक थरारपट, समलैंगिक संबंधांची कथा असलेले चित्रपट, तरुणाईच्या विज्ञान कल्पना आणि काव्यात्मक प्रायोगिक या सहा विशेषत्वाने निर्धारित विभागांचा यामध्ये समावेश असेल.

शताब्दी आदरांजली

इफ्फी 2025 मध्ये गुरुदत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुशाली, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी या दिग्गजांची जन्मशताब्दी साजरी केली जाणार असून त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृती दाखविल्या जाणार आहेत.

सलील चौधरी यांचा ‘मुसाफिर’ आणि ऋत्विक घटक यांचा ‘सुवर्णरेखा’ हा चित्रपट इफ्फी 2025 मध्ये दाखवला जाणार आहे. 

रजनीकांत यांच्या कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव

महोत्सवाच्या सांगता समारंभात 50 वर्षांच्या अद्भुत चित्रपट कारकिर्दीबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांचा सत्कार केला जाणार आहे.

इंडियन पॅनोरामा आणि  नवी क्षितीजे

इंडियन पॅनोरामा 2025 – 25 चित्रपट, 20 नॉन फीचर चित्रपट आणि नवोदितांचे 5 चित्रपट

प्रारंभाचा चित्रपट (इंडियन पॅनोरामा चित्रपट) – अमारन (तमिळ), दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी

प्रारंभाची नॉन फीचर फिल्म – काकोरी

नवी क्षितीजे – (जागतिक, आंतरराष्ट्रीय, आशियाई अथवा भारतीय प्रथम प्रदर्शन) विशेष निवडलेले जास्तीत जास्त पाच चित्रपट. इंडियन पॅनोरामा विभागामध्‍ये   ज्यांचा विचार केला गेला नाही, असे हे चित्रपट असतील.

महिला, नवोदित आवाज आणि उदयोन्मुख प्रतिभा

चित्रपटसृष्टीतील महिला: महिलांनी दिग्दर्शित केलेले 50 हून अधिक चित्रपट; नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या 50 हून जास्त कलाकृती, समावेशकता आणि उदयोन्मुख आवाजांवर महोत्सवाचा भर प्रतीत होतो (आंतरराष्ट्रीय विभाग)

भारतीय चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक: पाच निवडक नवोदित चित्रपट प्रदर्शित केले जातील; पुरस्कारात प्रमाणपत्र आणि दिग्दर्शकाला 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळेल.

सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) पुरस्कार: पाच अंतिम स्पर्धकांमधून (30 प्रवेशिकांमधून निवडलेले), विजेत्याला प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळते, जे निर्माते आणि दिग्दर्शकामध्ये विभागून दिले जाईल.

भावी सर्जक (CMOT)

भावी सर्जक विभागात यंदा 799 प्रवेशिका आल्या आहेत. निवडक सहभागींची संख्या 75 वरून 124 झाली आहे, ज्यामध्ये या वर्षी तीन नवीन कलाकृतींसह 13 चित्रपट निर्मिती कलाकृती समाविष्ट आहेत. या कार्यक्रमात शॉर्ट्सटीव्हीच्या सहकार्याने 48 तासांच्या  चित्रपट निर्मिती आव्हानाचा समावेश आहे.

वेव्हज फिल्म बाजार

वेव्हज फिल्म बाजार (19 वी आवृत्ती): पटकथालेखक लॅब, मार्केट स्क्रीनिंग, व्ह्यूइंग रूम लायब्ररी, सह-निर्मिती बाजार फीचर आणि डॉक्युमेंटरी यांचे 300 हून अधिक चित्रपट प्रकल्प निर्मिती, वितरण आणि विक्री सहकार्यासाठी सादर; दक्षिण आशियातील एक प्रमुख चित्रपट बाजारपेठ म्हणून बाजार वाढत आहे.

वेव्हज फिल्म बाजार सह-निर्मिती बाजार: 22 फीचर फिल्म आणि 5 माहितीपट दाखवले जातील. 3 विजेत्यांना एकूण 20,000 डॉलर्सचे रोख अनुदान दिले जाते (पहिले पारितोषिक : सह-निर्मिती मार्केट  फीचर - $10,000 दुसरे पारितोषिक : सह-निर्मिती मार्केट  फीचर - $5,000. सह-निर्मिती बाजार माहितीपट प्रकल्पासाठी विशेष रोख अनुदान - $5000).

या वर्षीच्या वेव्हज फिल्म बाजार शिफारशी (WFBR) विभागात 22 चित्रपट दाखवले जातील ज्यात 14 भाषा आणि 4 देशांचे प्रतिनिधित्व करणारे 3 लघुपट, 3 मध्यम लांबीचे माहितीपट आणि 16 काल्पनिक चित्रपट असतील, जे अनेक नवोदित दिग्दर्शकांना प्रकाशझोतात आणतील.

"नॉलेज सिरीज" मध्ये लोकप्रिय सत्रे, देश आणि राज्य प्रदर्शने आणि निर्मिती आणि वितरणावरील व्यावहारिक सत्रे समाविष्ट असतील.

WFB दालन आणि स्टॉल्स 7 हून अधिक देशांतील प्रतिनिधी मंडळांचे आयोजन करतील आणि 10 हून अधिक भारतीय राज्यांमधील प्रोत्साहने प्रदर्शित करतील. पाच आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असलेले एक समर्पित तंत्रज्ञान दालन प्रमुख उद्योग भागीदारांच्या सहकार्याने VFX, अॅनिमेशन, CGI आणि अन्य चित्रपट निर्मिती तंत्रज्ञानातील अत्याधुनिक नवोन्मेष प्रदर्शित करेल.

मार्केटप्लेस आणि सह-निर्मिती संधी: वेव्हज फिल्म बाजार नेटवर्किंग कार्यक्रम चित्रपट निर्माते, निर्माते, विक्री एजंट, महोत्सव प्रोग्रामर आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून सर्जनशील आणि आर्थिक सहकार्य वाढवेल.

मास्टरक्लासेस, पॅनेल आणि संवादात्मक कार्यक्रम

कला अकादमीमध्ये 10 स्वरूपात 21 मास्टरक्लासेस आणि पॅनेल चर्चा होणार आहेत, ज्यामध्ये विधू विनोद चोप्रा, अनुपम खेर, क्रिस्टोफर चार्ल्स कॉर्बोल्ड ओबीई, बॉबी देओल, आमिर खान, रवी वर्मन, कुशबू सुंदर, सुहासिनी मणिरत्नम, पीट ड्रेपर आणि श्रीकर प्रसाद यांच्यासह दिग्गज कलाकार सहभागी होतील. सत्रांमध्ये डिजिटल युगात संपादन आणि अभिनयापासून ते शाश्वतता, रंगभूमी अभिनय, एआय आणि व्हीएफएक्स तंत्रज्ञानापर्यंतचा समावेश असेल.

शांतता प्रस्थापित करण्यात सिनेमाची भूमिका आणि चित्रपट निर्मितीतील आव्हानांवर नवीन पॅनेल प्रकाश टाकतील. "इन कॉन्व्हर्सेशन" सत्रांमध्ये उद्योगांमधील प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते सहभागी होतील. तांत्रिक सत्रांमध्ये संपादन, छायांकन, व्हीएफएक्स आणि एसएफएक्स अधोरेखित केले जातील.

महोत्सवाची ठिकाणे आणि पोहोच

चित्रपट आणि कार्यक्रम पाच प्रमुख ठिकाणी आयोजित केले जातील: आयनॉक्स पणजी, मॅक्विनेझ पॅलेस, आयनॉक्स पोर्वोरिम, झेड-स्क्वेअर सम्राट अशोक आणि रवींद्र भवन, मडगाव. मिरामार बीच, रवींद्र भवन फातोर्डा आणि अंजुना बीच येथे खुल्या रंगमंचावर चित्रपट दाखवले जातील.

सर्व स्थळे  सुसज्ज आहेत - श्राव्य वर्णने, सांकेतिक भाषेचा अर्थ लावणे आणि बहुभाषिक डबिंग - या सुविधा आहेत जे महोत्सवाच्या समावेशक सहभागाच्या बांधिलकीशी सुसंगत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्युरी - 56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

· अध्यक्ष: राकेश ओमप्रकाश मेहरा (भारत)

· सदस्य:

o ग्रॅम क्लिफर्ड, संपादक आणि दिग्दर्शक (ऑस्ट्रेलिया)

o रेमी अदेफारासिन, सिनेमॅटोग्राफर (इंग्लंड)

o कॅथरीना शूटलर, अभिनेत्री (जर्मनी)

o चंद्रन रुटनम, चित्रपट निर्माते (श्रीलंका)

नोंद झालेले उल्लेखनीय चित्रपट श्रेणी आणि पुरस्कार विजेते

या महोत्सवात कान्स, बर्लिनले, लोकार्नो आणि व्हेनिस महोत्सवातल्या विजेत्या  चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि महोत्सवातील लोकप्रिय चित्रपट दाखवले जातील, जे उत्कृष्ट चित्रपटांसाठी जागतिक भेटीचे ठिकाण म्हणून इफ्फी भूमिका बळकट करतील. यामध्ये इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट (पाल्मे डी'ओर, कान्स), फादर मदर सिस्टर ब्रदर (गोल्डन लायन, व्हेनिस), ड्रीम्स (सेक्स लव्ह) (गोल्डन बेअर, बर्लिन), सिराट (ग्रँड ज्युरी प्राइज, कान्स), द मेसेज (सिल्व्हर बेअर, ज्युरी प्राइज, बर्लिन), नो अदर चॉइस (पीपल्स चॉइस अवॉर्ड, TIFF), ग्लोमिंग इन लुओमु (सर्वोत्तम चित्रपट, बुसान), फ्यूमे ओ मोर्टे! (टायगर अवॉर्ड, IFFR) यांचा समावेश आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)

1952 मध्ये स्थापन झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकारद्वारे आयोजित देशातील प्रमुख चित्रपट महोत्सव आहे. जागतिक स्तरावर भारतीय चित्रपट आणि प्रतिभेला प्रोत्साहन देताना जागतिक चित्रपटातील सर्वोत्तम चित्रपटांचा आनंद मिळावा हे  याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी गोव्यात आयोजित केला जाणारा इफ्फी सर्जनशील देवाणघेवाण, नवीन आवाजांचा शोध आणि सिनेमाच्या कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक समज वाढवण्यासाठी एक मंच म्हणून काम करतो.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. 1975 मध्ये स्थापना झालेले एनएफडीसी भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्यात, स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा देण्यात आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसह सह-निर्मिती सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते फिल्म बाजार (आता वेव्हज बाजार) देखील व्यवस्थापित करते, जे भारतीय निर्मात्यांना जागतिक बाजारपेठांशी जोडते, भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देते.

***

सुवर्णा बेडेकर/निलिमा चितळे/राजश्री आगाशे/सुरेखा जोशी/वासंती जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2187583) Visitor Counter : 23