पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगढमधील नवा रायपूर येथील ‘शांती शिखर’ या ध्यान केंद्राचे उद्‌घाटन, ब्रह्मकुमारींनाही केले संबोधित


राज्यांचा विकास राष्ट्राच्या प्रगतीला चालना देतो, या मार्गदर्शक तत्त्वानेच प्रेरित होऊन आपण विकसित भारताच्या निर्मितीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करत आहोत: पंतप्रधान

विश्व शांतीची संकल्पना हा भारताच्या मूलभूत तत्त्वांचा अविभाज्य भाग : पंतप्रधान

आपणच प्रत्येक सजीवात देवत्व पाहतो, आपणच स्वतःत अनंतत्व अनुभवतो, इथल्या प्रत्येक धार्मिक विधीचे समापन जगाच्या कल्याणासाठीचे आवाहन, सर्व सजीवांच्या कल्याणासाठीचे आवाहन अशा गंभीर आवाहनाने होते : पंतप्रधान

जगात कुठेही संकट किंवा आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर भारत एक विश्वासार्ह भागीदार आणि प्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून मदतीसाठी पुढे येतो : पंतप्रधान

Posted On: 01 NOV 2025 12:40PM by PIB Mumbai

 

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज छत्तीसगढमधील नवा रायपूर येथे आध्यात्मिक शिक्षण, शांतता आणि ध्यानधारणेसाठीच्या शांती शिखरया आधुनिक केंद्राचे उद्‌घाटन झाले. यावेळी त्यांनी ब्रह्मकुमारींना संबोधितही केले. छत्तीसगढच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली असल्याने आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केले. आज देशभरातील अनेक राज्ये आपला राज्य स्थापना दिवस साजरा करत असल्याचे सांगून, छत्तीसगढसोबतच, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांच्या स्थापनेलाही 25 वर्षे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्व राज्यांच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. राज्यांचा विकास राष्ट्राच्या प्रगतीला चालना देतो, या मार्गदर्शक तत्त्वानेच प्रेरित होऊन आपण विकसित भारताच्या निर्मितीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटचालीत ब्रह्मकुमारींसारख्या संस्थांनी बजावलेल्या महत्त्वाची भूमिकेचाही त्यांनी दखलपूर्ण उल्लेख केला. गेल्या अनेक दशकांपासून ब्रह्मकुमारी सारख्या संस्थेसोबत आपण जोडलेलो आहोत, हे आपले सौभाग्य आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या आध्यात्मिक चळवळीला वटवृक्षाप्रमाणे वाढताना आपण पाहिले आहे, असे त्यांनी सांगितले. 2011 साली अहमदाबाद येथे झालेल्या फ्युचर ऑफ पॉवर या कार्यक्रमाचे, तसेच 2012 मध्ये या संस्थेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे आणि 2013 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या कार्यक्रमाचे स्मरणही पंतप्रधानांनी यानिमित्ताने केले. आपण दिल्लीला आल्यानंतरही, आझादी का अमृत महोत्सवशी संबंधित अभियान असो, स्वच्छ भारत अभियान असो, किंवा जल जन अभियानात सहभागी होण्याची संधी असो, या संस्थेसोबत सातत्याने संवाद साधला आहे, आणि त्या प्रत्येक वेळी संस्थेच्या प्रयत्नांमधले गांभीर्य आणि त्यांचा समर्पणभाव अनुभवला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

वैयक्तिक पातळीवर ​ब्रह्मकुमारी संस्थेसोबत आपले गहीरे नाते असल्याचे त्यांनी सांगितले. दादी जानकी यांचा लाभलेला स्नेह आणि राजयोगिनी दादी हृदय मोहिनी यांचे लाभलेले मार्गदर्शन म्हणजे आपल्या जीवनातील अमोल आठवणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. Shanti Shikhar – Academy for a Peaceful World या संकल्पनेतून त्यांचे विचार वास्तवात उतरले असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात ही संस्था जागतिक शांततेच्या दिशेने केल्या जाणाऱ्या अर्थपूर्ण प्रयत्नांचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  या उपक्रमासाठी त्यांनी उपस्थितांना तसेच ब्रह्मकुमारी संस्थेच्या देश-विदेशातील सदस्यांना शुभेच्छाही दिल्या.

यावेळी पंतप्रधानांनी ​एका पारंपरिक वचनाचा दाखलाही दिला. आचरण हाच सर्वोच्च धर्म, तप आणि ज्ञान आहे, आणि सदाचार असला की असाध्य असे काहीही उरत नाही असे ते म्हणाले. शब्दांचे कृतीत रूपांतर झाले तरच खरे परिवर्तन घडून येते आणि हाच ब्रह्मकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा स्त्रोत आहे, असे त्यांनी सांगितले. ब्रह्मकुमारीतील प्रत्येक भगिनी कठोर तप आणि आध्यात्मिक शिस्तीतून जाते, असे त्यांनी नमूद केले. या संस्थेचे अस्तित्व हे, जग आणि विश्वातील शांतीच्या प्रार्थनेशी जोडलेले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ओम शांती हे ब्रह्मकुमारींचे पहिले आवाहन असून, ओम हे ब्रह्म आणि संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे, तर शांती हे शांततेच्या आकांक्षेचे प्रतीक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. म्हणूनच ब्रह्मकुमारींच्या विचारांचा प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनावर गहीरा प्रभाव पडतो, असे त्यांनी नमूद केले.

​जागतिक शांतता ही संकल्पना भारताच्या मूलभूत विचारपद्धतीचा व आध्यात्मिक विचारसरणीचा अविभाज्य भाग आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतासारख्या देशात प्रत्येक जीवात देवत्वाचा अंश असल्याचे मानले जाते आणि स्वतःमधल्या अनंतत्वाची जाणीव ठेवली जाते, असे त्यांनी नमूद केले. भारतातल्या प्रत्येक धार्मिक रितीरिवाजाचा शेवट जगाच्या कल्याणाच्या आणि विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांच्या सुखासाठीच्या प्रार्थनेने होतो, असे त्यांनी अधोरेखित केले. अशी उदार विचारसरणी, श्रद्धा आणि जगाच्या कल्याणाची कामना हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे असे त्यांनी विश्वासपूर्वक सांगितले. भारताची आध्यात्मिकता केवळ शांततेचे धडे देत नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शांततेचा मार्ग दाखवते असे ते म्हणाले. आत्मसंयमातून आत्मज्ञान होते, आत्मज्ञानातून स्वतःबाबतची जाणीव होते आणि स्व ची जाणीव झाल्याने अंतर्भूत शांतीचा मार्ग सापडतो असे त्यांनी विशद केले. या मार्गाने शांती शिखर अकादमीतील साधक जागतिक शांततेचे प्रणेते बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक शांततेच्या या अभियानात नव्या कल्पनांइतकेच व्यावहारिक धोरण आणि प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे अधोरेखित करुन मोदी म्हणाले की जागतिक शांततेसाठी भारत गांभीर्याने प्रयत्न करत आहे. जगात कुठेही एखादे संकट अथवा नैसर्गिक आपत्ती आली तर विश्वासार्ह भागीदार म्हणून मदतीसाठी भारत पुढे असतो, मदतीच्या आवाहनाला सर्वप्रथम प्रतिसाद देतो,” असे पंतप्रधान म्हणाले. सध्याच्या पर्यावरणीय आव्हानांच्या काळात जगभरातल्या निसर्ग संवर्धनासाठी सर्वप्रथम भारताने पुढाकार घेतला. निसर्गाने जे आपल्याला दिले आहे, त्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वावर भर देताना; निसर्गाशी सलोखा साधत जगण्याची कला आपण शिकू तेव्हाच हे शक्य होईल असे मोदी म्हणाले. आपले धर्मग्रंथ आणि विश्वनिर्मात्याने आपल्याला हीच शिकवण दिली आहे. आपण नदीला माता मानतो, पाण्याची पूजा करतो आणि झाडांमध्ये देव पाहतो असे त्यांनी नमूद केले. ही भावना आपल्याला निसर्ग आणि नैसर्गिक स्रोतांचा केवळ उपभोग न घेता आपणही निसर्गाचे देणे लागतो याची जाणीव करुन देते. जीवन जगण्याची ही शैली जगाला सुरक्षित भविष्याचा खात्रीशीर मार्ग दाखवू शकते असे मोदी यांनी सांगितले. 

भारताला भविष्यातील जबाबदाऱ्यांची जाणीव आहे आणि त्या आपण पूर्ण करतही आहोत असे त्यांनी अधोरेखित केले. एक सूर्य, एक धरती, एक ग्रिडयासारखे उपक्रम आणि एक विश्व, एक कुटुंब, एक भविष्यया भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करत; याला जगातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. भूराजकीय मर्यादा ओलांडत संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी भारताने मिशन लाइफसुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

सातत्याने सक्षम समाज घडवण्यात ब्रम्हकुमारीसारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून, शांती शिखरसारख्या संस्था भारताच्या प्रयत्नांना नवी उर्जा प्राप्त करुन देतील, या संस्थेकडून मिळणारी ही उर्जा लाखो देशवासियांना तसेच जगभरातल्या लोकांना जागतिक शांततेच्या संकल्पनेशी जोडून घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शांती शिखर शांततामय जगासाठी अकादमीया संस्थेच्या स्थापनेबद्दल आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले.

छत्तीसगडचे राज्यपाल रमण डेका, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/ सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185202) Visitor Counter : 9