पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

Posted On: 26 OCT 2025 10:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2025

 

22 वी आसियान-भारत शिखर परिषद 26 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. पंतप्रधान आणि आसियान नेत्यांनी आसियान-भारत संबंधांमधील प्रगतीचा संयुक्तपणे आढावा घेतला आणि सर्वंकष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या उपक्रमांवर चर्चा केली. पंतप्रधानांचा भारत-आसियान शिखर परिषदेतील हा 12 वा सहभाग होता.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी, तिमोर लेस्ते या देशाचे, आसियानचे 11 वे सदस्य राष्ट्र बनल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, आसियानचे पूर्ण सदस्य म्हणून त्यांच्या पहिल्या आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी झालेल्या शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि भारताकडून त्यांच्या मानवी विकासासाठी सतत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आसियान एकता (ASEAN Unity), आसियान महत्त्व (ASEAN Centrality) आणि हिंद-प्रशांत क्षेत्रावरील आसियान दृष्टिकोन  यांना भारताच्या असलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार करत, पंतप्रधानांनी आसियान समुदाय संकल्प 2045 (ASEAN Community Vision 2045) स्वीकारल्याबद्दल आसियानचे अभिनंदन केले.

आसियान-भारत मुक्त व्यापार कराराचा लवकर आढावा घेतल्यास दोन्हीकडील जनतेच्या हितासाठी, परस्पर संबंधांची पूर्ण आर्थिक क्षमता खुली होऊ शकते आणि प्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत होऊ शकते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

दहशतवाद हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान आहे असे सांगत, पंतप्रधानांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात एकजूट राखण्याच्या महत्वावर भर  दिला.

मलेशियाच्या अध्यक्षतेखालील "समावेशकता आणि शाश्वतता" या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत, पंतप्रधानांनी खालील घोषणा केल्या:

  • आसियान-भारत सर्वंकष धोरणात्मक भागीदारी (2026-2030) लागू करण्यासाठीच्या आसियान-भारत कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वाढीव सहकार्य.
  • आसियान-भारत पर्यटन वर्ष साजरे करत असताना, पर्यटन सहकार्य मजबूत करण्यासाठी शाश्वत पर्यटनावर आधारित आसियान-भारत नेत्यांचे संयुक्त निवेदन  स्वीकारणे.
  • नील  अर्थव्यवस्थेमधील ('ब्ल्यू इकॉनॉमी') भागीदारी वाढवण्यासाठी  2026 हे वर्ष "आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष" (ASEAN-India Year of Maritime Cooperation) म्हणून घोषित करणे.
  • सुरक्षित सागरी वातावरणासाठी दुसरी आसियान-भारत संरक्षण मंत्र्यांची बैठक आणि दुसरा आसियान-भारत सागरी सराव आयोजित करण्याचा प्रस्ताव.
  • आपत्कालीन परिस्थितीत प्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून आपली भूमिका, भारत शेजारच्या प्रदेशात सुरू ठेवेल आणि आपत्ती निवारणासाठीची तयारी तसेच HADR (मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण) मध्ये सहकार्य अधिक बळकट करेल.
  • आसियान उर्जा जाळे (पॉवर ग्रिड) उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी नवीकरणीय  ऊर्जा  क्षेत्रात 400 व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे.
  • तिमोर लेस्ते साठी, तात्काळ प्रभाव निर्माण करणाऱ्या प्रकल्पांचा   विस्तार करणे.
  • प्रादेशिक नैपुण्य विकसित करण्यासाठी नालंदा विद्यापीठात आग्नेय आशियाई अध्ययन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव
  • शिक्षण, ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आर्थिक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक जतन या क्षेत्रांतील विद्यमान सहकार्याला पाठिंबा देणे, तसेच पायाभूत सुविधा, अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर), उदयोन्मुख तंत्रज्ञान, दुर्मिळ धातू आणि खनिजे यांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देणे.
  • गुजरातच्या लोथल येथे पूर्व आशिया संमेलन सागरी वारसा महोत्सव (East Asia Summit Maritime Heritage Festival) आणि सागरी सुरक्षा सहकार्यावर परिषद आयोजित करणे.

22 वी आसियान-भारत शिखर परिषद दूरदृश्य पद्धतीने घेत परिस्थितीशी जुळवून घेणारे आयोजन केल्याबद्दल आणि बैठकीसाठी उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल, पंतप्रधानांनी मलेशियाचे पंतप्रधान दातो' सेरी अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. तसेच, फिलिपाइन्सने दुसऱ्या देशांशी प्रभावी समन्वय राखल्याबद्दल अध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांचेही आभार मानले.आसियान नेत्यांनी, आसियानला भारताचा दीर्घकाळचा पाठिंबा आणि पूर्वेकडील देशांना प्राधान्य ('Act East Policy') या धोरणा द्वारे या प्रदेशासोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या निरंतर वचनबद्धतेबद्दल, भारताची  प्रशंसा  केली.

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182736) Visitor Counter : 191