पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित स्टार्ट-अप महाकुंभातील पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर
Posted On:
20 MAR 2024 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2024
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पियुष गोयल जी, अनुप्रिया पटेल जी आणि सोम प्रकाश जी, आदरणीय मान्यवर आणि देशभरातील स्टार्ट-अप परिसंस्थेतील आमचे सर्व मित्र! स्टार्ट-अप महाकुंभासाठी मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.
बरेच लोक स्टार्ट-अप सुरू करतात आणि राजकारणात याचे प्रमाण जरा जास्त असते आणि ते पुन्हा पुन्हा सुरू करावे लागतात. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक हा आहे की तुम्ही सृजनशील आहात; जर एक सुरुवात यशस्वी झाली नाही, तर तुम्ही वेगाने दुसरी सुरुवात करता. आता, आता निकाल धरून ठेवण्याची वेळ आली आहे.
मित्रांनो,
देश जेव्हा 2047 चे उद्दिष्ट ठेवून 'विकसित भारत'च्या पथदर्शी प्रकल्पावर काम करत आहे, तेव्हा मला वाटते की हा स्टार्ट-अप महाकुंभ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या दशकांमध्ये, आपण पाहिले आहे की भारताने माहिती तंत्रज्ञान आणि संगणक आज्ञावली क्षेत्रात आपला ठसा कसा उमटवला आहे. आता, आपण भारतात नवोन्मेष आणि स्टार्ट-अप संस्कृतीचा कल सातत्याने वाढत असल्याचे पाहत आहोत. त्यामुळेच, या महाकुंभातल्या स्टार्ट-अप्सच्या जगात आपल्या सर्वांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. मी याबाबत विचार करत असताना, मला नवल वाटले की स्टार्ट-अप्स कशामुळे यशस्वी होतात, ते का यशस्वी होतात आणि त्यांच्यात प्रतिभेचा असा कोणता घटक आहे जो त्यांना यशाच्या दिशेने नेतो. मग माझ्या मनात एक विचार आला: तुम्ही सर्वजण ठरवा की माझे बरोबर आहे की चुक. तुमच्या पथकाने हे आयोजन केले आहे. कारण सहसा, औद्योगिक किंवा व्यावसायिक जगात कोणताही निर्णय सरकारशी संबंधित असतो आणि जेव्हा तो सरकारशी संबंधित असतो तेव्हा सहसा पाच वर्षांचा कालावधी असतो. या दिशेने प्रगतीला हळूहळू सुरुवात होत आहे. म्हणूनच, व्यावसायिकांना अनेकदा असे वाटते की, "हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे, चला वाट पाहूया. निवडणुका संपल्यानंतर, नवीन सरकारचे काय होते ते आपण पाहूया." असेच आहे ना? आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. असे असतानाही, तुम्ही एवढं मोठा कार्यक्रम आयोजित करत आहात. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की पुढील पाच वर्षांत काय घडणार आहे. आणि मला विश्वास आहे की तुमच्यात खोलवर रुजलेली हीच प्रतिभा स्टार्ट-अप यशस्वी बनवते.
येथे, आपल्याकडे गुंतवणूकदार आहेत, इन्क्यूबेटर आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, संशोधक आहेत, गरजेच्या अनुषंगाने उद्योजक आहेत, हा खऱ्या अर्थाने एक महाकुंभ आहे. येथे, आपल्याकडे तरुण उद्योजक आणि भविष्यातील उद्योजक दोघेही आहेत. आणि तुमच्यामध्ये जशी प्रतिभा आहे, तशीच ती माझ्यामध्येही आहे. आणि मी ती ओळखू शकतो; मी येथे भविष्यातील उद्योजकांना पाहू शकतो. अशा वातावरणात, ही ऊर्जा, हा उत्साह खरोखरच उल्लेखनीय आहे. जेव्हा मी मंच आणि प्रदर्शन स्टॉल्सजवळून जात होतो तेव्हा मला हा उत्साह जाणवत होता. आणि थोड्या अंतरावर काहीजण घोषणा देत होते. प्रत्येकजण त्यांच्या नवोन्मेषांचे मोठ्या अभिमानाने प्रदर्शन करत होते. येथे येताना, कोणत्याही भारतीयाला असे वाटेल, की ते फक्त आजच्या स्टार्ट-अप्सचे साक्षीदार नाहीत तर उद्याचे लघु स्टार्ट-अप आणि बृहद स्टार्ट-अपदेखील पाहत आहेत.
मित्रांनो,
भारत आज जर जागतिक स्टार्ट-अप क्षेत्रात एक नवीन आशा, एक नवीन सामर्थ्य म्हणून उदयास आला आहे, तर त्याच्या मागे एका विचारपूर्वक केलेल्या दृष्टिकोनाचे पाठबळ आहे. भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आहेत आणि योग्य वेळी स्टार्ट-अपवर काम सुरू केले आहे. आता, तुम्ही ही शिखर परिषद मोठ्या प्रमाणात आयोजित केली आहे. पण जेव्हा "स्टार्ट-अप" हा शब्दही सुरू झाला नव्हता, तेव्हा मी एक शिखर परिषद आयोजित केली होती. विज्ञान भवनातील सभागृह जेमतेम अर्धे भरलेले होते. सरकारे करतात तसे आम्हीही जागा भरली. ही अंतर्गत बाब आहे; बाहेर चर्चा करू नका. मी देशभरातून आलेल्या तरुणांच्या उपस्थितीत स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया सारखे उपक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. मला तरुणांसाठी एक आकर्षण, संदेश निर्माण करायचा होता, म्हणून पुढाकार घेतलेल्या काही लोकांचा देशभर शोध घेण्यात आला. जर कोणी देशाच्या कोणत्याही भागात काही करत असेल तर तिथे लक्ष द्या. मी 5-7 लोकांना बोलावले आणि त्यांना सांगितले होते की, "तिथे भाषण द्या; माझे कोणीही ऐकणार नाही." आता ते माझे ऐकतात, पण मी त्या कालावधीबद्दल बोलत आहे. तर, मला त्या कार्यक्रमात एका मुलीने तिचा अनुभव सांगताना स्पष्टपणे आठवते. कदाचित ती इथे बसली असेल; पण मी ते खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. ती मूळची बंगालची आहे आणि तिच्या पालकांनी तिला चांगले शिक्षण दिले आहे. तिने तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, "माझे पालकही सुशिक्षित आहेत. म्हणून, मी घरी गेल्यावर माझ्या आईने विचारले की, मी काय करत आहे?" ती तिचे शिक्षण पूर्ण करून घरी परतली होती. म्हणून, तिने उत्तर दिले, "मी एक स्टार्ट-अप सुरू करणार आहे." मग तिची आई, बंगाली असल्याने, म्हणाली, "हे दुर्भाग्यपूर्ण आहे, अत्यंत वाईट!" म्हणजे, स्टार्ट-अप म्हणजे केवळ आपत्ती मानली जायची. आणि तिथून, हा प्रवास सुरू झाला आणि आपण त्याचे एक उदाहरण येथे पाहत आहोत. स्टार्ट-अप इंडिया मोहिमेअंतर्गत देशाने नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्यांना निधी स्रोतांशी जोडले. शैक्षणिक संस्थांमध्ये इनक्यूबेटर स्थापन करण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली. बालवाडीप्रमाणे, आम्ही अटल चाचणी प्रयोगशाळा सुरू केली. तिथून आम्ही प्रगतीचा टप्पा गाठला आणि इनक्यूबेटर केंद्रे उदयास येऊ लागली. आम्ही प्रगती केली आणि 2- श्रेणी, 3- श्रेणी शहरांमधील तरुणांसाठी कल्पना रुजवण्याची सुविधा देखील सुरू झाली. आज संपूर्ण देश अभिमानाने म्हणू शकतो की आपली स्टार्ट-अप परिसंस्था फक्त मोठ्या महानगरांपुरती मर्यादित नाही. आणि हे आत्ताच एका लघुपटातही दाखवण्यात आले आहे. ती देशातील 600 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे. याचा अर्थ असा की, एक सामाजिक संस्कृती स्थापित झाली आहे. आणि एकदा सामाजिक संस्कृती तयार झाली की ती थांबण्याचे कोणतेही कारण नाही. ती नवीन उंची गाठत आहे. आज, भारतातील स्टार्ट-अप क्रांतीचे नेतृत्व देशातील लहान शहरांमधील तरुण करत आहेत. काही जणांना वाटते की आपले स्टार्ट-अप फक्त तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापुरते मर्यादित आहेत. परंतु मला हे पाहून आनंद झाला की आज शेती, कापड, औषध, वाहतूक, अवकाश आणि अगदी योगामध्येही स्टार्ट-अप सुरू झाले आहे. आयुर्वेदातही स्टार्ट-अप सुरू झाले आहेत. आणि केवळ एक-दोन नाही; तर मलाही यात थोडीसा रस आहे, मी त्यांना 300-400 च्या संख्येने पाहतो. आणि प्रत्येकात काहीतरी नवीन आहे. कधीकधी मला असा प्रश्न पडतो की मी करत असलेला योग चांगला आहे की स्टार्ट-अप विश्वातील एखाद्याने सुचवलेला जास्त चांगला आहे.
मित्रांनो,
अवकाश सारख्या क्षेत्रात, जिथे आपण अलीकडेच लक्ष केंद्रित केले आहे... मुळातच, सरकारमध्ये अडथळे निर्माण करण्याची प्रवृत्ती असते आणि माझे संपूर्ण प्रयत्न हे अडथळे ओलांडण्यासाठी असतात. अवकाश क्षेत्रात, भारतीय स्टार्ट-अप्स 50 हून अधिक क्षेत्रांमध्ये खूप चांगले काम करत आहेत. आणि आधीच, आपल्या स्टार्ट-अप्सनी इतक्या अल्प कालावधीत उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली आहे.
मित्रांनो,
आज जग भारताच्या युवाशक्तीची क्षमता पाहत आहे. या क्षमतेवर विश्वास ठेवून, देशाने स्टार्ट-अप परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीला या प्रयत्नांवर विश्वास ठेवणारे फार कमी लोक होते. याठिकाणी, शिक्षणाचा अर्थ नोकऱ्यांपुरता मर्यादित होता आणि नोकऱ्यांचा अर्थ फक्त सरकारी नोकरी असा होता. तो फक्त एवढ्यापुरता मर्यादित होता. मी पूर्वी बडोदा (वडोदरा) मध्ये राहत होतो आणि महाराष्ट्रीय कुटुंबांशी माझे जास्त संबंध होते. त्यापैकी एक गायकवाड इस्टेट आहे. आमचे काही मित्र गमतीने म्हणायचे, "जर मुलगी मोठी झाली तर घरी फक्त तिच्या लग्नाची चर्चा सुरु होते. मुलगा खूप चांगला आहे आणि त्याला सरकारी नोकरी देखील आहे. त्यामुळे, मुलीला लग्नासाठी योग्य मानले जात असे." आज, संपूर्ण मानसिकता बदलली आहे. पूर्वी, जेव्हा कोणी व्यवसाय सुरू करण्याबद्दल बोलायचे तेव्हा या कल्पनेबाबत मनात चिंता नसे तर पैसे कुठून आणायचे याबद्दल असायची. सुरुवातीला चिंता ही पैशांच्या कमतरतेबद्दल होती. तेव्हा असा समज होता की ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच व्यवसाय सुरू करू शकतात. ही धारणा आता बदलली आहे. स्टार्ट-अप परिसंस्थेने ती मानसिकता मोडून काढली आहे. आणि अशा गोष्टींमधूनच देशात क्रांती घडते.
देशातील युवकांनी नोकऱ्या शोधण्याऐवजी नोकऱ्या निर्माण करण्याचा मार्ग निवडला आहे. जेव्हा देशाने स्टार्ट-अप इंडिया मोहीम सुरू केली तेव्हा तरुणांनी त्यांच्या क्षमता दाखवून दिल्या. आज, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था आहे. 2014 मध्ये जिथे फक्त 100 स्टार्ट-अप होते, तिथे आज भारतात सुमारे 1.25 लाख नोंदणीकृत स्टार्ट-अप आहेत, ज्यायोगे जवळजवळ 1.2 दशलक्ष तरुणांना थेट जोडले जाते. आमच्याकडे 110 हून अधिक लघु स्टार्ट-अपआहेत आणि आपल्या स्टार्ट-अप्सनी जवळजवळ 12,000 पेटंट दाखल केले आहेत. असे अनेक स्टार्ट-अप आहेत ज्यांना पेटंटचे महत्त्व अद्याप कळलेले नाही. आत्ताच, मी एका व्यक्तीला भेटलो आणि माझा पहिला प्रश्न होता, "तुम्ही पेटंट मिळवले आहे का?" तो म्हणाला, "अजून नाही, ते प्रक्रियेत आहे." माझी कळकळीची विनंती आहे की ते कामसुद्धा सोबत सुरू करा. कारण आज जग इतक्या वेगाने बदलत आहे, कोण पुढाकार घेऊन जाईल हे तुम्हाला कधीच कळणार नाही. देश त्यांना कसे हाताशी धरून आहे याचे आणखी एक उदाहरण म्हणजे GeM पोर्टल. तुम्ही ते येथे देखील पाहू शकता. आज, या स्टार्ट-अप्सनी केवळ GeM पोर्टलद्वारे 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. याचा अर्थ असा की सरकारने एक असे व्यासपीठ तयार केले आहे जिथे 20-22 वर्षे वयोगटातील तरुण इतक्या कमी वेळात 20,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकले आहेत. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.
तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात की आजची युवा पिढी डॉक्टर आणि अभियंते बनण्याची आकांक्षा बाळगत यासोबतच नवोन्मेषक बनण्याचे आणि स्वतःचे स्टार्ट-अप सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मला माहित आहे की त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभेच्या आणि प्रशिक्षणाच्या बळावर ते स्टार्ट-अप्सच्या माध्यमातून नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहेत. आज, मी पाहतो की तरुण त्यांच्या स्टार्ट-अप्सच्या मदतीने वेगवेगळ्या क्षेत्रात कसे झळकत आहेत आणि मला खात्री आहे की 2029 च्या निवडणुकीत किमान 1000 स्टार्ट-अप्स असतील ज्यांच्या सेवा राजकीय पक्षांकडून घेतल्या जातील. ते असे नवोन्मेष आणतील आणि त्यांना असेही वाटेल की हो, पोहोचण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, हा सुलभ मार्ग आहे. दुसऱ्या शब्दांत, मी जे सांगू इच्छितो ते असे आहे की सेवा क्षेत्र असो, दळणवळण क्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात तरुण नवीन कल्पना मांडत आहेत. कमीत कमी गरजांसह ते कामगिरी पार पाडत आहेत. आणि मला वाटते की यामुळे त्यांचे सामर्थ्य खूप वाढीला लागले आहे. अन्न आणि पेय पदार्थांमधील पारंपारिक गोष्टी कशा प्रगती करत आहेत हे मी आज पाहिले आहे, वैद्यकीय उपकरणे अशा प्रकारे बनवली जात आहेत की तुम्ही स्वतःचे आरोग्य सहजपणे तपासू शकता. काही जण समाज माध्यमांच्या जागतिक दिग्गजांशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहेत. ही स्वप्ने आहेत, हीच भावना आहे आणि हीच शक्ती आहे, म्हणूनच लोक म्हणतात की, "मी हे करेन." एका अर्थाने, मी असे म्हणू शकतो की काही वर्षांपूर्वी देशाने धोरणात्मक व्यासपीठावर सुरू केलेले स्टार्ट-अप यशाच्या नवनवीन उंची गाठत आहे.
मित्रांनो,
देशाच्या डिजिटल इंडिया मोहिमेतून स्टार्ट-अप्सना महत्त्वपूर्ण मदत मिळाली आहे आणि विद्यापीठांनी याचा सखोल अभ्यास करावा असे माझे मत आहे. ही स्वतःच एक मोठी अंतःप्रेरणा आहे. आपल्या फिनटेक स्टार्ट-अप्सना युपीआय चा खूप लाभ झाला आहे. भारतात नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा विकसित झाल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल सुविधांचा विस्तार झाला आहे. आणि माझ्या मित्रांनो, तुम्हाला माहित नाही की आपण कुठे आहोत, कारण आपण आपले दैनंदिन जीवन जगत आहोत आणि अनेकदा याबाबत अनभिज्ञ राहतो. पण जी-20 शिखर परिषदे दरम्यान, मी ते पाहिले. आम्ही एक बूथ उभारला होता जिथे तुमचे प्रदर्शन आता भरवले जात आहे. तिथे, आम्ही युपीआय कसे कार्य करते याचे प्रात्यक्षिक दाखवले. आम्ही त्याच्या चाचणीसाठी त्यांना एक हजार रुपये देत होतो. प्रत्येक दूतावासाने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या बूथला किमान एकदा भेट देण्याच्या आग्रह केला. युपीआय म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या लांब रांगा असायच्या आणि त्यांच्यासाठी हे एक आश्चर्य होते. आमच्या गावातील भाजी विक्रेता देखील आता युपीआय द्वारे सहजतेने पेमेंट स्विकारू शकतो.
मित्रांनो,
यामुळे देशातील आर्थिक समावेशन बळकट झाले आहे आणि ग्रामीण-शहरी दरी कमी झाली आहे. सुरुवातीला जगभरात याबद्दल चिंतेचे वातावरण होते! जेव्हा डिजिटल प्रगती सुरू झाली तेव्हा "आहे रे आणि नाही रे" हा सिद्धांत त्याच्याशी जोडला गेला. चर्चा सामाजिक दरीबद्दल होती. भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे, म्हणून "आहे रे आणि नाही रे" हा सिद्धांत येथे तग धरू शकत नाही. सर्वांसाठी येथे सर्व काही उपलब्ध आहे. आज शेती असो, शिक्षण असो किंवा आरोग्य असो, स्टार्ट-अपसाठी नवीन संधी उदयास येत आहेत. मला हे देखील नमूद करताना आनंद होत आहे की आपल्या स्टार्ट-अपपैकी 45 टक्क्यांहून अधिक स्टार्ट-अप्सचे नेतृत्व 'नारी शक्ती' (महिला शक्ती) करत आहे. स्टार्ट-अप्सचा प्रभाव किती असेल याचा अंदाज लावता येत नाही. हा देशासाठी एक अतिरिक्त फायदा आहे. आपल्या मुली अत्याधुनिक नवोपक्रमाद्वारे देशाला समृद्धीकडे घेऊन जात आहेत.
मित्रांनो,
नवोन्मेषाची संस्कृती केवळ 'विकसित भारत'च्या विकासासाठीच नाही तर संपूर्ण जगाच्या चांगल्या भविष्यासाठी देखील आवश्यक आहे. आणि मी हे जबाबदारीच्या महत्वाच्या भावनेने सांगतो, मी जगाच्या चांगल्या भविष्याबद्दल बोलत आहे आणि मला केवळ माझ्याच नाही तर तुमच्या क्षमतांवर विश्वास आहे. भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात आपले दृष्टिकोन रोखठोकपणे मांडले. जी-20 शिखर परिषद येथेच आयोजित करण्यात आली होती. कोविड नंतर जगाला कुठे घेऊन जायचे यावर चर्चा करण्यासाठी जगातील सर्व नेते एकत्र आले होते. आणि या व्यासपीठावर बसलेले माझ्या देशाचे तरुण मन आहे, जे 2047 चा मार्ग निश्चित करत आहे. स्टार्टअप-20 उपक्रमांतर्गत, भारतने जगभरातील स्टार्ट-अप परिसंस्थांना एकत्र आणण्यासाठी याच भारत मंडपममध्ये प्रयत्न केले आहेत. स्टार्ट-अप्सना जी-20च्या दिल्ली घोषणेमध्येच समाविष्ट केले गेले नाही तर त्यांना 'विकासाचे नैसर्गिक इंजिन' म्हणून देखील ओळखले गेले. मी तुम्हाला जी-20चा हा दस्तऐवज पाहण्याचा नक्कीच आग्रह करेन. ते आपण कोणत्या पातळीवर पोहोचलो आहोत हे दर्शवते. आता आपण एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाशी जोडलेल्या एका नवीन युगात आहोत. आणि एआय म्हणजे भारताचा असलेला वरचष्मा हे आज जग मान्य करते. जगाने हे मान्य केलेच आहे. आता, आपण संधी गमावू नये हे आपले काम आहे. आणि मला आजकाल एआयकडून खूप मदत मिळत आहे. कारण मला माहित आहे की निवडणूक प्रचारादरम्यान मला भाषेच्या अडचणींचा सामना करावा लागतो, म्हणून मी तामिळ, तेलगू आणि ओडिया भाषेतही माझा संदेश देण्यासाठी एआयचा वापर करत आहे. जेव्हा तुमच्यासारखे तरुण हे काम करतात तेव्हा माझे कामही पूर्ण होते. पूर्वी कोणीतरी माझे ऑटोग्राफ मागताना मी पाहायचो, नंतर ते हळूहळू फोटो मागू लागले आणि आता ते सेल्फी मागतात. आता ते तिन्ही मागतात - एक सेल्फी, एक ऑटोग्राफ आणि एक फोटो. आता काय करायचे? म्हणून मी एआयची मदत घेतली. मी माझ्या नमो ॲपवर एक प्रणाली कार्यरत केली आहे. जर मी येथून जात असेन आणि तुमच्या चेहऱ्याची एक झलक कुठेतरी दिसली, तर तुम्ही एआयच्या मदतीने असा फोटो काढू शकता की तुम्ही मोदींसोबत उभे आहात. जर तुम्ही मंडळी नमो ॲपवर गेलात तर तिथे एक फोटो बूथ आहे आणि तुम्हाला तेथून तुमचा फोटो मिळेल. मी येथून जात असताना तुमचा फोटो आला असेल.
मित्रांनो,
म्हणूनच, कृत्रिम बुद्धिमत्तेने भारतातील तरुण गुंतवणूकदारांसाठी आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी असंख्य समान नवीन संधी आणल्या आहेत. राष्ट्रीय क्वांटम मिशन, भारत एआय मिशन आणि सेमीकंडक्टर मिशन; या सर्व मोहिमा भारतातील तरुणांसाठी शक्यतांचे नवे दरवाजे उघडतील. काही महिन्यांपूर्वीच, मला अमेरिकन काँग्रेसला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जिथे मी एआयबद्दल बोललो होतो. मी सांगितले की एआय जगाचे भविष्य ठरवण्यासाठी पुरेसे शक्तिशाली होत आहे. म्हणून, त्यांना जे काही लक्षात आले त्यावरून टाळ्यांचा तितकाच कडकडाट झाला. मग मी म्हणालो, एआयची माझी व्याख्या म्हणजे अमेरिका-भारत, आणि संपूर्ण प्रेक्षगारातील सर्वजण उभे राहिले.
मित्रांनो,
पण मी ते तिथल्या राजकीय संदर्भात म्हटले होते, पण आज माझा ठाम विश्वास आहे की एआयची क्षमता, त्याचे नेतृत्व भारताच्या हातातच राहील आणि राहिले पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की जागतिक अनुप्रयोगांसाठी भारतीय उपायांची संकल्पना खूप सहाय्यकारी ठरेल. समस्यांवर उपाय शोधणारे भारताचे युवा नवोन्मेषक जगभरातील अनेक देशांना मदत करतील. मी आजकाल प्रयोग करत राहतो. मी जगातील अनेक देशांसह आपल्या देशातील मुलांसाठी हॅकेथॉन आयोजित करतो. तीस ते चाळीस तास, ही मुले ऑनलाइन सहभागी होतात, मिश्र संघ बनवतात, जसे की जर सिंगापूर-भारत संघ असेल तर सिंगापूर आणि भारतातील मुले एकत्र समस्या सोडवतात. मी पाहिले आहे की भारतीय मुलांसोबत हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे जगभरात मोठे आकर्षण आहे. मग मी त्यांना सांगतो की, "तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेणार नाही". यावर ते म्हणतात की, "जरी आपण त्यांच्याशी जुळवून घेतले नाही तरी आपण काहीतरी शिकू." खरं तर, भारतात जे काही नवोन्मेष वापरून पाहिले जातात ते जगातील प्रत्येक भूगोल आणि लोकसंख्याशास्त्रात यशस्वी होईल कारण आपल्याकडे सर्व प्रकारच्या परिस्थिती आढळून येतात. तुम्हाला येथे वाळवंट, पूरग्रस्त भाग, मध्यम पाऊस असलेली क्षेत्र सापडतील, म्हणजेच सर्व प्रकारच्या परिस्थिती येथे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच येथे जे यशस्वी होते ते जगात कुठेही यशस्वी होऊ शकते.
मित्रांनो,
भारत या संदर्भात आगामी नियोजन पद्धतीने सतत पुढे जात आहे. देशाने अब्जावधी रुपयांचे राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही काही काळापूर्वी घेतलेला निर्णय. आणि आम्ही दिलेला अंतरिम अर्थसंकल्प पाहिला असेल, कारण आपल्या देशात काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी लोकांकडे वेळ नाही कारण त्यांचा वेळ अनावश्यक बाबींमध्ये वाया जातो. मी परत येईन तेव्हा पूर्ण अर्थसंकल्प येणार असल्याने, या अंतरिम अर्थसंकल्पात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील प्रत्येक तरुणाला हे कळावे असे मला वाटते की संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे 'सन -राईज तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये' दीर्घकालीन संशोधन प्रकल्पांना मदत होईल. भारताने डिजिटल डेटा संरक्षणासाठी उत्कृष्ट कायदे देखील केले आहेत. स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलले जात आहे. आता निधीसाठी एक चांगली यंत्रणा तयार करण्यासाठी देखील देश प्रयत्न करत आहे.
मित्रांनो,
यशस्वी होणाऱ्या स्टार्ट-अप्सवरही आज मोठी जबाबदारी आहे. तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही या टप्प्यावर पोहोचाल या भावनेने कोणीतरी तुमच्या कल्पनेवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे, तुम्ही एका नवीन कल्पनेला पाठिंबा दिला पाहिजे. कोणीतरी तुमचा हात धरला होता; तुम्हीही दुसऱ्या कोणाचा तरी हात धरला पाहिजे. शैक्षणिक संस्थांमध्ये तरुणांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही मार्गदर्शक म्हणून जाऊ शकत नाही का? समजा तुम्ही दहा चाचणी प्रयोगशाळांची जबाबदारी घ्याल. तुम्ही त्या मुलांशी संवाद साधाल, तुमच्या आणि त्यांच्या कल्पनांवर चर्चा कराल. तुम्ही इनक्युबेशन सेंटरला भेट द्याल. एक तास घालवा, अर्धा तास घालवा; मी पैसे देण्याबद्दल बोलत नाहीये. मित्रांनो, देशातील नवीन पिढीला भेटा, मजा येईल. तुम्ही महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकता कारण तुमच्याकडे सामायिक करण्यासाठी यशोगाथा आहे. तरुण मन ऐकण्यास तयार आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध केले आहे; आता तुम्हाला इतर तरुणांना दिशा दाखवण्याची गरज आहे.
देश प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहे. मी येथे आणखी काही गोष्टी सामायिक करू इच्छितो. ही अशी गोष्ट आहे, जी मी सरकारच्या अंतर्गत चर्चा करतो, माध्यमांमध्ये प्रसिद्ध होईल अशा पद्धतीने नाही. जेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीला आलो तेव्हा मी येथील संस्कृतीशी अनभिज्ञ होतो. मी बाहेरून आलेला होतो. मी नोकरशहांना सांगितले, “पाहा, येथे असे काही विभाग आहेत जे बऱ्याच काळापासून समस्यांशी झुंजत आहेत, गोंधळात अडकले आहेत. तुम्ही लोक प्रयत्न करत आहात, पण कोणताही उपाय निघताना दिसत नाही. अशी क्षेत्रे ओळखा. आणि मी देशातील तरुणांना एक समस्या देईन, त्यांना त्यावर हॅकेथॉन घ्यायला सांगेन आणि मला उपाय सांगावा असं आवाहन करेन.” बरं, आपले नोकरशहा उच्चशिक्षित आहेत, ते म्हणतात, “काही गरज नाही, आमच्याकडे वीस वर्षांचा अनुभव आहे.” मी म्हणालो, “चला, काय नुकसान आहे?” सुरुवातीला, मला खूप विरोध झाला कारण कोणीही आपल्याकडे काही अडथळे आहेत हेच स्विकारण्यास तयार नव्हते, काही साठून राहिलेली क्षेत्र आहेत; कोणीही ते मान्य करण्यास तयार नव्हते; प्रत्येकजण म्हणत होता की सर्वकाही चांगले चालले आहे. मी म्हणालो, "गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत, म्हणूनच मूल्यवर्धन होईल. जर काही चांगले नसेल, तर त्यातून काय चांगले निपजेल हे ते पाहतील, फक्त ते मोकळे होऊ द्या." बरं, अखेर मोठ्या कष्टाने, सर्व विभागांनी माझी विनंती मान्य केली.
जेव्हा मी ठाम राहिलो... खूप प्रयत्नांनंतर, त्यांनी शेवटी कबूल केले की ही एक समस्या आहे. म्हणून जेव्हा मी एकूण संख्या मोजली तेव्हा ती एकूण 400 समस्यांवर आली. आता, मला वाटते की कदाचित त्यांनी 0.1 टक्के देखील उल्लेख केला नसेल. मी देशातील तरुणांसाठी एक हॅकेथॉन आयोजित केला आणि त्यांच्यासमोर या समस्या ठेवल्या. मी सांगितले की, "यावर उपाय शोधा." तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांनी इतके उत्तम उपाय शोधले, मार्ग दाखवले आणि मुलांनी दिले ल्या 70-80 टक्के कल्पनांपैकी अनेक सरकारने स्विकारल्या. मग परिस्थिती अशा तऱ्हेने बदलली की विभाग मला विचारू लागले, "सर, या वर्षी हॅकेथॉन कधी होणार?" त्यांना वाटले की आता येथे उपाय सापडेल. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही मुले खूप गोष्टी शोधतात. आणि हे 18, 20, 22 वर्षांचे तरुण आहेत. आमच्या व्यवसायात सीआयआय, फिक्की, ॲसोचेम मध्ये काम करणाऱ्यांना मी त्यांच्या संबंधित उद्योगांच्या समस्या ओळखण्याचे आवाहन करेन. समस्या ओळखल्यानंतर, त्यांनी स्टार्ट-अप्ससाठी हॅकेथॉन आयोजित करावे. आणि या समस्या त्यांच्यासमोर ठेवाव्यात. मला खात्री आहे की यावर ते तुमच्यासाठी खूप चांगले उपाय सुचवतील. त्याचप्रमाणे, मी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील लोकांना त्यांच्या समस्या ओळखण्याचे आवाहन करतो, तांत्रिक अडचणी असतील, बराच वेळ लागत असेल, उत्पादनात सुरळीतता नसेल, उत्पादनात दोष असेल, अनेक गोष्टी असतील. तुम्ही देशातील विद्यार्थ्यांकडे जा, त्यांचे हॅकेथॉन आयोजित करा. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील लोकांनी स्वतःला आणि सरकारला यात कुठेही स्थान देऊ नये. जर आपण या दोन क्षेत्रात कठोर परिश्रम करायला सुरुवात केली तर देशातील तरुण प्रतिभा अनेक समस्यांवर उपाय शोधून देईल आणि आपल्या तरुण प्रतिभेला अशा क्षेत्राची कल्पना येईल जिथे ते काम करू शकतात. आपण यात जावे आणि माझा विश्वास आहे की स्टार्ट-अप महाकुंभातून काही कृतीयोग्य मुद्दे बाहेर येतील. त्या कृतीयोग्य मुद्द्यांना पुढे घेऊन जाऊया. आणि सध्या पुढील दीड महिना मी थोडा व्यस्त आहे परंतु मी तुम्हाला वचन देतो की त्यानंतर, मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मी फक्त अशी इच्छा करतो की तुम्ही पुढे जा, नवीन स्टार्ट-अप तयार करा, स्वतःला मदत करा, इतरांना मदत करा. नवोन्मेष चालू ठेवा, नवोन्मेषकांना पाठिंबा देत राहा. तुमच्या आकांक्षा भारताच्या आकांक्षा आहेत.
भारताचे 11 व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून 5 व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत रूपांतरण झाले आहे आणि माझ्या देशातील तरुणांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता, मी भारताला आणि जगाला आश्वासन दिले आहे की माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेन. आणि ही झेप घेण्यात, स्टार्ट-अप्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, हे मी पाहू शकतो.
मित्रांनो,
तुम्हा सर्वांशी गप्पा मारणे मला आवडले. तुमचा उत्साह आणि ऊर्जा माझ्यातही जोमाने एक नवीन उर्जा भरते.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद.
* * *
नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184147)
Visitor Counter : 3
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam