ऊर्जा मंत्रालय
भारताने ऊर्जा क्षेत्रात गाठला मैलाचा दगड : ओलांडला 500 गिगावॅट क्षमतेचा टप्पा, तर एकूण मागणीच्या 50% पेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मिती
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2025 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2025
भारताच्या ऊर्जा क्षेत्राने दोन ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत, जे देशाच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने होणाऱ्या निरंतर प्रगतीचे प्रतीक आहेत.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत, देशाची एकूण स्थापित वीज क्षमता 500 गिगावॅट चा टप्पा ओलांडून, 500.89 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. ही कामगिरी ऊर्जा क्षेत्रातील अनेक वर्षांचे दृढ धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.

भारताच्या वीज क्षमतेचे विभाजन
- गैरजीवाश्म इंधन स्रोत (नवकरणीय ऊर्जा, जलविद्युत आणि अणुऊर्जा): 256.09 गिगावॅट - एकूण क्षमते पैकी 51% पेक्षा अधिक.
- जीवाश्म-इंधन-आधारित स्रोत: 244.80 गिगावॅट - एकूण वीज मागणीच्या सुमारे 49%.
- नवीकरणीय ऊर्जेतील प्रमुख घटक:
- सौर ऊर्जा - 127.33 गिगावॅट
- पवन ऊर्जा - 53.12 गिगावॅट
2025-26 (एप्रिल - सप्टेंबर 2025) या आर्थिक वर्षात, भारताने 28 गिगावॅट गैर-जीवाश्म क्षमता आणि 5.1 गिगावॅट जीवाश्म-इंधन क्षमता जोडली - स्वच्छ ऊर्जेचा वाटा किती वेगाने वाढत आहे, याचे हे निदर्शक आहे.
नवीकरणीय ऊर्जेसाठी एक विक्रमी दिवस
29 जुलै 2025 रोजी, भारताने इतिहासातील सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा वाटा गाठला.
या दिवशी, देशाच्या एकूण 203 गिगावॅट वीज मागणीच्या 51.5% वीज नवीकरणीय ऊर्जेतून निर्मित झाली.
- सौर ऊर्जा निर्मिती: 44.50 गिगावॅट
- पवन ऊर्जा निर्मिती: 29.89 गिगावॅट
- जलविद्युत निर्मिती: 30.29 गिगावॅट
याचा अर्थ असा की, इतिहासात पहिल्यांदाच, भारताताने एका दिवशी निम्म्याहून अधिक वीज हरित स्रोतांमधून निर्माण केली, ही देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाची महत्त्वपूर्ण पायरी आहे.
राष्ट्रीय उद्दिष्टे नियोजित वेळेपूर्वी साध्य
या प्रगतीमुळे, भारताने ‘कॉप 26’ च्या ‘पंचामृत’ उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे लक्ष्य - 2030 पर्यंत एकूण वीज क्षमतेपैकी 50 % स्थापित विद्युत ऊर्जा क्षमता गैर जीवाश्म इंधन स्रोतांपासून साध्य करणे, हे उद्दिष्ट नियोजित वेळेपेक्षा पाच वर्षे आधीच साध्य केले आहे.
ही कामगिरी भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील जागतिक नेतृत्वाची साक्ष देते, ज्यात वीज ग्रिडची स्थिरता आणि विश्वासार्हता कायम राखण्यात यश मिळाले आहे.
या यशाचे महत्त्व
भारताच्या नवीकरणीय ऊर्जा उपक्रमामुळे उत्पादन, प्रतिष्ठापन, देखभाल आणि नवोन्मेष क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत - ज्याचा ग्रामीण आणि शहरी युवकांना थेट लाभ होत आहे.
सामूहिक प्रयत्नांचे फलित
ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) यांनी या ऐतिहासिक कामगिरीसाठी सर्व वीज निर्मिती कंपन्या, ट्रान्समिशन युटिलिटीज, सिस्टम ऑपरेटर आणि राज्य संस्थांचे अभिनंदन केले आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184006)
आगंतुक पटल : 42