गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय एकता दिवस - 2025 निमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या सोहळ्यासंदर्भात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बिहारमधील पाटणा येथे घेतली पत्रकार परिषद


पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबर रोजी एकता नगर येथे होणाऱ्या भव्य संचलनाची सलामी स्वीकारतील

या राष्ट्रीय संचलनात सीएपीएफ, अनेक राज्यांची पोलिस दले आणि 900 हून अधिक कलाकार त्यांचे कौशल्य, शिस्त, शौर्य आणि वारसा प्रदर्शित करतील

Posted On: 30 OCT 2025 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राष्ट्रीय एकता दिवस -2025 निमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या सोहळ्यासंदर्भात बिहारमधील पाटणा येथे पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाला एकत्र आणण्यात, आजच्या भारताची उभारणी करण्यात आणि एकसंध देश निर्माण करण्यात सरदार पटेल यांनी मोलाचे  योगदान दिले. ते म्हणाले की, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी केवडिया येथे येत आहेत, जिथे सरदार पटेल यांच्या भव्य पुतळ्यासमोर भव्य संचलन आयोजित केले जाते. ते पुढे म्हणाले की, यावर्षी सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि गृह मंत्रालयाने दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी भव्य संचलन आयोजित करण्याचा  निर्णय घेतला आहे.

अमित शाह म्हणाले की, देशाची एकता आणि अखंडता पुन्हा दृढ करण्यासाठी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि राज्यांच्या पोलिस दलांचा सन्मान करण्यासाठी हे संचलन  आयोजित केले आहे. भारताची एकता आणि अखंडतेचे प्रतीक असलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्यासमोर हे संचलन होईल.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी माहिती दिली की, यावर्षी रन फॉर युनिटी -एकता दौड अधिक भव्य प्रमाणात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दौड देशभरातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा पोलिस ठाणे , शाळा आणि विद्यापीठांमध्ये आयोजित केली जात आहे. ते पुढे म्हणाले की, या दौडनंतर प्रत्येक नागरिक देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी एकतेची प्रतिज्ञा घेईल. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त,  1 नोव्हेंबरपासून एकता नगर येथे भारत पर्व आयोजित करण्यात आले असून  15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी त्याची सांगता होईल असे त्यांनी सांगितले. 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी संस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या भव्य सादरीकरणाने भारत पर्वची सांगता होईल असे ते म्हणाले.  या कार्यक्रमात देशभरातील जमातींच्या सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ , पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अद्भुत मिश्रण पहायला मिळेल.

सरदार पटेल हे केवळ एक व्यक्तीमत्त्व नाहीत तर आपल्या राष्ट्रासाठी एक विचारधारा आहेत, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले. सरदार पटेल हे देशासाठी पूर्णपणे समर्पित होते, त्यांनी केवळ स्वातंत्र्यसंग्रामात आघाडीची भूमिका बजावली नाही तर महात्मा गांधींसोबत काम करत असताना ते स्वातंत्र्य चळवळीचा संघटनात्मक कणा देखील बनले, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या शोषणाला विरोध करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध 1928 चा बारडोली सत्याग्रह सुरू करण्यात आला होता आणि या चळवळीदरम्यानच महात्मा गांधींनी त्यांना "सरदार" ही पदवी बहाल केली, असे अमित शाह यांनी सांगितले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, ब्रिटिशांनी 562 संस्थानांमध्ये देशाला विभाजित करून देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्या काळी संपूर्ण जगाला वाटले की या 562 संस्थानांना एकाच राष्ट्रात समाविष्ट करणे अशक्य आहे. परंतु, सरदार पटेल यांनी अल्पावधीतच सर्व 562 संस्थानांच्या विलीनीकरणाचे मोठे काम पूर्ण केले आणि आज आपण पाहत असलेला आधुनिक भारताचा नकाशा तयार केला. हा अखंड भारताचा नकाशा सरदार पटेल यांची दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांचे फलित आहे, असे शाह यांनी नमूद केले.

सरदार पटेल यांच्या निधनानंतर विरोधकांनी त्यांचा वारसा पुसून टाकण्यात कोणतीही कसर सोडली नाही हे दुर्दैवी आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले. सरदार पटेल यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला 41 वर्षांच्या विलंबानंतर भारतरत्न प्रदान करण्यात आले आणि हा विलंब केवळ विरोधकांमध्ये सरदार पटेलांबद्दल असलेल्या आदराच्या अभावामुळे झाला, असे त्यांनी सांगितले. सरदार पटेल यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे देशात कुठेही स्मारक किंवा स्मृतीस्थळ बांधले गेले नाही. पण जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हाच त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटीची’ संकल्पना मांडली आणि सरदार पटेल यांच्या सन्मानार्थ एक भव्य स्मारक बांधले, हे अमित शाह यांनी अधोरेखित केले. 31 ऑक्टोबर 2013 रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकाची पायाभरणी करण्यात आली. 182 मीटर उंचीचा हा पुतळा केवळ 57 महिन्यांत पूर्ण झाला, असे ते म्हणाले. सरदार पटेल यांचे संपूर्ण जीवन शेतकऱ्यांसाठी समर्पित होते आणि या पुतळ्याच्या निर्मितीसाठी वापरलेले लोखंड देशभरातील शेतकऱ्यांच्या अवजारांमधून गोळा करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. ही अवजारे गोळा करून आणि वितळवून त्यातून पुतळ्याच्या बांधकामात वापरण्यासाठी सुमारे 25,000 टन लोखंड तयार करण्यात आले, असेही ते म्हणाले. 90,000 घनमीटर काँक्रीट आणि 1,700 टनांहून अधिक कांस्य वापरुन हे अविस्मरणीय स्मारक तयार करण्यात आले. हे स्मारक आता सरदार पटेल यांना अभिवादन करण्याचे एक प्रतीकात्मक स्थळ बनले आहे, असे त्यांनी सांगितले. दररोज सुमारे 15,000 पर्यटक या स्थळाला भेट देतात आणि आतापर्यंत भारत आणि परदेशातून सुमारे 2.5 कोटींहून अधिक पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतीय अभियांत्रिकीचा एक अद्वितीय चमत्कार म्हणून उदयास आला आहे, असे गौरव उद्गार त्यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाच्या परिसरात 14 अतिरिक्त पर्यटन स्थळे विकसित करण्यात आली आहेत, ज्यामुळे हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे, असेही ते म्हणाले. या आकर्षणांमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, एकता नगर टाउनशिप, लेक सर्किट, लाईट अँड साउंड शो, पटेल गार्डन, एकता क्रूझ, बटरफ्लाय गार्डन, जंगल सफारी, एकता मॉल आणि ग्लो टॉर्च व्ह्यूपॉइंट यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

31 ऑक्टोबर रोजी सकाळी एकता नगर येथून सुरू होणाऱ्या भव्य संचलनात सहभागी दलांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलामी दिली जाईल,असे अमित शाह म्हणाले.त्यांनी पुढे सांगितले, की या राष्ट्रीय संचलनादरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आणि विविध राज्यांतील पोलिस दल त्यांचे कौशल्य, शिस्त आणि शौर्य यांचे प्रदर्शन करतील. या वर्षीच्या संचलनामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) पाच शौर्य चक्र विजेते आणि सीमा सुरक्षा बलाचे (BSF) सोळा शौर्य पदक विजेते देखील सहभागी होतील;असे शाह यांनी अधोरेखित केले. संचलनाचे नेतृत्व महिला पोलिस अधिकारी करतील तसेच यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. राज्य पोलिस दल आणि सीएपीएफमधील कर्मचारी देखील त्यांच्या सांस्कृतिक प्रतिभेचे प्रदर्शन करतील,असे त्यांनी सांगितले. बीएसएफचे उंटावरून जाणारे दल आणि उंटावरून वाजतगाजत जाणारा बँड या  संचलनाची  नेत्रदीपकता वाढवेल, तर गुजरात घोडदळ दल, आसाम पोलिसांचा मोटारसायकल डेअरडेव्हिल शो आणि पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर पोलिस देखील या संचलनामध्ये सहभागी होतील.

याशिवाय, एनएसजी, एनडीआरएफ, अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोलिस दल, पुद्दुचेरी पोलिस आणि जम्मू आणि काश्मीर पोलिस दल  या कार्यक्रमादरम्यान आपापले चित्ररथ सादर करतील. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण पथकाचा एक नेत्रदीपक हवाई शो हे संचलनाचे प्रमुख आकर्षण असेल. देशभरातील 900 हून अधिक कलाकार भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा देश आणि जगासमोर सादर करतील असे  शाह म्हणाले."एक भारत, श्रेष्ठ भारत" या भावनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देणारे हे संचलन खऱ्या अर्थाने भारताच्या एकतेचे संचलन असेल,असे सांगत  त्यांनी विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनंतर, 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाप्रमाणेच दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी हे संचलन आयोजित केले जाईल. त्यांनी सांगितले की, हे संचलन सरदार पटेल यांच्या तत्वांबद्दल आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल देशातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना अवगत करण्यासाठी एक समर्पित माध्यम म्हणून काम करेल. या संचलनाद्वारे आपण सर्वांनी एकत्रपणे देशात पुन्हा एकदा एकता आणि अखंडतेचे मजबूत वातावरण निर्माण करण्यासाठी काम केले पाहिजे,असे आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केले.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184222) Visitor Counter : 18