पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा रायपूर येथे छत्तीसगड रौप्य महोत्सवी समारंभात केलेले भाषण

Posted On: 01 NOV 2025 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 नोव्हेंबर 2025

 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

माई दंतेश्वरी की जय!

मां महामाया की जय! 

मां बम्लेश्वरी की जय!

छत्तीसगढ़ महतारी की जय!

छत्तीसगडचे राज्यपाल आदरणीय रमेन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णु देव साय जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे ज्येष्ठ मित्र जुएल ओरांव जी, दुर्गा दास उइके जी, तोखन साहू जी, राज्‍य विधानसभेचे अध्यक्ष रमन सिंह जी, उपमुख्यमंत्री अरुण साहू जी, विजय शर्मा जी, उपस्थित मंत्रीवर्ग, लोकप्रतिनिधी आणि छत्तीसगडच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेल्या प्रिय बंधु भगिनींनो,

(छत्तीसगडच्या प्रादेशिक भाषेत उपस्थितांना अभिवादन करून शुभेच्छा देत संवाद साधतात ---)

छत्तीसगढ़ के जम्मो भाई-बहिनी, लइका, सियान, महतारी मन ल दूनो हाथ जोड़के जय जोहार!

आज छत्तीसगढ़ राज अपन गठन के 25 बछर पूरा करिस हे। ए मउका म जम्मो छत्तीसगढ़िया मन ल गाड़ा-गाड़ा बधई अउ सुभकामना।

बंधु भगिनींनो,

छत्तीसगडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी समारंभात छत्तीसगडी बंधुभगिनींसमवेत सहभागी होता येणं, हे माझ्यासाठी परमभाग्य आहे. आपणा सर्वांना माहीत आहेच, की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी, छत्तीसगड राज्याच्या सथापनेपूर्वीचा काळही बघितला आहे आणि गेल्या 25 वर्षातल्या प्रवासाचाही मी साक्षीदार आहे. त्यामुळेच, या गौरवशाली क्षणाचा एक भाग बनणं ही माझ्यासाठीही एक अद्भुत अनुभूति आहे.

मित्रहो‌, 

आपण 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. 25 वर्षांचा एक कालखंड पूर्ण झाला आहे आणि आज पुढच्या 25 वर्षांच्या नव्या युगाचा सूर्योदय होत आहे. आपण सर्वजण माझं एक काम कराल ? सगळ्यांनी सांगा, माझं एक काम कराल? कराल? आपला मोबाइल फोन बाहेर काढा, मोबाइल फोनचा फ्लॅश लाइट चालू करा, आणि हा घ्या - पुढच्या 25 वर्षांसाठी सूर्योदयाचा आरंभ झाला आहे. प्रत्येक हातात जो मोबाइल आहे, त्याचा फ्लॅश लाइट चालू करा. बघा, मला चहूकडे दिसतंय, तुमच्या तळहातावर नवीन स्वप्नांचा सूर्य उगवला आहे. नव्या युगाच्या संकल्पांची आभा तुमच्या तळहातावर फाकली आहे. तुमच्या पुरुषार्थाशी जोडलेल्या याच प्रकाशामुळे तुमची भाग्यरेखा आखली जाणार आहे.

मित्रहो, 

25 वर्षांपूर्वी अटलजींच्या सरकारने तुमच्या स्वप्नातला छत्तीसगड तुमच्या हाती सोपवला. शिवाय, छत्तीसगड विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा संकल्पही सोडला. आज आता मी गेल्या 25 वर्षांच्या प्रवासाकडे बघतो, तेव्हा अभिमानाने मस्तक उंचावतं. छत्तीसगडच्या तुम्हा सर्व बंधुभगिनींनी मिळून अनेक बाबतींत यश संपादन केलं आहे. 25 वर्षांपूर्वी जे बीज पेरलं गेलं त्याचाच आज विकासाचाच वटवृक्ष झाला आहे. छत्तीसगड आज विकासाच्या मार्गावर जलदगतीने पुढे जात आहे. आजदेखील, छत्तीसगडला लोकशाहीचं नवं मंदिर, नवं विधानसभा भवन प्राप्त झालं आहे. इथे येण्यापूर्वी मला आदिवासी संग्रहालयाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली. या मंचावरूनही जवळपास 14 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा/ विकासकामांचा शिलान्यास आणि लोकार्पण झालं आहे. या सर्व विकासकामांच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वाना खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रहो, 

सन 2000 नंतर इथं एक अख्खी पिढी बदलली आहे. आज इथे नवतरुणांची संपूर्ण पिढी आहे, जिने 2000 पूर्वीचे ते जुने दिवस पाहिलेच नाहीत. जेव्हा छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली, तेव्हा गावा-गावांपर्यंत पोहोचणं कठीण होतं. त्या काळी कित्येक गावांमध्ये नावापुरतेही रस्ते नव्हते. आता आज छत्तीसगडच्या गावांमध्ये रस्त्यांचं जाळं 40 हजार किलोमीटर पर्यंत विणलं गेलं आहे. गेल्या अकरा वर्षांत छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय महामार्गांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. नव-नवे एक्सप्रेस वे (द्रुतगती महामार्ग) आता छत्तीसगडच्या दिमाखात नवी भर घालत आहेत. पूर्वी रायपूरहून बिलासपूरपर्यंत पोहोचायला कित्येक तास लागत असत, आता तोही वेळ कमी होऊन निम्म्यावर आला आहे. आजही इथे एका नव्या 4 लेन हायवे चा शिलान्यास करण्यात आला. या महामार्गामुळे छत्तीसगड ते झारखंड कनेक्टिव्हीटी वाढून दळणवळण आणखी सुधारेल.

मित्रहो, 

छत्तीसगडच्या रेल्वे आणि हवाई कनेक्टिविटीसाठीही व्यापक काम झालं आहे. आज छत्तीसगडमध्ये वंदे भारतसारख्या जलदगती गाड्या धावतात. रायपूर, बिलासपूर आणि जगदलपूरसारखी शहरं आता थेट विमानवाहतुकीने जोडलेली आहेत. एके काळी केवळ कच्च्या मालाची निर्यात इतकीच छत्तीसगडची ओळख होती. आज छत्तीसगड एक औद्योगिक राज्य म्हणूनही नव्या भूमिकेनिशी नावारूपाला येत आहे.

मित्रहो,

गेल्या 25 वर्षांत छत्तीसगडने जे यश मिळवलं आहे, त्यासाठी प्रत्येक मुख्‍यमंत्र्यांचं, प्रत्येक सरकारचं अभिनंदन ! परंतु याचं मोठं श्रेय आदरणीय डॉक्टर रमन सिंह जी यांचं आहे. राज्यासमोर अनेक आह्वानं उभी असतानाच्या काळात त्यांनी छत्तीसगडचं नेतृत्व केलं. आज ते विधानसभा अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करत आहेत, आणि विष्‍णु देव सायजींचं सरकार छत्तीसगडच्या विकासाला वेगाने पुढे घेऊन जात आहे याचा मला आनंद वाटतो.

मित्रांनो,

आपण सगळे मला छान ओळखताच. आजही जीपमधून बाहेर पडताना कितीतरी जुने-जाणते चेहरे मी बघत होतो, माझ्या मनाला खूप समाधान वाटत होतं. मी कधी गेलो नसेन असा क्वचितच एखादा भाग असेल. आणि त्यामुळे तुम्ही सगळे मला अगदी व्यवस्थित ओळखता. 

मित्रांनो,

मी गरीबी अगदी जवळून बघितली आहे, अनुभवली आहे. गरिबाला कशाची काळजी असते, गरीब मनुष्य कशाबाबत असहाय असतो, ते मला ठाऊक आहे. म्हणूनच मला जेव्हा देशाने सेवेची संधी दिली तेव्हा मी गरीब कल्याणावर भर दिला. गरिबांसाठी औषधं, गरिबांसाठी उत्पन्न, गरिबांसाठी शिक्षण आणि गरिबांसाठी सिंचनसुविधा यांवर आमच्या सरकारने खूप लक्ष एकवटलं आहे. मी आपल्याला एक उदाहरणच देतो ना...  

मित्रांनो,

25 वर्षांपूर्वी आपल्या छत्तीसगडमध्ये केवळ एक मेडिकल कॉलेज होतं. आज छत्तीसगडमध्ये 14 मेडिकल कॉलेज आहेत, आपल्या रायपूरमध्ये एम्स आहे, मला आठवतंय, देशात आयुष्मान आरोग्य मंदिर उभारण्याचं अभियानही छत्तीसगडपासूनच सुरु झालं होतं. आज छत्तीसगडमध्ये जवळपास साडेपाच हजाराहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरं आहेत.

मित्रांनो,

गरिबांना प्रतिष्ठेचं, सन्मानाचं जिणं मिळावं, असा आमचा प्रयत्न आहे. झोपड्यांमध्ये, कच्च्या घरांमध्ये आयुष्य कंठण्याने गरीब माणसाला आणखी नैराश्य येतं, हताश वाटतं. त्यामुळे माणूस दारिद्र्याशी दोन हात करण्याची उमेद हरवून बसतो. म्हणूनच आमच्या सरकारने प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्या 11 वर्षांत 4 कोटी गरिबांना पक्की घरं दिली गेली आहेत. आता आम्ही आणखी तीन कोटी नवी घरं बांधण्याचा संकल्प सोडून वाटचाल करत आहोत. आजघडीलाही, छत्तीसगडमध्ये एकावेळी साडेतीन लाखाहून अधिक, साडेतीन लाखाहून अधिक कुटुंबं आपल्या नव्या घरात गृह-प्रवेश करत आहेत. जवळपास तीन लाख कुटुंबांना 1200 कोटी रुपयांचा हप्ताही देण्यात आला आहे.

मित्रहो,

छत्तीसगडचं भाजपा सरकार, गरिबांना घरं देण्याबाबत किती गांभीर्यानं काम करत आहे, हेच यावरून दिसून येतं. गेल्या एक वर्षभरातच गरिबांची सात लाख पक्की घरं आपल्या या छत्तीसगडमध्ये उभारली गेली आहेत. आणि हा केवळ एक आकडा नाही, तर प्रत्येक घरात एका कुटुंबाचं स्वप्न उभं राहतंय, एका कुटुंबाचं अपार सुख त्यात सामावलंय. सगळ्या लाभार्थी कुटुंबांचं अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा !

मित्रहो,

छत्तीसगडच्या जनतेचे जीवन सुखकर व्हावे, तुमच्या जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी आमचे सरकार सातत्याने काम करत आहे. आज छत्तीसगडच्या प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. जिथे वीज नव्हती, तिथे आज काळ बदलला आहे, या ठिकाणी आज इंटरनेट देखील पोहोचले आहे. एकेकाळी, सामान्य कुटुंबांसाठी गॅस सिलिंडर किंवा एलपीजी कनेक्शन हे एक स्वप्न होते. एखाद्या घरी जेव्हा गॅस सिलिंडर येत असे, तेव्हा लोक दुरूनच पाहत असत आणि विचार करत असत की हे एखाद्या श्रीमंत माणसाचे घर असेल. त्याच्या घरी येत आहे, माझ्या घरी ते कधी येईल? माझ्यासाठी, माझे प्रत्येक कुटुंब गरिबीशी झुंजणारे कुटुंब आहे आणि म्हणूनच मी त्यांच्या घरी उज्ज्वला गॅस सिलिंडर पोहोचवला. आज छत्तीसगडच्या गावांमध्ये, गरीब, दलित, मागास, आदिवासी कुटुंबांपर्यंत देखील गॅसची जोडणी पोहोचली आहे. आता, सिलिंडर बरोबरच, पाईपद्वारे स्वस्त गॅस देण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्याप्रमाणे पाईपद्वारे पाणी स्वयंपाकघरात येते, त्याचप्रमाणे पाईपद्वारे स्वस्त गॅस देण्याचा आमचा संकल्प आहे. आज नागपूर-झारसुगुडा गॅस पाईपलाईन राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठीही मी छत्तीसगडच्या जनतेचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

छत्तीसगडमध्ये देशातील मोठी आदिवासी लोकसंख्या आहे. हा तो आदिवासी समाज आहे, ज्याचा गौरवशाली इतिहास आहे. ज्याने भारताच्या वारसा आणि विकासात मोठे योगदान दिले आहे. आदिवासी समाजाचे हे योगदान संपूर्ण देश आणि संपूर्ण जगात पोहचावे यासाठी आम्ही निरंतर काम करत आहोत. देशभरातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा संग्रह तयार करणे असो, एखादे संग्रहालय उभारणे असो, की भगवान बिरसा मुंडा यांचा जयंती दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित करणे असो, आदिवासी समाजाच्या योगदानाचा नेहमीच गौरव व्हावा हा आमचा प्रयत्न आहे.

मित्रहो,

आज आम्ही या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. आज देशाला शहीद वीर नारायण सिंह आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय मिळाले आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व दीडशे वर्षांहून अधिक काळातला आदिवासी समाजाने केलेल्या संघर्षाचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला आहे. आपल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला, त्यातील प्रत्येक तपशील येथे दिसून येतो. मला विश्वास आहे की हे संग्रहालय येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

मित्रहो,

एकीकडे आमचे सरकार आदिवासी वारशाचे जतन करत आहे, तर दुसरीकडे आदिवासींचा विकास आणि कल्याणावरही भर देत आहे. धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान देशातील हजारो आदिवासी गावांमध्ये विकासाचा नवा प्रकाश पोहोचवत आहे. अंदाजे ऐंशी हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे, ऐंशी हजार कोटी रुपये! स्वतंत्र भारतात आदिवासी भागात या प्रमाणात काम कधीच झाले नाही. त्याचप्रमाणे, सर्वात मागास जमातींच्या विकासासाठी प्रथमच राष्ट्रीय योजना तयार करण्यात आली आहे. पीएम-जनमान योजनेंतर्गत मागास जमातींच्या हजारो वस्त्यांमध्ये विकास कामे केली जात आहेत.

मित्रहो,

आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या वनोपज गोळा करत आला आहे. आमच्या सरकारने वन धन केंद्रांच्या रूपात वनोपजांपासून अधिक उत्पन्न मिळवण्याच्या संधी निर्माण केल्या आहेत. तेंदूपत्ता खरेदीची चांगली व्यवस्था करण्यात आली, आज छत्तीसगडमधील तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत.

मित्रहो,

मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की आज आपला छत्तीसगड नक्षलवाद-माओवादी दहशतवादाच्या बेड्यांमधून मुक्त होत आहे. नक्षलवादामुळे तुम्ही 50-55 वर्षे जे भोगले ते वेदनादायी आहे. आज, जे लोक संविधानाचा देखावा करत आहेत, सामाजिक न्यायाच्या नावाखाली मगरीचे अश्रू ढाळत आहेत, त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या अनेक दशकांपासून तुमच्यावर अन्याय केला आहे.

मित्रहो,

माओवाद्यांच्या दहशतीमुळे, छत्तीसगडमधील आदिवासी भागांमध्ये बराच काळ रस्त्यांची सोय नव्हती. मुलांना शाळा मिळत नव्हत्या, आजारी लोकांना रुग्णालये मिळत नव्हती, आणि जी होती, ती बॉम्बने उडवली जात होती. डॉक्टर आणि शिक्षक मारले गेले आणि ज्यांनी अनेक दशके देशावर राज्य केले, त्यांनी तुम्हा लोकांना वाऱ्यावर सोडले आणि स्वतः वातानुकूलित खोल्यांमध्ये जीवनाचा आनंद घेत राहिले.

मित्रहो,

मोदी आपल्या आदिवासी बंधूभगिनींना या हिंसाचाराच्या खेळात उध्वस्त होण्यासाठी सोडू शकत नव्हते. मी लाखो माता आणि भगिनींना त्यांच्या मुलांसाठी रडताना सोडू शकत नव्हतो. म्हणूनच, 2014 मध्ये, जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिलीत, तेव्हा आम्ही भारताला माओवाद्यांच्या दहशतवादापासून मुक्त करण्याचा संकल्प केला. आणि आज देश त्याचे परिणाम पाहत आहे. 11 वर्षांपूर्वी देशातील 125 जिल्हे माओवाद्यांच्या दहशतवादाच्या विळख्यात होते आणि आता 125 जिल्ह्यांपैकी केवळ 3 जिल्हे उरले आहेत, जिथे माओवादी दहशतवाद अजूनही आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मी देशवासीयांना ही हमी देतो की तो दिवस दूर नाही जेव्हा आपले छत्तीसगड, आपला भारत, या भारताचा प्रत्येक कानाकोपरा माओवाद्यांच्या दहशतीपासून पूर्णपणे मुक्त होईल.

मित्रहो,

छत्तीसगडमधील जे सहकारी हिंसाचाराकडे वळले होते ते आता वेगाने शस्त्रे टाकत आहेत. काही दिवसांपूर्वी, कांकेरमधील वीस पेक्षा जास्त नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतले. यापूर्वी 17 ऑक्टोबरला बस्तरमध्ये 200 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. गेल्या काही महिन्यांत देशभरात माओवाद्यांच्या दहशतीशी संबंधित अनेक लोकांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांवर लाखो आणि करोडो रुपयांचे बक्षीस होते. आता त्यांनी बंदुका आणि शस्त्रे सोडून दिली आहेत आणि देशाचे संविधान स्वीकारले आहे.

मित्रहो,

माओवाद्यांच्या दहशतवादाचे उच्चाटन केल्यामुळे अशक्य ते शक्य झाले आहे. जिथे एकेकाळी बॉम्ब आणि बंदुकीची भीती होती, तिथे आता परिस्थिती बदलली आहे. विजापूरच्या चिलकापल्ली गावाला सात दशकांनंतर प्रथमच वीज मिळाली आहे. अबूझमदच्या रिकावाया गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच शाळा बांधण्याचे काम सुरू झाले आहे. आणि एकेकाळी दहशतवादाचा बालेकिल्ला असलेल्या पूर्ववर्ती गावात आज विकासाची लाट पसरली आहे. आता लाल झेंड्याऐवजी आपला तिरंगा ध्वज दिमाखात फडकत आहे. आज बस्तरसारख्या भागात भीती नाही, तर उत्सवाचे वातावरण आहे. बस्तर पांडम आणि बस्तर ऑलिम्पिक सारखे कार्यक्रम तिथे आयोजित केले जात आहेत.

मित्रहो,

तुम्ही कल्पना करू शकता की गेल्या 25 वर्षात जर आपण नक्षलवादासारख्या आव्हानाला तोंड देत इथपर्यंत पोहोचलो आहोत, तर हे आव्हान संपल्यानंतर आपला वेग किती वाढेल.

मित्रहो,

येणारी वर्षे छत्तीसगडसाठी खूप महत्त्वाची आहेत. आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे, त्यासाठी छत्तीसगडचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. मी छत्तीसगडच्या तरुणांना सांगू इच्छितो की, हीच वेळ आहे, हीच वेळ तुमची आहे. असे कोणतेही ध्येय नाही जे तुम्ही साध्य करू शकत नाही. मी तुम्हाला खात्री देतो, ही मोदींची हमी आहे, तुमचे प्रत्येक पाउल, प्रत्येक संकल्पामध्ये मोदी तुमच्या बरोबर आहेत. आपण सर्वजण एकत्र येऊन छत्तीसगडला पुढे नेऊ, देशाला पुढे नेऊ. या विश्वासाने, मी पुन्हा एकदा छत्तीसगडच्या प्रत्येक बंधू आणि भगिनीला  शुभेच्छा देतो. धन्यवाद, माझ्याबरोबर मोठ्याने म्हणा, दोन्ही हात वर करून बोला, भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! धन्यवाद!

 

* * *

सुषमा काणे/जाई वैशंपायन/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2186910) Visitor Counter : 15